गारेगार आइस्क्रीम

मंजिरी कपडेकर
सोमवार, 25 मे 2020

कव्हर स्टोरी
आइस्क्रीम हा घरातील लहानथोर अशा सर्वांचा आवडता पदार्थ! पोटभर जेवणानंतर गारेगार आइस्क्रीमही लागतेच. शिवाय उन्हाळ्याच्या दिवसांत जिभेला आणि पोटाला थंडावा देण्याचे कामही आइस्क्रीमच करते. पण या दिवसांत बाहेरचे आइस्क्रीम खाल्ल्याने आरोग्याच्या तक्रारी उद्‌भवू शकतात. अशावेळी घरच्याघरी वेगवेगळ्या फ्लेवरचे आइस्क्रीम सहज करता येते.

रोझ हनी
साहित्य : एक लिटर दूध, ४ टेबलस्पून साखर, २ टेबलस्पून गुलकंद, १ टीस्पून जीएमएस पावडर, अर्धा टीस्पून स्टॅबिलायझर पावडर, अर्धा टीस्पून रोझ इसेन्स, पिंक कलर आवडीनुसार, मध आवडीनुसार, २ टीस्पून कॉर्नफ्लोअर.
कृती : प्रथम दूध आटवून निम्मे करून घ्यावे. त्याआधीच अर्धा कप दूध बाजूला काढून ठेवावे. त्यात जीएमएस स्टॅबिलायझर पावडर, कॉर्नफ्लोअर घालून छान एकजीव करावे. आटलेल्या दुधात साखर घालून उकळावे. नंतर त्यात दूध पावडरचे तयार केलेले मिश्रण घालून छान शिजवून घ्यावे. नंतर हे मिश्रण गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घ्यावे. त्यात रोझ कलर आणि इसेन्स घालावा. मिक्सरला फिरवून घ्यावे. अॅल्युमिनियमच्या टिनमध्ये घालून फ्रिजरमध्ये दोन ते अडीच तास ठेवावे. १ कप व्हिप्ड क्रीम व्हिप करून घ्यावे. फ्रिजमधील आइस्क्रीम बाहेर काढून ब्लेंडरने बीट करून घ्यावी. त्यात गुलकंद, तयार केलेले व्हिप्ड क्रीम छान मिक्स करावे. दोन आइस्क्रीमचे टीन घ्यावे. त्यात आइस्क्रीम घालून ४-५ तास किंवा पूर्ण सेट होइपर्यंत आइस्क्रीम सेट करून घ्यावे. नंतर स्कुपरने स्कुप काढून वरून मध घालून आइस्क्रीम सर्व्ह करावे.

रोस्टेड अल्मंड
साहित्य : एक लिटर दूध, अर्धा कप साखर, १ कप व्हिप्ड क्रीम, अर्धा टीस्पून स्टॅबिलायझर पावडर, १ टीस्पून जीएमएस पावडर, २ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, २०-२२ बदाम. 
कृती : बदाम मायक्रोव्हेवमध्ये ठेवून भाजून घ्यावेत. ते गरम असतानाच कापून घ्यावेत. दूध आठवून घ्यावे, अर्ध्यापेक्षा कमी राहिले तरी चालेल. १ लिटर दुधामधील अर्धा कप दूध आधीच बाजूला काढून ठेवावे. त्यात जीएमएस पावडर, कॉर्नफ्लोअर, स्टॅबिलायझर पावडर घालून छान मिक्स करून घ्यावे. हे मिश्रण वरील दुधात घालून शिजवून घ्यावे. साधारण एक मिनिट शिजवावे. आता मिश्रण गार करून घ्यावे. नंतर हे मिश्रण मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घालावे. त्यात पाव कप फ्रेश क्रीम घालावे व चांगले फिरवून घ्यावे. नंतर अॅल्युमिनियमच्या टिनमध्ये ओतून, फ्रिझरला सेट करावे. साधारण २ तास ठेवावे. नंतर काढून, तुकडे करून पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यावे. आता एका मोठ्या भांड्यात काढावे. त्यात व्हिप्ड क्रीम मिक्स करावे. बदामाचे काप मिक्स करावेत. परत टिनमध्ये ओतून पुन्हा फ्रिझरला ठेवून सेट करावे. तयार आइस्क्रीम सर्व्ह करावे.

चोको चिप्स आइस्क्रीम 
साहित्य : अर्धा लिटर पूर्ण फॅट असलेले दूध (पिशवीमधील चालेल), ६ टेबलस्पून साखर, दीड टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, १ टेबलस्पून जीएमएस पावडर, पाव टीस्पून सीएमसी पावडर, ३ टेबलस्पून चोको चिप्स, (अर्धा टीस्पून नेसकॅफे, २ टीस्पून कोको पावडर, पाव कप दूध), १ कप साय. 
कृती : दुधात जीएमएस, सीएमसी, कॉर्नफ्लोअर घालून चांगले एकजीव करावे. एका जाड बुडाच्या पातेल्यात घेऊन उकळी येऊ द्यावी. नंतर मंद आचेवर २ ते ३ मिनिटे शिजवावे. गार झाल्यावर हे मिश्रण मिक्सरला फिरवून सेट करून घ्यावे. नंतर एका मोठ्या भांड्यात आइस्क्रीम काढून त्यात साय घालून बिटरने चांगले बीट करून घ्यावे. त्यात चोको चिप्स हलक्या हातांनी मिक्स करून पुन्हा सेट होण्यासाठी ठेवावे. चॉकलेटचा फ्लेव्हर जास्त हवा असल्यास कोको पावडर, नेसकॅफे, दूध, १ चमचा साखर हे सर्व मिक्स करून चमच्याने चांगले फेटून घ्यावे व आइस्क्रीम बीट करताना त्यात घालावे. छान चव येते.

