शहाणपणाची कथा  

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

मनतरंग
 

शहाणपण म्हणजे, इंग्रजीमध्ये ज्याला Wisdom म्हणतात ते. मला या शब्दाबद्दल आणि संकल्पनेबद्दलही फार कुतूहल आहे. शहाणपणानं निर्णय घ्या, असंही नेहमी सांगितलं जातं. कुठून येतं ते? शिक्षणानं येतं का? अनुभवानं येतं का? खूप टक्केटोणपे खाल्ले की येतं का? वाईट प्रसंग येऊन गेले की येतं का? माझ्याकडून नेहमी हा विचार केला जातो. सामान्यपणे शहाणपणा या शब्दाचा अर्थ कमालीचा समजूतदारपणा असा घेतला जातो. शहाणी आहे माझी बाळी, समजूतदार आहे, असं म्हटलं जातं. एखाद्या प्रसंगी, ‘त्यानं भावनांच्या आहारी न जाता शहाणपणानं निर्णय घेण्याचं ठरवलं, शांतपणे बोलणी केली आणि प्रश्‍न मार्गी लावले,’ असंही कौतुकानं सांगितलं जातं. क्वचित प्रसंगी ‘काही न बोलणं हा शहाणपणा ठरला,’ असंही अनेकांकडून आपण ऐकतो. कितीतरी पौराणिक कथांमधून अशा शहाण्या माणसांचा उल्लेख केला जातो. किंबहुना शहाणपणाच्याही काही कथा आहेत. ज्यात असे शहाणे हे गावातले अनुभवी, चतुर म्हातारे व म्हाताऱ्या आहेत. त्यांना महत्त्व केव्हा येतं? तर, गावावर किंवा कोणावर संकट येतं आणि ज्याला आपण पुस्तकी बुद्धी किंवा हुशारी म्हणतो, सिद्धांतामधली, असे त्याचे सर्व मार्ग अवलंबून होतात तरी उत्तर मिळत नसतं. मग हे चतुर शहाणे अनेक प्रश्‍नांवर, संकटांवर युक्त्या सुचवतात. त्यांना माणूस समजलेला असतो, त्यांना समाज समजलेला असतो. मानवी प्राण्याच्या विविध प्रसंगातील वर्तणुकीचा अंदाज आलेला असतो. म्हणून मग त्यांचे मार्ग हे ‘कोणाला न दुखावता, आक्रमक न होता समोरच्याला धडा शिकवणे, सहीसलामत कोणाची सुटका करणे,’ असे काहीसे असतात. 

या कथांमधून चतुरता आणि शहाणपण यात काही साधर्म्य सांगितलं जातं. ही चतुरता लौकिक अर्थानं मिळालेल्या शिक्षण, पदव्या यांपेक्षा काही प्रसंगी श्रेष्ठ ठरताना दिसते. समाजामध्ये ज्याला मान आहे अशा क्षमता, तसे सामर्थ्य जे प्राप्त करतात त्यांच्यात नकळत एक अहंभाव निर्माण होतो. आपण सर्वज्ञ असल्याचा. ते माहिती, ज्ञान या संदर्भात सर्वज्ञ असतातही, पण तो अहंकाराचा एक क्षण या सर्वज्ञांना त्यांच्या मर्यादा दाखवून देतो. अनेकदा असे शिकलेले, शिक्षित जन कितीतरी साध्या सर्वसामान्य वाटणाऱ्या लोकांचा नकळत अपमान करतात, त्यांचा योग्य आदर करत नाहीत. पण ही अशी वरवर भाबडी, साधी, अज्ञानी वाटलेली माणसं जगण्याच्या उंच पातळीवर असतात. त्यांच्या चतुराईनं आणि शहाणपणानं आपल्याला कायमचं काही शिकवून जातात, जे कोणत्याही ग्रंथात मिळणार नसतं. याच संकल्पनेवर आधारित एक छान गोष्ट आहे. ती थोडक्यात पाहूया. ही कथा मी एका प्रवचनात ऐकली आहे. 

