निराशा

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे
मंगळवार, 28 जुलै 2020

मनतरंग

सध्या निराशा या गोष्टीबद्दल बरेच बोलले जात आहे. या लॉकडाउनच्या काळात व्यवसाय, नोकरी याचे खूप प्रश्‍न निर्माण झाले, त्यामुळे निराशेच्या भरात काही लोकांनी आत्मघातकी निर्णय घेतले. तसेच एका सिनेकलावंताच्या मृत्यूला ‘निराशेतून आत्महत्या’ असे स्वरूप प्राप्त झाल्याने निराशा या विषयावर चर्चा आणि मार्गदर्शनपर लेखनही बरेच झाले. एक निरीक्षण असे, की आपल्या समाजात निराशा ही समजून घेतली जात नाही आणि जेव्हा त्यातून काही बरे वाईट घडते, तेव्हा निराशा कशी वाईट हे सर्वत्र चर्चिले जाते. पण यामुळे जगण्याच्या या एका महत्त्वाच्या बाजूवर चिंतन मनन तितकेसे केले जात नाही. निराशा यावी का नाही, ती चांगली का वाईट हे किंवा असे काही म्हणण्याआधी तिचे मानवी जगण्यातील स्थान समजून घ्यायला हवे, या हेतूने निराशा या विषयावरील लेखांची ही मालिका प्रस्तुत करत आहे. 

आजकाल चहूबाजूंनी वाढलेली स्पर्धा, त्यात स्वतःचे स्थान पक्के करण्याची इच्छा, म्हणून मग सतत काही ना काही मिळवण्यासाठी माणसाचे धावणे, भौतिक सुखांच्या मोहात अडकणे, साध्या गोष्टीत समाधान नसणे, प्रसिद्धी आणि वलय याचा कैफ, यामुळे निराशेचे प्रमाण वाढले आहे असे अनेकवेळा म्हटले जाते. परंतु, ही वरवरची बाह्य कारणे झाली. अश्मयुगातल्या माणसांनाही दुःख, निराशा आलीच असणार. खूप प्रयत्न करूनही आपण जंगली प्राण्याच्या हल्ल्यातून आपल्या भिडूला वाचवू शकलो नाही याचा खेद, सल असणार. जे जिवाच्या पलीकडे जपले होते ते निसटून गेले, या भावनेने उरलेले सारे निरर्थक वाटले असणार. अशा अनेक गोष्टींची कल्पना आपण करू शकतो. 

जर आपण आपला इतिहास, अगदी रामायण महाभारतापासून जर पाहिला, तर त्यातील कथांमधून कोणा ना कोणाला निराशा आली होती, असे वाचायला मिळते. या कथा घोर निराशेतून प्रगती, ज्ञान प्राप्ती अशा दिशेने जाणाऱ्या आहेत. ‘भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली गीता’ याला नैमित्तिक कारण म्हणजे अर्जुनाचा विषाद होता... ही एक प्रकारची निराशाच. गीतेचा पहिला अध्याय अर्जुनविषाद योग असाच आहे. आपण आपल्याच प्रेमाच्या माणसांबरोबर युद्ध करायला निघालो आहोत, ही भावना अर्जुनाला विषादावस्थेत नेते आणि मग कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग याची अद्‍भुत गुंफण असलेली गीता जन्माला येते, तीही प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखातून आणि युगानुयुगे ती साऱ्या जगाला मार्ग दाखवते.

रामायणाच्या काळातील वाल्या कोळ्याची कथा अशी, की ज्यांच्या सुखासाठी इतकी वर्षे लूटमार आणि जीव घेण्यासारखे कृत्य केले, ते आपल्या पापांमध्ये वाटेकरी व्हायला तयार नाहीत हे समजल्यावर आधी तीव्र दुःख, निराशा, मग पश्‍चात्ताप आणि मग त्यातून आत्मोन्नतीचा मार्ग, हा प्रवास! तर या पौराणिक काळातील कथांबरोबर अगदी याच काळातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचीही कथा असाच प्रवास दाखवणारी आहे. १९६५ च्या युद्धात आपले १९ सहकारी त्यांनी गमावले, तेव्हा अतीव दुःख आणि वेदना यामुळे त्यांनाही निराशेने ग्रासले. परंतु, स्वामी विवेकानंदांचे पुस्तक त्यांच्या वाचनात आले आणि त्यांचा जीवनमार्गच बदलून गेला. त्यांनी स्वतःबरोबर आपल्या गावाचाही विकास केला. त्यांचे समाजकार्य सर्वांना परिचयाचे आहेच. 

