फोबिया 

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

हितगूज
 

Marie Curie - Nothing in life is to be feared. It is only to be understood. 
अर्थात, आपल्याला वाटणाऱ्या भीतीतला फोलपणा समजून घेतला, वास्तविकता - रिॲलिटी समजून घेतली की त्यावर मात करायला मदत होते. तज्ज्ञांच्या मदतीबरोबरच स्वमदत महत्त्वाची ठरते. 

भयगंड (फोबिया) हा शब्द ग्रीक शब्द फोबस यावरून आला आहे. याचा अर्थ विशिष्ट प्रसंग, घटना, गोष्टी, कृती, प्राणी इत्यादींची अकारण वाटणारी तीव्र स्वरूपाची भीती. ज्या प्रसंगांची, गोष्टींची भीती वाटते त्यापासून पळ काढण्याची अतिरेकी व अवाजवी धडपड, तीव्र इच्छा हे भयगंडाचे प्रमुख लक्षण होय. जेव्हा अशा प्रकारची भीती सहन करण्याच्या पलीकडे जाते, तसेच दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागते, तेव्हा ती व्यक्ती कोणत्यातरी अस्वस्थतेच्या आजाराने (Anxiety Disorder) ग्रस्त आहे हे नक्की. मेंदूतील अमिग्डला (Amygdala) व हिप्पोकॅंपस (Hippocapmpus) या भागांत एखादी भयकारी घटना नोंदवून ठेवलेली असते आणि जेव्हा जेव्हा तसाच काही प्रसंग पुन्हा घडणार किंवा तशाच काही गोष्टीला सामोरे जावे लागणार असे वाटते, तेव्हा त्या व्यक्तीला पुन्हा तशाच शारीरिक व मानसिक लक्षणांचा अनुभव येतो जो पूर्वी आला होता. 

बहुतेक भयगंड हे निरर्थक व अवाजवी असतात. म्हणजे वास्तवात वाटणारी भीती ही पोकळ व कुठलाही आधार नसणारी असते. काहीतरी भयानक घडेल असे त्या व्यक्तीच्या मनानेच घेतलेले असते. 

बऱ्याच वेळा भयगंड हा इतर मनोविकारांबरोबरसुद्धा (co-morbidity) आढळून येतो. 
मेंदूतील रसायनांचे असंतुलन हेच भयगंडाच्या आजारामागील मुख्य कारण होय. 

भयगंडाची लक्षणे व पूर्वचिन्हे - अस्वस्थतेच्या आजाराचीच बहुतेक लक्षणे व पूर्वचिन्हे यात दिसतात. ही लक्षणे भावनिक (Emotional) किंवा शारीरिक (Physiological) अशा दोन्ही प्रकारची असतात. कधी सौम्य असतात तर कधी तीव्रपणे, जोरदारपणे जाणवतात (panic attack). ख्य मुख्य म्हणजे ज्या घटनेची, गोष्टीची भीती वाटत असते, ती घटना घडण्याची वेळ जशी जवळ येऊ लागते तसतशी भीती वाढत जाते. जर घटना अटळ असेल तिला तोंड द्यावंच लागणार असेल तर अस्वस्थता पराकोटीला पोचते. 
मला दीप्तीचा, सतीशच्या पत्नीचा फोन आला तेव्हा तिचा स्वर गंभीर आणि काळजीयुक्त होता. ‘सर, सतीश नोकरी सोडायची म्हणतोय. कारण देतोय ते विचित्र, खरे म्हणजे न पटणारे आहे. त्याच्या ऑफिसची नवीन जागा सहाव्या मजल्यावर आहे. आता सहाव्या  मजल्यावर ऑफिसेस नसतात का कुणाची? शिवाय चार लिफ्ट्‌स आहेत वर जायला. पण पुन्हा तेच कारण पुढे करतोय की लिफ्टने जाताना अतिशय त्रास होतो. त्यापेक्षा खाली कुठेतरी ऑफिस असेल अशी नोकरी बघतो. सर, इतकी चांगली नोकरी या कारणासाठी सोडणे बरोबर आहे का हो? खूप समजावले, ऐकतच नाहीय. घरातही अस्वस्थ असतो. रात्रीची नीट झोपही नाही.’ मी सतीशला भेटायला बोलावले. आल्यानंतर पाचच मिनिटात त्याची अस्वस्थता वाढलेली दिसली. म्हणाला, ‘सर ती खिडकी आणि पलीकडचा बाल्कनीचा दरवाजा उघडता का प्लीज? घुसमट होतेय. श्‍वास पुरत नाही. ऑक्‍सिजन कमी पडतोय असे वाटतेय.’ मी म्हणालो, ‘अरे आपल्या तिघांना पुरेल इतका ऑक्‍सिजन नक्कीच आहे या खोलीत. तुलाही पटतेय ते. बरोबर आहे ना?’ त्यावर म्हणाला, ‘पटतेय सर सगळे. पण हे हल्ली सारखेच वाटते. घरी, बंद कारमधे आणि मुख्य म्हणजे लिफ्टने जाताना. प्रचंड घुसमट होते लिफ्टमधे. खूप त्रास होतो. वाटते ॲटॅक येईल. भीती वाटते. म्हणून तर नोकरी सोडायची म्हणतोय.’ सतीशला औषधोपचार आणि थेरपीची गरज होती. त्याला क्‍लॉस्ट्रोफोबिया होता. 

