एकटेपण...  

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

मनतरंग
मन... डोळ्यांना न दिसणारं, पण तरीही रोजचं जगणं प्रभावित करणारं... त्याची रूपंही अनेक... अशा या मानवी मनाचा वेगळ्या नजरेतून वेध.

प्रत्येक जण जन्माला एकटा येतो आणि एकटाच हे जग सोडून जाणार. हे प्रत्येक जिवाच्या जगण्याचे सत्य आहे. पण जगताना मात्र प्रत्येकाला साथीची आवश्यकता भासतेच. मार्गदर्शनासाठी पालक, शिक्षक, वरिष्ठ; तर एक घट्ट अशी साथ द्यायला भावंडे, स्नेही आणि मित्रमैत्रिणी... अशा सर्वांची आपल्याला गरज असतेच. तसेही कोणाशी संग करणे, जोडले जाणे हा तर मनाचा गुणधर्म. त्यामुळेच की काय, मनातल्या त्या जागा रिकाम्या झाल्या की फार एकटे पडलोय आपण, आपल्या परिस्थितीशी एकटे लढतोय आपण, कोणी नाही सोबतीला... असे प्रत्येकाला कधी ना कधी वाटून जातेच. कधी आजूबाजूचे, घरचे, नातेवाईक मुद्दाम एकटे टाकत आहेत असेही वाटून जाते. 

गंमत अशी की असे सगळे असूनही कधीतरी एकटे असणे हीसुद्धा मनाचीच गरज असते. काहीवेळ एकटे राहिले तर बरे होईल असेही अनेकदा आपल्याला वाटते. काही वेळा तर माणसे सर्वांपासून दूर, फारसे कोणाला न भेटता एकटे राहणे स्वीकारतात. (निराशा आणि तत्सम मानसिक आजारात एकटेपण पांघरलेली माणसे याबद्दल हे म्हणणे नाही) प्रवाहाच्याविरोधी आपले विचार आहेत, त्यामुळे सारखा कलह सहन करण्यापेक्षा एकटे राहावे अशा विचारातूनही एकटे राहण्याची तयारी असलेल्या या व्यक्ती असतात.

याचा अर्थ असा की या ‘एकटे असण्याचा अर्थ’ आपण कसा घेतो त्यावर सारे अवलंबून असते. एकटेपणा हा शब्द बरेचदा नकारात्मक अर्थाने घेतला जातो. तर एकटेपणाचा सकारात्मक अर्थ म्हणजे एकांत मिळणे किंवा मिळवणे. क्वचित एकटे राहावेसे वाटते तेव्हा हा एकांतच हवा असतो. परंतु हे फक्त शब्दांचे खेळ नाहीत. आपल्या जगण्यातल्या आपल्याच मनाने निर्माण केलेल्या दोन वेगळ्या स्थिती आहेत. बहुतांश असे दिसते की ‘एकांत’ हा जणू मागून घेतलेला असतो, प्रयत्नपूर्वक मिळवलेला असतो, तर ‘एकटेपणा’ हा लादला गेलेला असतो. ज्यांना एकटे राहायला आवडते त्यांना तो एकटेपणा कधी त्रासदायक वाटत नाही. पण जे माणसात रमतात त्यांना मात्र एकटेपणा अंगावर येतो. त्यावेळी साथसंगत शोधताना त्यांच्या मनाचे भिरभिरे होते.

मुळात हा एकटेपणा येत का असेल असा विचार करता असे लक्षात येईल, की त्या व्यक्ती स्वतःशी फारशा जोडल्या गेलेल्या नसतात. कायम कोणीतरी हवे अशी मनाची पक्की भावना झालेली असते आणि मग हे कुणीतरी नसेल तर लगेच एकटे वाटायला लागते. अनेक वेळा प्रेमात पाडण्याचे कारण हा एकटेपणा असतो. मग ती प्रेमाची व्यक्ती आपली सर्वेसर्वा होते. त्यातून निर्माण होते परावलंबित्व. जे घेऊन येते एकटेपण. फक्त प्रेमी जीवांचे असे होते असे नाही. प्रत्येक नात्यात हे परावलंबित्व तयार होण्याची शक्यता असते. जसे काही गृहिणी, ज्यांनी फक्त घरासाठी वेळ दिला आहे आणि सतत फक्त मुले, नवरा, नातेवाईक यांचेच करण्यात आत्तापर्यंत आयुष्य वेचले आहे, अशा गृहिणींना एका टप्प्यावर एकटेपण जाणवते, जेव्हा त्यांची मुले स्वतंत्र होतात. नोकरीवरून निवृत्त झाल्यानंतर अनेकजणांची अशी अवस्था होते. कारण एकदम रिकामपण येते. दिवसभर घराच्या बाहेर असण्याची सवय असल्याने दिवसभर घरात असण्याचा त्रास होऊ लागतो. अशी अनेक उदाहरणे आपल्याला सापडतील, देता येतील. एकटे वाटणाऱ्या व्यक्तीचा खरे तर स्वतःशी बहुतेक वेळा झगडा चाललेला असतो. या व्यक्ती स्वतःवर खूश नसतात. इतरांचे विचार, शब्द, साथ यांचा आधार घेण्याची सवय जडलेली असते. 

