भयगंड; काल्पनिक भीती

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजनतज्ज्ञ
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

रात्री बाराचा सुमार असावा. मस्त थंडी होती. लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवर, सर्व सोपस्कार उरकून फ्लाइटची वेळ होईपर्यंत, ५ नंबरच्या टर्मिनसवर, मी एका ठिकाणी कॉफी घेत बसलो होतो. एक २८ - २९ वर्षांचा भारतीय तरुण माझ्या टेबलपाशी आला. इथे बसू का म्हणून त्यानं इंग्रजीत विचारलं. मी हसून, ‘my pleasure’ म्हणालो. त्यानं कॉफीचा मग आणला होता. पण खूप अपसेट वाटत होता. एवढ्या थंडीत त्याला चक्क घाम फुटला होता. हात थरथरत होते. कॉफीचा मग कसाबसा ओठांपर्यंत जात होता. डिस्टर्ब वाटत होता खूप. अचानक त्यानं विचारलं, Indian? म्हटलं, येस. महाराष्ट्रीय. एकदम relief मिळाल्यासारखा त्यानं निःश्‍वास टाकला.

रात्री बाराचा सुमार असावा. मस्त थंडी होती. लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवर, सर्व सोपस्कार उरकून फ्लाइटची वेळ होईपर्यंत, ५ नंबरच्या टर्मिनसवर, मी एका ठिकाणी कॉफी घेत बसलो होतो. एक २८ - २९ वर्षांचा भारतीय तरुण माझ्या टेबलपाशी आला. इथे बसू का म्हणून त्यानं इंग्रजीत विचारलं. मी हसून, ‘my pleasure’ म्हणालो. त्यानं कॉफीचा मग आणला होता. पण खूप अपसेट वाटत होता. एवढ्या थंडीत त्याला चक्क घाम फुटला होता. हात थरथरत होते. कॉफीचा मग कसाबसा ओठांपर्यंत जात होता. डिस्टर्ब वाटत होता खूप. अचानक त्यानं विचारलं, Indian? म्हटलं, येस. महाराष्ट्रीय. एकदम relief मिळाल्यासारखा त्यानं निःश्‍वास टाकला. मराठीत म्हणाला, सुजय.. सुजय खासनीस. आयटी कंपनीत आहे. पंधरा दिवसांसाठी इथं आलो होतो.. हात मिळवला आणि मी माझं नाव सांगितलं. फ्लाइटविषयी विषयी विचारलं. गमतीचा भाग म्हणजे आमची फ्लाइट एकच होती आणि सीट्‌सही शेजारी होत्या. मी म्हणालो, What a pleasant surprise! चला म्हणजे आता मला छान कंपनी मिळाली... तो कसनुसं हसला. जसजसा वेळ जात होता तसतसा तो जास्त जास्त अस्वस्थ होताना दिसत होता. शेवटी मी त्याला त्याविषयी विचारलं. काही मदत हवी आहे का विचारलं. तो म्हणाला, ‘कसं सांगू सर, प्रत्येक वेळी असं होतं. विमानानं जायचं म्हटलं की पोटात गोळा उठतो. मला फ्लाइट आणि हाइटची भीती वाटते. छातीत धडधडायला होतं, हात पाय कापतात. पण आता ही शेवटची वेळ. मी नोकरी सोडणार आहे. गावी जाऊन दुसरं काही तरी करणार आहे. पण हेही सोपं नाही. नुकतंच माझं लग्न झालंय. हेमांगीला, माझ्या बायकोला कितीही समजावलं तरी माझा प्रॉब्लेम तिच्या लक्षात येत नाही.’ विचारलं, ‘काय शिकलायस तू?’ तो म्हणाला, ‘एम.टेक. आयआयटी, पवई.’ एका हुशार तरुणाचं संभाव्य दिमाखदार कर्तृत्व काळोखून जाण्याचा संभव होता. 

समोर इंडिकेटरवर आमच्या फ्लाइट बसची अनाउन्समेंट दिसत होती. मी त्याच्या खांद्यावर हात टाकला. म्हटलं, ‘चल, मी आहे तुझ्याबरोबर. काही होणार नाही तुला.’ 

