घरगुती बागेसाठी खतांचा वापर

अल्पना विजयकुमार
सोमवार, 8 एप्रिल 2019

होम गार्डन
 

घरगुती बागेचा विचार करताना आपण झाडांच्या पोषणासाठी खतांच्या रूपाने अन्नद्रव्ये मातीत मिसळून मातीचा कस सुधारतो. गच्चीवरील बागेत मातीचे प्रमाण कमी असल्याने खते घालणे आवश्‍यक आहे.
सर्व वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. वनस्पती त्यांना वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये पाण्यातून, हवेतून व मातीमधून मिळवतात. बरीचशी अन्नद्रव्ये वनस्पती मातीतून मिळवतात. जमिनीमध्ये कमी पडणारी अन्नद्रव्ये आपण विविध प्रकारच्या खतांच्या माध्यमातून त्यांना पुरवत असतो. आपल्या बागेमध्ये विविध प्रकारची फुलझाडे आपण लावतो. त्यांची खताची गरज वेगवेगळी असते. झाडांच्या वाढीसाठी लागणारी आवश्‍यक अन्नद्रव्ये व त्यांचे प्रमाण माहीत करून घेणे गरजेचे आहे. ही अन्नद्रव्ये तीन गटात विभागली गेली आहेत.
१) मोठ्या प्रमाणात लागणारी अन्नद्रव्ये
यामध्ये कार्बन, प्राणवायू व हायड्रोजन यांचा समावेश होतो. ही अन्नद्रव्ये वनस्पती हवेतून किंवा पाण्यातून, सूर्यप्रकाशाच्या साह्याने मिळवतात. या क्रियेलाच प्रकाशसंश्‍लेषण किंवा फोटोसिंथेसिस असे म्हणतात. तसेच एन.पी.के. म्हणजेच नत्र (नायट्रोजन), स्फुरद (फॉस्फरस) व पालाश (पोटॅशियम) ही महत्त्वाची द्रव्ये वनस्पती जमिनीतून मिळवतात. स्फुरद झाडांची मुळे भक्कम होण्यासाठी, नत्र झाडांच्या व पानांच्या चांगल्या वाढीसाठी आणि पालाश चांगली फळधारणा, फळांची गुणवत्ता व रंग यासाठी उपयुक्त असते. वरील तीनही द्रव्ये फक्त खतांद्वारे झाडांना दिली जातात. झाडांच्या वाढीच्या टप्प्यांमध्ये खतांद्वारे आवश्‍यक अन्नद्रव्यांचा पुरवठा झाडांना झाला पाहिजे. वरील त्रिसूत्री लक्षात ठेवून खतांचा योग्य प्रमाणात, योग्य वेळी वापर केल्यास उत्तम परिणाम दिसून येतात.
२) मध्यम प्रमाणात लागणारी अन्नद्रव्ये 
या अन्नद्रव्यांमध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व गंधक यांचा समावेश आहे. 
३) सूक्ष्म प्रमाणात लागणारी अन्नद्रव्ये
लोह, बोरॉन, तांबे, जस्त, क्‍लोराईड व मॅंगनीज ही अन्नद्रव्ये सूक्ष्म प्रमाणात आवश्‍यक आहेत. ही जमिनीतून घेतली जातात. मातीमधून किंवा पाण्यातून वरील अन्नद्रव्ये वनस्पती मिळवतातच, परंतु पालेभाज्या किंवा फळ भाज्यांच्या चांगल्या वाढीसाठी वरील सूक्ष्म द्रव्यांची एकत्रित प्रमाणात मिळणाऱ्या खतांची एकदा केलेली फवारणी फायद्याची ठरेल. 
खतांद्वारे देण्यात येणारी अन्नद्रव्ये रासायनिक खते, सेंद्रिय खते, जैविक खते आणि हिरवळीचे खत या चार प्रकारच्या खतांद्वारे दिली जातात. 

