तिचा अपराध गंड 

डॉ. विद्याधर बापट (मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ)
सोमवार, 1 एप्रिल 2019

हितगूज
 

सगळेच दिवस सारखे नसतात. यश-अपयश, सुख-दु:खासारखे चढ-उतार जीवनात सुरू असतात. निसर्गचक्राचे, जीवनचक्राचेच हे अपरिहार्य भाग आहेत. घडणाऱ्या घटना या केवळ ’Happenings’ आहेत, हे ज्याने साक्षीभाव राखून स्वीकारले, तो मग कधीच विचलित होत नाही. ध्यान आपल्याला या स्थितीपर्यंत न्यायला मदत करते. जीवनात घडणाऱ्या घटनांना जो ’Unconditional Acceptance’ (विनाअट स्वीकार) देतो तो तरला. कुटुंबातील जवळील व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू ही एक अशीच घटना. तिचा स्वीकार शांतपणे करावा लागतो. आपल्या शक्ती बाहेरची गोष्ट म्हणून जी व्यक्ती शांतपणे स्वीकारते, ती परिस्थितीशी लवकर जुळवून घेऊ शकते. कधीकधी जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूसंदर्भात मनात अपराध गंड राहातो. तो दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न लागतात.  

क्षमा माझ्याकडे आली तेव्हा, खूप विचित्र मन:स्थिती होती तिची. ती दु:खी तर होतीच, पण तिला विलक्षण अपराध गंड होता. घडलेली घटना कुठल्याही पत्नीसाठी पराकोटीचे दु:ख देणारीच होती. तिच्यावर जणू आभाळच कोसळले होते. तिच्या पतीचा, आदित्यचा अचानक अपघाती मृत्यू झाला होता. या गोष्टीला आता दोन महिने होऊन गेले; पण ती तिळभरही सावरू शकली नव्हती. जोडीदार गेल्याचे दु:ख होतेच, पण विलक्षण ‘गिल्ट’ मनात होता. ती पुण्यात राहात होती... आणि कंपनीच्या पोस्टिंगप्रमाणे काही महिने आदित्य मुंबईत राहात होता. साधारणपणे शनिवार - रविवार तो पुण्याला येत असे.  

क्वचितच असे घडे, की Emergency मुळे त्याला यायला मिळत नसे. ज्या दिवशी तो भीषण अपघात झाला, त्यावेळी पहाटेची वेळ होती. त्याच दिवशी क्षमाचा वाढदिवस होता. तो वर्किंग डे होता. खरे तर त्यादिवशी आदित्यला काही महत्त्वाचे काम आणि मिटींग्ज होत्या. पण क्षमाचा आग्रहच होता, की ‘तू काही तासांसाठी तरी ये, आपण सेलिब्रेशन करू आणि तू परत जा.’ आदित्यला हे जड जाणार होते. तो म्हणत होता, की ‘मी येत्या शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे येतोच आहे. तेव्हा निवांत सेलिब्रेट करू.’ पण क्षमाने हट्टच धरला, की ‘तू काही तासांसाठीतरी ये, दुपारी जेवून परत जा.’ क्षमाचे मन त्याच्याने मोडवेना आणि तो मध्यरात्री निघाला... आणि हे अघटित घडले. आपल्या आग्रहामुळे तो रात्री निघाला. पर्यायाने आपणच त्या अपघाताला जबाबदार आहोत, हे क्षमाच्या मनाने पक्के घेतले होते. तिला विलक्षण अपराधी वाटत होते. आपणच त्याच्या मृत्यूला जबाबदार आहोत आणि त्याबद्दल आपल्याला शिक्षा व्हायलाच हवी, असे तिला सारखे वाटत होते. आपण आत्महत्या करावी असेही तिला वाटत होते, पण छोट्या आर्याचे, त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीचे काय होईल या काळजीनेही ती हतबल झाली होती. क्षमाला तीव्र नैराश्‍याने गाठले होते. तिने नोकरीवर जाणे बंद केले होते. घरच्यांनी समजावून पाहिले. आदित्यच्या नशिबात तेवढेच आयुष्य होते, हे समजावण्याचा प्रयत्न केला. आर्यावर, तिच्या लहानग्या मुलीवर याचा विपरीत परिणाम होतोय, हे समजावले. वेगवेगळे उपायही करून पाहिले. त्यात तिने आदित्यची पत्रिका कुणाला तरी दाखवली. खरंच मृत्युयोग होता का वगैरे प्रश्न विचारले. पूर्वी मी कधीतरी त्याच्याशी भांडले होते, म्हणून तर असे झाले नसेल ना? आपण मरून जाऊन त्याला भेटता येईल का? मृत्यूनंतर तो आता कुठे असेल? खूप दु:खात असेल का? त्याला शांतता मिळण्यासाठी काय करता येईल? वगैरे बरेच ’Irrational’ पण भावनिक मुद्देही तिच्या मनात येत होते. ती सैरभैर झाली होतीच; पण मुख्य म्हणजे अपराध गंडाने तिला ग्रासले होते. तिचा कुठलाही अपराध नसताना! औषधांनी स्वस्थता आल्यावर तिला Rational Thinking, परिस्थितीची कारणमीमांसा, योग्य Analysis इत्यादी बऱ्याच गोष्टींची जाणीव होणे गरजेचे होते. चांगल्या समुपदेशनाबरोबरच त्यासाठी योग्य त्या थेरपीज वापरणे आवश्‍यक होते. तिच्या व्यक्तिमत्वामध्ये Obsessive ट्रेट्‌स होते. या विचित्र दुष्टचक्रातून तिची सुटका होणे गरजेचे होते. आदित्यच्या मृत्यूचे वास्तव स्वीकारणे, त्या मृत्यूला ती अजिबातच कारणीभूत नाही, हे तिला पटणे आणि नव्या उभारीने आयुष्याला तोंड द्यायला तिला बळ देणे गरजेचे होते. 