आम्ही बाहेर पडलो. बाहेर थंडी मी म्हणत होती. जोडीला बोचरं वारं. मागं पाहिलं, तर हिथ्रोचं अवाढव्य स्वरूप आणि इकडं तिकडं वेगवेगळ्या रंगांचे लुकलुकणारे दिवे. बसमधून विमानापर्यंतचं अंतर पाच - दहा मिनिटांचं होतं. तेवढा वेळसुद्धा त्याला नीट उभं राहाता येत नव्हतं. माझ्या लक्षात आलं, ही फोबिक अँक्‍झायटी होती. या मुलाला यातून बाहेर काढायलाच हवं होतं. विमानात सीट्‌सवर बसेपर्यंत मी त्याचा हात सोडला नाही. त्यानंतरही तो सतत पाणी पीत होता. त्याला धाप लागत होती. मी हसून त्याला माझी, मी काय करतो याची माहिती दिली. त्याला सांगितलं, ‘तू प्रॉब्लेममधून बाहेर पडू शकतोस. मी तुला मदत करीन. भारतात पोचल्यावर - बंगलोरला, म्हणजे जिथे तू सध्या आहेस, तिथले तज्ज्ञ तुला मदत करतील. माझ्याशी आता फक्त मोकळेपणानं बोल..’ ‘सर मला नक्की काही होणार नाही ना? म्हणजे हार्ट ॲटॅक वगैरे?’ त्याने विचारले. मी म्हणालो, ‘तुला नक्की काही होणार नाही. हे तुला होतंय ते सारं मेंदूतील रासायनिक बदलांमुळं होतंय. आता फक्त तू मोकळेपणानं बोल.’ त्याच्या चेहऱ्यावर विश्‍वास दिसायला लागला होता. विमानानं धावपट्टी सोडली आणि तो बोलायला लागला. ‘प्रत्येक वेळेला विमानानं जायचं म्हटलं, की पोटात गोळा येतो. अस्वस्थता सुरू होते, प्रवासाचा दिवस उजाडला, की खचल्यासारखं होतं, विमानात बसलं की छातीत धडधडणं, डोकं जड होणं, आपलं काहीतरी बरं वाईट होणार असं वाटू लागतं. वाटतं आता बास झालं, आपली सहनशक्ती संपली, सोडून द्यावी ही नोकरी...’ तो अगदी हतबल झाला होता. त्याला समुपदेशनाची गरज होती. कदाचित दीर्घ काल उपचारांचीही! कारण हा भयगंडाचा (फोबिया) प्रकार दिसत होता. काही गोष्टी मला कराव्या लागणार होत्या आणि काही त्याला स्वतःला! त्याला धीर दिला की यातून नक्की बाहेर पडता येईल. 

