बागेतून नवनिर्मितीचा आनंद

अल्पना विजयकुमार
सोमवार, 30 डिसेंबर 2019

होम गार्डन
 

टेरेस गार्डनचा इतिहास पाहायला गेल्यास नासिर खुसरोने वर्णन केल्याप्रमाणे इसवी सन पूर्व अकराव्या शतकात रोमन काळापर्यंत मागे जाता येईल. जगातील उत्कृष्ट वास्तुकलेचे नमुने म्हणून फ्रान्स, मॅनहॅटन, टोकियो इत्यादी ठिकाणच्या कलात्मक (आर्टिस्टिक) टेरेस गार्डन्स प्रसिद्ध आहेत. सध्याच्या आधुनिक काळात पर्यावरणीयदृष्ट्या उपयुक्त म्हणून हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी व सेंद्रीय भाजीपाल्याच्या उत्पादनासाठी चीनमधील अनेक शहरांत मोठ्या टेरेस गार्डन्स आकाराला येत आहेत. यांना ग्रीन टेरेस म्हणजे शहरातील शुद्ध हवेच्या निर्मितीची फुप्फुसे म्हणता येतील.

घराच्या आजूबाजूला फुलणारी, फळणारी बाग गच्चीवर का व कशी गेली? याला कारण आहे शहरातील अक्रसत जाणारी मोकळी जागा व गगनचुंबी इमारतींमुळे जमिनीवरील सूर्यप्रकाशाचा अभाव. असे असले तरीही माणसाची मातीबद्दलची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. माणूस एका बाजूस 4G पासून 5G पर्यंत जाण्याची घाई करत असला, तरी छोट्या गॅलरीतील चार झाडांच्या कुंड्यांपासून (चौरस फूट गार्डन) गगनचुंबी इमारतींवर वाढविली जाणारी हिरवळ हे याचे प्रतीक आहे. भारतामधील अनेक शहरांमध्ये मागील पाच-सहा वर्षांत टेरेस गार्डनची चळवळ मूळ धरत आहे. गच्चीवरच्या बागांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. 

मागील ३०-४० वर्षांत भाजीपाला व इतर अन्नधान्य उत्पादनांसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांचे व कीटकनाशकांचे दुष्परिणाम आपण अनुभवतो आहोत. याबद्दलची जाणीव आता अगदी सामान्य माणसापर्यंत पोचली आहे. त्यामुळे सेंद्रिय व विषमुक्त अन्नधान्य व भाजीपाला वापरणाऱ्‍यांची संख्या वाढत आहे. अशी नैसर्गिक, सेंद्रिय उत्पादने सर्वत्र उपलब्ध असतीलच असे नाही. सेंद्रिय म्हणून घेतलेला भाजीपाला खात्रीलायक आहे का? या प्रश्‍नावर उत्तर म्हणून ज्यांच्याकडे जागेची उपलब्धता आहे, त्या सर्वांनी गच्ची, गॅलरी, घराच्या आजूबाजूची जागा वापरून किचन गार्डन तयार करणे ही संकल्पना लाख मोलाची आहे. अशा प्रकारे स्वतःच्या बागेमध्ये काम करताना मिळणारा आनंद व त्या भाजीपाल्याचे कौतुक अवर्णनीय आहे. गेली अनेक वर्षे टेरेस व जमिनीवरील बागा करण्यासाठी सल्ला व मार्गदर्शन करताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. कोणत्याही घरी गच्चीतील किंवा जमिनीवरची बाग करायची असेल, तर घरातील बागकामाची आवड असणाऱ्यांकडून संपर्क केला जातो. टेरेस गार्डनमुळे गळतीचा धोका होईल का? आमचे टेरेस वॉटरप्रूफ आहे का? मग त्या गार्डनची देखभाल कोण करणार? गार्डन करण्याचा विचार पक्का झाल्यावर कोणकोणती झाडे लावावीत? गार्डनचे डिझाइन कसे असावे या मुद्द्यांवर चर्चा होते.

