जब बदलती है नजरे।

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
सोमवार, 4 मार्च 2019

हितगूज
 

जब बदलती है नजरे 
तो बदल जाते है नजारे 
मानो तो जीवन है सुख ही सुख 
न मानो तो दुख का दरिया 
देखो मेरे यारो जीवन और कूछ नही है 
है बस देखने का नजरिया 

आयुष्याकडे पहाण्याचा दृष्टिकोन, आपले सुखी आणि आनंदी असणे ठरवतो. दोन काळ्याकुट्ट रात्रींमध्ये एक दिवस असतो असा एखाद्याचा दृष्टिकोन असू शकतो आणि दोन दिवसांमध्ये एक रात्र असते. ती संपली, की पुन्हा एक स्वच्छ लखलखीत सोनसळसळीत दिवस असणारच आहे असेही कुणी म्हणत असते. असे म्हणणाऱ्याचा दृष्टिकोन आनंदी, सकस, सकारात्मक ठरेल. हीच गोष्ट कुठल्याही गोष्टीकडे पहाण्यासाठी आणि आनंदाने राहण्यासाठी आवश्‍यक असते. 

पवन आणि रूपा हे जोडपे सोसायटीत नवीनच रहायला आले त्याला आता वर्ष झाले. मी जेव्हा जेव्हा रूपाला पहायचो तेव्हा तेव्हा ती वैतागलेलीच दिसायची. गेल्या कित्येक महिन्यात मी तिला उत्साही, फ्रेश असे पाहिलेच नव्हते. खरे तर छान सरकारी नोकरी होती. नवरा पवन एका मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पोस्टवर होता. सुस्वभावी होता. दोन गोजिरवाणी मुलं शाळेत जाणारी. एकूणच सांपत्तिक आणि कौटुंबिक स्थिती उत्तम होती. पण सदा चेहरा दुर्मुखलेला आणि चिडचीड चालूच. परवा विचारले ‘काय सगळं ठीक आहे ना’ म्हणाली ‘आमचं कसलं आलंय ठीक? कटकटी चालूच आहेत. तिकडे ऑफिसमध्ये प्रॉब्लेम्स आणि इकडे घरीदारी प्रोब्लेम्स. आनंद आहे. नशीब फुटकं म्हणायचं आणि गप्प रहायचं.’ मी म्हटले ‘झालं काय ते तर सांग’ म्हणाली ‘सर, तुम्ही विश्वास ठेवणार नाही पण माझ्याबाबतीत मनासारखं काही घडतच नाही. साधी भाजी घ्यायची तरी ती चांगली मिळत नाही. इतरांना कशा हव्या त्या भाज्या मिळतात. मी गेले, की हवी ती भाजी संपलेली. ऑफिसमध्ये तेच. लायकी नसलेल्यांना प्रमोशन. आम्ही वर्षानुवर्ष आहोत तिथेच. मुलांच्या बाबतीत सुद्धा तेच. अगदी म्हणजे अगदी ऐकत नाहीत. कितीही गोडीत समजावा, धाक दाखवा हव तसेच वागत रहातात. मैत्रिणींची मुलं कशी नेहमी मेरीटमध्ये पहिली दुसरी वगैरे. आमच्या मुलांपेक्षा जास्त मार्क्‍स. आमच्या मुलांना जेमतेम नव्वद ब्याण्णव. मैत्रिणींच्या मुलांपेक्षा कमीच. तेव्हढच कशाला नवऱ्याच्या बाबतीतही तेच. कंपनीत इतरांना सारख्या परदेशी जायच्या संध्या. सुदेश बसलाय वर्षानुवर्ष इंडिया इंडिया करीत. नशिबातच असायला लागतं हेच खरं. माझ्या बाबतीत सगळीकडे नन्नाचा पाढा.’ नकारात्मक विचारसरणीचे उदाहरण रूपाच्या रुपाने माझ्या समोर उभे होते. खरे तर खूप छान गोष्टी तीच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक आयुष्यात होत्या. पण 

We can complain because rose bushes have thorns, or rejoice because thorn bushes have roses. 
- Abraham Lincoln 

गुलाबाच्या रोपांमध्ये किती काटे आहेत म्हणून आपण तक्रारीचा सूर लावू शकतो. किंवा काट्यांमध्ये किती छान गुलाब फुललेत पहा असे आनंदाने म्हणूही शकतो. दृष्टिकोनातला हा फरक आहे. आपल्याला अर्धा ग्लास रिकामा आहे असे वाटत राहते, की अर्धा ग्लास भरलेला आहे असे वाटते? आपण सकारात्मक दृष्टिकोन बाळगतो, की नकारात्मक यावर हे अवलंबून आहे. मला आयुष्यात सुखी, समाधानी व्हायचे असेल तर सकारात्मक विचारसरणी असणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. 

