भीती रक्ताची

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
गुरुवार, 31 जानेवारी 2019

हितगूज
लहानपणापासूनच अनेक जणांना रक्ताची अवास्तव भीती वाटत असते. रक्त पाहिल्यानंतर त्यांना अक्षरक्षः घाम फुटतो. अस्वस्थ वाटायला लागते. ही रक्ताची अनाठायी भीती का वाटते? यावर कोणते उपाय आहेत? याची माहिती...

एका मित्राने मैत्रिणीला लिहिलेला आहे. I have blocked you because my words bleed and you have Hemophobia. यातला गमतीचा भाग सोडून देऊ पण रक्ताची अनाठायी, अवास्तव भीती असणाऱ्या अनेक व्यक्ती आढळतात.  लहानपणापासून आपल्याला बऱ्याचवेळा रक्त दृष्टीस पडते. कधी कुणाला खरचटले, कुणाचे तरी किंवा आपलेच रक्त तपासणीसाठी घेताना सिरींजमधे पाहातो, कधी कुणाच्या दातातून रक्त येतं तर कधी घोळणा फुटतो. पण म्हणून आपण एका प्रमाणाबाहेर अस्वस्थ होत नाही. हे असे  चालायचेच, असे आपले मत होते. पण काही व्यक्ती अशा असतात, की ज्यांना रक्ताच्या दिसण्याने अक्षरशः घाम फुटतो. त्या हादरून जातात. काही जणांना चक्कर यायला लागते किंवा उलटी होते. त्यांना हिमोफोबिया (hemophobia) असू शकतो. म्हणजे रक्ताची अतिरिक्त, अवास्तव भीती.

हिमोफोबिया ही डिसऑर्डर, DSM नुसार (Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders) `विशिष्ट फोबिया’च्या खाली BII म्हणजे blood-injection-injury वर्गीत केलेली डिसऑर्डर आहे.   अशा व्यक्ती ज्या प्रसंगात रक्त दिसणार आहे असे सर्वच प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करतात. स्वत:च्या आवश्‍यक अशा टेस्ट करणं सुद्धा टाळण्याचा प्रयत्न करतात. डॉक्‍टरांच्या महत्त्वाच्या अपॉयमेंट चुकवतात. ब्लड बॅंकेत जाणे, रक्तदान करणे दूरच राहिले. कुणा नातेवाइकाला इस्पितळात बघायला जायची यांना भीती वाटते. ऑपरेशन थेटर असा बोर्ड दिसला तरी वेगात पुढे जाण्याचा प्रयत्न करतात.  टी.व्ही वर रक्त पहाणे किंवा रक्ताचा विचार मनात येणे यालाही घाबरतात. इंजेक्‍शन घेताना सिरींजला लागलेले थेंबभर रक्त यांना अस्वस्थ करते. या डिसऑर्डर पुढील शारीरिक लक्षणे दिसू शकतात. 

१. श्वास घ्यायला त्रास. २. वाढलेला रक्तदाब. ३.वाढलेली नाडीची गती. ४. छातीत दुखण्याची भावना. ४. थरथर कापणे. ५. डोकं दुखल्याची भावना. ६. घाम फुटणे. ७. चक्कर येणे वगैरे यातील भावनिक लक्षणे - १.अतिशय अस्वस्थता.२. प्रसंगातून पळ काढावासा वाटणे. ३. मनावरचा ताबा सुटणे.४.मरून जाऊ अशी भावना.५ प्रचंड हतबलता इत्यादी. 

लहान मुलांमध्ये साधारणपणे प्रचंड रडणे, थयथयाट करणे, अतिहट्टीपणा करणे किंवा लपून बसणे अशी लक्षणे दिसू शकतात. 

