मधुर वाणी

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
सोमवार, 6 जुलै 2020

मनतरंग
मन... डोळ्यांना न दिसणारं, पण तरीही रोजचं जगणं प्रभावित करणारं... त्याची रूपंही अनेक... अशा या मानवी मनाचा वेगळ्या नजरेतून वेध.

असे म्हणतात की ज्यांच्या जिभेवर सरस्वतीचा वास, त्यांची वाणी शुद्ध आणि मधुर असते. खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्ती झाली, तर वाणीमध्ये माधुर्य येत जाते. मग आपल्यासारख्या सामान्य माणसाला ही वाणी प्राप्त होणार नाही का, तर नक्कीच होईल. आज त्यावर मनन करूया. 

वाणी म्हणजे भाषा. शब्दांची भाषा. जी मनात तयार होते, शब्दसंग्रह, शब्दफेक, शब्दांचे योग्य उच्चारण, त्याचे व्याकरण, ते शब्द बोलण्यासाठी मनात तयार झालेला भाव, तसेच मनात असलेल्या भावनांना दिलेले शब्दांचे स्वरूप आणि हे सारे व्यक्त होण्यासाठीचा हेतू... हे सर्व मिळून तयार होते आपली वाणी, म्हणजेच भाषा. ही भाषा आहे आपल्या मनाचा आरसा. आपण जसे आहोत तसे आपण बोलतो. 

शब्द आणि त्यांची वाक्ये करता आली, म्हणजे ही ‘भाषा’ बोलता आली असे नाही. ही भाषा अवगत करणे, त्यातून स्वतःला व्यक्त करता येणे, आपल्या मनातल्या भावाविष्कारांना रूप देणे, हे सर्व हे आपल्याला जाणीवपूर्वक शिकावे लागते. कारण ती भाषा जोडत असते आपल्याला आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी, लोकांशी, तसेच जगण्याच्या अनेक पैलूंशीही. इतरांचे ऐकून आपण बोलायला शिकतो, शाळेत व्याकरण शिकतो, परीक्षांमुळे लिहायला, व्यक्त करायला शिकतो. बहुतांश ज्ञान हे साठवले गेले आहे, ते या भाषेच्या माध्यमातून. म्हणूनच अध्ययनाचे, अनुभवाचे, ज्ञानाचे फलित म्हणून आपली वाणी शुद्ध आणि मधुर होत जावी असे संस्कार आपल्यावर लहानपणापासून केले जातात. म्हणजेच आपल्याला चांगल्या प्रकारे सर्व मांडता यावे, चांगले बोलता यावे असे सर्वांना वाटते. 

कित्येक वेळा अगदी साध्या शब्दांतून परिणाम साधणारी आणि आपल्याला छोटे छोटे दृष्टांत देणारी माणसे असतात. त्यांची भाषा उत्तम आहे, त्यांची वाणी शुद्ध आहे, मधुर आहे असे जाणवते. असे वाटते की ती माणसे काही वेगळीच आहेत. आपल्याला त्यांच्यासारखे बोलता यावे असेही वाटते. हे असे चांगले बोलता येणे हे निरोगी मनाचे प्रतीक असते, कारण त्या मनाला जगणे सुंदर भासत असते; म्हणून मग ते सौंदर्य जगताना शब्दांतून व्यक्त होत जाते.

कधी होईल असे? तर जे आपण मागील दोन लेखात म्हणत आलो आहोत, की जेव्हा हे सारे आजूबाजूचे, आपल्या भोवतालचे जग पाहायची दृष्टी आपण विकसित करू आणि आपल्याला आपल्या मनातला आवाज ऐकता येईल, तेव्हा आपली वाणी मधुर होईल. वाणी मधुर होणे म्हणजे एरवी आपण जसे म्हणतो, की अमका माणूस गोडबोल्या आहे, तसे नाही. मनात नसताना, एखाद्याला मस्का लावायचा म्हणून, फक्त आपले काम होईपर्यंत.. अशा काही हेतूंनी गोड बोलणे म्हणजे मधुर वाणी नव्हे. खोटे खोटे गोड बोलायचे नाहीये आपल्याला. शिवाय प्रत्येकाशीही समान बोलता येणार नाही. थोडे कधी रागवावे लागेल, कोणाला प्रेरित करताना आवेशात बोलावे लागेल, कोणाला स्पष्टपणे काही सांगावे लागेल, कोणाला नाही म्हणावे लागेल... असे अनेक. एखाद्याची वाणी, म्हणजे बोलण्याची पद्धत चांगली आहे असे आपण म्हणतो. शब्द नेमके कुठे कसे वापरावे ज्यामुळे आपला प्रभाव तर पडेल, पण समोरचा दुखावला जाणार नाही, त्याचा अपमान होणार नाही; हे तंत्र त्या माणसाला जमलेले असते. 