हे एकटेपणाचे दुःख घालवण्यासाठी   ‘कुणीतरी हवे’ या गरजेपासून स्वतःला दूर करायला हवे... आणि आपण, आपले विचार, क्षमता, कलागुण यावर थोडे जास्त लक्ष द्यायला हवे. ‘स्व’चा विकास, त्याचे प्रकटीकरण यावर विचार करायला हवा. म्हणजे मित्रमैत्रिणी नसावेत, आप्तेष्ट नसावेत असे नाही. या सर्वांबरोबर जगण्याचा आनंद घ्यायचाच आहे. परंतु ती गरज झाली की त्याचा त्रास होणार आहे. प्रत्येक जण, प्रत्येक मी स्वयंभू, स्वयंपूर्ण आहेच, पण या अशा ‘मी’चे भान येण्यासाठी एकटेपणाच्या भीतीमधून बाहेर पडून आपला प्रवास ‘एकांत’ या सकारात्मक भावनेकडे न्यायला हवा. कारण एकटेपणाची ही भावनिर्मिती अनेक दुखऱ्या भावनांना जन्म देणारी असू शकते आणि मग त्या दुखऱ्या भावना आपल्याला पुरत्या त्यांच्या जाळ्यात ओढून घेतात. परिणामतः सगळे काही नीट चालले असून ती व्यक्ती मात्र उदास आणि स्वतःला दुःखी समजू लागते. 

म्हणून नको वाटत असलेला हा एकटेपणा स्वीकारायला हवा. एरवी अनेकांच्या गराड्यात आपण स्वतःचा आवाज ऐकायचा प्रयत्नच कधी करत नाही. इतकेच नाही तर अनेक गोष्टींबद्दल आपल्याला नेमके काय वाटते याचाही विचार नीटसा केलेला नसतो. अनेकांच्या प्रभावाखाली राहायची सवय झालेली असते. जर अचानक एकटे राहायची वेळ आलीच तर ती संधी समजूया. जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी कोणावर अवलंबून राहावे लागले, तसेच कोणासाठी काही करावे लागले, तरी काही काळ स्वतःसाठी राखून ठेवूया. जरी खूप काही आपण वेगळे करणार नसलो, तरी स्वतःविषयी वेगळा विचार या एकटेपणात नक्कीच करता येतो. हे सर्व वयोगटांसाठी आवश्यक आहे. स्वतःशी मैत्री करायची ही फार मोठी संधी असते. असे एकटे बसण्याची वेळ येईल तेव्हा अधाश्यासारखी त्याची वाट पाहिली पाहिजे. 

ज्या गोष्टी कधी करता आल्या नाहीत, त्या करण्याची ही वेळ आहे. काही वाचन असेल, लिखाण असेल, बाहेर फिरून येणे असेल, छंद असतील, तर काही वेळा काही न करणेही असेल. पण जे करायचे ते फक्त स्वतःसाठी असेल. एकटेपणा मनाचा आहे. हे कायम लक्षात ठेवू. रॉबिन्सन क्रुसोसारखे आपण निर्जन बेटावर चुकून एकटे सापडलेलो नाही. ओळखीची नसतील तरी माणसे आहेत ना आजूबाजूला. जेव्हा स्वतःशी जोडणी होते, तेव्हा अनोळखी असेही कोणी वाटत नाही. सहज कोणाशी गप्पा मारून पुन्हा आपण आपल्या एकांतात रमायला जाऊ शकतो. 

जो माणूस आपल्याला हवा..  तो नसणे, त्याने दूर जाणे यातून येणारे एकटेपण हे केवळ मनाने ओढवून घेतलेले असते. या विषयावर कविता, शेरोशायरी यांचा वर्षाव असतो. सोशल मीडियावर भरपूर कोट्स सापडतात. हे वाचून याचा आनंद घेऊन सोडून दिले नाही, तर आपण एका विचित्र भावुक मनःस्थितीमध्ये सापडतो. एवढेच नव्हे तर सतत इतरांच्या विचारातच अडकतो. आपण कोणी आहोत हे विसरून जातो.

