पावसाळ्यात रोपांची लागवड

अल्पना विजयकुमार
सोमवार, 8 जुलै 2019

होम गार्डन
 

या  लेखामध्ये कुंड्यांमध्ये नवीन झाडांची लागवड, जुन्या झाडांच्या कुंड्या बदलणे, रोपे कशी करावीत याविषयी माहिती घेऊया. आपल्याकडे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जुन्या झाडांच्या कुंड्या बदलणे, नवीन झाडे कुंड्यांमध्ये भरणे ही कामे केली जातात. कारण पावसाळ्यातील योग्य वातावरणामुळे झाडांना धक्का कमी बसतो. 

पहिल्यांदा कुंडीचे खालचे पाणी जाण्याचे भोक विटेच्या लहान तुकड्यांनी बंद करावे. कुंडीमध्ये एक इंचापर्यंत विटांचे तुकडे भरावेत. यावर कुजलेला पालापाचोळा, नंतर रेती व त्यानंतर खत, कोको पीट, माती यांचे मिश्रण भरावे. पिशवी एका बाजूने फाडून नवीन झाड बाहेर काढावे. पिशवीतील मातीसकट कुंडीच्या मध्यभागी ठेवावे. त्याभोवती नवीन माती व मिश्रण भरावे. कुंडीचा वरचा दीड इंचाचा भाग रिकामा ठेवावा.

जुन्या झाडाची कुंडी बदलताना आदल्या दिवशी हलके पाणी द्यावे. कुंडीतील झाड काढण्यापूर्वी एका हाताने कुंडी उलटी करावी. कुंडीच्या तळाशी हलकी थाप देऊन मातीच्या गोळ्यासह मुळांना इजा होणार नाही अशा तऱ्हेने झाड काढावे. ते नव्या खत-माती भरलेल्या कुंडीत मध्यभागी काळजीपूर्वक लावावे. गुलाबासारख्या झाडाच्या मुळ्या खूप वाढलेल्या असतील, तर बारीक केशमुळे कात्रीने कापून मग परत कुंडीत भरावे.

पावसाळ्यापूर्वीच्या काळामध्ये झाडांच्या अनावश्‍यक फांद्या कापणे, छाटणी करणे म्हणजेच पिचिंग करणे आवश्‍यक आहे. झाडाचा आकार चांगला व्हावा किंवा अधिक चांगली वाढ व्हावी यासाठी झाडाची छाटणी करतात. ही छाटणी वर्षातून एकदा करतात. बोगन वेल, जाई, जुई, मोगरा, गुलाब या सर्व झाडांना फुले येऊन गेल्यानंतर त्यांची छाटणी करतात. त्यामुळे त्यांचा आकार चांगला राहतो. फळझाडांची छाटणी करण्याचे तंत्र वेगळे आहे. शेवगा, अंजीर या झाडांची उंची आठ फूट झाल्यावर मुख्य शेंड्याकडचा भाग कापतात. यामुळे आजूबाजूच्या फांद्यांची वाढ होऊन तिथे फळे लागतात. लिंबू, संत्र, मोसंब या सर्वांच्या वाळलेल्या फांद्या एकदा फळे येऊन गेल्यानंतर कापाव्या लागतात. काही वेलींना आपण तारेवर चढवतो किंवा तार गोलाकार करून त्यावर चढवतो. दोन-तीन हंगामांनंतर अशा वेलीची वेडीवाकडी वाढ होते, म्हणून ती सर्व वाढ छाटावी व फक्त नवीन फूट ठेवावी.

झाडांची रोपे बिया पेरून, पानफुटीच्या पानांपासून, खोडांचे कटिंग लावून, दाब कलम, गुटी कलम करून किंवा डोळे भरून किंवा विभाजन करून तयार करतात. त्यापैकी बियांपासून किंवा कटिंगपासून रोप तयार करणे हे फार सोपे आहे. कलम करण्यासाठी मात्र अभ्यासाची गरज आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला भाजीपाल्याच्या रोपासाठी ज्या भाज्यांच्या बिया मोठ्या असतात त्या टोचून पेरता येतात. अशा भाज्यांची अगोदर रोपे तयार करून त्यांची पुनर्लागवड करतात. ज्या भाज्यांच्या बिया लहान असतात, उदा. पालेभाज्या; त्यांची जागेवरच पेरणी करतात. लाल माठ, तांदुळजा, पालक, शेपू, चाकवत, आंबट चुका, कोथिंबीर या सर्वांच्या बिया पेरताना हातातून एका जागी जास्त पडतात, म्हणून त्या थोड्या मातीत किंवा खतात मिसळून मग पेराव्यात.

कोणत्याही बिया पेरणी अगोदर दोन ते चार तास पाण्यात ठेवल्या तर उगवण लवकर होते. बीज प्रक्रिया केल्याने निश्‍चित फायदा होतो. बाजारामध्ये यासाठीची तयार उत्पादने मिळतात. सेंद्रिय पद्धतीने बीजप्रक्रिया करण्यासाठी गोमूत्रात नऊ पट पाणी मिसळून त्यामध्ये बिया भिजवून लावल्यास फायदा होतो. धने पेरताना चिरडून पेरावेत. धने आदल्या दिवशी भिजत घालून पुन्हा बारा तास बांधून ठेवून पेरल्यास उगवण लवकर होते. पालेभाजीच्या बिया जमिनीमध्ये खूप खोल लावल्यास त्यांची उगवण होत नाही.

फांद्यांपासून अभिवृद्धी करताना खोडाचा किंवा फांदीचा थोडासा जूनाभाग कापून त्याचा उपयोग नवीन झाड करण्यासाठी होतो. मोगरा, गुलाब, जाई-जुई, जास्वंद फांद्यांपासून रोपे तयार करणे अत्यंत सोपे आहे. लिली वर्गीय झाडांच्या कंदांची पावसाळ्याच्या सुरुवातीला विभागणी करून परत लावल्यास त्यापासून रोपे तयार होतात. उदा. लिली, मे फ्लॉवर, निशिगंध. स्ट्रॉबेरी, रताळी, संक्रांत वेल यांसारख्या झाडांना खोडापासून मुळे म्हणजे रनर फुटतात. त्या पासून रोपे तयार करतात. वाळू किंवा पानांचे कुजलेले खत भरलेल्या लहान कुंड्यांमध्ये ही हवेतील मुळे लावावीत. हळद व आले यांचे छोटे तुकडे करून जमिनीत खोचून ठेवल्यास पावसाळ्यामध्ये मोड येऊन त्यापासून नवीन हळदीची किंवा आल्याची रोपे तयार होतात. काही गवत वर्गीय झाडे यासारखी वाढतात. गवती चहा, स्नेक ग्रास, वेखंड, वाळा यापासून रोपे तयार करण्यासाठी जुडगे मुळासह वेगळे करून लावावेत. जुडगे वेगळे करताना प्रत्येक खोडाबरोबर मुळ्याही असाव्यात. झाडांच्या विविध प्रकारानुसार अभिवृद्धी करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत.   

संबंधित बातम्या