...जहाज सोडायचे नाही!

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
सोमवार, 20 एप्रिल 2020

मनतरंग
मन... डोळ्यांना न दिसणारं, पण तरीही रोजचं जगणं प्रभावित करणारं... त्याची रूपंही अनेक... अशा या मानवी मनाचा वेगळ्या नजरेतून वेध.

आज आपण सर्वच, सर्व जगच कोरोना नावाच्या वादळात सापडलो आहोत. तेव्हा ही जीवन नैय्या कशी किनाऱ्याला लागणार हा प्रश्न प्रत्येकाला आहेच. तरी जिवावर उदार होऊन, आपला जीव धोक्यात घालून अनेक जण आपल्या सर्वांचे किमान रोजचे जगणे सुसह्य व्हावे म्हणून धडपडत आहेत. आपल्या जिवाची पर्वा न करता अनेक डॉक्टर्स आणि सर्व वैद्यकीय व्यवसायातले, विषाणूबाधित लोकांना वाचवायचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. अनेक जण आवश्यक अशा यंत्रणा राबवत आहेत. त्या सर्वांसाठी मला ज्येष्ठ विचारवंत आणि समाजसेवक बाबा आमटे यांची ही कविता आठवते.. 
... बुडत्या जहाजाच्या कर्णधारालाही ओढ असते घराची 
पण प्रसंग येतो तेव्हा घर बाजूला पडते. 
जहाजाबरोबर स्वतःला बुडवून घेणारे कर्णधार जेथे असतात 
तिथेच बुडता देश वाचवणाऱ्या नाविकांच्या पिढ्या जन्माला येतात. 
वाट पाहणाऱ्या किनाऱ्यांना .. आणि 
लाटांच्या उग्र कल्लोळाला कळू द्या 
मी अजून जहाज सोडलेलं नाही! 

ही कविता सर्व प्रकारच्या सेवा कर्मचाऱ्यांसाठीच आहे जणू. पण म्हणजे ज्यांनी या सेवेत भाग घेतला नाही त्यांचे जीवन व्यर्थ का? तर मुळीच नाही. आपण सर्व घरी बसलो आहोत. कदाचित आपल्यापासून संसर्ग होण्याचा जो धोका आहे तो आपण निश्चित टाळत आहोत. शिवाय सर्वांनाच सर्व करता येईल असे नाही. ज्यांना प्रशिक्षण मिळाले आहे आणि स्वतःची काळजी घेऊन जे ही कामे करू शकत आहेत त्यांनीच हे करायचे आहे. हकनाक या विषाणूच्या संसर्गाला बळी पडणे आणि आपल्यामुळे आपले कुटुंब, तसेच आपल्या आजूबाजूचे लोक यांचाही जीव आपण धोक्यात घालणे हे योग्यच नाही. आत्ता सर्वतोपरी घरी बसणे आणि फक्त आवश्यकता असेल तेव्हा एकाने घरासाठी बाहेर पडणे हेच केवळ योग्य आहे. जे आपण बहुतांशी लोक करत आहोत आणि त्यामुळे लाखो लोक विषाणूबाधित होण्याची शक्यता होती, तिथे काही हजारात ती संख्या मर्यादित ठेवण्यात आपल्याला यश येते आहे. 

पण ही कविता आज प्रत्येक मनाला लागू होते किंवा प्रत्येक मनासाठी आहे असे मला वाटते. कारण प्रत्येक मन हे विचारांचे एक जहाज आहे आणि येणाऱ्या अशा अनेक प्रश्नांच्या, समस्यांच्या लाटांवर नेहमीच हेलकावे खात असते. प्रत्येक मनाने आपल्या जहाजाचे दोर घट्ट हातात धरून ठेवण्याची गरज असते आणि आपल्या मनाला शेवटपर्यंत सोडून जायचे नसते. म्हणजेच विचारांच्या वादळात न अडकता स्वतःला निराशेच्या गर्तेत लोटायचे नसते. माझे एक सर आम्हाला नेहमी सांगायचे, की संकट येते ते आपल्याला कमजोर करायला नाही, तर आपल्यातल्या कमजोरींवर मात करायला आपल्याला शिकवायला. कदाचित जे काही आत्तापर्यंत आपण केलेले नाही ते करून बघायची ही संधी असते. म्हणजेच थोडक्यात कोणतीही आपत्ती ही नव्याने काही शोधायची संधी असते. कारण निराशेत आपण सर्व पर्याय संपले, आपले सर्व रस्ते बंद झाले अशा निष्कर्षाला येऊन पोचलेलो असतो. 

