कॉर्पोरेट जगातील सहजीवन 

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
शनिवार, 8 डिसेंबर 2018

हितगूज
 

इंटर्नल आणि एक्‍स्टर्नल असे दोन्ही ताण निर्माण करणारे स्ट्रेसर्स सध्या कॉर्पोरेट जगतात काम करणाऱ्या तरुण जोडप्यांवर असतात. त्यांना यशस्वीपणे तोंड देता आले नाही, ‘कोपिंग स्किल्स’ शिकून घेतली नाहीत आणि नेमके मला आयुष्यात कशाने समाधान, सुख मिळणार आहे, हे कळले नाही की सहजीवनात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुटेपर्यंत ताणले जाऊ शकते... 

ईशान माझ्या मित्राचा मुलगा. देखणा हुशार. कॉम्प्युटर इंजिनिअर. त्याची पत्नी सायली गोड, सालस मुलगी. तीही कॉम्प्युटर इंजिनिअर. ईशान आणि सायली एक हसतमुख, खेळकर जोडपे. दोघेही आय. टी. कंपन्यांमध्ये हिंजवडीला काम करणारे. वर्षभरापूर्वीच लग्न झालेले. भरपूर पगार, स्वतंत्र कार्स. वेल फर्निश्‍ड सोयीसुविधांनी सुसज्ज घर. दोघांचेही परदेश दौरे झालेले. सगळे कसे अगदी दृष्ट लागण्यासारखे.. आणि खरोखरच अचानक दृष्ट लागावी तसे घडले. वर्षभरापूर्वी त्यांच्या लग्नात दोघांनाही पाहिले होते. उत्साहाने ओसंडून वाहणारी प्रसन्न अशी ती व्यक्तिमत्त्वे होती.. आणि आज माझ्यासमोर बसलेला ईशान विलक्षण थकलेला, निरुत्साही दिसत होता. सायलीही विलक्षण थकल्यासारखी वाटत होती. मी नीट न्याहाळत होतो. काहीतरी घडले होते हे निश्‍चित. शेवटी सायलीने कोंडी फोडली. ‘सर, सध्या आम्हाला दोघांनाही प्रचंड अस्वस्थ वाटतेय. ताण खूप वाढलाय. ऑफिसमधला आणि आमच्या दोघांच्या रिलेशनमधलाही. ह्याची सारखी चिडचिड चालू असते. कधी कधी आठ आठ दिवस अबोला असतो. एकदम डिव्होर्सचीही भाषा करतो..’ मध्येच ईशान चिडून बोलला, ‘सायली, हे अति होतेय. सगळ्या चुका माझ्या नाहीत. तुझा अहंकार, आयुष्य जगण्याच्या चुकीच्या कल्पना याही सगळ्याला कारणीभूत आहेत.’ माझ्या लक्षात आले, दोघेही विलक्षण अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांना आपण काय बोलतोय याचे भान नाही. त्याची कारणे दोघांशी स्वतंत्रपणे तसेच नंतर एकत्र बोलून जाणून घायला हवीत. मी दोघांनाही शांत केले. या परिस्थितीतून निश्‍चित मार्ग काढून देण्याचे आश्‍वासन दिले. मी दोघांनाही आधीपासून ओळखत होतो. म्हणूनच माहीत होते, की दोघेही कुठल्यातरी विचित्र परिस्थितीत सापडले आहेत म्हणून हा गुंता निर्माण झालाय. त्याचबरोबर दोघेही निश्‍चितपणे अस्वस्थतेच्या आजाराचे (Anxiety Neurosis) बळी ठरलेले दिसत होते आणि नैराश्‍याच्याही. आधी वैयक्तिक अस्वस्थतेची कारणे शोधायला हवी होती. External stressors (बाह्य परिस्थितीजन्य कारणे) आणि Internal stressors (आंतरिक जैविक, स्वभावजन्य इत्यादी कारणे) यांचा मागोवा घ्यायला हवा होता. त्यावरचे उपाय करायला हवे होते. दोघांशी बोलताना अनेक गोष्टी समोर आल्या त्या अशा - १. दोघांवरही अतिशय ताण आहे. दोघांचीही एकाग्रता, आत्मविश्‍वास खूप कमी झालाय. कामात लक्ष लागत नाही. त्याचा परिणाम performance appraisal वर व्हायला लागलाय. २. शारीरिक तक्रारी, अशक्तपणा वाढायला लागला आहे. आयुष्यातला  आनंद नाहीसा झाल्यासारखे वाटतेय. ३. दोघांचाही रोजचा प्रवास जवळ जवळ अडीच तासांचा आहे. तोही प्रचंड ट्रॅफिकमधला; रात्री घरी यायला प्रचंड उशीर होतो. आल्यावर दोघेही विशेषतः सायली विलक्षण थकलेली असते. ४. दोघांमधला संवाद संपल्यासारखाच आहे. जेव्हा जेव्हा एकजण पुढाकार घेतो त्यात साध्या गप्पांमधूनसुद्धा भांडणच होते. मूळचे आनंदी स्वभाव चिडचिडे झालेत. शारीरिक व मानसिक थकव्यामुळे लैंगिक संबंध जवळजवळ नाहीतच. कधी जवळ आलेच तर त्यात एकसुरीपणा जाणवतो. ५. शनिवार रविवार सुटी असते. पण पूर्वी दोघेही एकत्रितपणे नियोजन करून निवांतपणा उपभोगायचे तो आनंद संपलाय. एकमेकांची उणीदुणी काढण्यातच वेळ जातो. आपण काय बोलतोय, किती टोकाचे बोलतोय, अनाठायी चिडतोय याचे भान हरवायला लागलेय. ६.  सुरुवातीपासून भरपूर कमाई असल्यामुळे सुटीच्या दिवशी अवास्तव खर्च करण्याची सवय लागलीय. घरात गरज नसताना भरपूर वस्तू आल्यात. विलासाची, चंगळवादाची सवय लागलीय. पण त्यातून अतृप्तीच जाणवते आहे. ‘माझी कमाई, तुझी कमाई, ‘माझी ऑफिस मधली पोझिशन, तुझी पोझिशन’ यातून असूयेची सुरुवात झाली आहे. त्यात दोघांचाही अहंकार खतपाणी घालतोय. ७. मुख्य म्हणजे ऑफिसमधील, करिअरमधील ताणतणाव चोवीस तास दोघांना वेढून राहिला होता आणि त्यात दोघांच्याही स्वस्थतेला ग्रहण लागले होते. या सगळ्यात त्यांचे स्वतःशी आणि अन एकमेकांशी असलेले निकोप नाते होरपळत होते. काही महिन्यांत योग्य उपचारांनंतर ईशान आणि सायली या सगळ्या अस्वस्थतेतून बाहेर आले. 

