प्रेझेंट

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

हितगूज
आयुष्यात नकारात्मक घटना घडत असतात. या घटनांमुळे आपण खचून जातो. योग्य वेळेत आपण यातून बाहेर पडलो नाही तर स्वास्थ्यावर देखील याचा परिणाम होतो. त्यामुळे नकारात्मक घटनांमध्ये आपल्या भावभावनांचे नियोजन कसे करायला हवे? सकारात्मक दृष्टिकोन कसा वाढवायला हवा? याविषयी...

अमोल सावकाश पावलांनी सुजयच्या खोलीत आला तेंव्हा रात्रीचे १२ वाजून गेले होते. खिडकीतून येणारा चंद्रप्रकाश आणि मंद वारा. पलंगावर गाढ झोपलेला अठरा वर्षांचा सुजय, एखाद्या लहान बाळासारखा वाटला त्याला निष्पाप..निरागस. पलीकडे काही अंतरावर टेबलावर सुजयने नुकतेच पूर्ण केलेलं पेंटिंग. वडिलांना म्हणजेच अमोलला त्यांच्या वाढदिवसा निमित्त प्रेझेंट देण्यासाठी..शेजारी पॅकिंगचा चकचकीत कागद.. अमोलनं सुजयच्या अंगावरचं पांघरूण सारखं केलं.. हातातलं पत्र आणि नवीन मोबाईल त्याच्या उशाशी ठेवला..पत्रात लिहिलं होतं

प्रिय सुजय, अभिनंदन खूप छान मार्क्‍स मिळाल्याबद्दल..आणि सर्वच बाबतीत छान प्रगती केल्याबद्दल..यात तुझी बदललेली वागणूक आलीच. उद्या तू मला वाढदिवसाचं प्रेझेंट म्हणून दरवर्षी प्रमाणे तू केलेलं पेंटिंग देशीलच .. पण तुझी उन्नतीकडे नेणारी वागणूक हे माझ्यासाठी खरं प्रेझेंट आहे..पाय घसरता घसरता तू सावरलास. त्यात तू माझ्या सूचनांचा सकारात्मक दृष्टिकोन बाळगून केलेला स्वीकार होताच पण तू स्वत: केलेले प्रयत्न जास्त महत्त्वाचे होते...तुझ्यासाठी तुला हवा आहे तो स्मार्टफोन घेतला आहे. मला आता खात्री आहे. त्याचा तू पुरेपूर आणि चांगला उपयोग करशील. तंत्रज्ञानाचा चांगला वापर केला तर ते वरदान आहे. नाहीतर शाप.. हे तुला निश्‍चित पटले आहे याची मला आता खात्री पटलीये, आणि हो तुझे आभारही मानायचेत मला.. फोन आणि संगणकातल्या अनेक गोष्टी तू मला शिकवल्याबद्दल.. माझ्या पिढीनंही आता अपडेट व्हायला हवं हे मला पटलंय .. थॅंक्‍स अलॉट,  बाळा..मोठा हो ..आनंदी आणि समाधानी हो.. आणि मुख्य म्हणजे एक चांगला माणूस आणि नागरिक हो.. खूप मोठा हो बाळा..उंच उड ..उंच भरारी घे..इतकी उंच की आकाशही अपुरं वाटावं..