निसर्गतःच मानवालाच काय, पण या सृष्टीतील प्रत्येक जिवाला स्वतःचा जीव काही करून वाचवायचा अशी एक अंतःप्रेरणा मिळालेली आहेच. ज्याला आपण सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट असे म्हणतो. ही अंतःप्रेरणा जशी पटकन काही हालचाली करायला प्रेरणा देते, तशीच नवीन विचार करायलाही प्रेरणा देते. हे नवीन विचार कशाला हवे आहेत, तर कसेही करून वाचायचे आहेच पण त्याबरोबर वाचल्यानंतर पुढे काय याचाही विचार करायचा आहे. कदाचित हाच विचार जास्त काळजी आणि चिंता निर्माण करणारा आहे. आत्ताही तोच विचार अनेकांना सतावतो आहे. 

साधारण बहुतेक लोक असा विचार करत आहेत की घरी बसलो आहोत, ठीक आहे. चुकून या कोरोनाने ग्रासले तर जावे लागेल हॉस्पिटलमध्ये, एकटे राहावे लागेल, पण बरे होऊ आपण नीट काळजी घेतली तर... आणि समजा चुकून काही बरे वाईट झालेच तर काय करणार, आयुष्याची दोरी आपल्या हातात कुठे आहे.... पण यातून बाहेर पडल्यावर काय आणि फक्त मीच नाही तर पूर्ण जगाचे काय, नोकऱ्या अशाच राहतील का, व्यवसाय टिकतील का, कितीतरी गोष्टी लगेच करता येणार नाही, आर्थिक मंदी येईल.... वगैरे वगैरे.. 

पण हा विचार झाला आपण पूर्वीपासून जसे होतो त्या मनाने केलेला. म्हणजे हे वादळ येण्यापूर्वीचे आपले जे जहाजरूपी मन होते त्यामधील हा विचार आहे. पण आता परिस्थिती बदलली आहे, तर आपल्या मनानेही बदलण्याची आवश्यकता आहे. पूर्वीचे आडाखे, निकष आता कसे चालतील. म्हणजे एकप्रकारे आपल्याच मनाचा आपल्याला नव्याने परिचय करून घ्यायला हवा आहे. जसे पूर्वी होते तसे आता नक्कीच नसणार. नोकरी संदर्भातही बरेच बदल जागतिक पातळीवर होणार आहेत. पण यात जर आपण एक ठरवले, की जे मला स्वीकारावे लागेल ते मी स्वीकारेनच पण त्याबरोबर जे मला समजले आहे ते मी अजून कोणाकोणाला नक्की समजावून सांगेन. कोणी भीतीपूर्ण मनस्थितीमध्ये असेल तर मी नक्कीच धीर निर्माण करेन, तर लढा थोडा सोपा होईल नाही का? असे सर्वच जण लढायला आणि धीर धरायला तयार झाले, तरच हे मनांचे जहाज आपल्यासाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी किंवा जमले तर ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी आपल्याला घट्ट पकडून ठेवता येणार आहे आणि स्थिर करता येणार आहे. 

या अशा आपत्ती अनेक वेळा जगाच्या कोणत्याना कोणत्या भागात अनेकांनी अनुभवल्या असतील. पण पूर्ण जग एकाच वेळी अनुभवत आहे, अशी ही या शतकातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे याला कसे सामोरे जायचे, याचे ठरलेले काही असे उपाय या जगात नाहीत. आपण सर्व शोधतो आहोत. एका प्रकाराने आपल्याला ज्याचा अनुभव नाही अशा एका शक्तीचा आपल्याला परिचय नसल्याने, आपल्या मनांची जहाजे आज थोडी हेलकावे खात आहेत. कोरोना विषाणूला मी शक्ती म्हणते आहे. मग ती वाईट शक्ती आहे का? जी जीवसृष्टीचा संहार करणारी आहे. जणू राक्षसी शक्ती. पण शक्ती ही चांगली किंवा वाईट नसते. त्याचे परिणाम हे या जीवसृष्टीच्या संदर्भाने, म्हणजे ही जीवसृष्टी टिकणे म्हणजे चांगले या संदर्भाने विचार केला, तर ते परिणाम वाईट होत आहेत. पण या निमित्ताने आपल्या हातात काही नाही असे या जगात सहज उत्त्पन्न होऊ शकते, या गोष्टीचा परिचय होतो आहे. हे जितक्या लवकर आपण मान्य करू तितक्या लवकर आपले सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेवरचे रोष कमी होतील आणि किमान माझे, माझ्या प्रियजनांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी मी स्थिर राहून काय काय करू शकतो याच्या नवनवीन कल्पना माझ्या मनात निर्माण होतील. ही स्थिरता येण्यासाठी जे आणखी काही चांगले आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये उपयोगी येणारे विचार आवश्यक आहेत ते असे - 

