फुलांचे आणि शोभिवंत वेल

अल्पना विजयकुमार
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

होम गार्डन
 

घरगुती बागेमध्ये फुले येणाऱ्या व रंगीत पाने असणाऱ्या वेलींना विशेष स्थान आहे. आपल्या बागेमध्ये फुलांचे वेल जरूर असायला हवेत. आपल्याकडे यामध्येदेखील भरपूर विविधता आढळते. 

फुले येणाऱ्या वेलींमध्ये पूर्वापार चालत आलेले सायली, जाई, जुई, कुंदा, कृष्णकमळ, मधुमालती यांसारखी मंद वासाची फुले येणारे वेल घरगुती बागेत आहेतच. परंतु, हल्ली विविध रंगाच्या बोगन वेली, संक्रांत वेल, रानजाई, आलाबंडा, लसूण वेल, ग्रेप वाइन इत्यादी परदेशी शोभेच्या फुलांचे वेलसुद्धा बागेत आवडीने लावले जात आहेत. बागेतील फुलांच्या  वेलींना प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाची गरज असतेच. यांचा फुले येण्याचा काळ वर्षातून एक ते दोन वेळेला असतो. आलाबंडाचा वेल वर्षभर फुलत राहतो.

फुले न येणाऱ्या परंतु शोभिवंत पाने असणाऱ्या वेलींमध्ये मनी प्लांट विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत. या शिवाय नावाप्रमाणेच मोठी पाने असणारा राक्षस वेल बागेचा एखादा कोपरा सहज भरून टाकेल. नागवेल म्हणजे खायचे पान हा प्रत्येक घरगुती बागेमध्ये आवश्यक असणारा वेल आहे.

औषधी गुणधर्म असणारा समुद्रशोथ वेल त्यावर येणाऱ्या जांभळ्या फुलांबरोबर एका वेगळ्या गुणधर्मामुळे माहिती आहे. उन्हाळ्यात याची पाने हाताला गार लागतात तर थंडीत उबदार लागतात. आपल्याकडे असणारे बांबू सरळ वाढणारे आहेत. पण केरळमध्ये वायनाडला वेलीबांबू पहायला मिळतात. आपल्याकडे मिळणारा हिरवा चाफा वेलीसारखाच वाढतो.

संबंधित बातम्या