बागेसाठी द्रवरूप सेंद्रिय खते

अल्पना विजयकुमार
सोमवार, 22 एप्रिल 2019

होम गार्डन
 

माझी मुलगी शाळेत असताना तिने केलेला विज्ञानाचा प्रकल्प आठवतो. कुकर लावताना डाळ व तांदूळ धुऊन झाल्यानंतरचे पाणी भाजीपाला वाढविण्यासाठी वापरले तर वाढ चांगली होते, असा काहीसा प्रकल्प होता. 
सेंद्रिय पद्धतीने घरगुती भाजीपाला पिकवणाऱ्यांची संख्या आजकाल खूपच वाढली आहे. किंबहुना याची एक चळवळच उभी राहिली आहे. व्हॉट्‌सॲप व फेसबुकच्या माध्यमातून तिला चांगले खतपाणी मिळते आहे. बागकाम, भाजीपाला लागवडीसंबंधीचे बरेच प्रयोग लोकांसमोर येत आहेत. त्यामुळे विविध घरगुती पदार्थांचा झाडांच्या वाढीसाठी प्रयोग म्हणून वापर होतो आहे. आपण स्वतः अनुभव घेऊनच त्यांचा वापर करावा. या लेखामध्ये आपण अशाप्रकारे वापरण्यात येणाऱ्या विविध मिश्रणांची माहिती घेऊ. यापैकी काही मिश्रणे, उदाहरणार्थ जिवामृताचे महत्त्व अनेकांनी वापरून सिद्ध केले आहे. 

झाडांना द्रवरूपाने खते देणे अतिशय फायद्याचे आहे. ही खते विरघळलेली असल्यामुळे अतिशय कमी प्रमाणात द्यावी लागतात. वनस्पती ही खते पटकन वापरू शकतात, त्यामुळे लगेचच परिणाम दिसतो. द्रवरूप सेंद्रिय खत म्हणून जिवामृत किंवा अमृत पाणी फार उपयुक्त आहे. जिवामृतामुळे घडून येणाऱ्या किण्वन प्रक्रियेमुळे जिवाणूंच्या सक्रियतेला चालना मिळते. यामुळे मावा, तुडतुडे, रसशोषक किडे अशा रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिवामृताचा उपयोग होतो. सातत्याने वापरले तर पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असा सर्वांचा अनुभव आहे. शेतीसाठी उपयुक्त असे किमान चार प्रकारचे जिवाणू शेणामध्ये फार मोठ्या प्रमाणावर असतात. जिवामृत बनवताना शेणामध्ये विविध घटक मिसळून ते आंबविण्याच्या प्रक्रियेने त्या जिवाणूंच्या संख्येत १० ते १०० पटींनी वाढ होते. जमिनीवरील जैविक पदार्थ, पालापाचोळा यांच्या विघटनासाठी मदत होते. गाळलेल्या जिवामृताचा वापर किडनियंत्रणासाठी फवारून करता येतो. 

 जिवामृत :  घरगुती स्वरूपात जिवामृत बनविण्यासाठी दोन किलो देशी गाईचे ताजे शेण, एक लिटर गोमूत्र, कुठल्याही डाळीचे १०० ग्रॅम पीठ, १०० ग्रॅम सेंद्रिय काळा गूळ याचे मिश्रण करावे. हे द्रावण पुढील तीन दिवस गोणपाटाने झाकून ठेवून दिवसातून दोन वेळा काठीने हलवावे. असे तयार झालेले द्रावण पुढे सात दिवस वापरता येते. जिवामृताची उपयुक्तता वाढविण्यासाठी वाया जाणाऱ्या फळांचा लगदा आणि वड किंवा पिंपळ यांच्या मुळातील एक मूठभर माती मिसळावी. जिवामृतात नत्र, स्फुरद व पालाश भरपूर प्रमाणात असते. याने जमिनीतील ह्यूमस व आर्द्रता वाढते. नियमित वापरताना प्रत्येकी २० दिवसांनी किंवा भाजीपाल्याची नवीन झाडे लावल्यानंतर आठ दिवसांनी याचा वापर करावा.

 केळीपासून द्रवरूप खत : खराब झालेल्या, काळ्या पडलेल्या केळ्याचा सालासकट चुरा करून अंदाजे एक कप सेंद्रिय गूळ, एक कप दही एकत्र करून ठेवावे. हे मिश्रण दर दोन दिवसांनी हलवावे. सावलीत ठेवून दोन आठवड्यांनी वापरावे. हे मिश्रण झाडांच्या वाढीसाठी मातीमध्ये घालू शकता किंवा गाळून घेतल्यानंतर पानांवर फवारणी करू शकता. केळ्यामध्ये नत्र आणि स्फुरदचे प्रमाण भरपूर असते. इथे गुळाचा व दह्याचा उपयोग उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढविण्यासाठी होतो. अशाप्रकारे उत्तम प्रकारचे घरगुती द्रवरूप सेंद्रिय खत तयार होईल.

  घरगुती ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस व त्यापासून मिळणारी स्लरी खत म्हणून वापरणे याबद्दलची माहिती आपण आधीच घेतली आहे. तसेच ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करणे सर्वश्रुत आहे. या ऐवजी एका जर्मन संशोधनानुसार अतिशय सोपी आणि उपयुक्त पद्धत म्हणजे आपल्या घरातील ओला कचरा, भाजी, फळे यांची साले, चहाची पत्ती, कॉफी, अंड्याची टरफले या सर्वांचा लगदा करून मिक्‍सरमधून काढून त्यामध्ये १ः१० प्रमाणामध्ये पाणी घालून झाडाच्या मुळाशी घालावे व नेहमीप्रमाणे पाणी द्यावे. यामुळे घरातल्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लागेल आणि त्याशिवाय तुमच्या बागेला उत्तम प्रकारचे द्रवयुक्त सेंद्रिय मिळेल.

अशा प्रकारे घरगुती द्रवरूप सेंद्रिय खत तयार करताना अगदी केवळ भारताचा विचार केला तरी विविधता आढळते. छोटे मोठे प्रयोग करून यातील कोणते खत जास्त उपयुक्त आहे, कोणते खत उपयुक्त नाही याचा तारतम्याने विचार करून आपल्या बागेसाठी वापर करावा.

संबंधित बातम्या