पाण्याचे व्यवस्थापन

अल्पना विजयकुमार
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

होम गार्डन
 

बागेचे नियोजन करताना पाणी व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बागेची आखणी करताना बागेची पाण्याची गरज मोजल्यास, योग्य व्यवस्थापन करणे शक्‍य होईल. पाण्याचे नियोजन झाडांच्या प्रकारावर, जमिनीच्या पोतावर, हवामानावर व बागेच्या रचनेवर (जमिनीवरील झाडे, कुंडीतील झाडे, गच्चीवरील झाडे ) अवलंबून आहे. यामुळे बागेच्या पाण्याच्या गरजेची आकडेवारी व काटेकोर नियम सांगता येणार नाहीत, म्हणून पाण्याचे नियोजन स्वतःच्या अनुभवाने, झाडांचे निरीक्षण करून ठरविणे योग्य होईल. वाफ्याचा निचरा, मातीचा प्रकार, झाडांचे प्रकार, बागेला मिळणारा प्रकाश व हवामानाचा अंदाज घेऊन, योग्य वेळी योग्य त्या प्रमाणात पाणी घालणे जरुरीचे आहे.

झाडांना किती पाणी द्यावे, हा प्रश्न नेहमी विचारला जातो. झाडांना पाणी कमी झाले तरी ती सुकून मरतात. पण घरगुती बागांमध्ये बहुधा पाणी जास्त झाल्यामुळे, कुजून झाडे पिवळी पडतात व कालांतराने मरतात. पाणी जास्त झाल्याने फुले व फळे कमी येण्याची समस्या उद्भवते. फुलांमध्ये मोगरा व फळांमध्ये डाळिंबाच्या झाडांना ठराविक काळामध्ये पाणी देण्याचे थांबवल्यावर बहर येतो.

जमिनीत लावलेल्या झाडांना पाण्याची गरज कमी तर कुंडीतील झाडांना सातत्याने पाणी घालणे जरुरीचे! विशेषतः गच्ची मधील झाडे, कुंड्या यांना दररोज पाणी देण्याची गरज आहे. कारण माती कमी असल्याने पाणी धरून ठेवण्याची क्षमता फार कमी असते.उन्हाळ्यामध्ये झाडांना भरपूर पाणी द्यावे लागते, तर हिवाळ्यात एक दिवसाआड पाणी पुरते. खरं तर मातीमध्ये बोट घातल्यावर ओलावा लागत असेल तर पाण्याचे प्रमाण योग्य आहे असे समजावे.

मातीमधे पालापाचोळा,कोकोपीट मिसळून मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल. कुंडीत हवा खेळती  राहिल्याने  झाडांची वाढही चांगली राहील. कुंडीतील झाडांना पाणी देताना तळाला असलेल्या भोकातून पाणी बाहेर येते का हे पहावे. बऱ्याच वेळेला  हे भोक बुजले असेल, कुंडी खाली ताटली ठेवल्याने, जास्तीचे पाणी कुंडीत साठून, झाडांची मुळे कुजतात. सध्या नव्यानेच आलेल्या सेल्फ वॉटरिंग कुंड्यांना पाणी किती व कसे द्यावे हे शिकणे महत्त्वाचे आहे. अशाच प्रकारे वाफ्यातील पाण्याचा निचरा नीट होतो आहे का, हे पाहावे. नवीन कुंड्या भरताना, तळाचे भोक झाकले जाईल एवढे विटांचे तुकडे व त्यावर पालापाचोळा व मग माती भरावी. असे केल्याने पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल.

