नाही म्हणायला शिकूया

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
सोमवार, 30 डिसेंबर 2019

मनतरंग
 

ताणतणाव व्यवस्थापन किंवा वेळेचं व्यवस्थापन या कार्यशाळांमधील एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर आज मनन करूया. तो मुद्दा आहे, ‘नाही म्हणण्याचा.’ 

अनेक विषयांवर चर्चा करताना ‘काही नाही... नाही म्हणता आलं पाहिजे,’ असं अनेकजण बऱ्याचदा म्हणतात. पण त्या पुढचं वाक्य असतं, ‘काय करणार, जमत नाही ना!’ हे दोन्ही खरं असतं. सगळीकडं, सर्वांसाठी आपण उपस्थित आणि कामाला हजर असणं शक्य नसतं. कुठंतरी, कोणीतरी नाही म्हणण्याची जरुरी असते. पण इतकं पटकन, सर्व परिस्थिती लक्षात घेऊन कोणी सहसा नाही म्हणू शकत नाही. पण मग निर्माण होतो ताण... कधी कधी अगदी छोटी आणि क्षुल्लक गोष्ट करतानासुद्धा. कारण, सर्व पातळ्यांवर उभं राहताना आपल्या क्षमता जास्त ताणल्या जातात. तसंच आपल्या अनेक भूमिका आणि त्यातली कर्तव्य आपल्याला स्वतःपेक्षा जास्त महत्त्वाची असल्यानं मग दुर्लक्ष होतं ते आपल्या अनेक गरजा आणि प्रश्‍नांकडं. स्वतःसाठी आणि आपल्याला जे मनापासून करावंसं वाटतं आहे त्यासाठी वेळ कमी पडतो. म्हणून जाणकार, प्रशिक्षक सांगत राहतात, ‘कधीतरी, कुठंतरी, कोणालातरी... नाही म्हणता आलं पाहिजे.’ 

नाही म्हणणं कशासाठी...? म्हणजे या लेखापुरतं थोडं स्पष्ट करते. 

अगदी सर्वांच्या बाबतीत घडणारी गोष्ट म्हणजे जे आवडत नाही, रुचत नाही, पटलेलं नसतं, करायचं नसतं... नेमकं तेच करावं लागतं. घरात, अनेकांना समजून घेताना, अनेक परिस्थितींमध्ये ॲडजस्ट होताना अशा नावडत्या, न पटणाऱ्या गोष्टी कराव्या लागतात. वयाचा मान ठेवायचा म्हणून, कोणाला बरं वाटतं म्हणून, तर काही वेळा प्रेम दाखवायचं म्हणून आपण अगदी रोज या गोष्टी करत असतो. काही कार्यक्रम असला, मोठं काही कार्य असलं, की ठराविक लोकांवर ती जबाबदारी पडते आणि मग आपण इतकी वर्षं करत आलो, आता कशाला नाही म्हणा, म्हणून अनेकजण दर वेळी करत राहतात. 

तसंच नोकरी करतानाही असं अनेक वेळा घडतं. ज्या माणसाशी पटत नाही, नेमकं त्याच्याबरोबर काम करायची वेळ आपल्यावर येते. आपण काम करणारे आहोत हे माहीत असतं म्हणून हातात चार पाच कामं असताना अजून एक दोन कामं अंगावर टाकली जातात. बऱ्याच वेळा तर बढतीच्या संधी किंवा व्यवस्थापन समितीचं प्रेशर असतं म्हणूनही नाही म्हणता येत नाही आणि आपण अनेक कामं ओढत राहतो. नोकरी सोडता येत नसते, कारण चरितार्थ चालवायचा असतो, दुसरी नोकरी दृष्टिपथात नसते, बाकीचे मित्र म्हणत असतात की अरे घे सांभाळून, नोकरी सोडू नको, फार पंचाईत आहे बाहेर, इथं किमान पगार देत आहेत... वगैरे वगैरे. यामुळं जे आहे ते स्वतःच्या क्षमता ताणून अनेकजण अनेक गोष्टी करत राहतात. 

