सूर्यप्रकाशाचा वापर

अल्पना विजयकुमार
गुरुवार, 31 जानेवारी 2019

होम गार्डन
 

बागेची आखणी करताना काही तांत्रिक बाबींची माहिती आपण घेत आहोत. या लेखात आपण सोलर परावर्तक, बागेसाठी कृत्रिम प्रकाशाचा वापर कसा करावा, याविषयी जाणून घेऊ.

सोलर परावर्तक (Solar reflectors) 
आपल्या बागेमध्ये प्रत्यक्ष सूर्यप्रकाश नसेल तर तो कसा आणावा यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे (फोटो क्र. १ पहा). पूर्वी सोलर कुकरमध्ये वापरण्यात येणारे तंत्रज्ञान म्हणजे आरशाचा वापर करून केले जाणारे सूर्यप्रकाशाचे परावर्तन (Solar reflectors) थोड्याफार प्रयोगाने तुम्ही घरच्या घरी असे रिफ्लेक्‍टर्स तयार करू शकाल. बागेमध्ये भरपूर सूर्यप्रकाश असणाऱ्या जागेमध्ये मोठा आरसा ठेवून तिथून सावली असणाऱ्या ठिकाणी प्रकाश परावर्तित केला जातो. (आकृती क्र. १ पहा)  
आकृती क्र. १ सोलर रिफ्लेक्‍टर्स रचना 
अशाच प्रकारे घराच्या भिंतींचे बाहेरच्या बाजूला पांढरा किंवा मोतिया रंग देऊन प्रकाशाचे परावर्तन करता येईल. विशेषतः दक्षिणेकडील भिंतीला असा रंग दिल्यास संपूर्ण बागेला त्याचा फायदा होईल. 

कृत्रिम प्रकाशाचा वापर 
परदेशामध्ये थंड हवेच्या ठिकाणी सर्वत्र, अतिशय कमी किंवा थेट सूर्यप्रकाश पडतच नाही. अशा ठिकाणी घराच्या आत बागेची रचना करून विशिष्ठ दिव्यांच्या साहाय्याने कृत्रिम प्रकाश पाडला जातो व भाजीपाला आणि इतर झाडे वाढविली जातात. अशाप्रकारचे दिवे व ट्यूब लाईटस्‌ आता आपल्याकडे सुद्धा योग्य किमतीत उपलब्ध  आहेत (फोटो क्र. २) 

हरितगृहे किंवा शेडनेटस 
गच्चीवरील उन्हामध्ये पाचसहा कुंड्या तग धरायला खूप त्रास होतो. परंतु छोटी झाडे, कुंडीतील झाडे, लॉन, पाण्याचा टब, छोटा धबधबा, या सर्व गोष्टी एकत्र असलेली एक रचना (ecosystem) लवकर तग धरते. याचे कारण बाष्पाचे किंवा आद्रतेचे एकूण प्रमाण वाढून एकमेकांच्या साथीने सूक्ष्म वातावरण तयार होते. झाडांची वाढ चांगली होते. 
जमिनीवर किंवा गच्चीमध्ये ज्या झाडांना सावलीतच वाढण्याची गरज आहे. अशांसाठी हरितगृहे शेडनेटगृहे यांची गरज आहे. ऑर्किडस्, अँथुरियम, फर्न, भाजीपाल्याची रोपे, यांना कायमच सावली व आर्द्रतेची जरुरी असते. अशा झाडांना वेलींच्या मांडवाखाली वेगवेगळ्या शेडनेटची जरुरी नाही (फोटो क्र. ३ पहा) 

मध्यम तापमान असणाऱ्या प्रदेशात गच्चीवरील बागांमधे भाजीपाला व इतर झाडांसाठीसुद्धा शेडनेटची गरज नसते. परंतु कडक उन्हाळा, अतिउष्ण व कोरडे हवामान असणाऱ्या ठिकाणी (उदा.औरंगाबाद, सोलापूर) गच्चीवरील तसेच जमिनीवरील बागांमध्ये भाजीपाला व नाजूक झाडांसाठी शेडनेटच्या उच्छादनाची गरज असते. बांबू किंवा लोखंडी अँगलच्या सांगाड्यावर पन्नास टक्के प्रकाश देणारे शेडनेट वापरून अशी सोय करता येईल. याबरोबरीने फॉगर्स, स्प्रींकलर्स, यांची सोय केल्यास हवेमधे आर्द्रता व थंड वातावरण राखता येईल. आजूबाजूला मोकळ्या जागा असणाऱ्या पोडीयम किंवा गच्चीवरील मोठ्या बागांना वाऱ्याचा त्रास होतो. यामुळे केळी किंवा इतरझाडांची पाने फाटतात अशावेळी बांबु, सुपारी,ऊस, पाम या उभ्या वाढणार झाडांचा आडोसा केल्यास वाऱ्यापासून संरक्षण होते व बागेचे सौंदर्यही वाढते. पॅरापीटला अँगल्स किंवा बांबूच्या साहाय्याने शेडनेट बांधून सुद्धा वाऱ्यापासून संरक्षण करता येईल.
पाण्याची उपलब्धता, बागेला पाणी देण्याची पद्धती व त्यातील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान याबद्दल पुढील लेखात माहिती घेऊ... 

संबंधित बातम्या