बंद जागांची भीती (Claustrophobia) हा एक फोबिया आहे. ज्यामध्ये व्यक्तीला बंद जागेमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण होते. त्याची अक्षरशः घुसमट होते. उदा. लिफ्टने जाणे, कार, दारे-खिडक्‍या बंद असलेल्या खोलीत थांबणे, विमानामध्ये प्रवास इत्यादी. मग अशा जागा ती व्यक्ती टाळू लागते. अशा जागेत जाण्याची वेळ आली किंवा अशा ठिकाणी जाण्याच्या नुसत्या विचारांनी तिला विलक्षण घाबरायला होते... आणि हा ताण मनाच्या कोपऱ्यात जागा राहिल्यामुळे तिच्या दैनंदिन जीवनातही अस्वस्थता जाणवत राहते. क्‍लॉस्ट्रोफोबिया हा शब्द मुळात क्‍लॉस्ट्रम या लॅटिन भाषेतून आला आहे. त्याचा अर्थ ‘बंद जागेत अडकणे’ असा आहे आणि फोबोज म्हणजे भीती. 

कुठे कुठे हा फोबिया जाणवू शकतो? - जिथे ऑक्‍सिजन कमी पडेल अशी निराधार भीती वाटेल अशा सर्व ठिकाणी हा फोबिया जाणवू शकतोच. त्याच बरोबर - लिफ्ट्‌स, तयार कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम्स, बोगदे, इमारतीचे बेसमेंट, भुयारी मार्ग, बंदिस्त खोली, खिडकी बंद असलेल्या तसेच सेंट्रल लॉकिंग असलेल्या कार्स, विमाने, काही कोंदट पब्लिक टॉयलेट्‌स, प्रचंड गर्दीची ठिकाणे अशा सर्व ठिकाणी असा फोबिया जाणवू शकतो. अर्थात एकाच व्यक्तीला या सगळ्याच ठिकाणी त्रास जाणवेल असे नाही. 

या फोबियाची लक्षणे साधारण पॅनिक डिसऑर्डर, पॅनिक ॲटॅकच्या लक्षणांसारखी असतात. अशा व्यक्तींना साधारण पुढीलपैकी शारीरिक लक्षणे जाणवू शकतात - १. घाम फुटणे २. हृदयाची धडधड वाढणे ३. श्‍वास न पुरणे ४. तोंड, घशाला कोरड पडणे ५. हात, पाय, शरीराला कंप सुटणे ६. चक्कर येणे ७. डोके दुखणे ८. छातीत दुखणे. ९. शौचाला किंवा लघवीला लागल्याची भावना येणे. 

या फोबियाची मानसिक लक्षणे साधारण पुढीलप्रमाणे असतात - १. मृत्यूचे विचार मनात येतात २. त्या जागेतून पळून जावेसे वाटते ३. कुठल्यातरी विचित्र जीवघेण्या सापळ्यात अडकल्याची भीती वाटायला लागते ४. खरे - वास्तव काय आहे आणि आपण अवास्तव विचार करत आहोत यातील फरकच नाहीसा होतो. प्रचंड कन्फ्युज्ड आणि भ्रमावस्था जाणवते ५. आपल्याला जाळले किंवा पुरले जातेय अशा प्रतिमा सतत डोळ्यासमोर येऊ शकतात. 

कारणे 
मेंदूतील रासायनिक बदल, आनुवंशिकता, दुर्बल व्यक्तिमत्त्व अशा अनेक गोष्टींमुळे अँक्‍झायटी डिसऑर्डर्स निर्माण होऊ शकतात. ज्यांना पॅनिक डिसऑर्डर, सोशल फोबिया किंवा इतर डिसऑर्डर्स आहेत त्यांच्या बाबतीत ही डिसऑर्डर निर्माण होण्याची शक्‍यता जास्त असते. तसेच भूतकाळातील, लहानपणातील भीतीदायक दुर्घटना, जवळच्या किंवा ओळखीच्या लोकांच्या बाबतीत घडलेले अपघात, त्यांच्याकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून न पाहता येणे आणि त्यातून निर्माण झालेली असुरक्षितता ही कारणेदेखील असू शकतात. 