म्हणूनच एकटेपणातून बाहेर पडण्याचा एक उपाय म्हणजे आपण एकटे नसून एकमेव आहोत असे समजणे. बरे ही नुसती समजूत नाही, तर खरेच प्रत्येक जण एकमेव आहे. कोणीच दुसऱ्यासारखा नाही. मग कोणाशी पटेल, कोणाशी नाही, कधी बाकी सगळे आपल्याबरोबर असतील कधी नाही. हे होणे स्वाभाविक नाही का? शिवाय कशाला हवी नेहमी इतरांची मर्जी किंवा मान्यता. आपण वेगळे आहोत तर कधीतरी एकटे राहावे लागेल असे मान्य करूया. कशासाठी बाकी जगाबद्दल ही नाराजी निर्माण व्हायला हवी. आपल्याला जे विचारधन निर्माण करायचे आहे ते आपण करत राहूया. कधीनाकधी पटेल हे इतरांना. नाही पटले तरी ठीक. का कोणाची नेहमी वाट पाहायची. आपल्याला जे हवे आहे, जे करायचे आहे ते विश्‍वासपूर्वक करत राहायचे. 

कोणी नाही आपल्याबरोबर या भावनेमुळे निर्माण होणारी स्वतःबद्दलची कीव आणि दया तसेच एकटेपणाची भीती ही थोडी घातक असते. कसे काय एकटे राहणार असा तो प्रश्न असतो. मग सर्वांच्या मर्जीप्रमाणे चला असे म्हणून आपण आपले वेगळे अस्तित्व नाकारत जातो. वेगळा विचार केला, तर वेगळे वागलो तर गटातून बाहेर फेकले जाऊ ही भीती आपण एकमेव आहोत या संकल्पनेलाच सुरुंग लावण्याची शक्यता असते. त्यात आपल्या आजूबाजूचे एकटेपणाची भीती आपल्याला घालत राहतात आणि जबरदस्तीने इतरांच्या विचारांप्रमाणे चालत राहतो. म्हणून असे काही होत असेल तर निकराने ते मनातून काढून टाकायला हवे. एकटेपणा हा आवश्यक आहे. कधीतरी स्वतःची, स्वतःच्या विचारांची पूर्ण जबाबदारी घेऊन एकट्याने पुढे जाणे हे खरे स्व-ओळखीचे मार्ग आहेत.

एकमेकांचे असणे, एकमेकांसाठी काही करणे, एकमेकांशी काही शेअर करणे, बोलता बोलता एकमेकांना प्रेरित करणे, ऊर्जा देणे तर कधी कोणी उपस्थित नसताना तीव्र आठवण येणे, हे सर्व मैत्री आणि कोणत्याही नात्यामधले सुंदर आविष्कार आहेत. परंतु असे झाले नाही तर येणारा एकटेपणा आपल्याला जागरूक राहून थांबवायचा आहे. प्रत्येक जण खरे तर आपापला जगत असतो. बाकीचे फक्त आजूबाजूला असतात किंवा ते शाब्दिक मदत करणारे असतात. फार तर फार आपल्याला होणाऱ्या कष्टाचा भार ते उचलू शकतात. परंतु, ‘सारे काही आजूबाजूचे’ समजून घेऊन निर्णय घेणारा शेवटी हा ‘स्व’ अथवा ‘मी’ हा तसा एकटाच असतो. म्हणूनच प्रत्येक प्रश्न, संकट, समस्येतून तावून सुलाखून बाहेर पडणारा ‘सर्व साक्षी मी’ हा जेव्हा एकटेपण वरदानाप्रमाणे स्वीकारतो, तेव्हाच ‘स्वयंप्रकाशी तू तारा .. चैतन्याचा गाभारा’ या स्थितीला पोचण्याची वाट सापडू शकते. म्हणूनच मनाला मोहवणारा संग, त्यातून बोचणारे एकटेपण असे जरी स्वाभाविक असले, तरी तिथून पुढे आपल्याला जायचे आहे. हा प्रवास प्रत्येकाला करायचा आहे. आपले व्यक्तिमत्त्व उमलवणारा आपल्या विचारांचा व्यासंग आपल्याला गाठायचा आहे. याबद्दल मनन करूया पुढच्या लेखात.  

संबंधित बातम्या