मी एक साक्षी!

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
गुरुवार, 23 जानेवारी 2020

मनतरंग
मन... डोळ्यांना न दिसणारं, पण तरीही रोजचं जगणं प्रभावित करणारं... त्याची रूपंही अनेक... अशा या मानवी मनाचा वेगळ्या नजरेतून वेध.

साक्षीदार ही वैयक्तिक जीवन, सामाजिक जीवन, ते तत्त्वज्ञान इथपासून कायद्यापर्यंत सर्व ज्ञान शाखांमध्ये आढळणारी आणि आपल्या अगदी रोजच्या जगण्यातही आपल्याला अनुभवाला येणारी संकल्पना. कितीतरी ‘रोज आणि क्वचित’ घडणाऱ्या गोष्टींचे आपण साक्षीदार असतो. त्यामुळे अनेकांना आपण मदतही करतो. कोणाला खरे काय घडले याचे पुरावे हवे असतील, तर आपण जे पाहिले ते ठामपणे मांडतोही. कोर्टात तर प्रत्यक्ष ज्याने पाहिले याची साक्ष गुन्हा सिद्ध होताना किंवा कोणी निर्दोष सुटताना फार महत्त्वाची. या संकल्पनेचा अजून एक पैलू असा, की काही वेळा काही घटनांचा, गोष्टींचा, कार्यक्रमांचा साक्षीदार आपण झालो याचा आपल्याला अभिमानही असतो. जसे अनेक दिग्गज लोकांच्या एकमेवाद्वितीय अशा सादरीकरणाचे आपण साक्षीदार होतो, याचे फार काळ आपल्याला कौतुक असते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण इथे आपण कशा कशाचे साक्षीदार असतो, केवळ हाच मुद्दा नमूद करायचा नसून आपण साक्षीदार असतो म्हणजे नेमके काय हे समजून घेण्याचा आहे. 

वरील सर्व उदाहरणांमध्ये आपण किंवा कोणी साक्षीदार आहोत हे नक्की, म्हणजेच समोर जे चालले आहे त्यामधले ‘कर्ता किंवा कारण दोन्ही नाही.’ आपण प्रेक्षक आहोत. बाहेरून पाहणारे आहोत. ती घटना तिच्या तिच्या तर्काने, गतीने घडते आहे. जो कोणी ते पाहणारा आहे तो त्या घटनेचा हिस्सा नाही. 

याच अर्थाने आजचे हे मनन आहे. अनेक विचारवंतांनी आणि ग्रंथकारांनी ‘साक्षी’ म्हणजेच ‘साक्षीदार’ या संकल्पनेचा अर्थ असा सांगितला आहे. जर तो मानवी मनाला नुसता पटला, तर अनेक गोष्टी आपल्याला जमणे तसेच टाळणे हे शक्य होणार आहे. जे एरवी अत्यंत अवघड वाटते. 

काय म्हणणे आहे ते नीट समजून घेऊ. हा साक्षी, प्रेक्षक, बाहेरून पाहणारा नेमका आहे कोण? कुठे असतो तो? कोण नेमके हे सर्व पाहत असतो? तर तो ‘मी’ आहे. या ‘मी’ला एक शरीर मिळाले आहे आणि एक मन. म्हणजे संगणकाच्या भाषेत एक हार्डवेअर आणि एक सॉफ्टवेअर. मेंदू हे सर्व ज्ञानेंद्रिये वापरून माहितीची साठवणूक करणारे एक केंद्र आणि त्याचा अर्थ समजून घेणारे, त्यातून भावनिर्मिती करणारे म्हणजे मन. ‘मी’ हा याहीपेक्षा वेगळा आहे. तो सर्वसाक्षी आहे, जो निर्णय घेणारा आहे. 

