‘तरुण म्हातारपण’

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
सोमवार, 18 मार्च 2019

हितगूज
 

सरसरत जाणारा चपटा दगड पाण्यावर अनेक भाकऱ्या थापत गेला. संथ वाहणाऱ्या नदीपात्रात वर अनेक तरंग उठत गेले. अप्पा खूष झाले, त्यांचा दगड अगदी त्यांना अपेक्षित असा गेला होता. हसून म्हणाले, ‘पाहिलंस, आता कशी मास्टरी आलेय माझी. तीन चार भाकऱ्या तर ठरलेल्याच असतात.’ मी आणि ते वृद्धाश्रमाच्या मागच्या बाजूला असलेल्या नदी काठावर बसलो होतो. मंत्रमुग्ध करणाऱ्या खूप गोष्टी होत्या तिथे. संध्याकाळची सूर्यास्ताची वेळ, वातावरण भारून टाकणारा संधी प्रकाश. नदीच्या प्रवाहावर लांबलेल्या सावल्या. पाण्यावर सूर मारून पाण्याला स्पर्श करत वर झेपावणारे पक्षी...आणि मुख्य म्हणजे प्रचंड उत्साही, आनंदी आणि पॉझिटिव्ह असण्याऱ्या पंचाऐंशी वर्षांच्या अप्पांचा सहवास. मी कधीतरी सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी त्यांना भेटायला यायचो. मलाही खूप छान वाटायचं, त्यांच्या सहवासात. अप्पा वृद्धाश्रमात रहातायत एकटे, अनेक वर्षं, हे त्यांच्याकडे पाहून कधीच वाटत नसे. अनेकांचा शक्तिस्रोत होते ते. वास्तविक अप्पांची तशी ट्रॅजेडीच होती. पत्नी दहा वर्षांपूर्वी निवर्तलेली. एक मुलगा अमेरिकेत, त्याला पैसे पाठवण्याशिवाय बापाची फिकीर नाही. साधी कधी चौकशी नाही. आजारी पडले तरी, ‘किती पैसे पाठवू’ एवढीच आश्रमात चौकशी. कधी येऊन भेटणं नाही. अप्पांना बाकीचे कुणी जवळचे नातेवाईक नसावेत.
 एवढं सगळं असूनही अप्पा इतके आनंदात कसे ह्याचं कुणालाही आश्‍चर्य वाटावं. पण अप्पांच्या आनंदी स्वभावाचं, चांगल्या प्रकृतीचं रहस्य त्यांच्या जीवनाकडे पाहाण्याच्या दृष्टिकोनात होतं. मी फक्त ‘आज’ मधे आणि ‘आत्ताच्या’ क्षणात जगतो, असं ते म्हणायचे. मी अप्पांना विचारलं, ‘अप्पा, रागावू नका, पण एक विचारू का? वृद्धाश्रमात राहूनसुद्धा तुम्ही कधीही निराश, दु:खी दिसला नाहीत मला. तुमचा मुलगा तुम्हाला विचारत नाही, हे ठाऊक आहे मला. पत्नीही नाही या जगात. तुम्हाला एकटेपण जाणवत नाही का?’ ते मला म्हणाले, ‘तुला एक सांगू, अरे शेवटी मीही माणूसच आहे. मलाही भावना आहेत. वाईट वाटतंच की! पण मी ठरवून टाकलंय, जे घडून गेलंय ते विनातक्रार स्वीकारायचं. शांतपणे. कारण जे घडलंय ते दुरुस्त करणं शक्‍य नाही. ही गेली...तिचे तेव्हढेच श्वास होते पृथ्वीवर. मुलगा आम्ही चांगले संस्कार देऊनही तसा वागला, आमचं प्राक्तन होतं. त्याच्याबाबतीत माझं कर्तव्य होतं ते केलंय, त्यात कसूर नाही केली. त्यामुळे विषाद नाही वाटत.’ एकटेपणाबद्दल विचारलंस, तर तुला एक सांगू, ‘जीवन नीट समजून घेतलं, तर लक्षात येईल. एकटेपणा, loneliness वाटणं ही मनाची अवस्था आहे. तुम्ही आयुष्याकडं कसं पहाता, त्यावर ते अवलंबून असतं. खरं तर प्रत्येक जण कायम एकटाच असतो. काही माणसं, आपल्या नातेवाइकांमधे, मित्रांच्या गोतावळ्यात राहूनही आतून एकटीच असतात. विलक्षण एकटेपणा, loneliness असतो त्यांच्यात. माझ्यापुरतं मी ठरवलं, परिस्थितीचा विनाअट स्वीकार करायचा. स्वतः आनंदात राहायचं. इतकंच नाही, तर माझ्या अवतीभवतीच्या प्रत्येक व्यक्तीला आनंद द्यायचा. स्वतःची तब्येत शेवटपर्यंत उत्तम राहील यासाठी आहार, विहार आणि व्यायाम ठेवायचा. सकारात्मक दृष्टिकोन बाळगायचा. इथे जे आजारी वृद्ध आहेत, त्यांची आपल्या परीने सेवा करायची. निराश वृद्ध आहेत, त्यांना धीर द्यायचा. आपण त्यांना भेटलो की, त्यांना आनंद झाला पाहिजे. काय आहे, ‘आम्ही सगळेच काही दिवसांचेच प्रवासी आहोत, याची सगळ्यांनाच कल्पना असते. मग प्रत्येक क्षण जास्तीत जास्त आनंदात घालवूया की... कडवट भूतकाळ इथल्या प्रत्येकालाच आहे, तो विसरायचा आणि वर्तमान क्षण आनंदात जगायचा प्रयत्न करायचा. आता, वयाप्रमाणे शारीरिक व्याधी जडणारच कधी ना कधी. निसर्ग त्याचं काम करणारच...आणि त्यानं ते करायलाच हवं. तुला सांगू का, हे निसर्गचक्र आहे ना, त्याचे नियम मनापासून स्वीकारले की, कसलीही परिस्थिती येवो, ती आनंदानं स्वीकारायला मदत होते.’

