मन चिंती ते...

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

मनतरंग

‘मन चिंती ते वैरीही न चिंती’ ही म्हण आपण सगळेच कधी ना कधी अक्षरशः जगत असतो. याचं कारण म्हणजे ‘जरुरीपुरताच विचार’ करायला न जमणं आणि दुसरं – ‘विचारांची खरंच गरज आहे का हे न समजणं.’ अगदी रोजच्या जगण्यातली उदाहरणं घ्यायची झाली, तर आपल्या किंवा कोणाच्या तब्येतीची चिंता करताना पार मृत्यूपर्यंत आपण जाऊन पोचतो. आपलं मूल अभ्यास करत नसेल, उनाडक्या करणारं असेल, आपलं ऐकत नसेल तर विचार वाहवत जाऊन त्या मुलाचं पार वाटोळं झालं आहे इथपर्यंत आपण जाऊन पोचतो. नातेसंबंधात काही ताण असेल, तर मनातल्या मनात जोरदार भांडणं रंगवून कोण कसं बोलेल आणि मग मी कसं उत्तर देईन ही जुगलबंदी मस्त रमते. 

बरं शक्यतेच्या सिद्धांतानुसार आपण विचार केल्याप्रमाणं क्वचित कधी घडतंही आणि मग आपल्या या विचारशक्तीवर आपला आंधळा विश्‍वास बसतो. आपण विचार करतो तेच बरोबर आहे, असं वाटायला लागतं. त्यानंतर जरुरीपुरता विचार किंवा अमुक विचारांची खरंच गरज आहे का, हे मग लक्षात येईनासं होतं.

हा लेख वाचणारे बहुतेक सगळे आपापल्या मनात हे कबूल करतील, की आपण फार विचार करतो, थांबवता येत नाही ही विचारांची मालिका. थोडं विस्तारानं सांगायचं झाल्यास, विचार करताना आपण एका विचारातून दुसऱ्या विचारात गुरफटत जातो. विचार करून अगदी डोकं फुटायची वेळ आली आहे, असं अनेकांचं म्हणणं असतं. त्यात पुन्हा आपणच खूप विचार करतो बाकी कोणी आपला विचारही करत नाही हीसुद्धा तक्रार असते. यामुळं मनातल्या पहिल्या प्रश्‍नाला, म्हणजे जिथून विचाराची सुरुवात झाली आहे, त्या प्रश्‍नाला अनेक फाटे आपल्याच मनात फुटतात. किती कंगोरे आहेत, किती पैलू आहेत आपल्या प्रश्‍नांना असं आधी वाटतं आणि मग नंतर लक्षातही येईनासं होतं, हे विचारांचे किंवा संकल्पनांचे कंगोरे वगैरे काही नाहीत, तर एक विचारांचं जाळं आपण मनात विणून घेतलं आहे आणि त्यात आपण फसत चाललो आहोत. हेही समजेनासं होतं, की इतका सारा विचार केला आहे तसं किंवा त्यातलं फारसं काही घडत नाही.

रोज दिवसभरात आपल्याला भरपूर काही वाटून जातं (feel), ज्याला आपण विचार म्हणतो. हा विचार, जे जाणवतं, मनाला भिडतं यापासून खूप वेगळा बाजूला काढता येत नाही सहसा. त्यामुळं जे वाटतं ते खरंच वाटत असतं, पण ती सारीच वस्तुस्थिती असते असं नाही. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, की feelings are real but they may not be the facts. म्हणजेच या जाणवणं, वाटणं यातून होणारा विचार ही मेंदूची नाही, तर मनाची निर्मिती आहे. 

अष्टावक्र गीतेची निरूपणं मी ऐकली. त्यात एक महत्त्वाचा विचार या ‘विचार किंवा चिंता’ याबाबतीत डोळे उघडून गेला. तो विचार असा, की आपल्याला या सर्व जगाला अनुभवण्यासाठी पंचज्ञानेंद्रियं जशी जन्मजात मिळाली आहेत, तशी जे समोर दिसतं आहे ते नेमकं ‘किती सत्य’ हे मात्र समजण्याची क्षमता जन्मजात मिळालेली नाही, ती कमवावी लागते... साधनेतून. यामुळं आपण जो विचार करतो तो पाहता, विचार, आपलं वाटणं, आपल्या जाणिवा, आपल्या भावना खऱ्या आहेत की आपल्या निव्वळ कल्पना, हे बहुतेक वेळा आपल्याला समजत नाही. काही वेळा पहा, की आपली स्वप्नंपण आपल्याला खरी वाटू लागतात आणि त्यातून भीती उत्पन्न होण्याची शक्यता असते.