उपचार
या फोबियामध्ये औषधोपचारांबरोबरच सायकोथेरपीज, रिलॅक्‍सेशन थेरपीज, माइंडफुलनेस थेरपीजचा उपयोग होतो. 
 फ्लडिंग/एक्‍स्पोजर थेरपी, सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन थेरपी : या थेरपीमध्ये फोबियाग्रस्त व्यक्तीला टप्प्याटप्प्याने भीतीचा सामना करायला शिकवले जाते. त्या दरम्यान श्‍वसनावर लक्ष केंद्रित करणे, मनात सकारात्मक प्रतिमा आणणे, वर्तमान क्षणात राहण्याचा प्रयत्न करणे अशा अनेक तंत्रांचा वापर करायला तज्ज्ञ शिकवतात. उदा. लिफ्टने जाण्याची भीती असेल आणि सहाव्या मजल्यावर जायचे असेल तर एकदम सहा मजले न जाता, प्रथम एक मजला जाणे, लिफ्ट वर जाताना स्वस्थतेच्या अनेक तंत्रांपैकी आपल्या मानसिक मेकअपला, स्थितीला अनुकूल अशा तंत्राचा वापर करणे, श्‍वासाच्या तंत्रांचा वापर करणे इत्यादी गोष्टी केल्या जातात. पुन्हा पुन्हा करून, सवय झाल्यावर जाण्याच्या मजल्यांची संख्या वाढवत नेली जाते. बराच काळ हा प्रयोग केल्यावर तसेच जोडीला पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन तंत्राचा वापर आणि इतर थेरपीजच्या साहाय्याने भीतीवर मात करायला, भीतीतला फोलपणा जाणवून घ्यायला शिकवले जाते. अस्वस्थतेवर मात करायला शिकवले जाते. 
 मॉडेलिंग थेरपीज : यामध्ये ज्या लोकांनी वेगवेगळ्या भीतीवर मात केली त्यांचे सकारात्मक प्रेरणादायी अनुभव, व्हिडिओज दाखवून प्रोत्साहन दिले जाते. तसे करायला प्रवृत्त केले जाते. 
 Cognitive Behavioural Therapy (CBT) : CBT व्यक्तीला त्याचे नकारात्मक विचारचक्र, विचारपद्धती आणि त्यातून घडणारी नकारात्मक वर्तणूक बदलायला शिकवले जाते. सकारात्मक विचारपद्धती आणि सकारात्मक वर्तणूक पद्धती रुजवायची कशी हे शिकवले जाते. बऱ्याचवेळा या उपचार पद्धती जोडीने वापरल्यास उपयुक्त ठरतात. 
योग्य प्रयत्नांनंतर सतीश आता या सगळ्यातून बाहेर पडलाय. न घाबरता एकटा ऑफिसच्याच नव्हे तर कुठल्याही लिफ्टमधे प्रवास करू शकतो. बंद जागांमध्ये स्वस्थ राहू शकतो. नव्याने मोकळ्या, स्वस्थ आयुष्याला सुरुवात झाली आहे. 

जगात भयगंडाचे शेकडो प्रकार अस्तित्वात आहेत. नेहमी आढळणारे प्रकार पुढीलप्रमाणे : 

 • Agoraphobia : अनोळखी माणसे किंवा ठिकाणे यांची भीती. 
 • Claustrophobia : बंद जागांची भीती. उदा. बंद खोली, लिफ्ट, बंद वाहन. 
 • Acrophobia : उंचीची (उंच ठिकाणांची) भीती. 
 • Mysophobia : (germophobia) - जंतूंची, जंतुसंसर्गाची अवाजवी भीती. 
 • Xenophobia : परक्‍या व्यक्तींविषयी वाटणारी अवाजवी भीती. 
 • Brontophobia : ढगांचा गडगडाट किंवा वादळाची भीती. 
 • Carcinophobia : cancer ची भीती. या व्यक्तींना कर्करोग झालेल्या व्यक्तींचा संपर्क नको असतो. तसे झाल्यास आपल्यालाही काहीतरी होईल ही निराधार व अशास्त्रीय भावना मनात रुजलेली असते. 
 • Haemophobia : रक्ताची भीती. रक्त दिसणे सहन होत नाही वगैरे. 
 • Aviophobia : विमान प्रवासाची भीती. 
 • Archnophobia : कोळी, कीटक,पाली इत्यादींची भीती. 
 • Thanatophobia : मृत्यू संकल्पनेची भीती. 
 • Necrophobia : मृत्यू पावलेल्या व्यक्ती किंवा मरणोन्मुख व्यक्तींसंदर्भातील विशिष्ट भीती.

संबंधित बातम्या