आज इथे चूक कोणाची का असेना, हलगर्जीपणा कोणाकडून का झालेला असेना, पण सर्वांना त्याची जबाबदारी घ्यावी लागली आहे आणि सर्वांनाच खबरदारी घ्यावी लागत आहे. फक्त जीव स्वतःचा वाचावा यासाठी नाही, तर सर्व जगच यातून बाहेर पडावे म्हणून अनेक जण यात योगदान देत आहेत. जसे टेस्टिंग किट तयार करणारे, या विषाणूवरची लस/औषध शोधणारे, या परिस्थितीवर नियंत्रण मिळावे म्हणून लॉकडाऊन यशस्वी व्हावे यासाठी असणारी यंत्रणा, तसेच यातून बाहेर पडल्यानंतर देशाची आणि समाजाची आर्थिक घडी लवकरात लवकर पूर्ववत यावी म्हणून विचार करणारे व्यावसायिक. ही सार्वत्रिक जबाबदारी आज जशी जमेल तशी प्रत्येकाने उचलली आहे. ही जाणीव आपल्याला ठेवता आली, तर आपणही सकारात्मक राहून आणि आहे ती परिस्थिती आनंदाने स्वीकारून एकप्रकारे ही सार्वत्रिक जबाबदारी उचलणार आहोत.

चूक कोणा दुसऱ्याची पण जबाबदारी मात्र सर्वांना घ्यावी लागते याचे दुःख करण्यात अर्थ नाही. त्याने मनाचे जहाज डगमगेल. तसेच ‘संपूर्ण मानव जात’ असा विचार केला, तर आपण मानव जातीत जन्माला आलो. त्यामुळे कोणत्याही भागातल्या मानवाने जरी चूक केली, तरी त्याची जबादारी आपल्याला घ्यावी लागणार आहे हे आपण जर मान्य केले, तर अधिक जबाबदारीने आपल्यावर या एकांतवासात जी भूमिका आली आहे ती पार पडायची आहे हा चांगला विचार निर्माण होईल आणि पुढचा प्रवास सुकर होईल. तसेच कारणे शोधताना तात्कालिक कारणावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे आपण कोणत्याही आपत्तीच्या मुळाशी पोचू शकत नाही, कितीही अभ्यास असला तरी त्याच्या मुळाशी लगेच घाला आपण घालू शकत नाही. म्हणून आहे तो प्रसंग उत्तमरीतीने पार पाडणे इतकेच आपल्या हातात राहते. 

ही जबाबदारी घेणे म्हणजेच एखाद्या बोटीच्या कॅप्टनपदाची सूत्रे संभाळण्यासारखे आहे. म्हणून आज आपण प्रत्येक जण कप्तान आहोत. कप्तान ही एक मनोभूमिका आहे, ती मनाची भक्कम तयारी करून घेणार आहे. 