मधुर हा शब्द गोड या शब्दापेक्षा काही वेगळेही आपल्याला सांगतो. मध हाही गोड असतो, पण तो साखरेसारखा गोड नाही, तो नैसर्गिकरीत्याच गोड आहे. त्याचा शरीराला काही अपाय होत नाही. तसेच मधुर भाषा ज्याने आत्मसात केली त्याच्या मनात कपट, पण ओठावर साखर असे नसते. त्याला मनातूनच असे वाटते की समोरचा, मग तो कोणीही असो, त्याच्याशी स्पष्ट, शांत आणि योग्य शब्दांत बोलावे. याच्याच उलट दर वेळी वादविवाद स्पर्धाच आपल्याला जिंकायची आहे, अशा थाटात काहीही बोलणारे लोकही आपण पाहतो. समोरच्याला चूक सांगायची आहे म्हणजे जमेल तितका अपमान करून, घालून पडून बोललेच पाहिजे अशीही अनेकांची समजूत असते. आपल्या रावसाहेब या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील चित्रणात पु. ल. म्हणतात तसे, ‘बोलताना एखादी शिवी दिल्याशिवाय आपल्या वाक्याला हवा तसा अर्थच प्राप्त होणार नाही,’ अशा थाटात बोलणारेही आपल्या आजूबाजूला असतात. आपणही असे कधीना कधी वागलेलो असतो.  

मधुर वाणी म्हणजे एक अर्थ असा की ‘बोलतानाचे आर्जव’. हे वाक्य वाचता क्षणी; अनेक पातळ्यांवर असे नाही बोलता येणार, नाही तर लोक डोक्यावर बसतील, असे अनेकांच्या मनात येईल. पण एका भूमिकेत बोलता नाही आले, तरी इतर अनेक भूमिकांत बोलायचे नाही असे तर नाही ना. कित्येकदा सवय पडून जाते ‘रफ’ भाषा वापरायची. अनेकदा तर बिनधास्त बोलण्याच्या नादात आपण समोरच्या माणसाच्या वयाचा आदर करायलाही विसरून जातो. तसेच असाही विचार करून पाहूया, की मनातून खूप आनंदी, समाधानी माणूस कशी भाषा बोलेल आणि जो कायम आपल्या दुःखांसाठी दुसऱ्यावर आरोप करत आला आहे, तो कशी भाषा बोलेल. थोडा अहंपणा आणि दुसऱ्याच्या वागण्यातली चूकच पाहण्याची सवय; यामुळे सरळ, स्पष्ट जरी बोलले गेले तरी ते मन दुखावणारे असू शकते. 

बोलण्यातले आर्जव हे आपोआप येत नाही. आपल्यातल्या समदृष्टीचा तो परिपाक असतो. त्यात आपण समोरच्या माणसाला माणूस म्हणून आदर दिलेला असतो; त्यामुळे मग आपल्यापेक्षा वेगळे असलेले, न पटलेले, दुखावणारे असे सांगताना, बोलण्यात स्पष्टता येऊन ती बोच दाखवणारा हळवा भाव समोरच्याला टोचणारा नसतो. तरी तो मुद्दा मात्र समोरच्याला पूर्णपणे समजलेला असतो.   

या मधुर वाणीमध्ये जसे आर्जव आहे, तशी शुद्धताही आहे. आज आपण शुद्ध वाणी अथवा शुद्ध भाषा ही फक्त शब्दोच्चाराच्या स्पष्ट उच्चारांशी संबंधित ठेवली आहे. ते महत्त्वाचे आहेच. पण मनातला भाव किंवा तसे बोलण्यामागचा हेतू शुद्ध असणे हे उच्चारांपेक्षाही महत्त्वाचे आहे. व्याकरणात शुद्ध भाषा आणि बोली भाषा असे दोन ढोबळमानाने प्रकार आपण करत असू, तरी त्यामध्ये शुद्ध अशुद्ध असा भेदभाव करणे योग्य नाही. आपण उच्चार कसे करतो यावर अनेकवेळा बोलले जाते. शहरी भाषा, ग्रामीण भाषा असेही फरक आपण करतो. पण ज्याला वाणी म्हणायचे ती फक्त व्याकरण पाळून बोलली गेलेली भाषा नव्हे. 

