वैचारिक शस्त्रांचा विचार 

डॉ. पल्लवी मोहाडीकर कासंडे 
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

मनतरंग
मन... डोळ्यांना न दिसणारं, पण तरीही रोजचं जगणं प्रभावित करणारं... त्याची रूपंही अनेक... अशा या मानवी मनाचा वेगळ्या नजरेतून वेध.

आपल्या हातून होणाऱ्या चुका आणि येणारं अपयश यांचा स्वीकार करताना मन काही वेळा आपल्याच मनातल्या ‘मी’च्या प्रतिमेला डाग लागू नये म्हणून वैचारिक शस्त्र वापरताना दिसतं. त्यातून काही ना काही समर्थन देत राहणं आणि त्यातून चुका साफ नाकारणं ही मनोभूमिका तयार होते, ते सारं आपण मागच्या लेखात पाहिलं. ‘मी’च्या संरक्षणार्थ’ अशी बरीच वैचारिक शस्त्रं आपलं मन तयार करत राहतं त्याबद्दल आज विचार करूया. 

समर्थनाच्या जोडीचं शस्त्र म्हणजे प्रतिप्रश्न करत राहणं. ज्येष्ठ लेखक व. पु. काळे यांची एक कथा इथं आठवते.. भांडणारे जोशी. या मनोभूमिकेची अगदी चपखल, विस्तृत मांडणी आहे. कोणी काही विचारलं, की त्याला सरळ उत्तर द्यायचं नाही. का, कशाला, कुठं, केव्हा, कसं असे प्रश्न विचारत राहायचं. त्यानं समोरचा कंटाळतो आणि आपल्याशी वाद घालत नाही आणि आपल्या चुकाही काढत नाही. ही ती वर्तन तसेच संवादाची तऱ्हा/धोरण. परंतु यात माणूस आपल्या या वागण्याबद्दल जागरूक असेल किंवा काही वेळा संवाद कौशल्य म्हणूनच तसं वागत असेल तर हे वागणं कधीही थांबवू शकेल, त्यातून बाहेर पडू शकेल. पण प्रतिप्रश्न करायची सवय लागली व हे बरंय.. डोक्याला ताप कमी आपल्या.. असं वाटू लागलं तर जिथं आपण आपली हार मान्य करून स्वतःच्या प्रगतीकडं वाटचाल करायला हवी आहे तिथंही आपण असंच वागणार. एरवी ज्यांना आपण भांडकुदळ म्हणतो त्यातला हा प्रकार आहे.  दिसताना इतका नकारात्मक वाटत नाही. जगात सर्व प्रकारच्या माणसांशी नीट सामना करायचा असेल तर असं हवंच असंही वाटतं. 

एक रोजचं उदाहरण घेऊ - रहदारीचा नियम मोडला तरी ‘हो मी आज नियम मोडला’ इतकं सरळ कोणीच स्वीकारत नाही, जरी पोलिसांशी हुज्जत घातली नाही तरी मन असंख्य प्रश्न निर्माण करतं, बाकीचे कसेही वागतात तेव्हा का नाही कोणी पकडत? ते बघा सायकलवाले, त्यांना काही नियम नाहीत का? आज मी घाईत होतो, म्हणून नेमका मीच सापडलो, माझ्या आधी बरेच पळाले असणार..! मुद्दा असा की मला एकट्यालाच शिक्षा का? सगळेच असं वागतात! नियम कोणतेही न पाळणं किंवा शक्यतो त्यातून पळवाटा शोधणं ही मनोभूमिका यातून तयार होते. येऊच दे माझ्याशी बोलायला, मलाही बरेच प्रश्न आहेत.. असा पवित्रा घेतला जातो.
समर्थन - द्राक्षं आंबट - हे अगदी आपल्या इसापनीतीतील कोल्ह्याच्या गोष्टीप्रमाणं घडतं. जे हाताला येत नाही त्याला आपण नावं ठेवत बसतो. बरेच वेळा प्रयत्न करून एखादी गोष्ट नाही जमली की.. जाऊ दे, ते फारसं चांगलं नव्हतंच असं म्हणत राहातो. काम करताना बरेच वेळा अशी माणसं आपण पाहतो आणि कधीतरी आपणही असं वागलेले असतो. आपले प्रयत्न शंभर टक्के यशस्वी झाले नाहीत, यात मग मन नकळत स्वतःला दूषणं देत बसण्याची शक्यता असते. त्यापेक्षा मीच कसा हट्ट सोडून दिला, त्याच्या दुसऱ्या बाजू लक्षात आल्या, मर्यादा समजल्या.. वगैरे म्हणून स्वतःची समजूत करून घेतो. तात्पुरती निराशा टाळण्यासाठी हे केलं असेल तर ठीक नाहीतर मग जे कौशल्य कमी पडलं त्यावर काम केलं जात नाही. मला कंटाळा आला, माझा आळस नडला असं स्वतःला सांगून स्वतःकडून कष्ट करून घेण्याची संधी इथं जाते. 