‘अपराध गंड’    
 अपराध गंड किंवा गिल्ट ही एक मानसिक भावनिक प्रतिक्रिया आहे. जेव्हा आपण काहीतरी विलक्षण चुकीची गोष्ट केली आहे किंवा आपल्याकडून काहीतरी खूप चुकीचे घडले आहे, ही भावना सारखी टोचत राहाते. आपल्या वागणुकीची शरम वाटत राहाते, तेव्हा तो गिल्ट असतो. कधीकधी हा गिल्ट इतका खोलवर रुजलेला असतो, की तो आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागतो. त्यामुळे आपली स्वस्थता नाहीशी होते. 

साधारणपणे अपराध गंड पुढील कारणांमुळे असू शकतो. १. तुम्ही खरोखरच काहीतरी चुकीचे केलेले असते - यामध्ये तुमच्यामुळे कुणाला तरी शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक त्रास झालेला असू शकतो. कुणाच्या सामाजिक प्रतिमेची, नात्यांची हानी झालेली असते. २. तुम्ही प्रत्यक्षात काहीही चुकीचे केलेले नसते, पण चुकीची कृती करावी अशी तीव्र इच्छा झालेली असते... आणि मग तुमची सद्‌सदविवेकबुद्धी किंवा सुपरइगो तुम्हाला त्रास द्यायला लागतो. असे चुकीचे किंवा Unethical विचार आपल्या मनात आल्याबद्दल गिल्ट वाटतो. ३. अशा गोष्टीबद्दल अपराधी वाटते, जी गोष्ट तुम्ही न करूनसुद्धा तुम्ही केली आहे असे तुम्हाला वाटते. Cognitive Theory ऑफ Emotions नुसार तुम्ही अतार्किक, Irrational  विचार केलात, तर दु:खी होता... आणि तुम्हाला जणू काही ती गोष्ट केलीच आहे अशा पद्धतीच्या गिल्टने ग्रासले जाते. क्षमाच्या बाबतीत हाही भाग होता. ४. कुणासाठी तरी तुम्ही आवश्‍यक असताना पुरेशी मदत केली नाही - विशेषत: कुणा जवळच्या व्यक्तीच्या आजारपणातील मदत. क्षमाच्या बाबतीत हा ही गिल्ट होता, की अपघात झाल्यावर आदित्यला कुठल्या तरी आडगावातल्या लहान हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्याला पुण्यातल्या मोठया हॉस्पिटलमध्ये आणले असते, तर तो वाचला असता. तिला वाटत होते, की अपघात स्थळावरून तिला फोन आल्यावर तिने फोन करणाऱ्या व्यक्तीला तसे सांगितले नाही. ५. बऱ्याच वेळा हा गिल्ट असतो, की इतरांपेक्षा तुमचे बरे चाललेले आहे- यात तुमचा खरे तर काहीच दोष नसतो, पण उगाचच इतरांविषयी कणव वाटत राहाते...आणि अपराधी वाटते.

