वेळ मोठी कठीण आव्हान पेलण्याची 

डॉ. विद्याधर बापट
सोमवार, 6 जुलै 2020

कोरोनाची भीती आणि त्याचे भविष्यकाळावर  असलेले सावट आपल्या मनात आणखी भीती निर्माण करत आहे. पण अशावेळी घाबरून न जाता ‘ही वेळही जाईल’, हा सकारात्मक दृष्टिकोनच आपल्याला यातून बाहेर पडायला मदत करेल...

आपले सुखी आणि आनंदी असणे हे आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरवतो. दोन काळ्याकुट्ट रात्रींमध्ये एक दिवस असतो, असा एखाद्याचा दृष्टिकोन असू शकतो आणि दोन दिवसांमध्ये एक रात्र असते, ती संपली की पुन्हा एक स्वच्छ लखलखीत सोनसळसळीत दिवस असणारच आहे, असेही कोणी म्हणत असते. असे म्हणणाऱ्याचा दृष्टिकोन आनंदी, सकस, सकारात्मक ठरेल. हीच गोष्ट कुठल्याही गोष्टीकडे पाहण्यासाठी आणि आनंदाने राहाण्यासाठी आवश्यक असते. आत्ताची सर्वार्थाने कठीण अशी Covid-19 च्या साथीची परिस्थिती आणि त्यानंतरचा भविष्यकाळ याचे सावट, मळभ मनात दाटून येणे स्वाभाविक आहे. पण ही वेळही जाईल. आकाश स्वच्छ होईल. हाच सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला सध्याच्या कोरोनाच्या काळात ठेवावा लागणार आहे. इतकेच नव्हे, तर लहान मुलांमध्ये रुजवावा लागणार आहे. कोरोनाच्या महाभयानक साथीचे परिणाम आणि दुष्परिणाम ही साथ चालू असताना आणि पुढेही व्यक्तिगत, आर्थिक, सामाजिक सगळ्याच क्षेत्रात अनुभवावे लागणार आहे. आत्ताच आपला कम्फर्ट झोन नाहीसा झाला आहे. एक प्रकारची हतबलता आणि भीती सगळीकडे आहे. पुढे नेमके काय होणार, आयुष्य कसे असणार असे विचार सतत मनात येतात. ज्यांना अस्वस्थेतेचे नैराश्याचे आजार आहेत त्यांचे आजार वाढत आहेत. ज्यांना नाहीत त्यांना ते निर्माण होत आहेत.. होत राहतील. या परिस्थितीत सकारात्मक, आनंदी दृष्टिकोनच आपल्याला आणि लहान मुलांसह तरुण पिढीला सक्षम करेल. 

काही वास्तवाच्या, सत्य आणि व्यावहारिक (Practical) गोष्टी आपण आधी लक्षात घेऊया. 

1. Unconditional acceptance (विनाशर्त स्वीकार) आत्ताच्या आणि भविष्यातील कटू परिस्थितीतल्या काही गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत, हे आपल्याला शांतपणे स्वीकारावे लागेल. ज्या गोष्टी आपण करू शकतो, त्या गोष्टी करण्याचा निर्धार करावा लागेल. त्यासाठी पुढील प्रार्थनेची आपल्याला मदत होईल. 

‘जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया 
जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया 
मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय 
माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया... 

मृत्यू या घटनेकडे वस्तुनिष्ठ रीतीने पाहणे 
साथीच्या रोगात किंवा इतर कारणांमुळे आपल्या आसपास, क्वचित माहितीच्या व्यक्तीचा, अनेक अनोळखी व्यक्तींचा मृत्यू होतो. टीव्हीवर मृत्युच्या बातम्या, आकडे, दृश्य सतत दाखवतात. आपल्याला साहजिकच विषण्णता येते. नैसर्गिक मृत्यू ही एक न टाळता येण्यासारखी, अपरिहार्य (Inevitable) वास्तव घटना आहे. आपल्याला एका गोष्टीचे भान येणे आवश्यक आहे, की जन्म आणि मृत्यू या दोन नैसर्गिक घटना प्रत्येकाच्या आयुष्यात अटळ आहेत. मृत्यू हा निसर्गचक्राचा एक अपरिहार्य भाग आहे. तसा तो स्वीकारायला हवा. कोणाचा मृत्यू कधी आणि कसा होईल याबद्दल माणसाला पूर्ण ज्ञान नाही. तो शांतपणे स्वीकारणे आवश्यक आहे. घडलेल्या घटनेला ‘Unconditional acceptance’ द्यायला हवा आणि आयुष्य पुढे जायला हवे. हेच निसर्गचक्राला अपेक्षित आहे. दुःख होणे स्वाभाविक आहे, पण त्यातून लवकर बाहेर पडून नव्याने उभे राहणे हेही स्वाभविकच असायला हवे. निसर्गचक्र आणि त्यामागची कल्पना स्वीकारली, की अवघड असले तरी ते शक्य होते. मानवी नियंत्रणाच्या बाहेरील घटना लवकर स्वीकारायला हव्यात. 