‘मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं’ किंवा ‘अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर...’ असं सहज लिहिणाऱ्या आपल्या बहिणाबाईंची भाषा कोणी अशुद्ध म्हणेल का? कारण ते मांडण्यातला भाव गोड आहे. एका अनुभवातून अनेकांच्या अनुभवांत पोचण्याची ताकद त्यामध्ये आहे. म्हणून तो भाव, तो विचार स्पष्ट आणि शुद्ध आहे. त्यात भेसळ नाही. जे जे वाटते आहे, भावते आहे, अनुभवास येते आहे, ते जर मनात स्पष्ट असेल, त्यामध्ये संभ्रम नसेल आणि ते सर्वांसमोर मांडण्याची तयारी असेल तर हा भाषेतला भाव शुद्ध आहे असे जाणवते. शुचिता किंवा पावित्र्य अशा कोणत्याच कल्पना मी याला जोडत नाही. कारण त्या कल्पनांना सामाजिक संदर्भ आहे. व्यक्त होण्यातला भाव इथे अभिप्रेत आहे. जेव्हा बोलताना आणि काही मांडताना प्रथम ते मी स्वतःला सांगते, स्वतःसाठी त्याच्या रचना करते, काही उद्‍बोधक सांगायचे असल्यास त्याचा आधी स्वतःवर प्रयोग करते, जे जे मी मांडते ते ते मी अनुभवलेले किंवा शिकलेले असते, तेव्हा तेव्हा माझ्या बोलण्यात स्पष्टता येत जाते आणि मनातला शुद्ध भाव त्यात उतरत जातो.

आपल्या भाषेतून आपल्या मनाला शांती आणि समाधान मिळायला हवे, तसेच ऐकणाऱ्याच्या मनालाही. आपल्या बोलण्यातून उभारी यायला हवी, जगण्यात रस निर्माण व्हायला हवा, जणू आपला आणि समोरच्याचा अनुभव एकच आहे ही जाणीव निर्माण व्हायला हवी. यापेक्षा मधाळ वाणी दुसरी काय असेल. जी संतांची आहे. ‘भले तर देऊ कासेची लंगोटी आणि नाठाळाच्या माथी हाणू काठी...’ असे आवेशात म्हणणारे संत तुकाराम हे काही भयंकर अपमानकारक सांगत आहेत असा भास क्षणभरही होत नाही, पण नेमके काय करायला हवे हे मात्र समजते. सर्व संतांची वचने ही मधुरच आहेत. ती आपल्याला जगायला विश्वासही देतात, त्याचबरोबर आपला कानही धरतात. म्हणूनच मधुर याचा अर्थ ज्याला धार नाही असा नाहीच. गुळमुळीत आणि अनिर्णायक बोलायचे आहे असे अजिबात नाही. परंतु नकारात्मकतेला छेद देऊन सकारात्मकतेला बढावा द्यायचा आहे हे मात्र निश्चित. 

घरात मोठी माणसे कशी बोलतात त्यावर लहानपणी आपल्यावर या भाषेचे संस्कार कसे होतील ते मात्र अवलंबून असते. मुले जेव्हा खेळतात आणि त्यांच्या समवयस्कांशी बोलतात किंवा ती मनाने मोकळी असतात, तेव्हा मुलांना स्वतःच्या बाबतीत आणि इतरांच्या बाबतीत घरातून तसेच आजूबाजूच्या वातावरणातून काय ऐकायला मिळते ते समजते (खास करून शिव्या किंवा तत्सम वाईट शब्दांचे शिक्के). जर असे अनुभव मुलांना येत गेले, तर त्यांनी जगाबद्दल चांगला विचार करावा असे खात्रीशीर कसे काय आपण म्हणणार. चांगले, सकारात्मक बोलता येणे यातच निरोगी मनाचा विकास आहे. सतत राग, नाराजी, असमाधान हे मनाला उभारी देणाऱ्या शब्दांची निर्मिती करू शकेल का? समजा आपले लहानपण अशा शब्दांनी सावरलेले नसेल. तरीही जेव्हा आपण स्वतःला सज्ञान म्हणवून घेतो, तेव्हा विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक ही भाषा नक्कीच आत्मसात करू शकतो आणि स्वतःच्या मनाला सुदृढ व निरोगी ठेवू शकतो. विनम्रता हे या मधुर वाणीचेच एक प्रगत रूप आहे. ती माणसाने मिळवलेली सर्वांत श्रेष्ठ अशी भाषा आणि मनोभूमिका आहे. याबद्दल आणखी काही... पुढील लेखात!

संबंधित बातम्या