व्यवसायात, वैयक्तिक आयुष्यात, जोडीदार, मुलांच्या संदर्भात, निर्णय घेताना, मैत्रीत, प्रेमात, इतर नात्यात, कोणाशी कसं वागावं, कोणासाठी काय करावं, किती करावं, कुठं थांबावं... कशाला हो म्हणावं, कशाला नाही म्हणावं... हे प्रश्‍न युगानुयुगं आहेतच. अशी घरदारची अनेक उदाहरणं स्वतःच्या बाबतीत वाचकांच्या डोळ्यासमोरून जातील.

आता हे नाही म्हणणं कसं जमवायचं यावर उत्तर शोधताना प्रथम हे जाणून घेऊया, की नाही का म्हणता येत नाही. खूप वेळा प्रश्‍नाचं उत्तर हे प्रश्‍नातच असतं. प्रश्‍न नीट उलगडता आला की ते दिसत जातं. खरं सांगायचं तर आपल्याला नाही म्हणता येत नसलं, तरी सगळं आपण कायम दुसऱ्यासाठी करत असतो असं नाही. आपल्या मनातल्या स्वतःच्या प्रतिमेसाठीच आपण बहुतांश वेळा करत असतो. ‘केलं हो मी आयुष्यभर अनेकांसाठी,’ हे स्वतःला सांगायला छान वाटतं. माझ्या अनेक गरजांकडं दुर्लक्ष करून करत राहिले, हे सांगताना तर आपलाच अभिमानही वाटतो. यामुळं जनमानसातही आपली प्रतिमा खूप चांगली होते. नाही म्हटलं तरी आपल्याला मान मिळतो. हा मान सन्मान कित्येक काळ आपल्याला खरं तर ऊर्जा देत राहतो आणि अधिकाधिक करण्याचं बळही. यातच आनंद असेल, तर नाही म्हणण्याचंही कारण काय!

दुसरं कारण नाही म्हणता न येण्याचं, म्हणजे थोडा दबून राहण्याचा स्वभाव. यामध्ये स्वतःची प्रतिमा फार चांगली नसतेच. कोणाचं ऐकलंच पाहिजे असं सतत मनात असतं. मोठ्यांचं ऐकलं पाहिजे, वरिष्ठांचं ऐकलं पाहिजे, पदाला मान दिला पाहिजे, आपल्याला नेमून दिलेल्या भूमिका व्यवस्थित पार पडल्या पाहिजेत; या विचारांचा थोडा अतिरेक होतो आणि मग अनेकजण गृहीत धरत जातात. पराकाष्ठेची बांधीलकी असते. या लोकांना बाकीचे सांगत राहतात, की अरे इतकं करू नकोस, कुठंतरी थांब, स्वतःचा विचार कर. 

तिसरं कारण नाही म्हणता न येण्याचं, म्हणजे एकदा केलं म्हणजे नेहमी केलं पाहिजे हा चुकीचा विश्‍वास. म्हणजे काही वेळा योगायोगानं आपण त्या परिस्थितीमध्ये असतो म्हणून अनेक जबाबदाऱ्या स्वीकारतो. आपले सहकारी म्हणून, आपली भावंडं म्हणून, आप्तेष्ट म्हणून त्या क्षणी आपण ते सहजपणे करतोही. कोणीतरी अडचणीत असतं, कोणीतरी दुःखी असतं, कोणीतरी संकटात असतं म्हणून जिवाच्या पलीकडं जाऊन मदत केली जाते. नकळत मग आपले आणि त्या माणसांमधले धागे घट्ट होतात आणि मग आपण नेहमीच त्या लोकांसाठी उपलब्ध असावं, असं आपलंही मन मानायला सुरुवात करतं. आपल्याही मनात त्या व्यक्तींबद्दल नको इतकी काळजी निर्माण होते. 

इथं एक गोष्ट मान्य करूया, की उगाच नाही म्हणायचं नाहीये. स्वतःचा विचार न करता इतरांचं आणि आपल्या प्रेमाच्या लोकांचं काही करणं हा अत्यंत चांगला भाव आहे. निरपेक्ष प्रेम करायला तिथंच तर शिकतो आपण. त्यामुळं जो करत राहतो त्याच्याही भावना आहेतच त्या करण्यात. पण तब्येतीवर परिणाम होत असेल, स्वतःच्या काही गोष्टी करायला जमत नसेल, तर काही ठिकाणी त्याच प्रेमानं नाही म्हणायलाही शिकायला हवं. म्हणून मनाच्या प्रशिक्षणाचा भाग असा, की नाही कसं म्हणायचं, केव्हा म्हणायचं आणि नेमकं कशासाठी म्हणायचं. 

