बागेतील वेलवर्गीय वनस्पती

अल्पना विजयकुमार
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

होम गार्डन
 

झाडे हा बागेतील सर्वांत महत्त्वाचा व मुख्य घटक आहे. या झाडांचे वर्गीकरण आपण विविध प्रकारे करू शकतो. उदा. फळझाडे, वेली, भाजीपाला, विविध प्रकारचे गवत. झाडांच्या उंचीनुसार उदा. झुडुपे, मध्यम उंचीची झाडे, वृक्ष; झाडांच्या आयुर्मानानुसार उदा. पाच ते सहा महिने टिकणारी सीझनल झाडे, एक वर्षीय व बहुवर्षीय झाडे. झाडांच्या उपयोगानुसारसुद्धा आपण त्यांचे वर्गीकरण करू शकतो. उदा. शोभिवंत झाडे, फळझाडे, भाजीपाला, औषधी वनस्पती.

घराभोवतीच्या बागेसाठी झाडांची निवड करताना बाग सुशोभित दिसावी व बहुउपयोगी असावी असा दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी बागेचा काही भाग शोभिवंत झाडांसाठी, काही भाग फळझाडांसाठी, भाजीपाल्यासाठी व औषधी वनस्पतींसाठी एक कोपरा राखून ठेवावा. गॅलरीतील बागेमध्ये कुंड्या वापरून अशी मांडणी करता येईल.

बागेमध्ये वेलवर्गीय भाज्यांची व शोभिवंत वेलांची जोपासना कशी करावी, हे आपण विस्ताराने पाहू. पावसाळा हा वेलवर्गीय भाज्यांसाठी सर्वांत योग्य ऋतू. भोपळा, पडवळ, कारले, तोंडली, घोसावळे, काकडी इत्यादी वेलवर्गीय फळभाज्या यांना आयुर्वेदामध्ये आहारात खूप महत्त्व आहे. तसेच अनेक प्रकारच्या वेलींवर वाढणाऱ्या शेंगांचे प्रकार उदा. पावटा, घेवडा, वाल, चवळी, पापडी, डबल बी पावसाळ्यातच येतात. सुरुवातीचा जोराचा पाऊस सहन करायचा असेल, तर अक्षयतृतीयेला वेलींच्या बिया लावणे उपयुक्त. म्हणजे महिनाभरात वाढलेले वेल सुरुवातीच्या जोराच्या पावसाला तग धरतील. अन्यथा सुरुवातीचा पाऊस महिन्याभरात कमी झाल्यानंतर बिया मातीत पेराव्या. नाहीतर जोराच्या पावसामध्ये त्या कुजून जातील. 

वेलीभाज्या लावण्यासाठी बांबू किंवा अँगल वापरून केलेला छोटासा मांडव पुरेसा. पडवळ, दुधी, घोसावळे यासाठी आठ ते दहा फूट उंच मांडव असावा. (फोटो क्र. १) तोंडली, कारले कुंपणाच्या जाळीवर, रामफळ, सीताफळ यांसारख्या झाडांवरतीसुद्धा चांगले वाढतात. कलिंगड, काशी भोपळा या वेलींना जमिनीवरच पसरायला आवडते. त्यांच्यासाठी पुरेशी जागा सोडावी. गच्चीतील मांडवाखाली तीन फूट व अर्धा फूट उंच वाफा वेलीच्या झाडांसाठी पुरेसा होईल. या वाफ्यात विटांचे तुकडे त्यावर सुका पाला, खत, माती भरावी. शेंग वर्गीय भाज्यांच्या वेली कुंपणावर किंवा इतर मोठ्या झाडांच्या साहाय्याने वाढवू शकता.

अनेक वेळा वेलांना फळे धरतात, पण लहान असतानाच ती काळी पडतात व गळतात. वेलवर्गीय भाज्यांसाठी चांगला सूर्यप्रकाश आवश्‍यक आहे. फळे गळून पडण्याचे मुख्य कारण जमिनीमधील काही घटकांची कमतरता. रोप करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करणे, मातीमध्ये योग्य प्रमाणात सेंद्रिय खते घालणे, शेणाच्या गोवरीच्या राखेचा वापर, तसेच सेंद्रिय औषधांचे फवारे या सर्वांच्या मिश्र वापरामुळे फळे गळून पडण्याचे प्रमाण बरेच कमी होते.

वेलवर्गीय भाज्यांमधील दुधी भोपळा, कलिंगड, पडवळ, कोहळा हे सर्व वेल तीन ते चार महिने टिकतात. तसेच घेवडा, वाल पापडी या भाज्यांचे वेल पाच ते सहा महिने उत्पन्न देतात, नंतर ते काढून टाकावे लागतात. प्रत्येक वर्षाला यांची नवी लागवड करावी लागते. परंतु, तोंडली, द्राक्षे हे वेल मात्र चार ते पाच वर्षे फळे देतात. घरगुती बागेत सर्वांना आवडणारा वेल म्हणजे पॅशन फ्रूट, याच्या फळांचे सरबत खूप सुंदर होते. हा खूप वाढतो व इतर वेलींना वाढू देत नाही, त्यामुळे तो स्वतंत्र लावावा. औषधी वनस्पतींमधील प्रत्येक बागेत असावा असा वेल म्हणजे गुळवेल. या वेलाची एखादी फांदीसुद्धा पुरेशी ठरते. गुळवेल ही वनस्पती एकदा लावली, की कायमची आपल्या बागेत वाढत राहते.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे हल्ली कोणत्याही सीझनमध्ये शेडनेट किंवा हरितगृहे वापरून आपण हवी ती झाडे, फळे, भाज्या मिळवू शकतो. पण घराभोवतीच्या बागेमध्ये ऋतुचक्रानुसारच भाजी लागवड करावी लागते.

संबंधित बातम्या