घरगुती बागेतील फळझाडे

अल्पना विजयकुमार
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

होम गार्डन
 

फळझाडांशिवाय घरगुती बागा अपुऱ्या आहेत. टेरेस गार्डनसाठी जास्त जागा लागणारी किंवा ज्यांची मुळे कडक आहेत, खोलवर जातात अशी फळझाडे मुळातच लावू नयेत. आंबा, फणस, जांभूळ, नारळ ही झाडे लावणे टाळावे. याउलट सीताफळ, पेरू, डाळिंब, चिकू, शेवगा, आवळा, लिंबू, केळी ही झाडे जरूर लावावीत. ड्रममध्ये लावताना किंवा वाफ्यामध्ये दोन फुटांचे विटांचे वाफे करून लावल्यास झाडांची वाढ चांगली होईल. थोडी उशिरा का होईना यांना सर्वसाधारण आकाराची फळेसुद्धा लागतात. मात्र झाडांच्या वाढीसाठी आवश्यक ते खाद्य खतांमधून पुरवणे ही तितकीच महत्त्वाची बाब आहे.

स्वतंत्र बंगला किंवा रो-हाउसभोवती किती जागा मोकळी आहे, यावर फळझाडे लावावीत की नाही हे ठरेल. आंबा, फणस, जांभूळ, नारळ इत्यादी मोठे होणारे वृक्ष घरापासून दहा फूट अंतर मोकळे सोडून लावले तर चालतील. घराच्या भिंतीजवळ कोणतीही मोठी झाडे लावणे अयोग्य आहे. यामुळे भिंतीला तडे जाणे, मुळांमुळे घराचा पाया कमकुवत होणे किंवा घरामध्ये अंधार होणे हे सर्व प्रश्‍न निर्माण होतात. 

डाळिंब : कोरड्या हवेत बागेमध्ये डाळिंबाचे एक तरी झाड हवेच. हे झाड कमी पाणी लागणारे आहे. मोठ्या ड्रममध्ये अथवा मोठ्या कुंडीत डाळिंबाचे झाड लावावे. याला वर्षातून दोन वेळा बहार येतो. केशरी रंगाची फुले किंवा डाळिंबे झाडाला लगडली की बागेची शोभा नक्कीच वाढते. दोन प्रकारची म्हणजे नर व मादी अशी फुले येतात. डाळिंबावर रोग किंवा कीड फार प्रमाणात पडते. पानांवर ठिपके किंवा फळांवर काळ्या रंगाचे ठिपके पडतात. योग्य प्रकारची सेंद्रिय कीटकनाशके वापरून हे आपण टाळू शकतो. वर्षातून एकदा डाळिंबाचे प्रोनिंग म्हणजे वाळलेल्या फांद्या कापून टाकल्यास नवीन फूट येईल.

पेरू : पेरूमध्ये लाल व पांढरा अशा दोन जाती आहेत. काही पेरू आकाराने गोल किंवा लांबट असतात. घराभोवतीच्या बागेमध्ये कलमी झाडे वापरावीत म्हणजे फळ लवकर धरते. पेरूच्या झाडावर पांढरी माशी हा रोग जास्त प्रमाणात पडतो. अलीकडे पेरूच्या नवीन जाती उदा. मलेशियन पेरू हा प्रसिद्ध होत आहे. याचे एक फळ अर्धा किलोचे असते. म्हणून याला डॉलर पेरू असेपण म्हणतात.

केळी : आपल्याकडे केळीच्या विविध जाती उपलब्ध आहेत. पुण्याच्या हवेत वेलची केळी चांगली येतात. केळीची लागवड केल्यावर साधारण वर्षभरात केळीचा घड लागतो. दोनशे लिटरच्या ड्रमचे दोन भाग केल्यावर तयार होणाऱ्या ड्रममध्ये केळीची वाढ चांगली होईल. टेरेस गार्डनवर एक फुटाच्या उंचीच्या वाफ्यांमध्येसुद्धा केळीच्या झाडांची लागवड करून चांगले उत्पादन मिळते. याला लागून येणारी नवीन पिल्ले, हलक्या हाताने काढून दुसऱ्या जागी लावावीत. केळीचा घड वाढल्यावर घडामुळे झाड वाकते, त्यामुळे आधार द्यावा लागतो.