आपण नाही म्हणत नाही... ते नेमकं का? हे जर स्वतःला समजावून सांगितलं तर जो त्रागा होतो तो कमी होईल. याबद्दलचा त्रागा ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण ज्या लोकांना मला हे जमत नाही असं सांगायचं असतं, ते लोक सोडून आपण बाकी साऱ्या जगाशी हे बोलून मोकळं होतो की आता फार ताण येतो आहे. पण ज्यांच्याशी बोलायला हवं, त्यांना सांगणं जमत नसतं. म्हणून नुसता त्रागा करून नकारात्मक भाव वाढवण्यापेक्षा समजून घेऊ की कसं बोलायचं. 

मुळात नाही म्हणायचं म्हणजे काही वाईट गोष्ट आहे हे मनातून काढून टाकू. कारण नाही म्हणायचं म्हणजे काहीच कधीच करायचं नाही असं नाही. उलट नाही म्हणताना नेमकं आपल्याला जमण्यासारखं काय आहे हे समजत जाण्याची शक्यता अधिक आहे. जसं की एकूण कामाचे भाग जर आपण केले, तर कोणतं काम नेमकं आपल्याला जमेल, कोणत्या कामासाठी मदत लागेल हे कळायला सोपं जातं. कामाच्या ठिकाणी, किंवा जिथं, ज्यांच्यासमोर नाही म्हणता येणं शक्य नाही, तिथं ही कामाची विभागणी आपल्या मनात असली की थोडा धीर करून बोलता येतं. ही काही वाक्यं पहा - 

‘थोडी मदत मिळेल का मला कोणाची यात,’ ‘यातलं हे काम कोणाला दुसऱ्याला दिलं तर चालेल का,’ ‘या तीनपैकी आत्ता एकच जमेल असं वाटतं आहे. जरा पुन्हा विचार करूया का,’ ‘मला जमत नाहीये खरं, पण मी तुमची पंचाईत करत नाही, मी पाहू का दुसरं कोणी, मी असेनच काही अडलं तर,’ ‘बाकी काही सांगा पण प्लीज या गोष्टी करायला सांगू नका,’ ‘केलं ना मी इतकी वर्षं. थोडा वेळ हवा आहे मला काही वेगळ्या गोष्टी करायला,’ ‘आपण बोलू यावर, गैरसमज करून घेऊ नका,’ ‘मी मान्य केलं त्याचा अर्थ हा नव्हता, या गोष्टीचे असे पैलू, असेही अर्थ माझ्या लक्षात आले नव्हते, आपण बोलू यावर.’

या काही वाक्यांचा विचार करा. घरी किंवा कामाच्या ठिकाणीपण असं बोलता येतं. यात कोणाला मदत करायला आपण नाकारत नाही आहोत. जेव्हा जमेल तेव्हा हजर राहायचं आहेच. पण कोणी गृहीत धरून आपल्या एखादी गोष्ट न करण्याच्या स्वातंत्र्यावर नकळत गदा आणत असेल, तर त्या माणसाला न दुखावता हे सांगायचं आहे, की हो काम झालं पाहिजे असं पाहूया, कोणी करायचं हा दुय्यम मुद्दा असू शकतो. मनाविरुद्ध काही करायची वेळ आली किंवा जे मुळीच पटत नाहीये, पण ते करण्यावाचून काही पर्याय नसेल, तरी आपल्या मनाविरुद्ध आहे हे नक्कीच सांगता येतं. आता करतो आहे पण पुढच्या वेळेस कृपया मला सांगू नका, मला ते पटत नाही असंही म्हणता येतं. 

शेवटी असं म्हणता येईल, की हेही करून पाहिल्याशिवाय, आपल्याला जमतं आहे का नाही ते समजणार नाही. पण त्याशिवाय असं केल्यानं खूप काही बिघडत नाही. उलट अनेक नाती मोकळी आणि सर्वसमावेशक होत जातात हे कळणार नाही... चला करून पाहूया... आवश्यक असेल तेव्हा ‘नाही’ म्हणून पाहूया. 

संबंधित बातम्या