मी त्याला विचारलं, ‘सुजय, संख्या शास्त्रानुसार विमानांचे अपघात सर्वांत कमी होतात की इतर वाहनांचे, म्हणजे रेल्वे, रस्त्यावरील वाहनं वगैरेंचे?.. विमानांचे, बरोबर आहे? बरं मृत्यू टाळता येतो का? तू विमानानं नाही गेलास आणि मृत्यू येणार असेल तर टाळता येईल? आणि नसेलच येणार तर? विमानानं जायचंय ठरल्यावर जे काही छातीत धडधडतं, रक्तदाब वाढतो, मळमळल्यासारखं होतं याची कारणं निर्माण होणाऱ्या भीतीत, मानसिक ताणात आहेत की शारीरिक?’ तो थोडा विचारात पडला. पटत तर असावं पण एवढ्यानं प्रश्‍न सुटणार नव्हता. भीतीचं मूळ खूप खोलवर रुजलं होतं. अन ती अवास्तव, निराधार निरर्थक होती. शेवटी फोबिया म्हणजे तरी काय? विशिष्ट प्रसंग, घटना, गोष्टी, कृती वगैरेंची अकारण वाटणारी, अशास्त्रीय, अवाजवी वाटणारी तीव्र भीती. अशी भीती जेव्हा दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागते तेव्हा व्यक्ती त्या घटनेपासून पळ काढू लागते. तेच सुजयच्या बाबतीत घडत होतं. मेंदूत एखादी भयकारी घटना, प्रसंग नोंदवून ठेवला जातो. त्याची अतार्किक कारणमीमांसा नोंदवून ठेवली जाते आणि तसा प्रसंग आला, की अस्वस्थतेची लक्षणं सुरू होतात. मूलतः हे मेंदूतील रासायनिक असंतुलनामुळं होतं. बऱ्याचदा आनुवंशिकता, दुबळी आत्मप्रतिमा अशाही गोष्टी लक्षणं वाढायला कारणीभूत ठरतात. सुजयला विमान प्रवासाचा जसा फोबिया तसा अनेकांना इतर.. उदा. बंद जागांची भीती, लिफ्टची भीती, जंतूसंसर्गाची, मृत्यूची, कर्करोगाची, रक्ताची, अनोळखी ठिकाणांची, माणसांची... असते. ही यादी प्रचंड मोठी आहे. पण यावर मात नक्की करता येते आणि ती करायला शिकायला हवं. जरूर भासल्यास वेळेवर तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी. सुजय बंगलोरला असला तरी या प्रकरणामध्ये माझ्याकडून अपेक्षित मदत मी नक्कीच करीन असं आश्‍वासन त्याला दिलं. पण त्यानं काय करायला हवं होतं? प्रथम या फोबियावर मी मात करू शकेन हा विश्‍वास बाळगायला हवा. रिलॅक्‍सेशनची वेगवेगळी तंत्रं शिकून घ्यायला हवीत, त्यांचा रियाझ करायला हवा आणि प्रसंगाला तोंड देताना ती वापरायला हवीत. नियमित चल पद्धतीचा व्यायाम करायला हवा, ज्यामुळं नैसर्गिकरीत्या सेरोटोनिन व इतर चांगली संप्रेरकं स्रवतील. सकारात्मक स्वयंसूचनेचा वापर शिकायला हवा. भीती वाटणाऱ्या प्रसंगाला आपण व्यवस्थित तोंड देत आहोत या कल्पनाचित्राचा सतत मानसिक रियाझ करायला हवा. हळू हळू, पायरी पायरीनं, निर्धारानं आणि ठामपणे प्रसंगाला तोंड देण्याची सवय करावी. आवश्‍यक तिथं निःसंकोचपणे तज्ज्ञांची मदत घ्यावी.

सुजय आता बराच स्वस्थ झाला होता. म्हणाला, ‘पोचल्यावर तुम्ही म्हणाल ते सगळं करीन.’ मी स्मित केलं. त्याच्या पाठीवरून हात फिरवला. थोड्याच वेळात तो गाढ झोपला. एखाद्या लहान, निर्व्याज बाळासारखा! 

मी खिडकीतून बाहेर पाहिलं. बाहेर अजून अंधार होता. विमानाचं सावकाश हलणं आणि अजस्र पंख्यांखालच्या इंजिनचा घरघर आवाज. बाकी सगळी शांतता. पण थोड्याच वेळात निश्‍चितपणे उजाडणार होतं. 

सुजयनं भारतात पोचल्यावर सांगितलेलं सगळं केलं. बंगलोरला तज्ज्ञांकडून आवश्‍यक औषधं घेतली. सीबीटी, आरइबीटी, Systematic Desensitization Techniques आणि आवश्‍यक त्या सायकोथेरपीज घेतल्या. रिलॅक्‍सेशनची तंत्रं शिकून घेतली. वेळ आल्यानंतर प्रसंगाला तोंड कसं द्यायचं, काय विचार करायचा हे सगळं शिकून घेतलं. 

मधे काही महिने गेले. परवा सुजयचा बंगलोरहून फोन आला.. ‘सर, सुजय खासनीस बोलतोय. आता सगळं मस्त चाललंय. गेल्या चार महिन्यांत पाच ट्रिपा मारल्या.. नो प्रॉब्लेम..’ मी त्याचं अभिनंदन केलं. 

मेंदूत एखादी भयकारी घटना, प्रसंग नोंदवून ठेवला जातो. त्याची अतार्किक कारणमीमांसा नोंदवून ठेवली जाते आणि तसा प्रसंग आला, की अस्वस्थतेची लक्षणं सुरू होतात. मूलतः हे मेंदूतील रासायनिक असंतुलनामुळं होतं. बऱ्याचदा आनुवंशिकता, दुबळी आत्मप्रतिमा अशाही गोष्टी लक्षणं वाढायला कारणीभूत ठरतात.
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या