काळजी वाटतेय?

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

हितगूज
 

असं म्हटलं जातं, की ‘Worry won’t stop the bad stuff from happening, it just stops you from enjoying the good’... आणि हे अगदी खरंय. केवळ काळजी करत राहण्यानं भविष्यात घडणाऱ्या अप्रिय गोष्टी तर आपण टाळू शकत नाहीच, पण आताच्या वर्तमान क्षणातले चांगले क्षण मात्र आपण उपभोगणं, त्याचा आनंद घेणं सोडून देतो. मेंदूला भविष्यातल्या दु:खाची, अप्रिय गोष्टींची चाहूल लागली, की मेंदू आनंद सोडून त्याच गोष्टी विस्तारत राहतो. आपण आता कुठल्याही आजाराविषयी बोलत नाही आहोत. सर्व साधारणपणे सारखी काळजी करण्याची, लहान लहान गोष्टीत नाराज राहण्याची सवय असण्याविषयी बोलत आहोत.  

काळजी करण्याची सवय घालवण्यासाठी आपण पुढील गोष्टी करून पाहू शकतो. 
१. काळजी करण्याची सवय का असते ते समजून घेणं :  पुढं घडू शकणाऱ्या अप्रिय गोष्टी, उद्‌भवू शकणारे धोके यांचा मेंदू अंदाज बांधण्याचा (anticipate) प्रयत्न करतो. बऱ्याचदा वाटणाऱ्या या धोक्‍यांची तीव्रता ही किरकोळ असते. बऱ्याचदा त्यांचे होणारे परिणाम काल्पनिक आणि अवास्तव असतात. मेंदू फक्त घडू शकणाऱ्या किंवा कदाचित घडू शकणाऱ्या अप्रिय गोष्टींची जाणीव करून देतो इतकंच. पण मन त्यातली अवास्तव बाजू समजूनच घेत नाही आणि आपला तोल जातो. आपण विनाकारण अस्वस्थ होतो. मेंदू त्याची धोका असू शकेल किंवा अप्रिय घडू शकेल हे जाणवून देण्याची जबाबदारी छान पार पाडतो. पण मन मात्र तो धोका फार गंभीर आहेच आणि काहीतरी खूप विपरीत घडेलच असं वाढवून (magnify) दाखवतं. मग भीती वाटायला लागते. हे सगळं समजून घ्यायला हवं.  

२. भीतीचा शांतपणे स्वीकार : दुसरा टप्पा आहे, भीतीचा शांतपणे स्वीकार करणं. साधारणपणे आपण विचारांना विरोध करतो. म्हणजे असं काही घडणार नाही असं स्वत:ला सांगत राहातो. त्याऐवजी अशी भीती मला वाटते आहे आणि मी त्याचा स्वीकार (accept) करत आहे असं स्वत:ला सांगणं. हवं तर ‘allowed’ असं स्वत:ला सांगणं.

३. स्वत:विषयी दयाभाव निर्माण होऊ देणं आणि शांतपणे भीतीच्या भावनेचं विश्‍लेषण करणं : एकदा मला अशी काळजी वाटते आहे, या गोष्टीचा जाणिवेनं स्वीकार केला, की जिथं आपल्याला भीतीमुळं, काळजीमुळं शारीरिक संवेदना जाणवत असतील तिथं अतिशय प्रेमानं हात ठेवणं. उदा. हृदयात धडधडत असेल, तर छातीवर प्रेमानं हात ठेवणं आणि स्वत:ला धीर देणं. यानं मेंदूला ही संवेदना जाणवते आणि काळजीची, भीतीची तीव्रता कमी होते. मग शांतपणे विश्‍लेषण करावं. आता मला दडपण नेमकं कशाचं आलं आहे? मला असुरक्षित का वाटतंय? नेमकं काय विपरीत घडेल आणि जास्तीत जास्त वाईट काय होईल? मला आता कुणी मदत करावी असं वाटतंय का, की मीच माझी मदत करायला हवी? मला इतरांनी दुर्लक्षित केल्यासारखं वाटतंय का? मला कुणाचं प्रेम, कुणी माझा दयाळूपणे विचार करायला हवंय का, की माझंच काही चुकतंय? मी चुकीचा विचार करत आहे का? वगैरे वगैरे हे आणि असे प्रसंगानुसार आणि व्यक्तीच्या मेंटल मेकअपनुसार अनेक प्रश्न निर्माण होतील. त्यांची उत्तरं आतून हळूहळू यायला लागतील आणि मग काळजीची (सर्वसाधारण) तीव्रता कमी होत जाईल. दडपणाचा, आपण त्यातून, त्या भावनेतून वेगळे होऊन, साक्षी भावनेनं  विचार करू शकू. 