अशी खूप उदाहरणे सापडतील, जे सांगतील की निराशा अनुभवली आहे आणि विचारपूर्वक त्यातून बाहेर पडलो आहे. म्हणून मग निराशा ही वाईट.. नकोच.. असा विचार न करता, निराशा म्हणजे जगताना कोणत्यातरी टप्प्यावर, अनुभवास येणारी मनाची, विचारांची एक अवस्था आहे असे म्हणूया. ‘निराशा’ ही अंतिम ‘मनोवस्था’ नसून काही चांगले/वाईट घडण्यामागची प्रेरक ‘मनोभूमिका’ आहे असेही म्हणता येईल. याचाच अर्थ या निराशेत जगण्याची दिशा बदलण्याचे सामर्थ्य आहे. ते एकदा मान्य केले, की त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कदाचित शक्यतेच्या पातळीवर येईल.

काय होत असावे जेव्हा निराश वाटते? मुळात निराशा ही एक भावनाच. तेव्हा प्रथम भावना निर्माण होते म्हणजे काय होते, ही भावना नेमकी कुठे तयार होते, कुठे जाणवते ते पाहूया. कथा, कादंबऱ्या, कविता, गाणी, चित्रपट यांमुळे असेल किंवा एक जनमानस म्हणून असेल; आपला समज असा असतो, की आपल्याला ज्या भावना जाणवतात, त्या हृदयात जाणवत असाव्यात. कारण भावना हे मनाचे कार्य आणि मन कुठे? तर हृदयात, असे काहीसे ढोबळमानाने आपण मानत आलो आहोत. पण मनही हृदयात नसते आणि भावनाही हृदयात जन्माला येत नाहीत. मन आणि भावनिर्मिती ही दोन्हीही मेंदूचीच कार्ये. म्हणजे मेंदूमधील पेशींची कार्ये. पंचज्ञानेंद्रियांमार्फत माहिती ही पेशींद्वारेच मेंदूमधील विविध केंद्रांपर्यंत नेली जाते आणि मग तिथे त्या माहितीचा अर्थ लावला जाऊन, त्यावर काय क्रिया, प्रतिक्रिया द्यायची, कृती काय करायची, निर्णय काय घ्यायचे असे सर्व संदेश मेंदूच्या पेशीच ठरवत असतात. 

या पेशींचे अमूर्त स्वरूपातील कार्य म्हणजे मन आणि मूर्त स्वरूपातील कार्य म्हणजे शरीर. हे दोन्ही वेगळे असले तरी त्यांच्यामध्ये कमालीचा समन्वय असतो. म्हणून ज्ञानेंद्रियांनी मेंदूपर्यंत नेलेल्या कोणत्याही माहितीचा अर्थ लक्षात आला, की त्याबद्दल प्रथम भाव निर्माण होतो. मागचे अनुभव, आपले अध्ययन या अर्थनिर्मितीला आणि पर्यायाने भावनिर्मितीला मदत करतात. या भावनांना शारीरिक पातळीवर प्रतिक्रिया उमटत जाते. हृदयाची धडधड ही भीतीमुळे असते किंवा अतीव आनंदाच्या प्रसंगाला सामोरे जाताना असते. डोळ्यातून वाहणारे अश्रू हे तीव्र वेदना आणि दुःखामुळे असतात किंवा आनंदाचे भरते आल्यामुळे असतात. 

जसजसे आपण बाहेरील जगाचे अधिकाधिक अनुभव घेत जाऊ, तसतसे आपले भावविश्‍व वाढत जाते. एकसारखा दुसरा अनुभव नसला, तरी आपण सारखे अनुभव, वेगळे अनुभव अशी त्यांची विभागणी करतो. मग दुःखकारक, सुखकारक अनुभव असेही वर्गीकरण होत जाते. 

शरीर मनाचे कार्य जसे मज्जापेशींद्वारे चालवले जाते, तसेच अनेक अंतःस्रावी ग्रंथींमुळेही. या ग्रंथींमधील रासायनिक स्राव हे रक्तामध्ये संपूर्ण शरीरात फिरत असतात आणि त्याद्वारे शारीरिक अवयव व मन यांचे नियंत्रण करत असतात. या रासायनिक स्रावांना हार्मोन्स म्हटले जाते. भावनिर्मितीमध्ये या हार्मोन्सचा महत्त्वाचा वाटा आहे. सकारात्मक भावना निर्माण करणारे स्राव निराळे असतात आणि नकारात्मक भावना निर्माण करणारे स्राव हे निराळे असतात.  