बागेला पाणी देताना पाइपने पाणी घातले जाते, यासाठी नळीच्या तोंडाशी बसविण्याचे स्प्रे किंवा नोझल जरूर वापरावे. कारण पाणी फार जोराने घातल्यास झाडातील माती इतस्ततः फेकली जाते व मुळे उघडी पडतात. मोठ्या झाडांना, फुलझाडांना पाणी देताना फवाऱ्याने पाणी दिल्यास पानांवरील कीड निघून जायला मदत होते असे असले तरी शेतकरी मात्र भाजीपाल्याला जमिनीवरूनच पाणी देण्याचे कटाक्षाने पाळतात, कारण भाजीपाल्याची पाने पाणी जास्त काळ राहिल्यास कुजतात व किडीचे प्रमाण वाढते.

ठिबक सिंचन पद्धत 
पाण्याची बचत व सोय या दोन्ही दृष्टींनी ठिबक सिंचन ( ड्रिप ) करणे फायद्याचे ठरते. या पद्धतीत टाकीपासून बागेपर्यंत, एक प्लास्टिकची पाइप लाइन (मेन्स) टाकतात. या पाइपला ठरावीक अंतरावर भोके पाडून, तिथून मुळाशी पोचतील अशा छोट्या नळ्या (लॅटरल्स) बसवून, त्यातून थेंबाथेंबाने पाणी पडण्याची व्यवस्था केलेली असते. किती वेळा मधे किती लिटर पाणी दिले जाईल हे मोजता येते. छोट्या नळ्यांच्या तोंडाशी ड्रीपर्स बसवून त्यांच्या साह्याने थेंबा थेंबा ने पाणी दिले जाते. काही झाडांना कमी पाणी लागते तर काहींना जास्त, अशावेळी कमी जास्त क्षमतेचे ड्रीपर वापरतात.
अशाच प्रकारे तुषार सिंचन (स्प्रिंकलर्स) किंवा फॉगर यांचीसुद्धा जोडणी करतात. यासाठी मूळ रचना ठिबक सिंचनासारखी करून ड्रीपरच्या जागी गोलाकार फवारा मारणारे स्प्रिंकलर्स बसवतात. नाजूक फुलांचे वाफे,भाजीपाला, नर्सरीमध्ये अगदी छोटे स्प्रिंकलर्स पुरतात. हिरवळ किंवा मोठ्या क्षेत्रांमध्ये चौफेर पाणी देण्यासाठी स्वनियंत्रित ऑटोमॅटिक स्प्रिंकलरचा फार उपयोग होतो. गोलाकार अर्धगोलाकार अशा विविध प्रकारांचे व क्षमतेचे स्प्रिंकलर्स बाजारात उपलब्ध आहेत. वातावरणामध्ये ओलावा, दमटपणा धरून ठेवण्यासाठी काही विशिष्ट पिकांसाठी किंवा हरितगृहामध्ये फॉगर्सचा वापर केला जातो. ठिबक सिंचनासाठी जमिनीवरील पाइपचा वापर करतात. तर फॉगर्स अडकविण्यासाठी आठ ते दहा फूट उंच तारेचा सांगाडा वापरतात. एकूणच ठिबक किंवा तुषार सिंचनामुळे पाण्याची फार मोठी बचत होते व पाणी देणे सोयीचे होते, कष्ट वाचतात. तसेच या पाण्यामधून झाडांच्या मुळाशी काही द्रवरूप खते देणे, तणांचीवाढ नियंत्रित ठेवणे इत्यादी अनेक फायदे होतात. ठिबक सिंचनाचे नियंत्रण करणारी स्वयंचलित उपकरणे (ऑटोमॅटिक कंट्रोल) बाजारात उपलब्ध आहेत. यांनी रोजच दिवसातील ठरावीक काळासाठी या मधून पाणी पडते. तुम्ही पाच ते सहा महिने गावाला गेलात, परदेशी गेलात तरी तुमच्या बागेतील झाडे, कुंड्या हिरव्यागार राहतात. अशाप्रकारे ठिबक, तुषार सिंचन या पद्धती थोड्या  खर्चिक असल्या तरी अत्यंत सोयीच्या ठरतात.     

संबंधित बातम्या