योग्य औषधोपचार, समुपदेशन, व्यायाम, तणावनियोजनाची जुनी व अद्ययावत तंत्रे त्याचबरोबर आयुष्याकडे पाहण्याचा निकोप दृष्टिकोन जोपासायला शिकणे, भोगलालसेला, चंगळवादी विचारसरणीला लगाम घालणे, मुख्य म्हणजे सर्वच बाबतीत कुठे थांबायचे हे कळणे, करिअर इतकेच स्वतःतल्या व इतरांमधल्या माणूसपणाला महत्त्व देणे या सगळ्या गोष्टी शिकणे दोघांसाठी आवश्‍यक होत्या.   

आज आय. टी . क्षेत्रात काम करणारे आणि अशा पद्धतीच्या समस्या असणारे खूप ईशान किंवा सायली आढळतात. सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात, आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच स्तरातील बऱ्याच तज्ज्ञांवर ताणतणाव व त्याचे दुष्परिणाम वाढताना दिसत आहेत.
 
नेमके काय आणि का घडतेय या सर्वांच्या बाबतीत? तर.. 

 • आय. टी. क्षेत्रातील व्यक्ती achievement oriented असतात. टार्गेट पूर्ण करणे, परदेशातील व्यक्तींशी सतत वेळी अवेळी संपर्क ठेवावा लागणे, घरी आल्यावरसुद्धा सतत ऑफिस डोक्‍यात ठेवावे लागणे यामुळे त्यांना कुटुंबीयांसाठी आणि सोशल लाइफसाठी पुरेसा वेळ देत येत नाही. 
 • अतिव्यग्र रुटीनमुळे स्वतःला रिलॅक्‍स करणे, मनोरंजन यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. 
 • प्रचंड स्पर्धा आणि जॉब संदर्भातील असुरक्षितता यामुळे सततचा ताण असतो. 
 • जेवणाच्या व झोपेच्या वेळा नीट न पाळता आल्यामुळे शरीरातील जैविक घड्याळ बिघडून जाते. त्याचा शरीरावर व मनावर विपरीत परिणाम होतो. 
 • हे सगळे अस्वास्थ्य कुटुंबीयांवर परिणाम करते. नात्यांवर परिणाम करते. हळूहळू अस्वस्थतेचा आणि नैराश्‍याचा आजार पाय पसरायला लागतो. भरपूर संपन्नता असूनही स्वास्थ्य नाहीसे होऊ लागते. व्यसने वाढीस लागतात. 
 • पती - पत्नी एकमेकांना quality time देऊ शकत नाहीत. रोमान्स, सेक्‍स यासाठी आवश्‍यक असे मानसिक स्वास्थ्य नाहीसे होते. 
 • या सगळ्यावर उपाय निश्‍चितच आहेत. प्रथम एक गोष्ट मान्य करुया, या क्षेत्रातील बाह्य परिस्थिती अशीच राहणार किंवा दिवसेंदिवस अधिक बिकट होत जाणार. त्याला तोंड देण्यासाठी आपण आतून शांत, कणखर, स्वस्थ व्हायला हवे. कसे? 
 • ‘बाह्य’ वातावरण कसेही असो आपण ‘आतले’ वातावरण बदलायला हवे. त्यासाठी काही गोष्टी शिकायला हव्यात. बदलायला हव्यात. थोडक्‍यात मेंदूचे (मनाचे) reprogramming करायला हवे. 
 • तणाव नियोजनाच्या पद्धती शिकून घ्यायला हव्यात. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व, आनुवंशिक गुण, स्वभाव, मेंटल मेकअप वेगळा असतो. त्यामुळे तणाव नियोजनाच्या पद्धतीही वेगळ्या असू शकतात. 
 • आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. आपल्याला आयुष्यात नेमके काय हवे? पुरेसा पैसा हवाच, वैभवही हवे, पण फक्त पैसा की पैशाबरोबरच स्वास्थ्य, मनःशांती? पैशाने सुखसोई मिळतील पण आनंद ही मनाची अवस्था आपल्याला प्राप्त करून घ्यावी लागेल. एका मर्यादेनंतर भोग, लालसा, चंगळवाद फक्त दुःख निर्माण करतात, हे लक्षात ठेवावे. 
