ऐसे कैसे झाले भोंदू 

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

हितगूज
 

डोळस श्रद्धा आणि चिकित्सक दृष्टिकोन ठेवून अध्यात्माकडे पाहणे, खऱ्या संतांच्या मार्गदर्शनानुसार साधना करणे व इष्ट ध्येयाप्रत जाणे आणि भोंदू लबाड बाबाबुवांच्या सरेआम चाललेल्या हातचलाखीच्या चमत्कारांना बळी पडणे यात जमीन - अस्मानाचा फरक आहे. डोळस श्रद्धाळूपणा अन्‌ अंधश्रद्धाळू भाबडेपणा यात समाजमन विभागले गेले आहे. 

आज अंधश्रद्धेचा विचार करू. विज्ञान ठामपणे असे सांगते, की या जगात ‘चमत्कार घडणे’ असे काही नसते. ज्या ज्या गोष्टी या जगात घडतात, त्या सृष्टी किंवा निसर्गनियमानुसारच घडतात. कुणाच्या कृपेमुळे, अंगी असलेल्या तथाकथित दैवी शक्तीमुळे काहीही घडू शकत नाही. विकसित अवस्थेतील मेंदू, विज्ञानाची अफाट प्रगती अशा सकारात्मक गोष्टी या शतकात घडत असूनही बहुतांशी ‘मानवी मन’ आजही भीतीयुक्त आणि त्यामुळे अंधश्रद्ध राहिलेले दिसते आहे. यात केवळ अशिक्षितच नव्हे, तर बऱ्याच तथाकथित सुशिक्षितांचाही समावेश आहे. आजही नशीब, जन्म-मृत्यूचे चक्र, कर्मसिद्धांत (गेल्या जन्मातल्या पाप-पुण्याच्या हिशेबांवर या जन्मातील सुखदुःखे अवलंबून असण्याची समजूत), भविष्य, प्रारब्ध, चमत्कार, शुभ-अशुभाचे संकेत या आणि अशा अनेक गैरसमजुतींच्या गर्तेत मानवी मन फसते आहे. मानवाला मिळालेली बुद्धीची आणि ‘विवेकनिष्ठ’ तर्कशुद्ध विचारांची देणगी नीट वापरलीच जात नाही. त्याचाच परिपाक म्हणजे बाबाबुवांच्या आहारी जाणे होय. ही खरे तर एक विकृतीच मानायला हवी. गैरफायदा घेण्यासाठी हे बाबाबुवा टपलेले आहेतच; पण तो गैरफायदा घेऊ देणारेही तितकेच बेजबाबदार आहेत हे नक्की. हा भक्तवर्ग कोणीतरी भूल दिल्यासारखा, सर्व संवेदना बधिर होऊ देऊन या बाबाच्या अधीन होऊन जातो. जगातला कुठलाही बाबाबुवा आपले चांगले किंवा वाईट करू शकत नाही. त्याच्या अंगात असली कुठलीही शक्ती असू शकत नाही या सत्याकडे डोळेझाक करतो. स्वतःला त्याच्या अक्षरशः स्वाधीन करतो. प्रयत्नवादावरचा विश्‍वास, स्वतःवरचा विश्‍वास या गोष्टी जणू लुप्त होतात. अन्‌ मग याचा अपरिमित गैरफायदा हे बाबालोक घेतात. तकलादू सामान्य चमत्कार, खरेतर हातचलाखीचे खेळ दाखवून विश्‍वास संपादन करतात. स्वतःचे मायावी साम्राज्य उभे करतात. मग सुरू होते शोषण. प्रचंड सत्तासंपत्ती गोळा व्हायला लागते. वासनाविकार फोफावायला लागतात. भक्ती, कृपाप्रसादाच्या नावाखाली स्त्रिया, लहान मुलांचे लैंगिक शोषण यासारख्या विकृतीही फोफावतात. समाजातल्या मान्यवर व राजकारणातल्या व्यक्तींनाही हाताशी धरले जाते. त्यांच्याकडून अभय मिळवले जाते. अन एक समांतर शक्तिकेंद्रच सुरू होते. इथेच समाजाचा अन समाजमनाचा ऱ्हास सुरू होतो. 

