घराभोवतीच्या बागेतील फुलझाडे

अल्पना विजयकुमार
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

होम गार्डन
 

घराभोवतीची बाग म्हटले, की डोळ्यासमोर येतात ती विविध रंगांची, वेगवेगळ्या आकारांची, सुवासिक फुलझाडे. या लेखामध्ये आपण या सर्व फुलझाडांविषयी माहिती घेऊ...
 घरगुती बागेसाठी प्रामुख्याने मध्यम आकाराची झाडे आणि छोटी झुडुपे वापरली जातात. वृक्ष स्वरूपातील झाडांचा फारसा विचार करता येणार नाही. प्रत्येक झाडाचा आकार, फुलांचा रंग तसेच फुलण्याचा ऋतू वेगवेगळा असल्यामुळे बागेमध्ये कोणती ना कोणती फुले फुलतच राहतात.

मध्यम आकाराची फुलझाडे : पारिजातक, स्वस्तिक, अनंत जास्वंद, रातराणी, शंखासुर, बोगनवेल, कण्हेर ही झाडे सर्वसाधारणपणे बागेमध्ये लावली जातात. यांपैकी जास्वंद, कण्हेर, स्वस्तिक या झाडांना बाराही महिने फुले असतात. पारिजातक, अनंत आणि सोनचाफा प्रामुख्याने पावसाळ्यात फुलतात. पारिजातकाचा सडा डोळ्यांना सुखावतो. पूर्वीच्या काळी या झाडाभोवती स्वच्छ धोतर पसरून गोळा केलेल्या फुलांचा लक्ष वाहायचा हे गणपतीच्या वेळी ठरलेले असायचे. अनंतामध्येसुद्धा पांढरा आणि पिवळा असे दोन रंग असतात. चाफ्याचे विविध प्रकार आहेत. यामध्ये सोनचाफा, कवठी चाफा तसेच हिरवा चाफाही असतो. पण त्याचा वेल येतो. तगर किंवा स्वस्तिक, सिंगल आणि डबल प्रकारांमध्ये येते. आता त्याची लहान आकाराची झाडेही मिळतात. त्यांना हवा तसा विशिष्ट आकारही देता येतो. बोगनवेल प्रामुख्याने उन्हाळ्यात फुलते, तिचे विविध रंग असतात. कुंपण म्हणून किंवा कुंडीतही छान कटिंग करून लावतात. याशिवाय परदेशातून आपल्याकडे स्थायिक झालेली जट्रोफा, टीकोमा, उभा चाफा एकझोरा अशी अनेक मध्यम आकाराची फुलझाडे बागेची शोभा वाढवतात. यांची विशेष काळजी घेण्याची गरज नसते.

झुडूप वजा फुलझाडे : अबोली, सदाफुली, कोरांटी, गुलबक्षी, गुलाब, कुंदा, शेवंती तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या लिलीची फुले या वर्गात मोडतात. अबोली, सदाफुली, कोरांटी ही बाराही महिने फुले देतात. यांच्या फांद्या लागत नाहीत. यांच्या बिया पडून कायम नवीन झाडे येत राहतात. गुलाबाचे बागेमधील महत्त्व वेगळेच आहे. घरच्या बगिच्यात पाच-सहा तरी गुलाबाच्या कुंड्या असाव्यात, असे प्रत्येकाला वाटते. गुलाब काळजीपूर्वक वाढवावे लागतात. यामध्ये ''एच टी'' म्हणजे दांडीवर एकच फूल, फांदीवर झुबक्यांनी फुले येणारे म्हणजे फ्लोरी बंडा, तसेच मिनिएचर गुलाब असे विविध रंगांचे, आकारांचे आणि वासाचे गुलाब येतात. वेळच्या वेळी थोडेसे पाणी, कंपोस्ट, शेणखत आणि योग्य वेळी केलेले कटिंग यामुळे गुलाबाच्या झाडांना कायम फुले येतात. पण गुलाबावर कीड लवकर पडते. गावठी गुलाब किंवा इतर काही कणखर जाती निवडाव्यात. पूर्वी आपल्याकडे पांढरी किंवा पिवळी शेवंती असायची, पण आता ग्रीन हाउसमध्ये वाढवलेली निरनिराळ्या रंगांची शेवंती उपलब्ध आहे. पावसाळ्याच्या शेवटी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये यांची फुलायला सुरुवात होते आणि पूर्ण हिवाळाभर त्याला फुले येतात. बहर संपल्यावर वर्षभर ही झाडे अशीच सांभाळावी लागतात. शिवाय कंदापासून येणाऱ्यामध्ये निशिगंध, खूप प्रकारच्या लिली, कर्दळ, हेलिकॉनिया, डेलिया बागेची शोभा वाढवतात. पावसाळ्यामध्ये फुले येऊन गेली, की वर्षभर हे गड्डे कोरडे ठेवून सांभाळावे लागतात. मे फ्लॉवर सारखी झाडे फक्त उन्हाळ्यातच फुले देतात.

सिझनल किंवा हंगामी फुले : यामध्ये बालसम, कॉसमॉस, झेंडू, पिटूनिया होली हाँक, सुपारी, घाणेरी, जिरेनियम, फ्लॉक्स ही झाडे येतात. आपल्या बागेमध्ये या हंगामी फुलांचा ताटवा असावा असे सर्वांना वाटते. झेंडू सोडल्यास बहुतेक सगळी परदेशातून आपल्याकडे येऊन इथलीच झालेली झाडे आहेत. या झाडांचे आयुष्य तीन-चार महिन्यांचे असते. तेवढा वेळ आपल्या बागेला ते वेगळेच रंगरूप आणतात. 
 एक्झॉटिक म्हणजे परदेशातून आलेल्या झाडांना आपण एक्झॉटिक म्हणतो. अँथुरियम हेलिकॉनिया, बर्ड ऑफ पॅराडाईज, हायड्रेंजीया जिंजर, वेगवेगळ्या प्रकारची ऑर्किड या प्रकारात मोडतात. यांना वाढविणे थोडे कठीणच असते. सावली, पाण्याची गरज, मातीमधील सेंद्रिय घटकांचे प्रमाण एकदा जमले, तर ही झाडे सहज बागेमध्ये आपण वाढवू शकतो. विविध प्रकारची ऑर्किड्स म्हणजे जंगलाकडून आपल्याला मिळालेला ठेवाच आहे.
 कोणत्याही प्रकारची फुलझाडे लावण्यास पावसाळा हा उत्तम ऋतू असतो. यांपैकी फक्त सिझनल झाडांची फुले नाजूक असल्यामुळे सुरुवातीच्या पावसाळ्याला तग धरत नाहीत. त्यामुळे पाऊस संपल्यानंतरच्या कालावधीमध्ये ही लावली, तर तीन-चार महिने आपल्याला फुलांचे नेत्रसुख मिळते.

संबंधित बातम्या