एकदा एका प्राणितज्ज्ञाला राष्ट्रीय पुरस्कार मिळतो आणि त्याला तो घेण्यासाठी त्या देशाच्या राजधानीत बोलावलं जातं. त्याला घेण्यासाठी आलिशान गाडी पाठवली जाते. वाहन चालक त्याला सांगतो, की त्याच्याबरोबर अजून एक पुरस्कारार्थी आहे आणि आधी त्याला घ्यायला त्याच्या गावी जावं लागणार आहे, मगच राजधानीकडं प्रयाण करता येईल. तो प्राणितज्ज्ञ आनंदून जातो. कारण त्याच्यासारख्याच हुशार माणसाची त्याला प्रवासात सोबत होणार असते. पण त्याचा आनंद फार काळ टिकत नाही. कारण तो दुसरा पुरस्कार मिळालेला एक खेड्यातला वयस्कर शेतकरी असतो. चालक चिखलातून गाडी कशीबशी त्या शेतकऱ्याच्या घरापाशी आणतो. त्या शेतकऱ्याला निरोप द्यायला सारं गाव आलेलं असतं. प्रथमच त्यांच्या गावातून कोणी असं बक्षीस घ्यायला चाललेला असतो. 

प्राणितज्ज्ञाला वाटतं, की कसं काय असं झालं? मी किती शिकलेला आणि हा अडाणी खेडवळ, आमची बरोबरी कशी काय होऊ शकते. त्याउलट तो शेतकरी अगदी अंग चोरून बसतो. त्याला मनातून खूप आनंद होतो, ‘काय भाग्य आपलं, इतक्या शिकलेल्या माणसाबरोबर आपण जातोय.’ प्रवासाला 
दोन तीन तास लागणार असतात. अस्वस्थ तज्ज्ञ आणि आनंदी सामान्य असा प्रवास सुरू होतो.

सुरुवातीचा अर्धा तास अगदी शांततेत जातो. पण असं अगदी शांत बसून कसं चालेल. त्या प्राणितज्ज्ञाला वाटतं, जाऊदे जे झालं ते झालं, पण किमान या शेतकऱ्यानं आपल्याला मान द्यायला हवा. त्याला वाटायला हवं, की त्याच्यात आणि माझ्यात खूप फरक आहे. मग तो बोलायला सुरुवात करतो, त्या शेतकऱ्याची तपशीलवार चौकशी करतो, घरदार, शिक्षण वगैरे. आपलंही सांगतो. शेतकरी अगदीच अशिक्षित, फक्त लिहिता वाचता येणारा, पण त्या शेतकऱ्यानं शेतातलाच पालापाचोळा वापरून एक जैविक जंतुनाशक विरहीत खत तयार केलेलं असतं, त्यामुळं तो बक्षीसपात्र ठरलेला असतो. तर, या प्राणितज्ज्ञाला अनेक प्राण्यांचा अभ्यास केल्याबद्दल पुरस्कार मिळालेला असतो. तो शेतकरी प्राणितज्ज्ञाला मनापासून नमस्कार करतो आणि आनंद व्यक्त करतो. 

पण या संभाषणातून प्राणितज्ज्ञाला हवा तसा मान मिळतोय असं काही वाटत नसतं. आपण यापेक्षा श्रेष्ठ हे कसं काय सिद्ध करायचं, असा विचार करत असताना त्याला एक युक्ती सुचते. तो शेतकऱ्याला म्हणतो, की वेळ घालवण्यासाठी आपण प्रश्‍न उत्तरांचा खेळ खेळूया. तू मला आणि मी तुला कोणताही प्रश्‍न विचारायचा, जर तुझ्या प्रश्‍नाचं उत्तर मला आलं नाही, तर मी तुला १०० रुपये देईन आणि जर माझ्या प्रश्‍नाचं उत्तर तुला आलं नाही, तर तू मला एक रुपया दे. म्हणजे इथंही अहंकार, की ‘तू मला काय विचारणार की जे मला माहीत नसेल आणि माझ्या प्रश्‍नाचं तू काय उत्तर देणार...’ शेतकरी मनातून हिरमुसतो पण काही बोलत नाही. खेळ सुरू होतो. 

