पावसाळ्यापूर्वीची तयारी

अल्पना विजयकुमार
मंगळवार, 11 जून 2019

होम गार्डन
 

पावसाळ्यापूर्वी शेतकरी शेत नांगरून ठेवतात. ढेकळे फोडून माती मऊ करून ठेवतात. काडीकचरा, आधीच्या पिकाचे अवशेष, मुळे वेचून शेत तयार ठेवतात. उन्हाळ्यामध्ये तापलेल्या जमिनीवर पाऊस पडल्यावर उत्तम वाफसा येतो व पेरलेले धान्य उगवते. अगदी अशाच पद्धतीने घराभोवतीची बागसुद्धा पावसाळ्यासाठी, नवीन झाडे लावण्यासाठी सज्ज करावी लागते. या लेखामध्ये घरगुती बाग असणाऱ्या सर्वांसाठी पावसाळ्यापूर्वीच्या तयारीबद्दल सखोल माहिती घेऊ.

आपल्याकडे जूनमध्ये पावसाचे आगमन होते. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्या बागेतील उन्हाळ्यातील कामे पूर्ण करायला हवीत. बागेमधील माती बदलण्याचे काम उन्हाळ्यामध्येच करायला हवे. पावसाळ्यामध्ये एकतर माती विकत मिळत नाही आणि किमती वाढतात हे सांगायला नकोच. साधारणपणे दोन वर्षांतून एकदा जमिनीवरच्या बागेमध्ये लाल माती किंवा पोयटा मातीची भर घालावी. नियमितपणे सेंद्रिय खत घालणाऱ्यांसाठी नवीन मातीची भर घालणे जरुरी नाही. पण जुन्या मातीमध्ये सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढविण्यासाठी शेणखत/कंपोस्ट खत/गांडूळ खत जरूर वापरावे. मात्र कोणतेही सेंद्रिय खत घालताना त्यामध्ये हुमणी, गोगलगायी नसल्याची खात्री करावी. शक्‍यतो पूर्ण वाळलेले खत घ्यावे व त्यामध्ये नीमपेंड मिसळून त्यातील ढेकळे फोडून बारीक करून मगच मातीमध्ये मिसळावे. नीमपेंडीमुळे सर्व शत्रू कीटक, जिवाणूंचा नाश होतो. नवीन माती व खताचे मिश्रण संपूर्ण बागेमध्ये न टाकता मोठ्या झाडांच्या भोवती आळी करून व भाजीच्या वाफ्यातच घालावे.

बागेतील वाफ्यांच्या जागा बदलणे, पाणी साठणाऱ्या जागा शोधून पाण्याचा निचरा कसा होईल हे पाहणे, ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वीच करावी लागतील. जुन्या झाडांच्या कुंड्या बदलून मोठ्या कुंड्यांमध्ये झाडे लावणे, कुंडीतील झाडांची माती बदलणे ही कामेसुद्धा पाऊस सुरू व्हायच्या अगोदर करावीत. नको असलेली झाडे काढून काहींच्या फांद्या कमी करणे, झाडांना शेप देणे हे सर्व पाऊस सुरू व्हायच्या आधी उन्हाळ्यामध्येच करून घ्यावे.

काहीवेळा विटांच्या वाफ्याची उंची कमी असल्याने माती वाहून जाते. अशा ठिकाणी विटांची उंची वाढवावी. बऱ्याच ठिकाणी विटा व सिमेंटचे वाफे बांधलेले असतात. तळाजवळ भोके नसतील, तर पाणी साचते व झाडे मरतात. पाऊस आल्यावर यामध्ये दुरुस्ती करणे अवघडच होते.

पावसाळ्यामध्ये सर्वांत डोकेदुखी निर्माण करणारे बागेचे शत्रू म्हणजे गोगलगायी. यांचे दोन प्रकार आहेत शंखवाल्या व बिनशंखाच्या स्लग. जमिनीवरच्या गार्डनमध्ये यांना रोखणे अतिशय कठीण. टेरेस गार्डनमध्ये त्या जाण्याचे कारण म्हणजे नवीन झाडे! म्हणून नवीन झाडांच्या पिशव्या, कुंड्या यांच्या तळाशी व मुळांवरसुद्धा अगदी लहान शंख आहेत का, याचे बारकाईने निरीक्षण करावे. अगदी थोड्या प्रमाणात असतील तर उचलून साबणाच्या पाण्यात टाकाव्यात. कारण बागेतील नवीन कोवळी झाडे, भाजीची रोपे हेच यांचे खाद्य. यासाठी बागेमध्ये मुद्दाम दोन-तीन बेडूक सोडा. गोगलगायी रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. त्यावेळी त्या सहज उचलता येतात. तसेच बागेमध्ये गुळाचे पाणी किंवा छोट्या भांड्यात बिअर जागोजागी ठेवावी. गोगलगायींना त्याचा वास आवडतो व त्यामुळे त्या त्याच्यात येऊन पडतात आणि दुसऱ्या दिवशी उचलून टाकता येतात. अशाच प्रकारे कंपोस्ट बरोबर आलेली लहान झुरळे हीसुद्धा त्रासदायक होऊ शकतात.

बागेत नव्याने लावायच्या झाडांची यादी करावी. ही झाडे विकत आणणार की जुन्या झाडांच्या फांद्या कापून नवीन झाडे तयार करणार की बिया पेरणार हे सर्व ठरवून घ्यावे. शक्‍यतो पावसाळ्याच्या आधी अशी रोपे तयार ठेवावीत. एक-दोन पाऊस पडल्यावर ती ठरवलेल्या जागी लावावीत. एकदा जोरात पाऊस सुरू झाल्यावर नवीन झाडे लावण्यासाठी थांबावे लागेल. आपल्याकडची सर्व फळझाडे, फुलझाडे लावण्याचा चांगला सीझन म्हणजे पावसाळा!

सर्व वेलवर्गीय भाज्या उदा. दुधी, दोडका, कारले, काकडी, पडवळ, घोसावळे यांच्या बिया पेरून रोपे तयार ठेवा. शक्‍यतो नवीन बियाणे वापरा. कांदा, टोमॅटो, वांगी, मिरची, कोबी, फ्लॉवर यासारख्या भाज्या पावसाळ्यात उत्तम येतात. त्यापैकी काहींचे पावसाळ्यात वापरण्याचे बियाणे व हिवाळ्यात वापरण्याचे बियाणे वेगवेगळे असते. पावसाळ्याच्या सुरुवातीला जोरदार पावसात पालेभाज्या लावू नयेत, कारण त्यांची पाने नाजूक असल्यामुळे त्या कुजून जातात. हळद, आले, फुलांच्या झाडांपैकी लिली, मे फ्लॉवर, मोगरा, जाई, जुई या झाडांच्या लागवडीसाठी पावसाच्या सुरुवातीचा काळ उत्तम आहे.

शेतकरी वर्ग धान्य पेरण्यासाठी अक्षयतृतीया हा उत्तम मुहूर्त मानतात. कारण, या दिवशी लावलेले बियाणे उत्तम प्रकारे उगवून येते. याचा अनुभव आपणसुद्धा जरूर घ्या!

संबंधित बातम्या