पपई : पपई हे झाड घराभोवतीची बाग किंवा टेरेस गार्डनमध्ये लावायला अगदी योग्य आहे. झाडाचे आयुष्य दोन ते तीन वर्षांचे असते. देशी वाणामध्ये पूर्वी नर व मादी अशी वेगळी झाडे मिळत असत. हल्ली टिश्‍यू तंत्रज्ञानाने सर्व झाडांना फळधारणा होते. शिवाय ही झाडे कमी उंचीची असल्याने फळे काढणे सोपे जाते. हल्ली बाजारामध्ये काही रसायनांच्या साहाय्याने पपई पिकवली जाते. म्हणून स्वतःच्या गार्डनमधील पपईचे महत्त्व पटते.

चिकू : कलमी चिकूचे झाड ठेंगणे असते. टेरेस गार्डन मधील एका कोपऱ्यात याची सहज वाढ होते. चिकूला वर्षभर फळे येतच राहतात. यावर फारशी कीड येत नाहीत व पाणीदेखील कमी लागते.

लिंबू : भारतीयांच्या रोजच्या जेवणामध्ये लिंबू हवेच. त्यामुळे एक तरी लिंबाचे झाड घराजवळ हवे. लिंबाचे झाड उन्हातच ठेवावे. सावलीतील लिंबाच्या झाडाला फारशी फळे धरत नाहीत. लिंबाला वर्षातून दोन वेळेला फळे धरतात. कोरडे हवामान लिंबाला विशेष मानवते. कोकणासारख्या दमट हवामानात लिंबाच्या झाडाला फळे धरत नाहीत. बहर धरण्याच्या अगोदर याचे पाणी तोडावे लागते. म्हणून शक्य असेल तर स्वतंत्र ड्रममध्ये लावावे. लिंबाच्या झाडाचे वर्षातून एकदा प्रोनिंग करावे. आडव्या वाढणाऱ्या फांद्या कापाव्यात. झाडावर फारशी कीड पडत नाही. ऊन व पाण्याचे प्रमाण यांचे गणित जमले, तर दुसऱ्‍या किंवा तिसऱ्‍या वर्षी भरपूर लिंबे धरतात.

अंजीर : अंजिराच्या झाडाला कोरडे हवामान विशेष मानवते. या झाडाला पाणी कमी, पण सूर्यप्रकाश जास्त लागतो. या झाडावर कीड मात्र जास्त पडते. साधारण सहा महिन्याच्या झाडाला अंजीर धरायला सुरुवात होते.

शेवगा : शेवगा फळांमध्ये मोडत नसला, तरी बागेमध्ये शेवग्याचे झाड असावे या हेतूने इथे माहिती देत आहे. चांगल्या जातीच्या शेवग्याची फांदीसुद्धा लावता येते. नवीन जाती बुटक्या असतात. तरीही शेवग्याचे झाड दहा फूट वाढवावे नंतर त्याचा शेंडा तोडावा. त्यामुळे आडव्या फांद्या यायला सुरुवात होईल. शेवग्याचे झाड नाजूक असते. त्यामुळे काठीने शेंगा काढाव्यात. साधारणपणे सहा महिन्यांपासून सुरुवात होते. शेवग्याची भाजी आरोग्यदायी असते.

या फळझाडांची लागवड साधारणपणे पावसाळ्यात केली तर जास्त योग्य. वर्षातून दोन वेळा सेंद्रिय खते देणे. रोग पडल्यास औषधांची फवारणी करणे. गरजेप्रमाणे छाटणी करणे. हे सर्व जमल्यास आपण बाग उत्तम वाढवू शकतो.  
 

संबंधित बातम्या