हा असा भयानक विचार करण्याचं दुसरं रूप कधीकधी आपल्याला आपल्या प्रत्यक्ष बोलण्यातही दिसतं. काही वेळा मोकळं बोलायचं म्हणून आपण बोलून जातो आणि मग असंही वाटत राहतं, की इतकं जे काय आपण बोललो ते भावनेच्या भरात बोललो खरं, पण खरं असंच वाटतं आहे का? उगाच जास्त तर बोलून नाही ना गेलो. खूप गोष्टी रंगवून रंगवून सांगण्याची सवय असते अनेकांना. प्रत्येक गोष्टीचा इतिहास, भूगोल सांगत राहतात. त्यामुळं मूळ मुद्दा काय आहे, त्याचा इतका खरंच संदर्भ आहे का, हे बोलताना लक्षात येत नाही. मन असतंच सृजनशील, अशा वेळी अनेक धागेदोरे असलेलं नसलेलं बिनधास्त जोडून मोकळं होतं. 

हे असं का होत असावं हे अगदी साध्या भाषेत समजून घेऊ. अनुभवाला आलेली प्रत्येक गोष्ट पंचज्ञानेंद्रियांमार्फत मेंदूमधील त्या त्या संबंधित केंद्रांमध्ये साठवली जाते. या साठवणुकीलाही मनाची गाळणी असतेच. ज्ञानेंद्रियांना वेदना झालेल्या प्रत्येक गोष्टीची काही साठवणूक होत नाही. ज्या गोष्टींकडं आपलं लक्ष जातं त्या जाणीवपूर्वक साठवल्या जातात. आवड, नावड, इच्छा, गरज, आवश्यकता या निकषांबरोबरच, आनंद, दुःख, राग, मोह असं काही उत्पन्न करणाऱ्या गोष्टी छान वर्गीकरण करून, त्याला नावं देऊन नोंद केल्या जातात. या नोंदीनंतर प्रत्येक गोष्टीबद्दल मनात भावनिर्मिती होत जाते. त्यानुसार निर्णय घेतले जातात. मेंदू आपल्याला सर्व माहिती (डेटा)  पुरवतो पण त्यावर योग्य कृती, हालचाल करण्यासाठी भावनांच्या इंधनाची गरज असते. जसे भाव निर्माण होतील तशी कृती घडत जाते. राग उत्पन्न झाला तर वेगळ्या हालचाली होतील, आनंद उत्पन्न झाला तर वेगळ्या आणि भीती, काळजी निर्माण झाली तर वेगळ्या हालचाली, कृती निर्माण होत असतात. इथपर्यंत सर्व ठीक असतं. 

घोळ कुठं होतो, तर जेव्हा कधी कधी ही भावनिर्मिती आपल्याला वास्तवापेक्षा भलत्याच दिशेनं आणि कल्पनेतून निर्माण झालेल्या माहितीकडं घेऊन जाते. मेंदू डेटा निर्माण करतच राहतो. एखादा व्हायरस शिरल्यासारखा. मग एकाच गोष्टीचे अनेक अर्थ काढले जातात. एरवी ज्याचा परस्पर काही संबंध नाही अशा अनेक गोष्टींचं नातं मनात जुळत जातं. असं वाटतं, की यावर अजून बोलावं, अजून वेगवेगळे अर्थ समजावे. मग अनेक विचार गिरणीत धान्य दळल्यासारखं आपण दळत बसतो.

त्यानंतरची स्थिती खरी दयनीय होते, कारण मग खूप मोठे भयंकर प्रश्‍न असं वाटून आणि त्याचं ओझं मनावर शिल्लक राहिल्यानं अनेक मार्गांनी भरकटूनही सगळे रस्ते बंद झाल्यासारखं वाटतं. शेवटी त्याचा थकवा येतो पण तरी ते वाटणं काही थांबत नाही. यातून निर्माण होणारा संभ्रम फार त्रासदायक असतो. कारण नेमका प्रश्‍न काय तेच समजत नाही. नक्की कशाचा राग आला आहे, नक्की कशाचं वाईट वाटत आहे, हे समजत नाही. 

