संवाद विश्‍वासाचा

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

मनतरंग
 

असं कधी कोणी अनुभवलंय का, की आपण ज्याच्यावर खूप विश्‍वास ठेवतो, जो आपल्याला अत्यंत जवळचा असतो त्याच्यावरचाच विश्‍वास आपला कमी होतो आणि तो विश्‍वास कमी होतोय याच्या वेदना आपल्यालाच होतात. कोणाच्या कार्यक्षमतेवरचा विश्‍वास इथं अभिप्रेत नाहीये किंवा आर्थिक फसवणूक, अत्याचार हा या लेखाचा विषय नाही. 

एखादं नातं जोडताना ते नातं कायम उमलावं, बहरावं या इच्छेमुळं त्या समोरच्या व्यक्तीच्या ते नातं त्याला सांभाळता येईल, या क्षमतेवरचा किंवा ते सांभाळायचं आहे या इच्छेवरचा हा विश्‍वास असतो. गृहीत धरलेलं असतं आपण अनेक वेळा, की नातं वगैरे या संकल्पनेवर जेवढी आपली श्रद्धा आहे, भक्ती आहे तेवढीच त्या व्यक्तीचीपण असेल आणि जसं आपण धडपडतोय ते नातं वाचावं म्हणून तसंच ती व्यक्तीपण प्रयत्न करेल. पण जिथं इच्छा आणि गृहीतकं आहेत तिथं ते पूर्ण न होण्याची शक्याशक्यता असूनही मान्य होत नाही आणि हे सर्व अपेक्षांमध्ये परावर्तित होतं. मग काय, जिथं अपेक्षा आहेत तिथं अपेक्षाभंग आहेच.. नाही का?

म्हणजे इथं सर्व घोळ होतो इच्छा आणि गृहीतकांचा. आपल्या प्रत्येकाच्या रोजचं ‘जगणं जगण्याच्या’ अनेक प्रेरणा असतात. त्यापैकी इथं लक्षात घ्यायला हवी ती ‘माणसं जोडण्याची, नाती जोडण्याची प्रेरणा.’ किती सुंदर संकल्पना आहे ही. कितीतरी कथांमधून, सिनेमांमधून अशी प्रेमासाठी, मायेसाठी, माणसांसाठी वेडी असलेली लोकं आपण पाहतो. प्रत्यक्षात ही तशी दिसतात. पण हे ऐकायला जितकं छान आहे तितकंच प्रत्यक्ष अनुभव घेणाऱ्यांसाठी नसतं. कारण अशा माणूसवेड्या लोकांना त्यांच्यासारखी माणूसवेडीच लोकं भेटतात असं नाही किंवा सर्वांना नात्याच्या उमलण्याबद्दल इतकं अप्रूप असतं असंही नाही. तसंच अगदीच काही अपेक्षा न ठेवता, एकतर्फी त्या नात्याची स्वप्न पाहत राहायची हेही शक्य नाही. त्यामुळं हे एकतर्फी ट्रॅफिकसारखं माणूसवेडेपण त्या नात्याच्या बाबतीत मनाला भावनिकच नव्हे, तर पझेसिव्ह होण्यास भाग पाडतं. इतरांबद्दल कशाला बोला... आपणापैकी बहुतेकांना हा अनुभव येतोच की! 

विश्‍वास कमी होण्याचं अजून एक कारण म्हणजे आपल्याला माहीत असतं; की समोरच्याची मानसिकता वेगळी आहे, आपल्या हौसेला पूरक अशी नाही, पण तरी तो आपल्या मनाप्रमाणं, इच्छेप्रमाणं बदलेल अशा अपेक्षेनं आपण काही ना काही प्रयत्न करत राहतो. त्या प्रयत्नांना यश येत नाही पाहून मग पुन्हा आपलीच चिडचिड होते. एखाद्याशी ओळख होताना किंवा नात्याची जोडणी जेव्हा सुरू असते, तेव्हा अबोल माणसंही थोडी जास्त बोलतात आणि मग सगळं सवयीचं नेहमीचं झालं, की मूळ पदावर येतात. ते सुरुवातीचं बोलणं हेच छान वाटल्यानं तेच आपण सत्य धरून बसतो. काहीवेळा समोरचा आपल्याला सांगतही असतो, की एरवी मी अबोल आहे, पण आता प्रथमच बोलतोय किंवा बोलतेय वगैरे. मग मस्त वाटतं की आपल्यामुळं कुणी व्यक्त व्हायला शिकलं, बोलायला शिकलं... पण हे खूप कमी काळापुरतं असतं आणि तिथंच सगळी गंमत होते. खास करून जोडीदाराच्या बाबतीत किंवा एखाद्या जवळच्या नात्याच्या बाबतीत. मग साधारणपणे सुरू होते जणू एक परीक्षाच. कोण किती बोलतं, संवाद ठेवायला उत्सुक असतं, आपणहून फोन करतं, कामाखेरीज गरजेशिवाय सहज आठवण म्हणून भेटायला येतं, वगैरे निकष आपण लावत राहतो आणि तसं झालं नाही, की मग काय समोरचा आपल्या परीक्षेत नापास! बरं, विश्‍वास कमी होतो, तो समोरचा नापासही होतो; पण त्या माणसाला याची पूर्ण कल्पनाही नसते. शिवाय त्या जिवलग माणसाच्या नापास होण्याचं दुःखही आपल्यालाच. त्याबद्दलही आपली चिडचिड, घालमेल, घुसमट.  