भक्तांच्या बाबतीत नेमके काय होते? मुळात ते या बाबाची जी उपासना करतात किंवा त्याच्या आहारी जातात, त्यात डोळस भक्ती, श्रद्धा असते, की मनाच्या कमकुवतपणातून निर्माण झालेली असुरक्षितता तळाशी असते? असुरक्षितता, भीती किंवा कमकुवतपणा असेल तर त्या मागची कारणे कोणती? तिच्या निर्मूलनाचे उपाय कोणते? तसे झाले तर होणारे व्यक्तिगत व सामाजिक फायदे कोणते? मुळात आपण उपासना करतो, भक्ती करतो म्हणजे काय करतो? परमेश्‍वर आहे किंवा नाही हा वाद बाजूला ठेवला आणि तो आहे असे मानले तरी या बाबाबुवांचा परमेश्‍वराशी ते भासवतात तसा काही संबंध आहे का? त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी या एजंटांची गरज आहे का? आणि या सगळ्यातून आपण आपल्या मनाची, व्यक्तिमत्त्वाची काही उन्नती साधतो का? की स्वतःला जास्त जास्त कमकुवत करत नेतो? 

बुद्धी आणि भावना या दोन्हींच्या मदतीने व्यक्तीचे जीवन चालू असते. व्यक्तिमत्त्वात त्याचे संतुलन असावे लागते. असे संतुलन विवेकनिष्ठ, विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिवादी जीवन जगायला मदत करते. अशा माणसाचा तोल सहजासहजी जात नाही. म्हणजेच तो भावनेच्या आहारी जाऊन बाबाबुवांच्या आहारी जात नाही. मनःशांतीसाठी त्याला अशा कुबड्यांची गरज भासत नाही. तो मुळात त्रयस्थपणे साक्षीभावाने आपल्यातल्या असुरक्षिततेची कारणे शोधतो. गरज पडल्यास तज्ज्ञांची मदत घेतो. विवेकाच्या भिंगातून जीवनाकडे पाहायला शिकतो. मग त्याला पुढील गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. 

१.     चिकित्सक बुद्धीच्या आधारे माझ्यापुढील समस्यांची उत्तरे मिळू शकतात. मी हे मान्य करतो, की दोन वस्तुस्थिती (realities) आहेत. एक व्यक्तिगत (individual) वस्तुस्थिती. म्हणजे माझ्या आवाक्‍यातील, मी स्वतः शोधू शकेन अशी उत्तरे; ज्यायोगे मी माझ्या क्षमतेनुसार समस्या सोडवायला हव्यात. दुसरी माझ्या नियंत्रणाच्या बाहेरील वस्तुस्थिती. त्याला आपण cosmic reality म्हणू. याच्यामध्ये अशा सर्व गोष्टी येतात ज्यावर माझ्याकडे उपाय नसतो. उदा. माझ्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात घडणाऱ्या अप्रिय गोष्टी, आजारपण, मृत्यू, आर्थिक संकटे वगैरे. अशा गोष्टी विनातक्रार, विनाअट स्वीकारण्याची क्षमता (unconditional acceptance) माझ्यात हवी. तो जीवनाचा अपरिहार्य भाग आहे. त्याचा साक्षित्वाने आणि खिलाडूपणाने मी स्वीकार करायला हवा. ती सवय माझ्या मनाला लावायला हवी. त्यावर कुठल्याही बाबाबुवाकडे उपाय नाही. त्याच्या मागे लागून मी माझ्या सकारात्मक क्षमता हरवून बसणार नाही. 

२.     मला स्वतःला परमेश्‍वर ही संकल्पना स्पष्ट आहे का? बहुतांशी ती नाही. अन्यथा मी त्याच्याकडे काहीही मागितले नसते. तो काही देत नाही आणि घेत नाही. तो कोपत नाही वा खुश होत नाही. माझ्या नैतिक किंवा अनैतिक वागण्याचा परिणाम त्याच्यावर होत नाही. माझ्यावर असलेले संस्कार, माझी सदसद्विवेकबुद्धी, माझ्या मनाचे कंडिशनिंगच मला त्रास देते. परमेश्‍वर असला तर त्याचा या cause and effect प्रक्रियेशी काहीही संबंध नाही. माझ्याकडून काही चुकले तर किंवा मी दुःखात असेन तर मी त्याचे स्मरण करून त्याच्याशी (देवघरात) मोकळेपणाने बोलणे यात काही गैर नाही. त्याने मी मोकळा व्हायला (ventilate) होईल मदत होईल इतकेच. या व्यतिरिक्त काहीच घडणार नाही हे मी लक्षात ठेवायला हवे. पण कोणत्याही कारणासाठी ढोंगी बाबाबुवाकडे जाऊन मी मुक्त होणार नाही. तसे मी केले तर ती फक्त माझी मीच केलेली घोर फसवणूक असेल. 