सकारामत्मक विचार म्हणजे केवळ मनात सकारात्मक विचार आणणे नव्हे. एकूणच आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मनात रुजणे आवश्‍यक आहे. चांगलेच घडेल असा विचार करण्याबरोबरच विपरीत घडले तरी ते शांतपणे स्वीकारणे, त्याचे विश्‍लेषण करणे, हातात असेल तर उपाययोजना करणे, मुळात माझ्या आवाक्‍यातल्या गोष्टी कोणत्या आणि आवाक्‍याबाहेरच्या गोष्टी कोणत्या याचे आकलन होणे या सगळ्या गोष्टी समजण्याची क्षमता निर्माण होणे फार महत्त्वाचे. 

सकारात्मक विचारसरणी (Positive thinking) हा एक आयुष्याकडे, त्यातील विविध घटना, व्यक्ती, विचार यांच्याकडे पाहाण्याचा आशादायक दृष्टिकोन आहे. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगले शोधण्याची मनाची धाटणी बनवणे आहे. आयुष्यातला प्रत्येक क्षण रसरसून जगण्याची ती कला आहे. पॉझिटीव्ह व्यक्तीचा, आपल्याला आयुष्यात सुख, समृद्धी, यश मिळेलच यावर ठाम विश्वास असतो. तसेच आयुष्यातल्या विपरीत घटना, संकटं यावर आपण सहज मात करू, ज्या गोष्टी अटळ आहेत त्या आनंदाने विनाअट स्वीकारू अशी तिची मनोभूमिका असते. त्यामुळे अशा व्यक्ती दुःख, अपयश अशा गोष्टी सहजी पचवतात. किंबहुना अशा गोष्टी या आयुष्याच्या खेळाचा एक भाग आहेत, असा त्यांचा दृष्टिकोन असतो. 

सकारात्मक विचारसरणी अमलात येण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घेतल्या तर मनाला तसे वळण लागायला मदत होईल

  • आपल्याकडे असलेल्या क्षमता ओळखूया, लक्षात घेऊया. स्वत:वर आणि स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवूया. 
  • आपल्या मन:शांतीचे सुकाणू आपल्याकडे ठेवूया. म्हणजेच इतर माझ्याविषयी काय म्हणतात. मला वाखाणतात, की माझ्यावर टीका करतात यावर माझी मन:शांती अवलंबून असता कामा नये. माझा आतला गाभा नेहमीच स्वस्थ, शांत असला पाहिजे. 
  • स्वत:विषयी व इतरांविषययीही सतत चांगला विचार करूया. चांगलं बोलूया. इतरांच्या चांगल्या कृतीबद्दल, त्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करूया. 
  • ज्या लोकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडून यश मिळवले त्यांचा आदर्श समोर ठेऊया. त्याने आपल्याला प्रोत्साहन मिळेल आणि सकारात्मक दृष्टिकोन रुजायला मदत होईल. 
  • नकारात्मक संवाद आणि नकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांपेक्षा सकारात्मक विचारसरणी असलेल्या लोकांबरोबर राहूया. 
  • स्वत:शी आपला, आपण जागे असताना सतत स्व-संवाद होत असतो. तो सकारात्मक होतोय याकडे जाणीवपूर्वक पाहूया. नकारात्मक विचार मनात आले तर ताबडतोब जाणीवपूर्वक सकारात्मक विचार मनात आणूया. याचा अर्थ स्वत:शी भांडायचे नाही आहे तर शांतपणे सकारात्मक बदल (alternative) आणून त्याप्रमाणे कृती करायची आहे. 

लक्षात घेऊया, की Helplessness is not hopelessness. असहाय्य वाटलेच तरी त्याचा अर्थ सगळे संपले असे नव्हे. आयुष्यात कुठलीच परिस्थिती कायम रहात नाही. रात्री नंतर दिवस असतोच. There is always light at the end of tunnel. अंधाऱ्या बोगद्याच्या शेवटी प्रकाशाची तिरीप असतेच. प्रकाश असतोच. म्हणूनच विपरीत परिस्थिती आलीच तर ती बदलेलच यावर ठाम विश्वास ठेऊया. 