मन स्वस्थ, शांत ठेवायला हवे 
विचित्र सावट आले आहे. ही परिस्थिती कठीण खरी, पण त्याला खंबीरपणे आणि शांतपणे तोंड द्यायला हवे. त्यासाठी विज्ञानाने आणि सरकारने सुचवलेल्या सर्व स्वच्छतेच्या आणि सामाजिक शिस्तीच्या सूचनांचे पालन तर करायलाच हवे; पण मन शांत ठेवणे अतिशय आवश्यक आहे. दोन प्रश्न प्रत्येकाला सतावत आहेत. ते म्हणजे, हे सगळे कधी संपणार आणि या व्हायरसचा संसर्ग मला किंवा माझ्या माणसांना निश्चित होणार नाही ना! या प्रश्नांतून एक भीती सगळ्यांना वेढून राहिली आहे. 

सध्याच्या परिस्थितीत स्वतःचे मन स्वस्थ ठेवणे, शांत ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी वास्तव जसेच्या तसे स्वीकारायला हवे. वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे काळज्या घ्यायला हव्यात. Lifestyle changes करायला हवेत आणि शांतपणे परिस्थितीला तोंड द्यायला हवे. या काळात मानसिक स्वास्थ्य जपणे अतिशय महत्त्वाचे आहे. मनाच्या स्वस्थतेचा आणि शरीर स्वस्थ असण्याचा, प्रतिकारशक्ती उत्तम राहण्याचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणूनच काळजी करणे आणि काळजी घेणे यामधला फरक समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. अति काळजी करण्यामुळे प्रश्न सुटणार नाहीतच, तर नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात. 

केवळ काळजी करीत राहण्याने भविष्यात घडणाऱ्या अप्रिय गोष्टी तर आपण टाळू शकत नाहीच; पण आत्ताच्या वर्तमान क्षणातले चांगले क्षण मात्र आपण एंजॉय करणे राहून जाते. मेंदूला भविष्यातल्या दुःखाची, अप्रिय गोष्टींची चाहूल लागली, की मेंदू आनंद सोडून त्याच गोष्टी मोठ्या (Magnify) करतो. काळजी करण्याची सवय का असते ते समजून घेणे - पुढे घडू शकणाऱ्या अप्रिय गोष्टी, उद्‍भवू शकणारे धोके यांचा अंदाज बांधण्याचा (Anticipate) प्रयत्न मेंदू करतो. बऱ्याचदा वाटणाऱ्या या धोक्यांची तीव्रता (Intensity)  किरकोळ असते. बऱ्याचदा त्यांचे होणारे परिणाम काल्पनिक आणि अवास्तव असतात. मेंदू फक्त घडू शकणाऱ्या किंवा कदाचित घडू शकणाऱ्या अप्रिय गोष्टींची जाणीव करून देतो इतकेच. पण मन त्यातली अवास्तव बाजू समजूनच घेत नाही आणि आपला तोल जातो. आपण विनाकारण अस्वस्थ होतो. धोका असू शकेल किंवा अप्रिय घडू शकेल हे जाणवून देण्याची त्याची जबाबदारी मेंदू छान पार पाडतो. पण मन मात्र तो धोका फार गंभीरच आहे आणि काहीतरी खूप विपरीत घडेलच असे Magnify करतो. मग भीती वाटायला लागते. कोरोना साथीच्या संदर्भात हे सगळे समजून घ्यायला हवे. 

भीतीचा Mindfully स्वीकार - ही दुसरी स्टेप आहे. 
भीतीचा शांतपणे स्वीकार करणे. साधारणपणे आपण विचारांना विरोध करतो. म्हणजे असे काही घडणार नाही.. घडणार नाही असे स्वत:ला सांगत राहतो. त्याऐवजी मला अशी भीती वाटते आहे आणि मी त्याचा स्वीकार (Accept) करीत आहे असे स्वत:ला सांगणे; म्हणजेच सध्याच्या कोरोना साथीच्या परिस्थितीत मी सांगितलेली सगळी काळजी घेईनच. पण जर चुकून विपरीत परिस्थिती आली, तरी मी ती स्वीकारेन आणि शांत राहून तोंड देईन. अति काळजी करणे, हा एक प्रकारचा अस्वस्थतेचा आजार आहे. मुख्यत: यात जैविक कारणे आहेत. मेंदूतील रासायनिक असंतुलनामुळे हे आजार होतात. Psychoneuroimmunology (PNI) या शास्त्राप्रमाणे  मन व शरीर यांचा एकमेकांवर चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो. 