कारणे : मेंदूतील रासायनिक बदल, आनुवंशिकता, दुर्बल व्यक्तिमत्त्व अशा अनेक गोष्टींमुळे होमिओफोबियासारख्या डिसऑर्डर निर्माण होऊ शकतात. दुबळे व्यक्तिमत्त्व तसेच ज्यांना पॅनिक डिसऑर्डर, सोशल फोबिया किंवा इतर डिसऑर्डर आहेत त्यांच्या बाबतीत ही हा डिसऑर्डर निर्माण होण्याची शक्‍यता जास्त असते. तसेच भूतकाळातील, लहानपणातील भीतीदायक दुर्घटना, जवळच्या किंवा ओळखीच्या लोकांच्या बाबतीत घडलेले अपघात, त्यांच्याकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून न पाहता येणे आणि त्यातून निर्माण झालेली असुरक्षितता ही कारणे देखील असू शकतात. बहुधा या डिसऑर्डरची  सुरुवात लहानपणी झालेली आढळते. 

उपचार : या फोबियामधे औषधोपचाराबरोबरच सायकोथेरपीज, रील्याक्‍सेशन थेरपीज, माइंडफुलनेस थेरपीजचा उपयोग होतो.

 Flooding/exposure therapy, systemtaic desensitization therapy : या थेरपीमध्ये फोबियाग्रस्त व्यक्तीला टप्प्याटप्प्याने भीतीचा सामना करायला शिकवले जाते. उदा. रक्ताची आणि शरीरातील त्याच्या कार्याची माहिती चित्ररूपाने देणे, लॅपटॉपवर रक्ताचे चित्र, रक्तदानाचे किंवा रक्त देतानाचे दृश्‍य दाखवणे, इंजेक्‍शनची सिरींज दाखवणे. रक्त तपासणीच्या वेळी रक्त दाखवणे. रक्ताला स्पर्श करायला लावणे. त्या दरम्यान श्वसनावर लक्ष केंद्रित करणे, मनात सकारात्मक इमेजेस आणणे, वर्तमान क्षणात राहण्याचा प्रयत्न करणे अशा अनेक तंत्रांचा वापर करायला तज्ज्ञ शिकवतात.  

 स्वस्थतेच्या अनेक तंत्रांपैकी आपल्या मानसिक मेकअपला, स्थितीला अनुकूल अशा तंत्राचा वापर करणे, श्वासाच्या तंत्रांचा वापर करणे इत्यादी गोष्टी केल्या जातात. या सर्व गोष्टी पुन्हा पुन्हा करून त्याची मनाला सवय लावणे आणि त्यात घाबरण्यासारखे काहीच नाही, हे मनाला पटवणे. अशा शक्‍य त्या गोष्टी केल्या जातात. बराच काळ हा प्रयोग केल्यावर तसेच जोडीला सकारात्मक दृश्‍य तंत्राचा वापर आणि इतर थेरपीजच्या साहाय्याने भीतीवर मात करायला, भीतीतला फोलपणा जाणवून घ्यायला शिकवले जाते. अस्वस्थतेवर मात करायला शिकवली जाते.  

 मॉडेलिंग थेरपीज : यामध्ये ज्या लोकांनी वेगवेगळ्या भीतीवर मात केली त्यांचे सकारात्मक प्रेरणादायी अनुभव, व्हिडिओ दाखवून प्रोत्साहन दिले जाते. तसे करायला प्रवृत्त केले जाते.   

Cognitive Behavioural Therapy (CBT) : CBT व्यक्तीला त्याचे नकारात्मक विचारचक्र, विचार पद्धती आणि त्यातून घडणारी नकारात्मक वर्तणूक बदलायला शिकवले जाते.  सकारात्मक विचारपद्धती आणि सकारात्मक वर्तणूक पद्धती रुजवायची कशी हे शिकवले जाते. बऱ्याचवेळा या उपचार पद्धती जोडीने वापरल्यास उपयुक्त ठरतात.  योग्य प्रयत्नांनी हिमोफोबियावर मात करता येते.  
 

संबंधित बातम्या