व्हॅनिला 
साहित्य : दोन कप पिशवीमधील दूध, १ कप साखर, १ कप साय किंवा फ्रेश क्रीम, २ टीस्पून कॉर्नफ्लोअर, अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स.
कृती : दीड कप दूध जाड बुडाच्या कढईत तापायला ठेवावे. अर्धा कप दुधात कॉर्नफ्लोअर मिक्स करावे. कढईतील दुधाला उकळी आल्यावर त्यात कॉर्नफ्लोअर मिक्स केलेले दूध घालावे. ते चांगले उकळू द्यावे. शिजू द्यावे. मिश्रण दाटसर झाल्यावर त्यात साखर घालावी व परत शिजवावे. नंतर हे मिश्रण गार करून घ्यावे. मिक्सरच्या मोठ्या भांड्यात हे मिश्रण घेऊन त्यात साय आणि व्हॅनिला इसेन्स घालून चांगले फिरवून घ्यावे. आता एका प्लॅस्टिक किंवा अॅल्युमिनियमच्या टिनमध्ये हे मिश्रण घालून फ्रिझरला सेट होण्यासाठी साधारण ६-७ तास ठेवावे. आता हे तयार आइस्क्रीम सर्व्ह करावे. सर्व्ह करताना चॉकलेट सॉस किंवा स्ट्रॉबेरी क्रश घातला, तर आणखी छान लागते.

सिझनल मँगो
साहित्य : एक कप आंब्याचा रस, १ कप मिल्क पावडर, १ कप दूध, १ कप फ्रेश क्रीम किंवा साय, १ कप आंब्याच्या चौकोनी लहान फोडी, ४ टेबलस्पून साखर.
कृती : मिक्सरच्या मोठ्या भांड्यात आंब्याचा रस, दूध, क्रीम किंवा साय, साखर, मिल्क पावडर हे सर्व घेऊन फिरवून घ्यावे. आइस्क्रीमच्या अॅल्युमिनियमच्या टिनमध्ये ठेवून फ्रिझरला २ तास सेट करावे. नंतर काढून पुन्हा तुकडे करून मिक्सरला फिरवून घ्यावे. आता त्यात आंब्याच्या फोडी मिक्स करून परत हे मिश्रण टिनमध्ये ओतून सेट होईपर्यंत फ्रिझरमध्ये ठेवावे. सर्व्ह करायच्या आधी थोडावेळ फ्रिझरमधून बाहेर काढून ठेवावे.
टीप ः साखरेचे प्रमाण आवडीनुसार ठेवावे.

मँगो 
साहित्य : चोको चिप्स आइस्क्रीमप्रमाणे बेस, अर्धा कप आंब्याच्या फोडी (आवडीनुसार जास्तही घेता येतील.), १ आंब्याचा रस, १ टीस्पून साखर, पाव टीस्पून मँगो इसेन्स.
कृती : चोको चिप्स आइस्क्रीमप्रमाणे बेस करून घ्यावा. आंब्याच्या रसात साखर घालून मिक्सरला फिरवून घ्यावे. आइस्क्रीमच्या बेसमध्ये साय घालून बीट केल्यानंतर त्यात आंब्याचा रस आणि इसेन्स घालून पुन्हा बीट करून घ्यावे. नंतर आंब्याच्या फोडी त्यात हलक्या हाताने मिक्स करून आइस्क्रीम सेट करायला ठेवावे. पूर्ण सेट झाल्यावर आइस्क्रीम सर्व्ह करावे.

मलई कुल्फी 
साहित्य : एक लिटर दूध, ४ ब्रेड स्लाइस, ३-४ मारी बिस्किटे, १०० ग्रॅम पेढे, प्रत्येकी अर्धा टीस्पून वेलदोडे पावडर व जायफळ पावडर, पाऊण कप साखर, बदाम-पिस्त्याचे काप आवडीनुसार. 
कृती : एका भांड्यात दूध घेऊन आटवून घ्यावे (शक्यतो पितळी पातेले वापरावे). नंतर त्यात साखर घालून गॅस बंद करून ब्रेडचे स्लाइस घालावेत. हे मिश्रण गार करून घ्यावे. नंतर या मिश्रणात पेढे कुस्करून घालावेत. नंतर मारी बिस्कीट, वेलदोडे, जायफळ पावडर घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. आता आइस्क्रीमच्या मोल्डमध्ये हे मिश्रण घालून डीपफ्रिझरला साधारण ४ तास ठेवून सेट करावे. नंतर मोल्डमधून काढून कुल्फी कापून वरून बदाम पिस्त्याचे काप घालावेत व कुल्फी सर्व्ह करावी.

आइस्क्रीम चांगले होण्यासाठी टिप्स

  • आइस्क्रीमसाठी नेहमी पूर्ण फॅट असलेलेच दूध वापरावे. 
  • घरची साय किंवा फ्रेश क्रीम वापरावे. 
  • आइस्क्रीममध्ये वापरायच्या सर्व पावडरी फ्रेश असाव्यात. 
  • आइस्क्रीम सेट करण्यासाठी अॅल्युमिनियम टिन किंवा प्लॅस्टिकचा डबा वापरावा. 
  • आइस्क्रीम ठेवण्याआधी डीपफ्रिझर स्वच्छ करून मॅक्सिमम मोडवर फ्रिज ठेवावा, म्हणजे आइस्क्रीम लवकर सेट होते. 
  • आइस्क्रीम सेट झाल्यावर फ्रिज पुन्हा नॉर्मल मोडवर ठेवावा.
     

संबंधित बातम्या