एकाचा राग दुसऱ्यावर - हे वागणं तर प्रत्येक घरात दिसतं. घरच्या कटकटी, तर काहीवेळा सासरचा जाच याला कंटाळलेल्या मुली, कधी कधी मुलांना रागवताना जास्त कठोर होतात. मनात साठलेलं मुलांना दिलेल्या फटक्यात परिवर्तित होतं. काम करत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणाला झापलं, की त्या तिरीमिरीत तो व्यवस्थापक त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या सहकाऱ्यांवर तो राग काढतो. इथं आपण व्यवस्थापक आहोत तर ‘सर्व निर्णयाची अंतिम जबाबदारी आपल्यावर आहे’ हे तर पूर्णपणे मान्य नसतंच; उलट इतरांमुळंच मला कशी बोलणी बसतात यावर लक्ष केंद्रित होतं आणि फक्त राग, चिडचिड, निराशा दुसऱ्या कोणावर ओरडून, रागावून व्यक्त केली जाते. 

बालिशपणा - यामध्ये एखादा झटका इतका तीव्रतेनं बसलेला असतो, की आपल्याला आपल्या चुकीची पूर्ण जाणीव आहे असं वाटून रडू येतं. खूप अडचणीत, विचारांच्या गोंधळात सापडलो आहोत असं वाटतं आणि मग खरी साथीची गरज आहे, मदतीची गरज आहे असं वाटू लागतं. लहान मुलांसारख्या आपल्याही कोणाजवळ तरी मागण्या असतात. हे खोटं नसते, कपट नसतं, परंतु हरल्याचा धक्का, काही न जमण्याचा ताण इतका मोठा असतो की तो हाताळता येत नाही. मग माझे खरे प्रश्न कोणाला समजतच नाहीत, मी एकटाच लढतोय असं सतत वाटत राहतं. काही क्षण असं वाटणं स्वाभाविक आहे, परंतु त्यातच काही काळ अडकणं, त्यातून बाहेर न पडत येणं हे त्या व्यक्तीबरोबर तो ज्यावर अवलंबून आहे त्या व्यक्तीलाही त्रासाचं होतं. यात काही घडलं, की लहान मुलांसारखं आरडाओरड करणं, रडणं, कांगावा करणं हे ही वर्तन प्रकार मोडतात; दुःखानं रडू येणं वेगळं! 

प्रक्षेपण - आपल्याला टीव्ही कसा दिसतो किंवा आपण प्रोजेक्टरवर कसं पाहतो... त्या पडद्यात काही नसतं, टीव्हीच्या बॉक्समध्ये काही नसतं, तर ते तिथं प्रक्षेपित होत असतं. तसंच जे आपल्या मनात आहे ते दुसरा वागतो आहे असं आपल्याला वाटू लागतं. राग आपल्याला आलेला असतो, पण समोरच्या माणसाचा चेहरा रागीट, आपल्याला  
चिडवतोय असा वाटू लागतो. खोट आपल्या मनात असते, आपण थापा मारत असतो पण त्यामुळं वाटतं की सगळं जगच असं असेल. अनेकदा विश्वासघात आपल्या हातून झालेला असतो त्यामुळं जगात कोणीच विश्वास ठेवण्यासाठी योग्य नाही असं वाटू लागतं. किती अवघड आहे ते असं आपण सांगत फिरतो.. कारण आपल्याला कोणाचा विश्वास संपादन करून तो राखणं जमलेलं नसतं. 

प्रक्षेपणात अजून एक वर्तनप्रकार येतो, तो म्हणजे - जे आपल्याला जमलं नाही ते कोणत्यातरी वस्तूची नासधूस करून राग, चिडचिड व्यक्त करणं. राग आला असताना ‘पंचबॅग’ला मारणं, आदळआपट करणं, भांडी फेकणं, दार आपटणं हे सर्व याच प्रकारात मोडतं. काहीवेळा राग व्यक्त व्हावा म्हणूनही अनेक जण ‘पंचबॅग’ला बुक्के मारत बसतात. एखादवेळी ठीक पण इथं राग का येतो आहे, काही गैरसमज आहेत का, उगाचच असलेले आग्रह, हट्ट आहेत का, हे पाहायला हवं. 