अप्पा भरभरून बोलत होते आज. मीही त्यांना थांबवलं नाही. त्यांच्या बोलण्यातून मलाही ऊर्जा मिळत होती. तांबूस सोनेरी प्रकाश पाण्यावर पसरला होता. नदीचा प्रवाह संथ वाहत होता आणि मंद वाऱ्याची झुळूक सुखावत होती. 

‘आता म्हातारपणाचं म्हणशील, तर तेही मानण्यावर आहे खरं तर! अरे मार्क ट्‌वेननंच म्हणून ठेवलंय ‘Age is an issue of mind over matter, if you don’t mind it doesn't matter‘. एवढं बोलून अप्पा खळखळून हसले. अरे खरंच सांगतोय तो. तुम्हाला आतून तरुण वाटायला हवं. तरुण दिसण्यापेक्षा, आतून तरुण वाटणं महत्त्वाचं आहे...आणि प्रत्येकाला शक्‍य आहे ते...आणि त्यासाठी तुमचे विचार सकारात्मक हवेत. आहार संयमित हवा. व्यायाम नियमित हवा. मुख्य म्हणजे दृष्टिकोन हेल्दी हवा. आत्ता घडतंय ते चांगलं घडतंय आणि पुढे घडणार आहे, ते चांगलंच घडेल हा दृष्टिकोन हवा. एखादी अप्रिय गोष्ट घडलीच, तर शांतपणे विनाअट तिला स्वीकृती द्यायला हवी. तसंच एखादी व्याधी जडलीच, तर निसर्गनियमांचा भाग म्हणून ती स्वीकारायची आणि त्याही स्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा. मुख्य म्हणजे भूतकाळातल्या गोष्टी उगाळत राहायचं नाही. काही व्यक्ती, अगदी नात्याच्या का असेनात चुकीचं वागल्या असतील, तर त्यांना क्षमा करून टाकायची. तू आता म्हणशील, ‘हे अवघड आहे. पण हीच तर आपली परीक्षा आहे. आपल्याला अहंकारावर जर मात करता आली, तर हे सहज शक्‍य आहे. माणसं चुकतात. खूप चुकतात. शेवटी ती माणसंच असतात रे हाडामासाची. असं करता आलं, की मग वर्तमान क्षणात राहायला मदत होते. आणि मन:शांती वर्तमान क्षणातच आहे!’ आत्ताचंच बघ ना, ‘मी तुझ्याशी बोलण्याचा आनंद घेतोय, त्याचबरोबर आसपास किती छान गोष्टी घडतायत. संध्याकाळची वेळ, मावळतीला जाणारा सूर्य, विलोभनीय आकाश, परतणारे पक्षांचे थवे, मंद वाऱ्याची झुळूक, इथली नीरव शांतता हे सगळं माझे senses टिपतायत. या सगळ्याचा आनंद माझ्या आत झिरपत राहतोय. मी जर भूतकाळातल्या कडवट आठवणींचं आणि भविष्यातल्या अनाठायी काळज्यांचं सावट घेऊन वावरत राहिलो, तर वर्तमान क्षणातला हा आनंद गमावून बसेन ना! जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूमधलं हे आयुष्य स्वत: आनंदी राहण्यासाठी आणि इतरांना आनंदी करत राहण्यासाठीच आहे. म्हणूनच मी सारखा स्वत: आनंदात राहतो आणि इतरांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतो. मदत करतो. हसवत राहतो.’ तुला आणखी एक गुपित सांगतो. जे सगळ्याच वृद्धांसाठी आहे. विशेषत: जे कुटुंबात राहातात ना त्यांच्यासाठी. ‘म्हातारपणी, वानप्रस्थाश्रम माणसात राहूनच स्वीकारायचा. त्यासाठी कुठे जंगलात नाही, तर मठात जाऊन राहायची गरज नाही. मनानं कौटुंबिक गोष्टीतून स्वत:ला अलिप्त ठेवायचं. स्वत:चे हट्ट, तत्त्व, अहंकार वगैरे कुणावर लादायचे नाहीत. कशात अडकायचं नाही. झाली तर मदत करायची, नाहीतर शांत रहायचं. सोपं नाही ते. पण ठरवलं तर जमत हळूहळू.’ 

अप्पा भरभरून बोलत होते. मी भेटायला आलो की, असंच घडतं. मलाही खूप काही मिळत त्यातून ‘...आणि एक महत्त्वाचं, ‘म्हातारपणी वाटणारी मृत्यूची भीती. अरे मुळात जे अटळ आहे, त्याची भीती कसली? आपला मृत्यू म्हणजे वेगळ, विशेष असं काही घडणार नाहीय. झाडाची पानगळ होते, तसंच तर असणार आहे ते. निसर्गाच्या engineering चा Mechanics आपण एक भाग आहोत, हे आपण समजून घ्यायचं. जे कधी तरी घडणारच आहे, त्याला मग आनंदानं सामोरं जाऊया. त्या कालप्रवाहात विलीन व्हायच्या अंतिम क्षणापर्यंत भरभरून जीवन अनभवूया. चला, निघायला हवं. आश्रामातली जेवणाची घंटा झाली. मित्र वाट पाहात असतील. ये रे पुन्हा!’ 

मी पाहात राहिलो. अप्पांची काटक मूर्ती झपाझप आश्रमाच्या दिशेने जात होती. नेहमीप्रमाणेच अप्पांनी आज मला खूप ऊर्जा दिली होती. आता आकाशात चांदणं उमटायला लागलं होतं. मला आतून शांत, स्वस्थ वाटत होतं.   

संबंधित बातम्या