शरीर, मन यापेक्षा खरेच कोणी अजून तिसरा वेगळा असेल, निर्णय घेणारा असेल तर मग अनेक मर्यादांमुळे जे शरीर आणि मनाला जमत नाही, ते त्या ‘मी’ला जमेल का असा विचार करायचा आहे. श्रीमद्‍भगवद्‍गीता, त्यावरची अनेक निरूपणे, अष्टावक्र गीता आणि ओशोंचे त्यावरील भाष्य यामध्ये या साक्षीभावाची अत्यंत प्रभावी मांडणी आहे. हे सारे ग्रंथच मुळात मानसशास्त्रावरील महान ग्रंथ आहेत. त्यामधली ही संकल्पना आज आपण विचारात घेत आहोत. ती अगदी रोजच्या जगण्यात कशी वापरता येईल ते पहात आहोत. 

मुद्दा असा आहे, की आपण फार प्रखरपणे असे मान्य करत आलो आहोत की आपल्या गरजा, इच्छा, भावना यावर आपला काहीच ताबा नसतो आणि तो ताबा मिळवणे फार फार अवघड आहे, जवळ जवळ अशक्य. मग जे अशक्य आहे ते आपण सोडून देतो. मनात आलेल्या सर्व इच्छा आणि लोभ यांचे समाधान व्हायलाच हवे, नाही तर मग आपण अपूर्ण आहोत असे वाटायला लागते... किंवा कुठे सारे काही मनात इच्छिलेले पूर्ण होते.. जाऊद्या असे ही थोडे निराश होऊन म्हणतो, आपले नशीब असे म्हणत नाराजीने आहे ते स्वीकारतो. यामध्ये या इच्छा माझ्या आहेत, या माझ्या गरजा आहेत, माझ्या भावना आहेत, माझे विचार आहेत, हे सारे माझे, माझे, माझे.. असे असते. त्यातून अहंभाव येतोच शिवाय मनासारखे मिळाले नाही, की निराशा, राग, स्वतःवर आणि सर्व जगावर. 

विचारवंत असे म्हणतात, की हे माझे, म्हणजे या ‘मी’चे असे असेल तर आधी समजून घेऊ की नक्की कोणाचे आहे. माझ्या शरीराच्या गरजा आहेत, माझ्या मनाच्या भावना आहेत. माझे शरीर, माझे मन असे जेव्हा म्हणतो आहोत, तेव्हा या शरीरावर आणि मनावर मालकी हक्क दाखवणारा या दोघांपेक्षा वेगळा कोणी आहे. जो या शरीर आणि मन यापेक्षा वेगळा आहे. शरीर आणि मन फक्त माध्यमे आहेत, या जगाला समजून घेण्याची. त्यामुळे ज्या गरजा आहेत, त्या या ‘मी’च्या नाहीत; त्या ‘मी’ला जग समजावे म्हणून जी दोन माध्यमे मिळाली आहेत, त्या शरीराच्या आणि मनाच्या आहेत. पण काय करायचे या गरजांचे, भावनांचे, कसे वागायचे, कशाच्या आहारी जायचे, कशाच्या नाही... हे ठरवणारा मात्र ‘मी’ आहे. जो या शरीर, मनाचा ‘साक्षी’ आहे. 

तो पाहतो आहे पण त्या ‘मी’ची जाणीव मात्र त्याच ‘मी’ला नाही. म्हणून शरीर, मन जे दाखवतात, सांगतात त्याप्रमाणे तो घडू देतो आहे आणि मग म्हणतो आज की माझा ताबा नाही. मला हे शक्य नाही. पण तसे नाही. आपण कर्ते नाही, आपण फक्त साक्षी आहोत हे ज्या दिवशी समजते तेव्हा मग जरी शरीर आणि मनात काही निर्माण झाले आणि त्याने कितीही मोह उत्पन्न केला तरी किती वाहावत जायचे आणि कुठे थांबायचे हे निर्णय त्या ‘साक्षी मी’ला घेणे सोपे जाते. 