अति काळजी करण्यामुळे  ताण निर्माण होतो आणि शरीरात रासायनिक प्रतिक्रिया सुरू होतात. Andrenalin किंवा Cortisol सारखी स्ट्रेस हार्मोन्स अति प्रमाणात स्रवतात. हे सतत घडायला लागले, की शरीरावर विपरीत परिणाम व्हायला सुरुवात होते. प्रतिकारशक्ती कमी होते. Metabolism च बिघडते. चयापचयावर परिणाम होतो. मग पचनसंस्था बिघडणे, रक्तदाबाचा त्रास, वजन घटणे किंवा अति वाढणे, निद्रानाश, डोकेदुखी, चिडचिडेपणा, एकाग्रता कमी होणे, आत्मविश्‍वास कमी होणे, मेमरी लॉस वगैरे शारीरिक व मानसिक त्रास सुरू होतात. बऱ्याच शारीरिक तक्रारींचे मूळ मानसिक अस्वस्थतेत असते, हे आता मान्य होऊ लागले आहे. 

आत्ताच्या परिस्थितीत मनात येणारे, अस्वस्थ करणारे विचार कमी होण्यासाठी माइंडफुलनेस म्हणजेच क्षणसाक्षित्वाच्या सरावाचा खूप उपयोग होण्यासारखा आहे. योग्य आहार, भरपूर चल पद्धतीचे व्यायाम, योग व ध्यानाचा नियमित सराव हे सर्व प्रतिकारशक्ती वाढण्याच्या दृष्टीने आणि मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. 

मुलांसाठी अतिशय महत्त्वाचे 
सकारात्मकता हा सर्वांच्याच विचार करण्याच्या पद्धतीचा भाग व्हायला हवा. या किंवा कुठल्याही संकटानंतर विपरीत परिस्थितीत टिकून राहणे आणि त्यावर मात करणे हे शिकून घेणे, प्राणवायूइतके महत्त्वाचे आहे. IQ (Intelligence Quotient) बरोबरच, सोशल Quotient, भावनांवर नियंत्रण आणि अतिशय महत्त्वाचा म्हणजे Adversity Quotient, कठीण परिस्थिती यशस्वीपणे हाताळता येणे, अपयश आले तरी न खचता पुन्हा जिद्दीने उभे राहणे या गोष्टी मुलांना जमायलाच हव्यात. त्या दृष्टीने घरात, शाळेत प्रयत्न हवेत. शिक्षणक्रमात या विषयाचा समावेश व्हायला हवाच. यामुळे व्यक्तिमत्व सक्षम होईल आणि तात्कालिक अस्वस्थतेवर आपण मात करू शकू. संकटात संधी शोधू शकू. सकारात्मक विचारसरणीचा मेंदूवर खूप चांगला परिणाम होतो. 

 • १. मेंदूमध्ये Prefrontal cortex मध्ये न्यूरॉन्सची वाढ - ग्रोथ होते. नवीन Synapses तयार होतात. याच भागामधे मन, विचार यासंबंधीचे महत्त्वाचे कार्य चालते. 
 • २. विश्लेषण करण्याची व विचार करण्याची क्षमता वाढते. 
 • ३. मनाची सतर्क राहण्याची क्षमता वाढते. 
 • ४. सकारात्मक विचारसरणी एकदा रुजली, की नवनवीन, सृजनात्मक विचार निर्माण होण्याची क्षमता वाढते. 

संशोधनाअंती सकारात्मक विचारसरणीचे खूप फायदे लक्षात आले आहेत... 

 •      आयुष्यमान वाढणे 
 •      ताणतणावांचे निराकरण करता येणे 
 •      अस्वस्थतेचे आजार व नैराश्याचा आजार टाळणे किंवा झाल्यास लवकर बरे होण्यास मदत होणे 
 •      प्रतिकारशक्ती वाढणे 
 •      व्यक्तिमत्व विकास 
 •      शारिरीक व मानसिक आजार लवकर बरे होणे 
 •      भौतिक आयुष्यात हवे असणारे यश, समृद्धी स्वकर्तृत्वाने मिळवता येणे.
 •      तरुण पिढीसाठी, लहान मुलांसाठी अशा पद्धतीच्या सकारात्मक प्रोग्रामिंगची आता नितांत गरज आहे. 

थोडक्यात काय, तर आलेल्या परिस्थितीला खंबीरपणे आणि शांतपणे तोंड देऊया. आपले ‘आतले वातावरण’ स्वस्थ ठेवूया. आलेल्या संकटाचे सावट, मळभ निश्चित जाईल. पुन्हा एकदा आकाश स्वच्छ, निरभ्र होईल...

संबंधित बातम्या