विविध पेशींची जोडणी, त्यातून वाहणाऱ्या ग्रंथी, स्राव या सर्वांचे व्यवस्थापन मेंदूतील विविध केंद्रात होत असते. म्हणजेच या विविध ग्रंथींमुळे निर्माण होणाऱ्या भावनांना सांभाळून समतोल वर्तन आणि विचार घडवणे, जेणेकरून नीट जगता येईल, पुढच्या क्षणाची हमी वाटेल, थोडे स्थिर वाटेल हे मेंदूचे (मेंदूतील विविध केंद्रांचे) काम असते. जेव्हा हे काम कमी पडते किंवा मेंदूची ही क्षमता काही एका क्षणी कमी पडते असे म्हणूया, तेव्हा समतोल नाहीसा होऊन भावनिक चलबिचल होते. अस्वस्थ वाटू लागते. खेद, खंत, दुःख, अपराधीपणा, भीती, चिंता अशा भावनांचा जोर अधिक होतो. तिथे स्वस्थता कमी होऊन, निराशेच्या अवस्थेमध्ये माणूस जातो असे म्हणता येईल.

भावनिर्मिती ही मूलभूत प्रेरणांइतकीच स्वाभाविक आहे. या सर्व भावनिर्मितीला समतोलाकडे नेणारा विचार ही मात्र मेंदूची निर्मिती आहे. विचार हा जसा समतोलाकडे नेणारा आहे, तसा तो असमतोलाकडे नेणाराही आहे. तसाच तो नकारात्मक भावनिर्मिती होऊन घडणाऱ्या कृतीला किंवा दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रियेला नियंत्रित करणाराही आहे. फक्त तो विचार मात्र होणाऱ्या भावनिर्मितीपेक्षा जास्त प्रबळ असावा लागतो. हा विचार निर्माण होतो मज्जापेशींच्या जोडणीतून. म्हणजेच आपण जितकी नवी माहिती घेतो, नवे काही शिकतो, तितके विविध घटना, परिस्थिती, माणसे, वस्तू यांमधले नवनवीन सहसंबंध शिकत जातो. ज्याला आपण ज्ञान म्हणतो. साध्या शब्दांत, एखाद्या गोष्टीला जास्तीत जास्त बाजूंनी समजून घेणे, तत्त्व जाणून घेणे, आयाम, मिती लक्षात घेणे हे जितके अधिक घडत जाईल, तितके भावनिर्मितीनंतरच्या कृती किंवा प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवणे शक्य होत जाते.  

जर एखादा माणूस भावनाविवश होऊन आता काही माझे खरे नाही, सर्व मार्ग संपले, मी साफ अपयशी ठरलो.. असे म्हणू लागला आणि जर अत्यंत प्रेमाने, धीर येईल अशा शब्दांत, उत्साह वाटेल अशा रोखाने आपण त्या माणसाला काही चांगले सकारात्मक सांगत गेलो, त्याच्यावर टीका न करता त्याला विश्‍वास देत गेलो, तर या नवीन विचारांनी तो निराशादायी विचारांवर मात करू शकतो. 

आता माणूस इतका भावनाविवश नकारात्मक का होतो, यामागचा कार्यकारण भाव समजून घेणे महत्त्वाचे आहे. लहानपणापासून माणसाची जडणघडण कशी झाली, तो विविध गोष्टींना प्रतिक्रिया द्यायला कसा शिकला, भावनिर्मिती आणि विचारनिर्मितीची प्रक्रिया त्याच्या बाबतीत कशी आहे, या आणि अशा अनेक गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. तरच या अवस्थेतून बाहेर पडण्याचे मार्ग आपल्याला शोधता येतील. काही वेळा हे मार्ग त्या कारणीभूत झालेल्या परिस्थितीमध्येच दडलेले असतात. ही परिस्थिती म्हणजे आपला समाज, आजूबाजूची माणसे, घर, शाळा, स्पर्धा अशी वाटत असली, तरी त्या अवस्थेचा उगम मात्र माणसाच्या मनात आहे. पर्यायाने मानवी मेंदू, त्याची विविध केंद्र, त्याची कार्ये यात आहे. हे एकदा समजून घेतले, की बाहेरचे बिघडले आहे हा समज नाहीसा होऊन आपल्या आतले घडवायला हवे, हा विश्‍वास पक्का होतो आणि संपूर्ण जगण्याला प्रभावित करणारी ही निराशेची अवस्था पार करून आपण सहज त्यातून बाहेर पडतो. या सर्वांचे तपशीलवार चिंतन आपण पुढील काही भागांत करणार आहोत. 

आचार्य विनोबाजींनी गीताईमध्ये लिहिलेला श्‍लोक इथे आठवतो. (अध्याय ६ वा, ५ वा श्‍लोक)

 

उद्धरावा स्वयें आत्मा खचूं देऊ नये कधी ।

आत्माचि आपुला बंधू, आत्माचि रिपु आपुला ।।

संबंधित बातम्या