असे काम करताना प्रत्येक टेरेसच्या आकारानुसार वेगवेगळे डिझाइन तयार करणे, प्लांटरची रचना, झाडांची रंगसंगती यामध्ये कल्पकतेला मोठा वाव असतो. साधारणपणे ५० ते १०० चौरस फुटांच्या गॅलरीत कुंड्या, हँगिंग, व्हर्टिकल इत्यादींचा वापर होताना दिसतो. ५०० चौरस फुटांच्या गच्चीचा वापर घराला पुरेसा भाजीपाला वाढविण्यासाठी करायचा, असे ठरले तर डिझाइन पूर्ण वेगळे असते. या डिझाइनमध्ये येण्या-जाण्याची जागा सोडली, तर मोकळी जागा सोडलेली नसते. परंतु, ग्रीन टेरेस म्हणून विकसित केल्या जाणाऱ्या टेरेस गार्डनमध्ये फळा-फुलांची झाडे, कुंड्या, छोटा धबधबा इत्यादी असलेला सुशोभित कोपरा (डेकोरेटिव्ह कॉर्नर पीस) व्हर्टिकल्स, वॉल पेंटिंग इत्यादींचा समावेश असतो.

अशा टेरेस गार्डनमध्ये योग्य प्रकाश रचना, गार्डन लाइट, ड्रिप व स्प्रिंकलरद्वारे केलेली पाण्याची सोय, कंपोस्ट पेटी या गोष्टी उपयुक्त ठरतात. आमच्या परिचयाचे कितीतरी गार्डनप्रेमी ऑटोमॅटिक ड्रिपचा अवलंब करून अगदी सहा महिने परदेशातसुद्धा जाऊन येतात.

अशा या गार्डनसाठी झाडांची निवड करणे, ती आणायला नर्सरीमध्ये जाणे हा अतिशय सुखद अनुभव ठरतो. काहीजण छंद म्हणून, बागकामाची आवड म्हणून स्वतः बाग तयार करतात व तिची काळजी स्वतः घेतात. तर अनेकजणांना बागेची आवड असली, तरीही बागेचा आकार व वेळेची उपलब्धता यांच्या अभावामुळे माळ्याची  मदत घ्यावी लागते. परंतु, पाळीव प्राण्यांप्रमाणे झाडांनासुद्धा मायेची गरज असते. गार्डनमधील असा ‘पर्सनल टच’ झाडांना सुखावतो. अशी झाडे टवटवीत असतातच, पण फळाफुलांनी लगडलेली दिसतात.

अशा या गार्डनचे फायदे सांगावे तेवढे थोडेच आहेत. पडीक जागेचा सुयोग्य वापर, भाजीपाल्याचे उत्पादन, कचऱ्याचा पुनर्वापर, आनंदी व ताणरहित राहण्याचे घराला लागून असलेले ठिकाण. एवढेच नव्हे तर आपली स्वतःची कल्पकता व सौंदर्यदृष्टी व्यक्त करण्याचे साधन म्हणून टेरेस गार्डन संकल्पनेकडे पहावे.

असे असले तरीही टेरेस गार्डन तयार करण्यापूर्वी काही गोष्टींवर विचार करणे आवश्यक ठरते. अशा गार्डनसाठी माळी असला तरीही काही ठिकाणी आपण स्वतः लक्ष देणे आवश्यक ठरते. पूर्वानुभव नसला तर गार्डनिंगचे प्रशिक्षण, सोशल मीडियावरील माहितीची देवाण-घेवाण यामधून झाडांची देखभाल कशी करावी, त्यांची काळजी कशी घ्यावी, ऋतूनुसार पाण्याची गरज, झाडांवर पडणारे रोग, उपाय, ऊन-पाऊस इत्यादींचा होणारा परिणाम याबाबत जागरूक असणे जरुरीचे ठरते. अति पाऊस किंवा कडक ऊन असेल तर लहान झाडे तग धरू शकत नाहीत, काही वेळेला ती मरतात. यासाठी मानसिक तयारी ठेवणे आवश्यक ठरते.

संबंधित बातम्या