पावनखिंड आणि विशाळगड

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 1 जून 2020

‘गुगल’वारी
शिवाजी महाराजांनी आपल्या लढायांमध्ये सह्याद्रीतील गड-किल्ले, दऱ्याखोऱ्यांचा कुशल वापर केला. या लढाया झाल्या ती ठिकाणे नेमकी कशी होती? आता घरबसल्या त्या ठिकाणांना भेट देणे शक्य आहे, ‘गुगल अर्थ’च्या माध्यमातून. ‘गुगल अर्थ’च्या मदतीने ही ठिकाणे नेमकी कुठे होती हेही जाणून घेता येईल आणि त्यांचा भूगोलही समजावून घेता येईल! 

विशाळगड हा सह्याद्रीतील ७६४ मीटर उंचीवर असलेला अवघड ठिकाणी उभारण्यात आलेला किल्ला आहे. हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येला ७६ कि.मी. अंतरावर वसलेला आहे. सह्याद्रीची रांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अणुस्कुरा घाट यांच्या दरम्यान किल्ले विशाळगड उभा आहे.

किल्ले विशाळगड हा नावाप्रमाणेच एक विशाल किल्ला आहे. सह्याद्रीतील या किल्ल्याला नैसर्गिकरीत्याच दुर्गमतेचे कवच लाभलेले आहे. हा प्राचीन किल्ला अणुस्कुरा घाट व आंबा घाट, तसेच कोकणातील बंदरे यांना जोडणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला असावा.

इ.स. ११९० च्या सुमारास दुसरा राजा भोज याने घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधले. त्यांपैकीच हा एक किल्ला. २८ नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला. त्याच वेळी खेळणा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव ‘विशाळगड’ ठेवले. कोकणात शत्रूला घाटमाथ्यावरून उतरता येऊ नये व कोकणात शत्रूला पाय रोवता येऊ नयेत म्हणून विविध गडांची उभारणी शिवाजी महाराजांनी केली होती.

सिद्दी जौहरने ३ मार्च १६६० ला पन्हाळ्याला वेढा घातला. पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे जाताना महाराजांनी हा वेढा फोडून काढला व महाराज विशाळगडावर सुखरूप पोचले. त्याआधी पावनखिंडीत ३०० निवडक मावळ्यांसह बाजीप्रभूंनी सिद्दीचे सैन्य रोखून धरले व आपल्या प्राणांची आहूती दिली. त्यामुळे विशाळगड आणि पावनखिंड या दोन्ही ठिकाणांना आणि तिथल्या दुर्गम आणि अतिकठीण अशा भूगोलाला मोठेच महत्त्व आहे. 

असा ऐतिहासिक विशाळगड आजही पन्हाळगडाच्या वेढ्याची आणि बाजीप्रभूंच्या पावनखिंडीतील लढाईची आठवण करून देत सह्याद्री पर्वतरांगांवर एका पहारेकऱ्यासारखा उभा आहे. उंच आणि अवघड ठिकाणी उभारण्यात आलेल्या विशाळगडाचे महत्त्व, शिवाजी महाराज पन्हाळगडाचा वेढा फोडून या गडावर सुरक्षित पोचले त्याचवेळी स्पष्ट झाले होते. राजांनी पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे जाण्याचा जो मार्ग निवडला होता तो अतिशय अवघड आणि घनदाट जंगलाचा होता. गडाच्या पश्‍चिमेला म्हसाईचे चार-पाच मैल लांब आणि तीन-चार मैल रुंद पठार आहे. म्हसाईच्या पठाराच्या उत्तरेच्या बाजूने मलकापूरमार्गे आंबा घाटाकडे रस्ता जातो. याच मार्गाने विशाळगडावरही जाता येते आणि अंबा घाटातून कोकणातही उतरता येते. पठार संपल्यावर डावीकडे कुवारखिंडीतून खाली उतरता येते. पुढचा मार्ग पश्‍चिमेला डोंगराच्या कडेकडेने जातो. खोतवाडी, पुढे खिंड, कर्पेवाडी, अंबावाडी, कळकवाडी, रिंगेवाडी, मालेवाडी, पाटेवाडी, म्हसवड हा राजांनी निवडलेला सर्व मार्ग अतिशय डोंगराळ व दाट जंगलाचा होता. इथल्या वाटा प्रामुख्याने डोंगरांच्या उतारावरून जातात. दोन-तीन खिंडी पार कराव्या लागतात. ओढे नाले असंख्य. अनेक ठिकाणी वाटा चिखलाच्या व निसरड्या.

म्हसवड्याजवळ पांढरेपाणीपाशी मलकापूरवरून माणमार्गे येणारी वाट मिळते. वाट इतकी दुर्गम असल्यामुळेच राजांचे सर्व सैन्य अगदी गुपचूप इथपर्यंत येऊ शकले. पांढरपाण्याच्या पुढे लांबच लांब अशी घाटी आहे. तिच्या दोन्ही बाजूला अंदाजे पाच-सहाशे फूट उंचीचे डोंगर आहेत. त्यामुळे तयार झालेल्या खिंडीला पूर्वी घोडखिंड म्हटले जायचे. आज तिलाच पावनखिंड म्हटले जाते. खिंडीतून पुढे गजापूरच्या दिशेने कासारी नदीचा एक प्रवाह लागतो. हा सगळा परिसर आणि शिवाजी राजे ज्या मार्गाने पन्हाळगडावरून विशाळगडावर पोचले तो मार्ग आणि वाटेवरची या लेखांत दिलेली सगळी ठिकाणे गुगल अर्थ किंवा गुगल अर्थ प्रो संगणक संहिता, यापूर्वीच्या लेखांत सांगितल्याप्रमाणे, वापरून पहा. प्रदेशाच्या दुर्गमतेचा शिवाजी राजे किती ताकदीने उपयोग करून घेत असत याची नेमकी कल्पना त्यातून येईल. पुढे दिलेले अक्षवृत्त रेखावृत्त संदर्भ वापरा.

विशाळगड (उंची ७६४ मी. १६.९/ ७३.७४), गजापूर (उंची ६४६ मी. १६.८९/७३.७५), पांढरपाणी (उंची ८०५ मी. १६.८८/७३.८४), म्हसवड (उंची ६४० मी. १६.८७/७३.८८), पावनखिंड माथा (उंची ७७८ मी. १६.८९/७३.८१), म्हसईचे पठार (उंची ९४६ मी. १६.८२/७४.०४).

संबंधित बातम्या