यावर काही उपाय आहे का, तर नक्कीच आहे. सर्वप्रथम हे असं होतं हे स्वीकारणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या या वेडेपणाबद्दल आपल्याला जाग येणं ही त्यातून बाहेर पडण्याची पहिली पायरी आहे. किंबहुना हे असं आपण करत आहोत, हे जेव्हा समजतं तेव्हाच आपल्यातल्या बदलाला सुरुवात झालेली असते. सर्व सत्य समजेल असं मुळीच नाही, पण त्या सत्याच्या शोधात झालेली ही अनावश्यक विचारनिर्मिती मात्र नक्कीच थांबवता येईल. 

सर्वप्रथम हे ठरवूया की हे आज, आत्तापासून मला जमलं पाहिजे. कारण असं काही जमायला मुहूर्त नसतो. ज्याक्षणी बोध होईल तो क्षण पकडायचा. जशी दारूची नशा असते तशी या विचारांचीपण नशा असते. म्हणून हे विचारचक्र तोडणं फार फार गरजेचं आहे. हे चक्र तोडावंच लागतं. थोडं त्यासाठी आपल्याला जागरूक राहावं लागतं. 

एखाद्या घटनेनंतर.. आता आपण वाहवत जाऊ शकतो.. असं स्वतःला बजावायचं आणि विचार सुरू झाले, की विचारांच्या नशेतून बाहेर पडून तिथंच विचार तोडायचे (Thought stopping technique). जिथं बसलो आहोत तिथून उठायचं, थोडं चालायचं, पाणी प्यायचं, एखादं गाणं ऐकायचं, विनोदी मालिका किंवा चित्रपटाचा एखादा सीन पाहायचा. थोडं सुरुवातीला अस्वस्थ वाटेल, पण तो घटना घडल्यामुळं येणारा अस्वस्थपणा नसून त्या विचारांची भूल आपण न घेण्याचं ठरवल्यामुळं येणारा अस्वस्थपणा आहे. 

साधारण दिवसभरातली एक वेळ अशी असते, ज्यावेळी हमखास हे विचारांचं जाळं विणलं जातं. त्या वेळेसाठी काही वेगळ्या योजना करायच्या. काही नावीन्यपूर्ण काम त्या वेळेत आखायचं. गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानातील एक विचार इथं महत्त्वाचा, की आपलं मन हे माकडाचं मन आहे. त्याला आपलं आपलं काही शोधू द्यायचं नाही, तर त्याला आपण रोज नवीन काम शोधून द्यायचं ज्यात आपल्या क्षमतांचा कस लागेल.

तसंच स्वतःला हेही बजावायचं, की जगातला सगळा विचार आपण करायची अजिबात गरज नाही. अगदी जाणीवपूर्वक घटनेतल्या तांत्रिक बाबींना जोडून जो विचार आहे, तेवढाच करायचा आणि स्वतःच्या मनाला थोडी शांती लाभू द्यायची. आपण नेमका का नकारात्मक विचार करतोय, नातेसंबंध, घरातल्या गोष्टी, जगण्याचे काही प्रश्‍न याकडं आपण कसं पाहत आहोत यासंबंधी ठरवण्यासाठी कोण्या शहाण्या माणसाची मदत घ्यायची. 

एका झटक्यात काही हे जमणार नाही. हा एकप्रकारे विचारांवरील संयमच आहे. तो मिळवण्यासाठी आपल्या मनाचं प्रशिक्षण करणं गरजेचं आहे. आपले छंद, कला इथं आपल्याला तारून नेतात. प्रत्यक्ष कामात आपल्याला गुंतवतात. हातून छान काही घडू लागलं, की विचार घडवण्याची इच्छा आणि व्यसन कमी होत जाईल. शिवाय समुपदेशक आणि मानसशास्त्रज्ञ आहेतच मदतीला. जरूर त्यांची मदत घ्या आणि आपण आपले मित्र व्हा!

संबंधित बातम्या