प्रेम भावनेचे व्यवस्थापन 

पल्लवी मोहाडीकर कासंडे 
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

मनतरंग

... प्रेम म्हणजे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यकाळातील त्याच्या अभ्युदयाची आशा.. एकमेव! कुसुमाग्रजांच्या कवितेतील या ओळी वाचल्या की प्रेम ही सर्वश्रेष्ठ भावना आहे यात शंकाच राहात नाही. प्रेम ही जगातली सर्वांत जास्त तर्कसुसंगत अशी भावना आणि कृती आहे असेही म्हटले जाते (लव्ह इज द मोस्ट रॅशनल ॲक्ट). पण कदाचित जोपर्यंत प्रेमात आपण यशस्वी आहोत किंवा कितीही संकटे आली तरी आपल्या मनात प्रेम आहे, आपल्या लोकांबद्दल, जगाबद्दल, अथवा आपल्यालाही भरभरून प्रेम मिळाले असे आपल्याला वाटते आहे, तोपर्यंतच या प्रेमाबद्दलच्या उच्च विचारांना मनात भरपूर जागा असते. 
पण... जर आपल्याला प्रेमभंग, किंवा हवे तसे प्रेम न मिळणे हे अनुभवास येते तेव्हा मात्र विचार बदलतात. ''प्रेमात पडूच नये'', ''प्रेम यशस्वी होणे अवघड असते'', ''कोण्या एकाला प्रेमात सहन करावे लागतेच'', ''प्रेम म्हणजे त्याग'', ''प्रेमात सर्व सोडून द्यावे लागते'', ''प्रेम करायचे तर सुखाची अपेक्षा करायची नाही''.. अशी मते ऐकायला मिळतात. यात जे प्रेम करतात त्यांनी एकमेकांना धोका दिला, विश्वासघात केला.. फक्त असे नाही, तर समाजही प्रेमिकांना जीवन जगू देत नाही, सामाजिक आर्थिक व्यवस्था, जातिभेद यामुळेही प्रेम यशस्वी होत नाही असे ऐतिहासिक काळापासून दिसते. इथे रोमियो ज्युलिएट, हीर रांझा, लैला मजनू, सलीम अनारकली, नल दमयंती, संत मीराबाई.. अशा कथा आपणास ठाऊक आहेतच. त्यातून अगाध प्रेमाचे दाखलेच आपण देतो. इथे प्रेम ही ‘भावना’ न राहता प्रेम म्हणजे ‘श्रद्धा, भक्ती’ असेही आपण मानतो. प्रेम ही अशी अवस्था की जिथे ''मी पण ज्यांचे सहजपणाने गळले हो''  म्हणजे दोन जिवांची एकरूपता असेही वाटते व अनेक कथा - कादंबऱ्या, कविता, गाणी, चित्रपट यातून मांडलेही जाते. 

प्रेम म्हणजे नेमके काय.. हे आपल्याला खरेच समजले असते का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. प्रेमातील होकार आणि नकार म्हणजे नेमके काय, याबद्दल आपले स्वतंत्र मत असते असे नाही. आपण जे वाचतो, पाहतो, ऐकतो त्यावरूनही आपले मत तयार होत जाते. युगानुयुगे प्रेमासंबंधी ज्या कल्पना या जगात अस्तित्वात आहेत त्या नकळत आपल्या बोधावर म्हणजे कॉन्शसवर परिणाम करत असतात. त्याप्रमाणे विचार होतो. 

प्रेमाला विरोध किंवा प्रेमात नकार या बरोबरच अजून काही भावना, कृती अशा आहेत की ज्या निराशा आणि हिंसा याकडे घेऊन जातात. जसे मालकीहक्क (पझेसिव्हनेस) ही भावना. म्हणजे ‘मला जे हवे ते मिळायलाच हवे, मला कसा नकार देऊ शकते कोणी, जर तुझे प्रेम मला मिळाले नाही तर ते दुसऱ्या कोणाला का मिळावे, आणि तू तरी ते का दुसऱ्यावर करावे.. माझी किती तडफड होते, मग समोरच्या माणसाची का होत नाही, माझ्यासारखे आणि माझ्याइतके प्रेम कोणी करूच शकणार नाही..’ या सर्व भावना. यातून एकतर्फी प्रेम व त्याचे परिणाम म्हणजे हत्या किंवा आत्महत्या असेही दिसते. नाहीतर एकदम सर्व जगातून विरक्ती, व्यसनाच्या आहारी जाणे, त्यातून करिअर इत्यादी गोष्टींमधील असफलता म्हणजे ''देवदास''सारखे प्रकारही दिसतात. 