३.      माझी विचार करण्याची पद्धत तसेच मानसिक जडणघडण यावर माझ्यावर झालेले धार्मिक, रूढी-परंपरांचे संस्कार, लहानपणापासून केलेली कर्मकांडे या सगळ्याचा खूप प्रभाव असतो. त्यात काही भीती, दबाव इत्यादी गोष्टी लपलेल्या असू शकतात. मी विज्ञाननिष्ठ, विवेकनिष्ठ विचार करण्याची सवय लावून घ्यायला हवी. मला शिकवलेली या बाबतीतली प्रत्येक गोष्ट, धार्मिक कर्मकांड इत्यादी मी चिकित्सक वृत्तीने तपासून पाहायला हवी. मला ज्या गोष्टी विवेकाच्या, कार्यकारण भावाच्या कसोटीवर उतरत नाहीत असे वाटते, त्या गोष्टींचा त्याग करायला हवा. ही ताकद मला माझ्यात निर्माण करायलाच हवी. धार्मिक कर्मकांडे आणि अध्यात्म या गोष्टी भिन्न आहेत हेही समजून घ्यायला हवे. 

४.     व्यावहारिक जगातील माझ्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मला अशा बाबाबुवांकडे जाण्याची गरज नाही. त्यांना कौल लावण्याची गरज नाही. मला माझे SWOT analysis करायला हवे. माझ्या बलस्थानांचा, क्षमतांचा, कमतरतांचा अंदाज घ्यायला हवा आणि त्यानुसार विकास घडवून आणायला हवा. तेच यशाचे गमक आहे.

५.     मनःशांती मिळवण्यासाठी ध्यानाची मदत होते. ध्यानाचे शारीरिक, मानसिक अनेक फायदे आहेत. शास्त्रीय प्रयोगातून हे सिद्ध झाले आहे. ध्यान मला स्वस्थ व्हायला शिकवते. साक्षीभाव जागा ठेवायला शिकवते. पण ध्यानासाठी मला कुठल्याही लबाड बाबाबुवाच्या मदतीची गरज नाही. ध्यानाची प्रक्रिया मला इतर तज्ज्ञांकडूनही शिकता येईल. मुळात ध्यान करता येत नाही. ते ‘doing‘ नाही. ती ‘being ‘ ची प्रक्रिया आहे. 

६.     माझ्यातील न्यूनगंड, अस्वस्थतेचे आजार किंबहुना कोणतेच शारीरिक वा मानसिक विकार, या आलिशान ढोंगी बाबांकडे जाऊन बरे होऊ शकत नाहीत. किंबहुना या बाबांकडे वेळ दवडल्यास उपचारांना उशीर होऊ शकतो. विकार बळावू शकतात. आज समाजात अनेक जण या कारणांसाठी या बाबाबुवांकडे जातात. कुठलाही मानसिक विकार हा मुख्यतः मेंदूतील रासायनिक असंतुलनामुळे होतो. त्याच्या उपचारांसाठी विज्ञानाची कास धरणेच आवश्‍यक आहे. 

विश्‍वाची व त्यातील व्यवहारांची मार्गक्रमणा ही एक प्रचंड अवाढव्य अशी निरंतर प्रक्रिया आहे. अनेक आकाशगंगा, अनेक ग्रहमालिका, त्यातले एकूण चराचर. त्यातलाच माझे मानवी जीवन हा एक अतिसूक्ष्म घटक. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील माझे आयुष्य स्वस्थ शांत समाधानी व्यतीत करायचे असेल तर विवेकाचीच कास धरायला हवी. इच्छापूर्तीसाठी आणि मनःशांतीसाठी बुवाबाजीच्या मायाजालात माझा मेंदू अडकू देता कामा नये. 
खरेतर पावणेचारशे वर्षांपूर्वी तुकोबांनी याविषयी लिहून ठेवले आहे - 
‘ऐसे कैसे झाले भोंदू, 
    कर्म करोनी म्हणती साधू, 
अंगा लावूनिया राख, 
    डोळे झाकुनी करिती पाप, 
दावून वैराग्याच्या कळा, 
    भोगी विषयाचा सोहोळा, 
तुका म्हणे सांगू किती, 
    जळो तयांची संगती.’ 
एकूण काय, सध्या या आलिशान भोंदू बाबांचे पेव फुटले आहे आणि कमकुवत समाजमन त्यांच्या विळख्यात अडकते आहे, हे थांबायलाच हवे.

संबंधित बातम्या