क्षमाला बऱ्याच गोष्टींचे भान येणे आवश्‍यक होते. उदा. १. जन्म आणि मृत्यू या दोन नैसर्गिक घटना प्रत्येकाच्या आयुष्यात अटळ आहेत. मृत्यू हा एक निसर्गचक्राचा अपरिहार्य भाग आहे. तसा तो स्वीकारायला हवा. कोणाचा मृत्यू कधी आणि कसा होईल याबद्दल माणसाला पूर्ण ज्ञान नाही. तो शांतपणे स्वीकारणे आवश्‍यक आहे. इतक्‍या लहान वयात असे कसे झाले? माझ्याच वाट्याला हे दु:ख का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यापूर्वी घडलेल्या घटनेला ’Unconditional Acceptance’ द्यायला हवा आणि आयुष्य पुढे जायला हवे. हेच निसर्गचक्राला अपेक्षित आहे. दु:ख होणे स्वाभाविक आहे, पण त्यातून लवकर बाहेर पडून नव्याने उभे राहाणे हेही स्वाभाविक असायला हवे. निसर्गचक्र आणि त्यामागची कल्पना स्वीकारली, की अवघड असले तरी हे शक्‍य आहे. मानवी नियंत्रणाच्या बाहेरील घटना लवकर स्वीकारायला हव्यात. २. तिच्या वाढदिवसाला त्याने यावे असे तिला वाटणे हे दोघांमधील प्रेमापोटीच होते. त्यात गैर काही नव्हते. तिला असे वाटणे, त्यासाठी तिने आग्रह धरणे, त्यानेही तिच्या इच्छेला मान देवून पहाटे यायला निघणे, या सगळ्याचा अर्थ, ती आदित्यच्या मृत्यूला कारणीभूत आहे, असा होत नाही. यापूर्वीही आदित्य अनेकदा पहाटे निघून आलेला होता. तो चांगला ड्रायव्हर होता. अपघात घडण्याला रस्त्याची स्थिती, समोरच्याची चूक अशा अनेक घटना कारणीभूत असू शकतात. ३. अपघातानंतर आदित्यला लोकांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. याचे कारण त्याला तातडीची मदत मिळणे गरजेचे होते.  

पुण्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणणे त्या परिस्थितीत आणखी वेळ घालवण्यासारखे होते. त्याने मृत्यू टळला असता असेही नाही. त्याक्षणी तेथील लोकांनी जे सुचले ते तातडीने केले. त्यामुळे आपण आदित्यला पुण्याला आणायला सांगितले नाही हा क्षमाला गिल्ट वाटायचे कारण नाही. ४. स्वत:च्या आयुष्यासाठी तिने या स्थितीतून लवकर बाहेर पडायला हवे आणि मुलीसमोर एका धीरोदात्त आईचे उदाहरण उभे करायला हवे. मुलीला आत्ता हे समजणार नाही, पण पुढे मोठेपणी नक्की उमजेल. ५. सावरण्यासाठी तिने तत्त्वज्ञानाचा किंवा श्रद्धेचा आधार जरूर घ्यावा. परंतु, कुठल्याही अंध:श्रद्धेच्या आहारी जाऊ नये.  

या सगळ्या सर्व सामान्य मुद्द्यांबरोबरच क्षमाच्या व्यक्तिमत्त्वातील दोष, मेंटल मेकअप, Weakness, Obsessive विचारसरणी, आनुवंशिकता आणि मेंदूतील रासायनिक असंतुलन वगैरे मुद्देही कारणीभूत होते. त्यामुळेच तिचे गिल्ट फिलिंग जाणे, नैराश्‍यातून सावरणे यासाठी तज्ज्ञांची मदत आवश्‍यक ठरली. क्षमा आता छान आहे. पुन्हा कामावर जायला लागली आहे. योग्य औषधोपचार, माइंडफुलनेस, स्वस्थतेची तंत्रे, थेरपीज, समुपदेशन इत्यादींच्या मदतीने ती सावरली आहे. तिने वास्तव स्वीकारले आहे. निसर्गचक्र आणि जीवनचक्र यांचे भान तिला आले आहे. आदित्यच्या आठवणी येतातच, पण ते स्वाभाविकच आहे. तोही निसर्गचक्राचा, जीवनचक्राचाच एक भाग नाही का?

संबंधित बातम्या