टाकाऊपासून टिकाऊ प्लांटर

अल्पना विजयकुमार
सोमवार, 20 मे 2019

होम गार्डन
 

घरगुती बागेसाठी विविध प्रकारचे टाकाऊपासून टिकाऊ प्लांटर करता येतात. उदा. गाडीचे टायर, पॅकिंगचे लाकडी खोके, पीव्हीसी पाइप, वापरात नसलेली चीनीमातीची बेसिन, एवढेच नव्हे तर अगदी संडासचे भांडे सुद्धा!

जुन्या टायरच्या तळाशी पत्रा किंवा लाकडी फळी बसवून उत्तम प्लांटर तयार होतो. (फोटो क्र.१) तळाशी विटांचे तुकडे, नारळाच्या शेंड्या व त्यावर खत-मातीचे मिश्रण भरावे. यामध्ये पालक, मेथी, कोथिंबीर चांगली वाढते. पूर्ण किंवा अर्धा कापलेला टायर तसाच ठेवून हॅंगिंग म्हणून झाडे लावण्यासाठी वापरता येईल. याला तळाला भोके पाडून नेहमीप्रमाणे भरून, दोरी किंवा साखळी वापरून हॅंगिंग करता येईल. अशा हॅंगिंगची शोभा वाढविण्यासाठी विविध रंगाच्या ऑइल पेंटचा वापर करता येईल.

एक ते दोन लिटरच्या प्लॅस्टिकच्या बॉटल विविध प्रकारे कापून त्यापासून उत्तम प्रकारचे प्लांटर बनवता येतात. (फोटो क्र.२) यामध्ये चीनी गुलाब, ऑफिस टाइम यासारखी छोटी झाडे छान वाढतात. वापरून खराब झालेल्या बिसलेरीच्या कॅनचा तळाकडचा भाग कापून टाकून निमुळता भाग वरच्या बाजूला बसवून घरगुती सेल्फ वॉटरिंग पॉट तयार होईल. या बाटल्यांना ऑइल पेंट दिल्यास शोभून दिसतील.

पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडी फळ्या वजनाला हलक्‍या व कापायला सोप्या असतात. अशा फळ्यांपासून प्लांटर बनवता येतात. पाण्याने खराब होऊ नयेत म्हणून त्यांना आतून प्लास्टिक शीट बसवतात. (फोटो क्र.३)

फुटलेल्या सिंटेक्‍स टाकीच्या तळाकडचा भाग बागेतील पाँड म्हणून उत्तम प्रकारे वापरता येतो. (फोटो क्र.४) अशाच प्रकारे चित्रात दाखविल्याप्रमाणे फुटके बेसिन, संडासचे भांडे अगदी कल्पकतेने झाडे लावण्यासाठी वापरता येईल.

अशाच प्रकारे चीनीमातीच्या बरण्या, जुन्या बास्केट, दुधाचे कॅन अशा अनेक वस्तू आहेत, की ज्यांचा आपण झाडे लावण्यासाठी उपयोग करू शकतो. फक्त कल्पकता व सौंदर्यदृष्टी आणि काम करायला हात तयार असायला हवेत.    

संबंधित बातम्या