इथंही शेतकऱ्याला पहिला प्रश्‍न विचारायची संधी मिळते. जरा दोन तीन मिनिटं विचार करून तो प्राणितज्ज्ञाला विचारतो, की साहेब, तुमी लै प्राणी पाहिले असतील. मग अशा प्राण्याचं नाव सांगा, की जो एका पायावर उभा राहू शकतो, दोन पायावर चालू शकतो आणि तीन पायांवर धावू शकतो.’ तिन्ही करता येणारा प्राणी कुठला? तो तज्ज्ञ आत्तापर्यंत वाचलेलं सर्व आठवून पाहतो, पण असा प्राणी काही त्यानं अभ्यासलेला किंवा पाहिलेला नसतो. बरं विचारायचं कसं, म्हणजे हारच ती एक प्रकारची. त्याला वाटतं, की नक्की याच्या गावातला हा प्राणी असणार. बराच विचार करून तो खजील होतो व शेवटी खिशातून १०० रुपये काढून त्या शेतकऱ्याच्या हातात ठेवतो, मला उत्तर माहीत नाही, हे १०० रुपये. शेतकरी मुकाट्यानं ते पैसे खिशात ठेवतो आणि शांत बसतो. तज्ज्ञाला उत्तर हवं असतं, पण ते तू सांग हे तरी कमीपणा घेऊन कसं म्हणायचं? म्हणून तो म्हणतो की आता मी विचारतो, की तू तुझ्याच प्रश्‍नाचं उत्तर दे. त्यावर शेतकरी शांतपणे खिशातून एक रुपया काढून देतो आणि म्हणतो, ‘मला याचं उत्तर माहीत नाही!’

या कथेनंतर बोलायचं काहीच उरत नाही. ज्यानं त्यानं समजून घ्यायचं आहे. सर्वच प्रसंगी असे मार्ग सुचतील किंवा उपयोगाचे असतील असंही नाही किंवा शहाणपणा हा एकच पैलू असेल असंही नाही. पण भावनिक होऊन समोरच्याला खरमरीत उत्तर दिलंच पाहिजे, असं वाटून जे बोललं जातं आणि त्यातून अनेक संवाद, वादात रूपांतरित होऊन बरंच काही बिनसतं, हे तर टाळता येईल. काहीतरी कुरघोडी करून उत्तर देण्यासाठी जय्यत तयारी करताना जी ऊर्जा वाया जाते, त्याचा उपयोग काही चांगल्या कामांसाठी करता येईल. नकळत किंवा मुद्दाम चिडवून बोलणारी माणसे असतात, उगाचच टीका, कुजकट बोलून येता-जाता अपमान करणारेही असतात. परंतु, प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया या मार्गानं अनेक प्रश्‍न चिघळत जातात. शिवाय अहंकारी माणसं बदलत नाहीतच आणि आपण मात्र उत्तर देण्याच्या नादात आपला समतोल घालवून बसतो.

अर्थात एका कथेनं आपणही एकदम शहाणे चतुर होऊ असं नाही. पण सुरुवात तर करता येईल. मनाला समजावून शांतपणे विचार करायला लावता येईल. असं का, असं विचारण्यापेक्षा, अच्छा असंही असतं तर, असं म्हणून माणसाची विविध रूपं समजून घेता येतील. कधीतरी नक्की जमेल मग शहाणपणानं उत्तर द्यायला!    

संबंधित बातम्या