रासायनिक खते
रासायनिक खते कारखान्यात तयार करण्यात येतात. झाडांच्या आवश्‍यकतेनुसार त्यांचे प्रमाण ठरविता येते. बाजारात सुफला, युरिया सुपर फॉस्फेट या नावाने ही खते उपलब्ध आहेत. रासायनिक खतांचा वापर काटेकोरपणे करावा लागतो. खतांची मात्रा योग्य प्रमाणात सांभाळली नाही, तर वनस्पतींचे नुकसान होते. भरमसाट रासायनिक खतांचे मानवाच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम अनुभवतच आहोत. तसेच रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनी क्षारयुक्त व निकामी झाल्याचे नेहमी वाचनात येते. त्यामुळेच आपण सेंद्रिय खतांकडे वळलो आहोत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या लोकसंख्येसाठी अधिक धान्य पिकवणे आवश्‍यक आहे. बागेसाठी रासायनिक खते वापरताना त्यांची साठवण, हाताळणी, योग्य मात्रा व पाणीपुरवठा या गोष्टी सांभाळणे आवश्‍यक असते. हे घरगुती बाग करणाऱ्याला जमेलच असे नाही. म्हणूनच घरगुती बागेसाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे सर्वच दृष्टीने फायद्याचे ठरते.

सेंद्रिय खते
सेंद्रिय खते नैसर्गिक प्रक्रियेने तयार होत असल्याने त्यांचे झाडावर किंवा मानवी शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. सेंद्रिय खतामध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या खतांसाठी जे पदार्थ वापरले जातात, त्यानुसार त्याची गुणवत्ता व गुणधर्म ठरतात. सेंद्रिय खते आपण आपल्या बागेमध्ये तयार करू शकतो. सेंद्रिय खतांचे भर खते व जोर खते असे दोन प्रकार आहेत. भर खतांमध्ये शेणखत, कंपोस्ट, लिफ्ट मोल्ड हे प्रकार आहेत. लागवडीच्या वेळी ही खते दिली जातात. लेंडी खत, विष्ठेचे खत, गांडूळ खत हीदेखील उपयुक्त भर खते आहेत. भर खते झाडांना लागणारी अन्नद्रव्ये कमी असल्याने घालावी लागतात. पोत सुधारण्यासाठी या खतांचा चांगला उपयोग होतो. यामध्ये अन्नघटक जास्त प्रमाणात असल्याने ती कमी द्यावी लागतात. 
जोर खत म्हणजे पेंडी. तेल काढल्यावर राहणारा चोथा म्हणजेच सरकी पेंड, शेंगदाणा पेंड, मोहरी पेंड हे सर्व खत म्हणून उपयोगी पडते. त्यापैकी निंबोळी पेंड व करंज पेंड कीटकनाशकांचेसुद्धा काम करतात. ही खते जमिनीत घातल्यामुळे कीटकांचे उपद्रव टाळता येतात. याचा वापर झाडे लावताना जरूर करावा. स्टरामील हेदेखील जोर खतात मोडते. काही खतांचा वापर अत्यंत कमी प्रमाणात करावा लागतो व ती दिल्यावर भरपूर पाणी द्यावे लागते. नाहीतर झाड पिवळे पडू शकते. परसबागेमध्ये, घरगुती बागेमध्ये दर दोन ते तीन महिन्यांनी या खताचा वापर करावा. सेंद्रिय खतांचे परिणाम झाडांवरती दिसायला थोडा वेळ लागतो, कारण झाडाला वापरण्याच्या अवस्थेमध्ये येण्यासाठी लागणारा वेळ जास्त असतो. या खतांमुळे मातीचा पोत सुधारतो. मातीमध्ये हवा खेळती राहते. प्राणी जमीन पोखरून जमीन भुसभुशीत करतात. खते मातीमधील निरनिराळ्या क्षारांचे उपयुक्त अवस्थेत रूपांतर करून झाडांना पुरवण्याचे काम करतात. त्यामुळे जेवढे जीवजंतू जास्त तितके झाडांना अन्न जास्त प्रमाणात मिळते. काही सेंद्रिय खते, उदाहरणार्थ लिफ्ट मोड किंवा पालापाचोळ्याचे खत, कंपोस्ट खत, गांडूळ खत आपण आपल्या बागेमध्ये स्वतः तयार करू शकतो.
 

संबंधित बातम्या