घरगुती बागेची निर्मिती

अल्पना विजयकुमार
सोमवार, 6 मे 2019

होम गार्डन
 

घरगुती बागेच्या निर्मितीसाठी विटांचे वाफे वापरावेत की कुंड्यांमध्ये रचना करावी, हा जसा एखाद्याच्या आवडीचा भाग आहे, तसेच कोणत्या प्रकारच्या बागेसाठी कोणते साहित्य (कंटेनर्स) वापरावेत याचाही विचार करावा.
जमिनीवरील बागेसाठी विटांचे वाफे उपयोगी पडतात, परंतु रचनेनुसार काही ठिकाणी कुंड्यांचा वापर योग्य ठरतो. वॉटरप्रूफिंग नसलेल्या किंवा आकाराने लहान असलेल्या गॅलरीसाठी कुंड्यांमध्येच झाडे लावणे योग्य होईल. वॉटरप्रूफिंग असलेल्या गच्चीसाठी जमिनीवरील विटांचे वाफे, फळाफुलांची मोठी झाडे अशी रचना परिपूर्ण होईल.

१) विटांचे वाफे : वाफे बनविण्यापूर्वी जमिनीवर प्लास्टिक शीट अंथरावे. भाजीपाल्याच्या प्रकारानुसार कमी अधिक उंचीचे वाफे आपण विटांच्या साह्याने तयार करू शकतो. याची लांबी गरजेनुसार वाढविता येते. रुंदी साधारण दोन ते तीन फूट असावी. पालेभाज्यांसाठी कमी उंची पुरते. परंतु, वेल व फळभाज्यांना तीन फुटाची उंची लागते. कंदभाज्या जमिनीत खोलवर जातात. त्यांच्यासाठी चार विटांचा थर लावावा. गच्चीवरील पॅरापिट वॉलच्या साह्याने भिंतीला समांतर वाफे केले, तर एका बाजूला विटांची गरज राहात नाही.  

२) कुंड्या : हल्ली बाजारामध्ये विविध प्रकारच्या कुंड्या उपलब्ध आहेत. माती, प्लास्टिक, सिमेंट, सिरॅमिक यामध्ये विविध आकारांच्या कुंड्या मिळतात. विविध आकारांच्या कुंड्या निवडल्या तरीही बुडाशी अतिशय अरुंद अशा कुंड्या निवडू नयेत. कारण मुळांना वाढायला जागा राहात नाही. सेल्फ वॉटरिंग प्रकारच्या कुंड्या सोडल्या, तर इतर सर्व कुंड्यांच्या तळाशी भोक असणे आवश्‍यक आहे. मातीच्या कुंड्या झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त. परंतु, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवताना त्या जड होतात. अशाच प्रकारे चिनी मातीच्या किंवा सिरॅमिकच्या कुंड्या रंगसंगती व नक्षीकामामुळे सर्वांना आवडतात. पण त्या वापरण्याच्या दृष्टीने नाजूक ठरतात. 
सध्या प्लास्टिकमध्ये अतिशय सुंदर, विविध रंगांच्या व आकारांच्या कुंड्या उपलब्ध आहेत. या वापरायला सोयीच्या असल्यामुळे सर्वत्र वापरल्या जातात. झाडांच्या निवडीनुसार कुंड्यांचे आकार ठरवावेत. आपल्या बागेमध्ये भाजीपाल्यासाठी आयताकृती कुंड्या किंवा ट्रे वापरावेत. फुलझाडांसाठी सहा ते दहा इंच व्यासाच्या कुंड्या उपयोगी ठरतात. फुलांची मोठी झाडे किंवा फळझाडे लावताना १६ ते २४ इंचांपर्यंतच्या कुंड्यांचा वापर करतात. 

३) हॅंगिंग कुंड्या : बाजारात प्लास्टिक किंवा ज्यूटपासून तयार केलेल्या हॅंगिंग कुंड्या विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. बांबूपासून अनेक प्रकारच्या हॅंगिंग कुंड्या तयार करता येतात. 

४) ग्रो बॅग : विघटनशील प्लास्टिक, ज्यूटपासून बनविलेल्या ग्रो बॅग वापरण्यास अतिशय उपयुक्त व माफक किंमत यांमुळे खूप प्रसिद्ध होत आहेत. नको असेल तेव्हा घडी घालून ठेवता येणे, हा यांचा अजून एक फायदा सांगता येईल. 

५) सेल्फ वॉटरिंग कुंड्या : झाडांना दररोज पाणी देणे, गावाला गेल्यावर झाडांना पाणी कसे देणार, या समस्यांवर उपाय म्हणून नव्याने विकसित झालेल्या सेल्फ वॉटरिंग कुंड्या अतिशय उपयुक्त ठरत आहेत. यामध्ये, कुंडीच्या तळाशी विशिष्ट ट्रे ठेवून त्याखाली पाणी साठवण्यासाठीची रचना, ट्रेमधून पाण्यापर्यंत झाडाची मुळे पोचण्यासाठी केलेली सोय, अशी सर्वसाधारण मांडणी असते. अशा कुंड्या विविध आकार व विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध आहेत. दररोज पाणी न देता आठवड्यातून एकदाच कुंडीमधील नळीवाटे पाणी सोडल्यावर ते तळाशी साठविले जाते. हवे तेव्हा, मुळांवाटे झाड पाणी शोषून घेते. यामुळे पाण्याची बचतसुद्धा होते. 

६) टाकाऊ पासून टिकाऊ प्लांटर : पत्र्याच्या किंवा प्लास्टिकच्या बाटल्या, लाकडी खोकी या सर्वांपासून अतिशय सुबक प्लांटर बनवता येऊ शकतात. या सर्वांची माहिती आपल्याला यूट्यूब वरून वेळोवेळी मिळतेच. याशिवाय घरगुती वापरातून टाकून दिलेल्या वस्तू म्हणजे सिंक, बेसिन, संडासची टाकून दिलेली भांडी या सर्वांतूनसुद्धा वेगळ्या प्रकारचे व सुबक प्लांटर बनवता येतात. फक्त आपल्याला यासाठीची दृष्टी हवी.   

संबंधित बातम्या