- तुझा मित्र आणि 
(नात्याने वडील) बाबा

सकाळी अमोल नेहमीप्रमाणे व्यायामासाठी जाऊन परतला तेंव्हा त्याच्या खोलीत टेबलावर ठेवलेलं छान पॅकिंग केलेलं पेंटिंग होतं आणि सोबत सुजयचं पत्र
प्रिय बाबा, हॅपी बर्थ डे. तुमचं पत्र वाचलं. मला भरून आलं. फोन खूप छान आहे.. मला हवा तोच..थॅंक्‍स..रडू आलं कारण सहा महिन्यांपूर्वीचा पाय घसरू शकेल अशा अवस्थेतला असा मी आणि आजचा मी यात खूप फरक पडलाय तो तुमचं ऐकल्यामुळे..मी तेही दिवस विसरणार नाही .. मला आठवतंय, एसएससीला मेरीटमधे आलेला मी कॉलेजमधे गेल्यावर पूर्ण बदलून गेलो..नको त्या मित्रांच्या नादाने नको त्या गोष्टी करायला लागलो..रात्र रात्र बाहेर राहायचो..घरात असलो तरी सतत तीन तीन वाजेपर्यंत सोशल साइट्‌स वर फालतू चॅटिंग..नको त्या गोष्टी, चित्र, फिल्म पाहणं..वाटेल तसे पैसे मागणं..उधळणं..एखाद्या दु:स्वप्नाप्रमाणे ते दिवस होते. तुम्हाला आणि आईला खूप त्रास दिला मी. पहिल्या सेमिस्टरला अपेक्षितपणे फेल झालो अन त्या स्वप्नातून जागा झालो..तुम्ही खूप समजावलंत. कधी ही मारलं नाही, की स्वत:चा तोल जाऊ दिला नाही. सोसायटीतल्या तेजसला त्याच्या बाबांनी मारलं..घराबाहेर काढलं.पण तुम्ही शांतपणे मला सरांकडे घेऊन गेलात. माझ्या चुका मला कळतील, पटतील असे सगळे उपाय केलेत. वास्तवाची सतत जाणीव करून दिलीत.रागावलात पण प्रेमानं पोटाशीही धरलंत.मला तुमच्याजवळ मोकळं होऊ दिलंत.माझी अस्वस्थता समजून घेतलीत.तुमच्या कुशीत मोकळं होऊ दिलंत आणि आज मी पुन्हा योग्य मार्गावर आहे. मी पुन्हा परीक्षेत पहिला आलोय. त्याचं सगळं श्रेय सरांना आणि बाबा तुम्हाला आहे. बाबा तुम्ही लहानपणापासून माझ्याशी जे वागलात ते मला आज सांगावसं वाटतं.. माझा पाय घसरला पण माणसं चुका करतात तशी सावरूही शकतात हा विश्वास तुम्ही मला दिलात. लहानपणापासून तुमची स्वत:ची वागणूक अतिशय शिस्तप्रिय आणि आदर्श होती. पण तुम्ही विलक्षण प्रेमळही होतात. मला आणि ताईला नेहमीच तुमच्याजवळ मोकळं होता आलं. तुमच्याबद्दल वडील म्हणून आदर वाटायचा पण तुमचं कधी दडपण यायचं नाही. तुम्ही आहे त्या परिस्थितीत आम्हाला कधी काही कमी पडू दिलं नाहीत. स्वत:च्या खिशाला खार लावून आमची हौसमौज पूर्ण केलीत. पण फालतू लाड कधीच केले नाहीत. त्याच्या मागची भूमिका नेहमी समजावून सांगत राहिलात. लहानपणापासूनच घरातलं वातावरण प्रसन्न कसं राहील याकडे तुम्ही आणि आईनं लक्ष दिलं. त्यामुळे घरात छान वाटायचं. तुमचे आणि आईचे ऑफिसमधले ताणतणाव तुम्ही घरी कधीच आणले नाहीत. शेजारच्या कारखानीसांकडच्या सारखी आईबाबांची सारखी भांडणं आम्ही कधीच पाहिली नाहीत. लहानपणापासून तुम्ही मला ध्येयाचा पाठपुरावा कसा करावा, खरं समृद्ध जीवन म्हणजे उत्तम शारीरिक आरोग्य, उत्तम मानसिक आरोग्य, नात्यांची जपणूक, पुरेसा पैसा (तुम्ही म्हणायचात ‘लालसा’ कुठे सुरु होते हे ओळखता आलं पाहिजे आणि तेथे थांबता आलं पाहिजे. मला तेच मधल्या त्या दिवसात विसरायला झालं होतं), आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदात जगण्याची कला आणि समाधानी वृत्ती या गोष्टी असल्या, की व्यक्ती समृद्ध आणि श्रीमंत आहे हे तुम्ही सांगितलं. ते मी नीट लक्षात ठेवीन . श्रेया मला आवडते आणि आमच्या दोघांत एक वेगळं नातं आहे, हे तुम्हाला मी मित्राला सांगावं तसं मोकळेपणानं सांगितलं. तुम्ही ते स्वीकारलं. तिला भेटलात. आम्ही दोघांनी हे नातं जपताना कोणती काळजी घ्यायला हवी हे समजावून सांगितलं. करिअर प्रथम आणि नातं त्यानंतर ही गोष्ट समाजावालीत. हे आम्हाला दोघांनाही पटलं. तिलाही खूप चांगले मार्क्‍स पडलेत. लहानपणापासून वेगवेगळ्या छोट्या मोठया जबाबदाऱ्या, बॅंकेची कामे, बाहेरची मला जमतील ती कामं सांगत गेलात. ती चांगल्या प्रकारे कशी करायची हे शिकवलं. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. नेहमी माझ्यातल्या सकारात्मक गोष्टींना प्रोत्साहन दिलंत. निराश झालो तेंव्हा धीर देत उभं रहायला मदत केलीत. तुम्ही नेहमी म्हणायचात, Greatness lies not in never falling, but in rising up everytime you fall. त्यामुळे कधी अपयश आलं तरी मी खचलो नाही. हिमतीनं पुन्हा उभा राहिलो. मुख्य म्हणजे चुकलो तेंव्हा तुम्ही रागावलात, प्रसंगी कडक वागलात पण नंतर प्रेमानं जवळ घेऊन समजावलंत. बाबा, मधल्या काळात मी थोडा वाहवत गेलो होतो. पण आज वाटतं ते बेभान दिवस अंतिमत: केवळ दुख:दायी ठरले असते. कारण क्षणिक मोहापायी माझं पूर्ण आयुष्य उध्वस्त झालं असतं. तुम्ही मला जागं केलंत. सावरायला मदत केलीत. तुमचे आभार कसे मानू कळत नाही. पण आता सगळं छान होईल. मला माझ्या बाबांचा अभिमान वाटतो. लव्ह यु बाबा.

तुमचा सुजय

अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानं खिडकीबाहेर नजर टाकली. त्याच्या मनात आलं.आज आकाश स्वच्छ आहे. नितळ निळे, पारदर्शी. सुजयला तो स्वत: पुन्हा सापडलाय.नव्या रुपात.

संबंधित बातम्या