भाजीपाल्याचे वर्षभराचे नियोजन

अल्पना विजयकुमार
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

होम गार्डन
 

मंडईत मिळणारा भाजीपाला रासायनिक खते, कीडनाशके वापरून पिकवला जातो. भाज्या धुऊन घेतल्या तरीही त्यातील विषारी अंश शिल्लक राहतात. शहरात काही ठिकाणी सांडपाण्यावर भाजीपाला पिकवला जातो. त्यामुळे या सांडपाण्यातील विषारी धातूंचे अंश भाजीपाल्यात उतरण्याची शक्यता असते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्या गच्चीवर, परसबागेमध्ये आपणच चांगल्या दर्जाचा सेंद्रिय नैसर्गिक भाजीपाला पिकवणे लाख मोलाचे!

भाजीपाल्याचे शेंगभाज्या, वेलभाज्या असे प्रकार आहेत. त्या लावण्याचे ठराविक हंगाम असतात. तसेच लागणारे पाणी, सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात मिळाल्यास उत्पन्न चांगले मिळते. बागेमध्ये भाजीपाला पसरट कुंड्या किंवा वाफे तयार करून लावू शकतो. त्यासाठीची माती किंवा मिश्रण कसे तयार करावे हे आपण मागील लेखांमध्ये पाहिले आहे.

फळभाज्यांच्या झाडांचे आयुष्य तीन-चार महिने असते. त्यामानाने पालेभाज्या लवकर तयार होतात. आपल्याला घरचाच भाजीपाला सतत हवा असल्यास लागवड सतत करावी लागते. लागवड करताना तीच भाजी एका ठिकाणी लावू नये. गच्चीवरील बागेमध्ये किंवा घरगुती बागेमध्ये भाजीपाला घेताना तीन ते चार महिन्यांनी सेंद्रिय खते परत घालावी लागतात.

फळभाज्या - गवार, भेंडी, टोमॅटो, मिरची, फ्लॉवर, कोबी, वांगी या फळभाज्या आहेत. पाऊस येण्यापूर्वी या भाज्या लावल्यास तग धरू शकतात. परंतु, पहिल्या जोरदार पावसामध्ये या भाज्यांची अगदी लहान रोपे कुजून जातात. सपाट कुंडीमध्ये रोपे लावताना एक ते दोन रोपे लावावीत. वाफ्यात लावायची झाल्यास साधारण अर्ध्या फुटावर एक झाड लावावे. कोबी, फ्लॉवर आकाराने मोठे होत असल्याने एवढे अंतर ठेवणे आवश्यक आहे. वरील भाज्यांची रोपे बीपासून तयार करून लावता येतात किंवा तयार रोपे आणून लावता येतात. टोमॅटो, वांगी, मिरची ही झाडे उंच होतात. फळांच्या वजनाने झाडे मोडतात त्यामुळे काठीचा आधार, लोखंडी स्टँड उपयोगी पडतो. मिरची, वांगी, टोमॅटो वर्षभर चांगले उत्पन्न देतात. ही झाडे जुनी झाल्यावर त्यांचे उत्पन्न कमी व्हायला लागते. रोगट दिसायला लागली तर ती वेळीच काढून नवीन रोपे लावावीत. अति कीड पडलेले झाड काढणे श्रेयस्कर, अन्यथा कीड सर्व बागेमध्ये पसरते. तसेच पाण्याचे नियोजन महत्त्वाचे आहे. वांगी, मिरची, टोमॅटो या झाडांना पाणी अति झाल्यास कीड पडते. फळभाज्या किंवा पालेभाज्यांना शेतकरी जमिनीवरून पाणी देतात, झाडावर पाणी पडल्यास जास्त प्रमाणामध्ये कीड लागते.

वेलभाज्या - गवार, घेवडा, बीन्स, चवळी या शेंगभाज्या, तर भोपळा, पडवळ, काकडी, दोडका, तोंडली, कारले या वेलवर्गीय भाज्या आहेत. पावसाळा व हिवाळा या दोन्ही ऋतूंमध्ये लागवड करता येते. वेलासाठी मांडव करणे उपयोगी पडते. लाल भोपळा जमिनीवर पसरतो. पूर्वी जेव्हा कौलारू किंवा पत्र्याची घरे असायची, तेव्हा घरावर वेल चढवले जायचे. कारले, तोंडले यांची फुले लहान व वेल नाजूक असल्याने ते घराच्या कुंपणावर, तर दुधी, पडवळ, दोडके यासाठी मांडव करावा लागतो. वेलभाज्यांची मुळे पसरत जातात. त्यामुळे उथळ जागेवर किंवा पसरट कुंडीमध्ये लावता येतात. बीन्स, घेवडा, मटार, वाटाणा यांची झुडूपवजा झाडे असतात. या वेलामध्ये दोन प्रकारची फुले असतात. नैसर्गिकरीत्या परागीभवन न झाल्यास कृत्रिम प्रकारे परागीभवन करून फळधारणा करावी लागते.

पालेभाज्या - पालक, चवळई, लाल-हिरवा माठ, चुका, पुदिना, कोथिंबीर, मेथी या पालेभाज्या आहेत. वाफ्यामध्ये, पसरट कुंडी, क्रेटमध्ये, अगदी टोपलीमध्ये पालेभाजी लावता येते. योग्य प्रकारे पाणी, योग्य मातीचा प्रकार यांचे नियोजन पालेभाजीसाठी करावे लागते. बी पेरल्यापासून काळजी घेणे आवश्यक असते. बिया लहान असल्याने एकदम जास्त पडतात व झाडे दाटीने येतात. त्यामुळे माती किंवा वाळू मिसळून मगच पेरावे. कोथिंबिरीसाठी धने चुरडून घ्यावे लागतात. कोथिंबीर फार खोल पेरल्यास उगवत नाही. मेथी मोड काढून लावल्यास चांगली येते. कोथिंबीर उगवायला सात दिवस लागतात. पालक लगेच उगवतो, पण रोपे अगदी लहान असताना पाणी फारच जपून घालावे लागते, नळीने पाणी घातल्यास रोपे लगेच आडवी होऊन कुजून जातात. पालक, लाल माठ, मेथी, पुदिना यांची पाने वरच्या वर तोडल्यास पुन्हा फुटतात व ते झाड आपण जास्त दिवस ठेवू शकतो. पालेभाजीसाठी माती भुसभुशीत असणे आवश्‍यक असते, तसेच मातीमधून पाण्याचा निचरा होईल याची काळजी घेणे आवश्यक आहे.

भाज्यांबरोबरच आले, हळद, लसूण, कांदा तसेच कंदवर्गीय भाज्यादेखील लावणे उपयोगी पडते. परसबाग किंवा गच्चीवरील बाग मोठी असेल, तर परदेशी भाजीपाला लावता येतो. वेगवेगळ्या प्रकारची सॅलड, ब्रोकोली, रंगीत सिमला मिरची, औषधी वनस्पती सीझनप्रमाणे म्हणजे शक्यतो थंडीत लावतात.

भाजीपाला लावताना योग्य सीझन, सेंद्रिय खताचा योग्य वापर, कीड नियंत्रण केल्यास उत्पन्न भरपूर मिळते.   

संबंधित बातम्या