ही जबाबदारी आपल्याला एका अभेद्य अशा मनोवृत्तीकडे घेऊन जाणार आहे. ही अभेद्यता का आवश्यक आहे कारण आपण आज सामाजिक अंतर सोशल डिस्टन्सिंग या एका नवीन संकल्पनेला सामोरे गेलो आहोत. यावर अनेकांनी कल्पनाविलास करून चांगले विचार मांडले आहेतच. पण ते फक्त शरीरापुरते मर्यादित आहेत असे मला वाटते. अंतर राखायचे आहे ते आपण आणि नकारात्मकता यांच्यात. काय विचार करावा, काय करू नये, काय बोलावे काय बोलू नये हे समजणे हेसुद्धा एकप्रकारचे अंतर समजून घेण्याचाच एक प्रकार आहे. सोशल मीडियावर लोकांना वाटेल ते लिहायला ऊत आला आहे. जोक्स, टीका, टोमणे इथपासून ते आपल्या तत्त्वज्ञानाशी संबंध जोडेपर्यंत याचा कल्पनाविलास आहे. वेळ घालवायला एक चांगले माध्यम आहेच. पण तेही मर्यादित असायला हवे. कारण आपण भेटत नाही तरी अनेकांच्या विचारांनी आणि लिखाणाने प्रभावित होऊन नकारात्मक विचार करत आहोत, घाबरत आहोत, काळजीत आहोत हे त्या विषाणूने बाधित होण्याइतकेच गंभीर आहे.

पत्रकार त्यांचे काम करत आहेत, आर्थिक, राजकीय विश्लेषक त्यांचे काम करत आहेत, पण त्याने आपण किती घाबरायचे. आपल्या हातात अनेक गोष्टी असताना आपणही थोडा प्रयत्न केला तर उद्या समाजासाठी उभे राहण्याचीही क्षमता आपल्यात असताना, उगाच भविष्याचा विचार करून आत्ताच निराश व्हायचे हे कोविड १९ झाल्याप्रमाणेच आहे. मनाचा हा व्हायरस यावरही अनेक तज्ज्ञांनी लिहिले आहे. जे काही वाचले, ते अपडेट म्हणून तिथेच सोडून देणे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये मी बेस्ट पॉसिबल काय करू शकते हा विचार करणे आत्ता आवश्यक आहे. तरच मनाची भिंत अखंडित आणि अभेद्य राहील.

जी सार्वत्रिक जबाबदारी आपण आज स्वीकारली आहे, त्याचा जो परिणाम असेल त्याला आपल्याला नक्कीच सामोरे जायचे आहे आणि अत्यंत खंबीरपणे आपण सामोरे जाणारही आहोत. त्यात कदाचित थोडे आपले आर्थिक नुकसान असेलही पण ते भरून येईल. परंतु, सामाजिक आणि आर्थिक घडी बसवायला आपलाही थोडाफार हातभार लागला, तर आपलेच पुढचे आयुष्य अधिक चांगले आणि समाधानी असेल. या अर्थाने आज प्रत्यकाने आपापल्या जहाजाचे सुकाणू हातात घट्ट पकडायचे आहे. काही मदत करायला नाही जमले तरी देशाच्या पातळीवर जे काय निर्णय घेतले जातील ते तंतोतंत पाळणे हेही एक मोठे काम प्रत्येकावर असणार आहे.

म्हणूनच आज आपण सगळे एक वचन एकमेकांना देऊया. ज्या गोष्टींचा आज नव्याने परिचय होतो आहे, तो मुळीच न घाबरता करून घेऊया. जिथे मी माझ्या जगण्याची आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या जगण्याची जबाबदारी घ्यायला हवी आहे त्याबाबत स्वतःला सक्षम करूया. आपल्या सर्वांवर जी सार्वत्रिक जबाबदारी आहे, त्याकडे एक संधी म्हणून पाहूया. मग समजत जाईल की काय जवळ करावे आणि काय दूर ठेवावे, काय वाचावे आणि काय वाचू नये, काय बोलावे आणि बोलू नये. हा बदल आपल्यात व्हायलाच हवा आहे आणि माझी खात्री आहे की तो होणार आहे. आपण हुशारी आणि कौशल्यपूर्ण होऊच; त्याचबरोबर एक प्रकारचे शहाणपणही कमावणार आहोत यातून. एकमेकांना धीर देत, आहे त्या परिस्थितीमध्ये आज आणि नेहमीच उत्तम जगण्यासाठी प्रेरित करू.... आणि एक लक्षात ठेवायचे आहे, की काही झाले तरी विचारांच्या वादळात आपल्या मनाचे जहाज कधीही सोडायचे नाही.. आपले कप्तानपद कधीही सोडायचे नाही.. किनारा जवळच आहे आणि तो मिळणारच आहे ... सर्वांना त्यासाठी शुभेच्छा!

संबंधित बातम्या