यावर या सगळ्याचा परिणाम म्हणजे त्या माणसाला दिल्या जाणाऱ्या आपल्या प्रतिक्रिया अगदी कटू किंवा दुखावणाऱ्याही येऊ शकतात. आजकाल आणखी मजा अशी होते, की गुगलवर अनेक मोठ्या लोकांचे हा विश्‍वास तोडणे, राखणे याबद्दलचे विचार उपलब्ध असतात. व्हॉट्सॲपवर असे मेसेजेस आपल्याला येतात. अत्यंत दुःखी मनानं आपण ते वाचतो, फॉरवर्ड करतो, फेसबुकवर शेअर करतो, कुणीतरी रिकामटेकडे त्यावर चर्चाही करतात आणि आपला या विश्‍वास आणि नातं याच्या सहसंबंधांविषयीचा हा असा भावनिक दृष्टिकोन मनोभूमिकेमध्ये परिवर्तित होण्यास सुरुवात होते. म्हणजे विश्‍वास आहे का नाही यापेक्षा दुसरा आपली कशी दाखल घेत नाही आणि हे कसं भयंकर आहे, विश्‍वासघात करण्यासारखं; हे असं बोलायला, व्यक्त करायला जास्त आवडू लागतं. संवादाचे धागे कमी होऊन रागाची शस्त्रं बाहेर पडतात. मग विश्‍वास पानिपतात गेल्याचा भास होतो. 

कसं हवं असतं आपल्याला, या चारोळीसारखं

कुठेतरी दोघे भेटले..
मग सूर त्यांचे जुळत गेले
शब्दांची गुंफण त्यांचे 
नातेही विणत गेली... 

समजा असं घडतच असेल, तर यात नेमकं काय होत असावं? मला वाटतं, की दोघेही एकमेकांना परस्परपूरक असतील, जरी मतभेद असतील तरी त्यांच्यात चर्चा होत असेल, भांडणांपेक्षा. कुणी एक रुसला, रागावला तर दुसरा त्याची दखल घेत असावा... आणि हे नेमकं दोघांना जमलं असावं. 

संवाद कौशल्य कार्यशाळांमधून प्रथम हेच सांगितलं जातं, की एकतर ऐकायचं कसं आणि त्याला उत्तर द्यायचं कसं. जर या दोन गोष्टी जमल्या, तर कितीतरी पुढचे नाराजीचे प्रसंग टाळता येतात. म्हणजेच अंतर नक्की पडतं दोघांत, पण ते अंतर संवाद जमला नाही म्हणून असतं. परंतु याचा अर्थ असा नसतो, की नातं कोणाला नको असतं. पण ते सांभाळायचं कसं ते नक्की माहीत नसतं. एखाद्याचं न बोलणं हादेखील संवाद असतो, पण दुसऱ्याला छान छान शब्दांची हौस असते. हौस मानसिक गरज कशी आणि कधी होऊन बसते हे समजत नाही. मग आपल्याच जिवलग माणसावरचा विश्‍वास कमी होण्यापर्यंत त्याचा परिणाम होऊ शकतो. 

पुन्हा इथे प्रश्‍न, मग सगळं दरवेळी आम्हीच समजून घ्यायचं का? समोरच्या माणसाची काहीच जबाबदारी नाही का? तर असं नाही. नातं हवं असेल तर थोडे बदल नक्कीच करायला हवे... पण दुसऱ्या कोणी बदलावं हे आपण कसं ठरवायचं? ज्याला समजेल तो प्रयत्न करेल. 

लहान मुलं कशी असतात याबाबतीत, त्यांच्याकडून बरंच घेता येईल. एका सर्वेक्षणात मुलांना विचारलं, की तुमचा तुमच्या मित्रांवर किती विश्‍वास असतो? त्यावर मुलं म्हणाली, ‘भरपूर.’ ‘मग तुम्ही ऐकता का त्यांचं सगळं?’ तर त्यावर मुलं म्हणतात, ‘छे छे सगळं वगैरे नाही, आमचे मित्र टिंग्यापण मारतात...’ पण मग भरपूर विश्‍वास कसा? तर म्हणतात, ‘मित्र म्हणून विश्‍वास आहे, सगळं ऐकायला कशाला हवं आणि कधीतरी आम्हीपण टिंग्या मारतोच की!’ किती छान पाहा, की मनमानी सर्वांनी करावी पण मित्र सर्वांनी राहावं. म्हणजेच रुसव्याफुगव्याची हत्यारं नकोत, खट्याळ खोडकर पानाचे धागे जास्त छान जोडणी करतील.

चला तुम्ही आम्ही तर प्रयत्न करू... प्रथम आपण कसे आहोत, ते समजून घेऊ. कदाचित हे समजलं, की समोरच्या माणसाला समजून घेणं जरा सुकर होईल. 
हो... आणि जर असं काही घडत नसेल आपल्याबाबतीत.. तर ज्यांच्या बाबतीत घडतंय त्यांना या छोट्या छोट्या गोष्टी उमजायला मदत करू... 

संबंधित बातम्या