उदात्तीकरण - हे म्हणजे आपला एखादा कमीपणा लपवायला दुसरी कोणतीही छोटी गोष्ट भव्य दिव्य करून सांगणं. ही भव्यता दिव्यता सामाजिक निकषांवर आधारित असते. म्हणजे साधारणपणे ज्याला भव्यतेचं रूप दिलं जातं. जसं एखादं आलेलं अपयश किंवा हातून घडलेलं समाजाच्या दृष्टीनं वाईट, चूक असलेलं कृत्य लपवायला मग समाजसेवा करणं, दानधर्म करणं, आपण खूप उदार असल्याचं दाखवणं, तशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करणं.. यात समाजोपयोगी गोष्टी करणं हे चांगलंच आहे. पण त्याच्या मागं समाजावरचं प्रेम असतंच असं नाही, काहीवेळा प्रायश्चित्त म्हणूनही उदारपणं काही गोष्टी केल्या जातात. मनातला अपराधीपणा कमी करण्यासाठी. यामुळं आपण नेमके कुठं चुकलो हे माणसाला पक्कं ठाऊक असलं तर ठीकच, नाहीतर चांगुलपणाच्या मुखवट्याआड माणूस स्वतःला लपवतो किंवा याचा अजून एक अर्थ असा की ज्या गोष्टींना विरोध केलेला असतो, इतरांना दूषणं दिलेली असतात, चुकून तेच जर आपल्या हातून घडलं तर मात्र त्या गोष्टीचा उदो उदो केला जातो. 

इतरांवर आरोप - हे शस्त्र तर अगदी रोज वापरलं जातं. आपल्या अपयशाला दुसराच कसा जबाबदार आहे हे इतरांनाही आपण सांगत राहतो आणि आपल्याला तर ते पटलेलंच असतं. माझ्या अधोगतीला माझे आई बाप, मित्र, सहकारी, जोडीदार, मुले, सामाजिक परिस्थिती, अनेक घटना.. अगदी देवसुद्धा जबाबदार वाटायला लागतो! मी मात्र साधा सरळ, नेहमी चांगले विचार करणारा, पण या बाकीच्यांमुळं हे असं वागावं लागतं या मनोभूमिकेत! जी काही परिस्थिती आपल्या आजूबाजूला असते आणि त्यामुळं आपल्याला ठराविक पद्धतीनं वागावे लागतं, हे जरी खरं असलं, तरी आपल्याला हवं तसं वागायचं असेल तर मग त्याला कोणी विरोध केला आणि त्याचा आपल्याला त्रास झाला तर ते सहन करायलाच हवं. जर त्रास नको असेल तर थोडी तडजोड स्वीकारायला हवी.  आपल्याला वाटतं म्हणून आपल्या आजूबाजूच्या लोकांनी विशाल मनाचं असावं हे कितपत योग्य आहे? याचाच अर्थ असा की बहुतांश वेळा आपणही कमीतकमी त्रास व्हावा असंच वागतो. पण त्यासाठी आपण इतरांना जबाबदार धरतो. 

यातून बाहेर कसं पडायचं? खरतर जेव्हा या सर्व संरक्षण यंत्रणांची आपल्याला जाणीव होईल, आपणच आपली फसगत करतोय हे जाणवेल तेव्हाच आपल्यातल्या बदलाला सुरुवात होईल. जो प्रयत्न करतो त्याच्याच हातून चुका होतात. अनेक इच्छा, ध्येय याचा मागोवा घेताना काहीवेळा मार्ग चुकतात. आपल्या मनातले आडाखे, गृहीतकं तितकी बरोबर न ठरण्याची शक्यता असते. यामुळं आपला अभ्यास कमी पडतो आहे, नव्यानं काही शिकायची आवश्यकता आहे असा विचार करणं हे आणि हेच महत्त्वाचं. इथं ‘च’ चा आग्रह ठेवा. कोणी किती का नावं ठेवो, विरोध करो, पण आपल्याला मनाची प्रगती साधत पुढं जायचं आहे हे स्वतःला समजून सांगणं खूप गरजेचं आहे. विरोधाला सामोरं कसं जायचं ते पुढील लेखात बघूया.

संबंधित बातम्या