  • जर आपण नकारात्मक विचारसरणीचे असू तर स्वत:त बदल घडवणे अत्यावश्‍यक आहे हे मान्य करूया. असा बदल घडवता येतो हे मान्य करुया. 
  • भूतकाळातल्या कडवट आठवणी व अनुभव विसरूया आणि पुढे जाऊया. 
  • स्वत:वर टीका करणे थांबवूया आणि आव्हानांना सामोरे जायचे ठरवूया. 
  • कळत किंवा नकळत होणारे नकारात्मक बोलणे थांबवूया. उदा. मला जमणार नाही, मला याआधी कधीच जमले नाही वगैरे. 
  • प्रत्येक गोष्ट व्यक्तिश: घ्यायला नको. साक्षीभावाने माणसं, प्रसंग, घटना अनुभवायचा प्रयत्न करुया. साक्षीभाव म्हणजे औदासिन्य किंवा निष्ठुरपणा नव्हे तर शांतपणे परिस्थिती न्याहाळण्याची ती एक कला आहे. ती आत्मसात करूया. 
  • सकारात्मक विचारसरणीचा मेंदूवर खूप चांगला परिणाम होतो 
  • मेंदूमध्ये prefrontal cortex मध्ये न्यूरॉन्सची ग्रोथ होते. नवीन synapses तयार होतात. याच भागामध्ये मन, विचार यासंबंधीचे महत्त्वाचे कार्य चालते. 
  • विश्‍लेषण करणे व विचार करण्याची क्षमता वाढते. 
  • मनाची सतर्क राहण्याची क्षमता वाढते. 
  • सकारात्मक विचारसरणी एकदा रुजली, की नव नवीन, सृजनात्मक विचार निर्माण होण्याची क्षमता वाढते. 

संशोधनाअंती सकारात्मक विचारसरणीचे खूप फायदे लक्षात आले आहेत 

  • आयुष्यमान वाढणे. 
  • ताण तणावाचं निराकरण 
  • अस्वस्थतेचे आजार व नैराश्‍याचा आजार टाळणे किंवा झाल्यास लवकर बरं होण्यात मदत होणे 
  • शरीरातील प्रतिकारशक्ती वाढणे 
  • व्यक्तिमत्त्व विकास 
  • शारीरिक व मानसिक आजार लवकर बरे होणे. 
  • भौतिक आयुष्यात हवे असणारे यश, समृद्धी स्वकर्तृत्वाने मिळवता येणे. 

सकारात्मक विचारसरणी रुजवण्यासाठी visualization तंत्रे व स्वयंसूचना यांचा चांगला उपयोग होतो. 
visualization तंत्र

एका जागी शांत बसावे. शवासना प्रमाणे क्रमाक्रमाने पायापासून डोक्‍यापर्यंत एक एक अवयव रिलॅक्‍स झालाय अशी कल्पना करावी. एखादे निसर्गरम्य किंवा मन शांत होईल असे प्रतिमाचित्र, दृश्‍य डोळ्यासमोर आणावे. पाचही सेन्सच्या साहाय्याने आपण तिथे आहोत आणि आणि आनंद घेतोय, अशी कल्पना करावी. मन शांत झाले, की आपण ज्या प्रसंगांमध्ये नकारात्मक विचार करतो किंवा अस्वस्थ होतो असे प्रसंग डोळ्यासमोर आणावे आणि आता अतिशय आत्मविश्वासाने, सकारात्मक पद्धतीने आपण त्याला तोंड देत आहोत अशी कल्पना करावी. प्रत्यक्ष तसे घडत आहे यावर विश्वास ठेवावा. ही कल्पना वारंवार करावी. त्यात अगदी लहान लहान डीटेल्स असावे. उदा. प्रसंग घडतोय तिथले वातावरण, प्रकाश, हवा, आपली सकारात्मक देहबोली वगैरे. आपण सर्व प्रसंगात आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा याने परिपूर्ण आहोत हा विश्वास मनात जागृत ठेवावा. हे तंत्र दिवसातून दोन वेळा तरी विविध प्रसंग कल्पनेत अनुभवून करावा. 

सकारात्मक स्वयंसूचना
शवासनातल्या प्रमाणे सर्व अवयव रिलॅक्‍स करून घ्यावे. शांत अवस्थेत स्वत:ला मनापासून स्वयंसूचना द्याव्यात. उदा. मी भरपूर ऊर्जा, आत्मविश्वास आणि अपरिमित आनंदाने परिपूर्ण आहे. आजचा दिवस खूप छान जाणार आहे. मी स्वस्थ आणि आनंदी असेन. माझे शारीरिक व मानसिक आरोग्य दिवसेंदिवस सुधारत आहे. ही निरामय जीवनाकडे वाटचाल आहे, इत्यादी सूचना देताना कल्पनेत, अर्थाप्रमाणे तशी भावना निर्माण होणे गरजेचे आहे. मनाचे पॉझिटिव्ह रिप्रोग्रामिंग शक्‍य आहे. फक्त स्वत:त बदल घडवण्याची तीव्र इच्छा हवी. 
सकारात्मक विचारसरणी असलेली व्यक्ती स्वत: आनंदी असतेच पण त्याचबरोबर आसपास असणाऱ्या लोकांना ऊर्जा देते. आपण काही विशिष्ट व्यक्तींच्या सहवासात गेलो की छान वाटते त्याचे कारण हेच आहे. 

संबंधित बातम्या