 • ताण समजून घेणे व त्यांची नोंद करणे महत्त्वाचं - आपल्यावर सध्या कुठले ताण आहेत? कुठल्या गोष्टींची काळजी वाटत राहते? कसली भीती वाटते? कशामुळे राग येतो? तो ताब्यात राहतो का? कशामुळे वाईट वाटते? कुठला अपराधगंड वाटत राहतो का? शारीरिक व मानसिक अस्वास्थ्याची लक्षणे, अशा अनेक गोष्टींची नोंद करावी. थोडक्‍यात हे एक प्रकारचे भावनांचे ऑडिट असेल. तज्ज्ञांच्या सहाय्याने त्यावरचे उपाय शोधावेत. तज्ज्ञांशी बोलल्यामुळे ताणाचा निचरा व्हायला मदत होईल. 
 • स्वयंसूचना व creative visualization ची तंत्रे शिकून घ्यावीत. तज्ज्ञांकडून ‘स्विच ऑन’ व ‘स्विच ऑफ’ची तंत्रे शिकून घ्यावीत. ज्या योगे ऑफिस व वैयक्तिक आयुष्य यात सीमारेषा आखता येईल. ऑफिसचे ताण वैयक्तिक आयुष्यापासून दूर ठेवता येतील. योग्य मार्गदर्शनाने आणि प्रयत्नांनी हे साध्य होऊ शकते. 
 • आपल्या आयुष्यातली इतर माणसे, मित्र आणि विशेष करून जोडीदार, त्यांच्याबरोबरची नाती महत्त्वाची आहेत हे समजून घ्यावे. जोडीदार नोकरी करत असेल तर त्याच्या मनःस्थितीचा विचार आपण करायला हवा. त्याची काळजी करायला हवी. त्याचे ताण समजून घायला हवेत. रात्री कितीही उशीर झाला तरी मायेचा स्पर्श आणि जिव्हाळ्याचे बोलणे, मन मोकळे करणे हे नियमित करायला हवे.  त्यातूनच दोघांनाही ताकद मिळेल. 
 • व्यायाम, योगासने, प्राणायाम, ध्यान व वर्तमान क्षणात राहण्याची तंत्रे महत्त्वाची आहेत. - रोज चल पद्धतीचा (Aerobics) व्यायाम म्हणजे ज्यायोगे नाडीची गती ठराविक मर्यादेपर्यंत वाढेल (तज्ज्ञ त्याचा फॉर्म्युला सांगतील) म्हणजे वेगात चालणे, धावणे, पोहणे इत्यादी. यामुळे शरीरात serotonin, endorphins तसेच इतर नैसर्गिक antidepressants स्रवतील. तसेच प्राणायाम, ध्यानाच्या काही पद्धती, श्‍वासावर आधारित ध्यान, क्षणसाक्षित्वाची (mindfulness), वर्तमान क्षणात राहण्याची तंत्रे शिकून घ्यावीत. 
 • संगीत, कविता, छंद आणि मैत्र - संगीत हे एक उत्तम औषध आहे. मनःस्थिती सुधारण्यासाठी रोज संगीताची साधना, आवडते संगीत रोज ऐकणे, कविता वाचणे, ऐकणे, आवडता छंद जोपासणे याची खूप मदत होते. तसेच ज्याच्यापाशी मोकळे होऊ शकू असे जिव्हाळ्याचे परंतु निर्व्यसनी मित्र जोडणे याचा छान उपयोग होतो. 
 • आपल्याला स्वतःशी असलेले नाते सुदृढ करायचे आहे. त्यामुळे रोज इतर व्यायामाबरोबरच ध्यान करणे, सुटीच्या दिवशी निसर्गाच्या सान्निध्यात जाणे, तिथली शांतता अनुभवणे, आत भरून घेणे.. यामुळेही मन स्वस्थ व्हायला मदत होते. 

कर्तृत्वाची शिखरे पादाक्रांत करताना ‘आतला’ मी आनंदी, स्वस्थ, कणखर राहणे खूप महत्त्वाचे... आणि प्रयत्नांनी ते शक्‍य आहे. 

संबंधित बातम्या