जर प्रेम ही उच्च भावना असते तर मग ती घातकी, आयुष्य वाया घालवणारी, उद्‍ध्वस्त करणारी असू शकेल का? की मग आपल्याला ती नीट न समजल्यामुळे आपण आपले जगणे सांभाळू, हाताळू शकलेलो नाही. जसे प्रेम आपल्याला मिळाले नाही तसेच खऱ्या अर्थाने आपणही दुसऱ्यावर करू शकलेलो नाही, म्हणूनच निराशा आहे, राग आहे, चिडचिड आहे, संशय आहे.. हे असे शांतपणे आज बोलले जाते का? हे आपण स्वतःला विचारू. तसेच हे सर्व टाळून प्रत्येकाला नेहमीच पुढे जाता येईल का हा ही विचार करू. जे आपण टाळू शकणार नाही, त्याचा अभ्यास करणे हा सर्वांत उत्तम मार्ग असतो. आपण या लेखमालेत प्रेमविषयक शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक पैलूंचा अभ्यास करणार आहोत आणि सोप्या भाषेत काही समजून घेणार आहोत. हे फक्त कुमारवयीन मुलांसाठी नव्हे, तर सर्व वयाच्या लोकांसाठी आहे. तरुण वयात मित्रमैत्रिणी, सहकारी तसेच सांसरिक आयुष्यात जेव्हा जोडीदाराबद्दल व त्याखेरीज इतर कोणाबद्दल आकर्षण वाटते, मैत्री करावीशी वाटते किंवा प्रेमभावना निर्माण होते तेव्हा त्या नात्यातून दुःखदायक असे काही निर्माण होऊ न देता त्या नात्याचे व्यवस्थापन जमणेही आवश्यक असते. म्हणूनच प्रत्येकाने समजून घेऊया! 

प्रेमाचे शरीरशास्त्र - अभ्यासाची सुरुवात करायला हवी - ‘शरीररचना, खास करून मेंदूची रचना व मेंदूमध्ये तयार होणाऱ्या ग्रंथी ज्या भावना निर्माण होण्यास कारणीभूत आहेत’ यांच्यापासून. याचा उपयोग होतो भावनांचे व्यवस्थापन करताना. कारण प्रेमभावनेचे नैमित्तिक कारण जरी एखादी व्यक्ती असली तरी ते सारे काही माझ्याच मेंदूत निर्माण होणार आहे व ते अगदी नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे हे समजते. तसेच ते प्रत्यक्ष कृती करण्यायोग्य आहे की नाही हे स्वतःला समजून सांगताना याचा उपयोग होतो. 
प्रेम हे हृदयात जन्म घेत नाही तर ते मेंदूतच जन्माला येते. प्रेम ही एक भावना आहे आणि भावना या आपल्या लिम्बिक सिस्टिम मध्ये तयार होतात. अमिगडाला, हिप्पोकॅम्पस, हायपोथॅलॅमस आणि लिम्बिक कॉर्टेक्स असे या लिम्बिक सिस्टिम चे भाग असतात. हे सर्व भावनांची निर्मिती आणि नियंत्रण तसेच भावनांशी निगडित स्मृती आणि इतर वेदनप्रक्रियांचे व्यवस्थापन हे काम करत असतात. प्रत्येक भावना विविध अवस्थांमध्ये विविध पद्धतीने व्यक्त होते. प्रेम ही तीन अवस्थांमध्ये व्यक्त होते - वासना, आकर्षण आणि मानसिक वैचारिक गुंतवणूक. या प्रत्येक अवस्थेत लिम्बिक सिस्टिम वेगवेगळे हार्मोन्स तयार करत असते. जसे वासना या अवस्थेमध्ये टेस्टेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन हे हार्मोन्स उद्दीपित केले जातात. हे लैंगिक इच्छांना पूरक असे हार्मोन्स आहेत. याचा अर्थ  कोणीही आवडले की लैंगिकते संबंधितच विचार भावना निर्माण होतात असे नाही; पण या प्रेरणांमुळे एका वेगळ्या आनंदाची जाणीव मनात येते. म्हणजे प्रथमदर्शनी एखादा माणूस आवडणे किंवा त्याबद्दल काही तीव्र स्वरूपाचे भाव निर्माण होणे हे या अवस्थेत घडते. या आनंद, उल्हास, उत्साहमिश्रित भावनांचा जोर इतका मोठा असतो की त्या भावना मनात काही काळ टिकणे अगदी स्वाभाविक असते. ती एक प्रकारची ताणाची अवस्थाही असते. हा सकारात्मक ताण असतो. नेहमीच्या, रोजच्या स्थिर अशा जीवन पद्धतीमध्ये अचानक बदल असतो. 