आता आपण असामान्यपणे (abnormally) अनाठायी अति काळजी करण्याच्या, अस्वस्थतेच्या आजाराविषयी पाहू.    
अनाठायी काळजी वाटण्याचा, अस्वस्थतेचा आजार : काळजी वाटणं, काळजी घेणं आणि सतत काळजी करत राहण्याची सवय असणं यात फरक आहे. सतत काळजी करण्याच्या सवयीचा मन व शरीर दोन्हींवर घातक परिणाम होऊ शकतो. आपली भावनिक प्रकृती चांगली नसण्याचं ते एक लक्षण आहे. आपल्या नकारात्मक किंवा सदोष विचारपद्धतीचा तो भाग आहे. काळजी वाटणं ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. पण सतत काळजी करणं हे अस्वस्थतेच्या आजाराचं (Generalized anxiety disorder ) लक्षण आहे.
अति काळजी करणं हा एक प्रकारचा अस्वस्थतेचा आजार आहे. मुख्यत: यात जैविक कारणं आहेत. मेंदूतील रासायनिक असंतुलनामुळं हे आजार होतात. त्याचे परिणाम आणि उपाय दोन्ही पाहू. Psychoneuroimmunology (PNI) या शास्त्राप्रमाणं मन व शरीर यांचा एकमेकांवर चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो.  

अति काळजी करण्यामुळं ताण निर्माण होतो आणि शरीरात रासायनिक प्रतिक्रिया सुरू होतात. ॲड्रिनलिन किंवा कॉर्टिसॉलसारखी स्ट्रेस हार्मोन्स अति प्रमाणात स्त्रवतात. हे सतत घडायला लागलं, की शरीरावर विपरीत परिणाम व्हायला सुरुवात होते. चयापचय क्रिया बिघडते. मग पचनसंस्था बिघडणं, रक्तदाबाचा त्रास, वजन घटणं किंवा अति वाढणं, निद्रानाश, डोकेदुखी, चिडचिडेपणा, एकाग्रता कमी होणं, आत्मविश्वास कमी होणं, स्मरणशक्ती जाणं वगैरे शारीरिक व मानसिक त्रास सुरू होतात. बऱ्याच शारीरिक तक्रारींचं मूळ मानसिक अस्वस्थतेत असतं हे आता मान्य होऊ लागलंय. 

यावर उपाय काय आहेत? तर तातडीनं तज्ज्ञांचा सल्ला, औषधोपचार, समुपदेशन आणि स्व-मदत. तज्ज्ञांच्या साहाय्यानं स्वस्थ होऊन त्रयस्थपणे स्वत:च्या विचारप्रक्रियेकडं पाहायला शिकणं. मेंदूमध्ये नकारात्मक विचार करण्याचे, काळजी करत रहाण्याचे न्यूरॉनल पॅटर्न्स तयार झालेले असतात, ते बदलायला या सगळ्यांची मदत होते. कॉग्नेटिव्ह बिहेविअरल थेरपी (CBT ) सारख्या थेरपीजच्या साहाय्यानं नकारात्मक विचार करण्याची पद्धत बदलता येते. इतरही थेरपीजद्वारे मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. या सर्व थेरपीजचा हेतू वाटणाऱ्या काळजीतील फोलपणा आणि वास्तवाची जाणीव करून देणं हा असतो. माइंडफुलनेस (Mindfulness) सारखी तंत्रं तुम्हाला वर्तमान क्षणात जगायला शिकवतात. श्वासावर आधारित ध्यानाच्या काही पद्धती उपयुक्त ठरतात.

काही गोष्टींचा आपण विचार करणं आवश्‍यक आहे. उदा. भविष्यात घडणाऱ्या सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्याच घडतील हे शक्‍य नाही. म्हणजेच आयुष्यातील अनिश्‍चितता आपण स्वीकारायला हवी. नेहमी वाईटच घडेल असा विचार करणं योग्य आहे का? आपण आपल्याकडून सर्व प्रयत्न करणं आवश्‍यक आहे आणि त्यानंतर शांतपणे, विनाअट, परिस्थितीचा स्वीकार करायला हवा. हे सर्वच बाबतीत लागू आहे आणि सर्वांच्या बाबतीत, म्हणजे स्वत:च्या व इतर ज्यांच्या बाबतीत आपण काळजी करतोय त्यांच्या. मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांनी उत्तर द्यायला शिकायला हवं. उदा. मी जी काळजी करतोय/करतेय त्याला आधार काय आहे? मी काळजी केल्यानं परिस्थिती सुधारणार आहे का, की फक्त मीच आणखी अस्वस्थ होत जाणार आहे? ज्या गोष्टीची काळजी वाटतेय तिच्या सर्व बाजूंचा विचार मी केलाय का, की फक्त नकारात्मक बाजूच विचारात घेतलीय?

‘चिता एकदाच जाळते, तर चिंता आयुष्यभर’ हे खरंच आहे. अति काळजी करणं हे सर्वच दृष्टीनं घातक ठरू शकतं.

संबंधित बातम्या