साधी उदाहरणे पाहू, वाटते आहे असे काही.. जसे ‘खूप गोड खावेसे वाटते आहे,’ ‘खूप राग येतो आहे, समोरच्याला वाटेल तसे बोलावेसे वाटते आहे,’ ‘किती या अडचणी, छे कंटाळा आलाय, नको झालेय, जीव द्यावासा वाटतो आहे,’ ‘इतका आनंद होत आहे की उधळून द्यावे सगळे या आपल्या माणसावर असे वाटते आहे...’ हे जरी वाटते आहे तरी तसे वागायलाच पाहिजे असे नाही. कारण हे मला म्हणजे माझ्या ‘मी’ला वाटत नाही, जो निर्णय घेणार आहे. हे वाटते आहे ते माझ्या मनाला वाटते आहे आणि माझ्या मनाला काय.. काही वाटेल..! पण त्यात माझे काय नुकसान होते आहे ते मला पाहायलाच हवे. मधुमेह आहे, खूप गोड खात राहिलो तर मलाच त्रास होणार आहे. राग आला बरोबर, म्हणून वाटेल ते बोलावे असे काही नियम नाहीत, नीट शब्दांत सांगता येईल, कंटाळा कदाचित खूप दगदग झाली, अडचणी सतत येत गेल्या म्हणून आला, पण म्हणजे यावर उपाय नाही असे नाही, आत्तापर्यंत नाही मिळाला, पण पुढे मिळणार नाही असे नाही. अजून बोलून पाहू अनेकांशी. 

असे म्हणणे या ‘मी’ला शक्य आहे. फक्त याचे साक्षीपण त्याला स्वतःला जाणवणे फार आवश्यक आहे. ज्याने हे जाणले तो रागवत नाही, निराश होत नाही, मोहात पडत नाही असे अजिबात नाही. सगळे भाव उत्तम जगतो. सर्व आनंद स्वतःला अत्यंत उंचीवर नेऊन अनुभवतो, पण कुठे थांबायचे हे त्याला माहीत असते. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची मालिका पाहणे आणि अगदी आवश्यक असेल तेव्हाच त्यावर जे भाव प्रकटले आहेत त्यानुसार काही निर्णय घेणे हे तो ‘मी’ करत जातो. मुद्दाम कशावर ताबा मिळवायची गरज उरत नाही.

वाचक नक्की विचार करत असतील, की हे लिहिले आहे तेवढे सोपे आहे का आत्मसात करायला. तर नक्की आहे. अगदी या क्षणापासून करता येईल. फक्त आपल्या या ‘मी’ला तो ‘कर्ता नाही तर साक्षी आहे’ ही जाणीव करून देणे आवश्यक आहे. यासाठी मनात जो एक अतार्किक विश्‍वास आहे त्याचा पुनर्विचार करायला हवा. तो विश्‍वास म्हणजे मी जे जे इच्छिले ते ते पुरे व्हावे. माझ्या मनासारखे घडावे. हा मी.. शरीर किंवा मन आहे.. मी नाही याची खात्री पटणे आवश्यक आहे. 

ज्ञानेश्‍वर माऊलींनी पसायदानामध्ये म्हणून ठेवले आहे, ‘... जो जे वांच्छील तो ते लाहो..’ यात ज्या इच्छा आहेत त्या या शरीराच्या आणि मनाच्या नसून त्या ‘मी’च्याच आहेत. ज्या चिरंतन समाधान आणि शांती याच्याशी निगडित आहेत. ते केव्हा घडेल जेव्हा शरीर आणि मन याच्यापेक्षा जो वेगळा ‘मी’ आहे त्याला समजून मान्य केले तरच!

वरील लिखाणाचा सारांश काही ओळीत असा
मी एक साक्षी... 
माझ्यातल्या चढ उतारांची 
मला वाटत असलेल्या माझ्या 
असण्याची तसेच मला वाटत असलेल्या 
माझ्या नसण्याची 
मी एक साक्षी... सर्व दिसत आहे 
या भासाची तसेच पाहता न 
आलेल्या आभासाची 
मी एक साक्षी... निराकार 
चिदशक्तीच्या अनुभवाची 
तसेच त्यातून प्रकटणाऱ्या 
शब्दरूपी स्पंदनांची 
मी एक साक्षी... हा साक्षी 
भाव उत्पन्न करणाऱ्या 
माझ्याच मनाची, कधी मीच हा 
देह असण्याच्या समजुतीची
तसेच कधी ‘सर्व काही असेच आहे का’ 
या संदेहाची 
मी एक साक्षी... केवळ एक साक्षी!
 
  

संबंधित बातम्या