यातूनच माणूस मग पुढच्या अवस्थेत जातो, ती अवस्था म्हणजे आकर्षण! या अवस्थेत सेरोटोनिन नावाचा हार्मोन प्रभावी असतो. हा बहुधा आतड्यांमध्ये साठवला जातो. यामुळे मग त्या माणसाबद्दल माया, त्याच्या काही गोष्टींमध्ये रस उत्पन्न होणे असे जाणवू लागते. जे रोज करतो आहोत त्यामधले लक्ष हलणे, सारखे तेच तेच विचार मनात येणे असे काहीसे होऊ लागते. एकाच वेळी हालचाली मंदावणे व त्याच वेळी मनातून ताजेतवाने वाटणे असे होऊ लागते. मग डोपामाईन नावाचा हार्मोन या सर्व जाणिवांचे आपल्याला काही बक्षीस मिळायला हवे म्हणजेच जो माणूस आवडतो तो भेटायला हवा, त्याच्याशी बोलायला हवे, त्याला स्पर्श करता यायला हवा व या सगळ्यातून आनंद मिळायला हवा.. असे फिलिंग निर्माण करतो. 

प्रेमाची तिसरी अवस्था म्हणजे मानसिक, भावनिक गुंतवणूक. जी एक नाते निर्माण करण्याकडे, ते टिकवण्याकडे माणसाला नेते. या अवस्थेत ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन प्रभावी असतो. शारीरिक संबंध व त्यातून मिळणाऱ्या सुखासाठीही हाच हार्मोन कारणीभूत असतो. परंतु या अवस्थेत मन आणि विचार यांचाही प्रभाव जाणवायला लागतो. त्यामुळे प्रेम करणे, प्रेम मिळणे अशा जाणिवेतून मनाला शांतता मिळते, सुरक्षित वाटते आणि आपल्याच स्वतःशी आपली एकरूपता वाढते. आपल्या जोडीदाराबद्दल प्रेम, जबाबदारी, तसेच नात्यांमधला अतूट बंध हे ही सर्व जाणवते. एकमेकांची काळजी घेणे, एकमेकांवर प्रभाव असणे याही गोष्टी अनुभवास येतात. 

इतके सर्व छान छान असताना मग दुःख कुठे निर्माण होते? तर होते असे की या हार्मोन्समुळे भावनिर्मिती होऊन जेव्हा कायम असेच घडावे, अशा सुंदर भावनांचे बक्षीस आपल्याला मिळावे व जे याला कारणीभूत आहेत ते लोक कायम भेटावे, सहवास लाभावा अशा इच्छा आणि अपेक्षा निर्माण होतात. तेव्हा आनंदनिर्मितीची क्रिया या सर्व गोष्टींवर जेव्हा अवलंबून राहायला लागते.. म्हणजेच या सुखद भावनांचे एकप्रकारे व्यसन लागते व ते तसे अनुभवास न येणे हे विचारांमध्ये, भावनांमध्ये बिघाड निर्माण करते. कारण असे न मिळणे हे अनपेक्षित असते. पूर्वी आलेले सुखद अनुभव स्मृतींमध्ये असतात आणि मग ते पुन्हा मिळाले नाही या वेदना त्या स्मृती, आठवणी सतत जागृत करून देतात. इथे भावना निर्माण होते नकार मिळाल्याची आणि कोणी आपल्याला झिडकारल्याची. त्यातून बाहेर पडणे खूप महत्त्वाचे असते. 

जरी हे हार्मोन्स प्रत्येकात निर्माण होत असले आणि जे दोघे एकमेकांना आवडतात त्या दोघांवरही या हार्मोन्सचा परिणाम होत असला तरी.. जसा प्रत्येक माणूस वेगळा तसाच इथेही हार्मोन्स सारखे असले तरी त्यांचा परिणाम प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार कमी अधिक आणि वेगळा! हा फरक समजून घेणे थोडे कौशल्याचे काम आहे. त्यासाठी वैचारिक परिपक्वता ही महत्त्वाची. ज्यांना या वेदना हाताळता येत नाहीत ते मात्र सुरुवातीला म्हटले त्याप्रमाणे दुखावल्या अवस्थेत राहून त्याचा स्वतःच्या आयुष्यावर परिणाम करून घेतात. हे व्यवस्थापन उत्तम कसे जमवायचे ते आपण पुढच्या लेखात पाहू.

संबंधित बातम्या