प्रेमभंग कशामुळे? 

डॉ. पल्लवी मोहाडीकर कासंडे 
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

मनतरंग
मन... डोळ्यांना न दिसणारं, पण तरीही रोजचं जगणं प्रभावित करणारं... त्याची रूपंही अनेक... अशा या मानवी मनाचा वेगळ्या नजरेतून वेध.
डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 

लेखांक २ 

मागच्या लेखात आपण प्रेमभावनेचे शरीरशास्त्र थोडक्यात अभ्यासले. प्रेम, आनंद, आणि सुख यासाठी जे हार्मोन्स कारणीभूत असतात यांच्याबद्दलही माहिती घेतली. आज आपण चर्चा करूया प्रेमभंग या घटनेची. कारण यातून निराशावादी भावना आणि विचार निर्माण होत राहतात. तरुणपणी हा दुःखद अनुभव आला असला तरी नंतरही सर्व दुःखाचे मूळ हे ''प्रेम प्रकरण'' असेच वाटत राहते; किंबहुना समेवर येतो त्याप्रमाणे थोड्या थोड्या काळाने या प्रेमभंगाच्या दुःखावर माणूस येतो. 

प्रेम करणे आणि प्रेमात पडणे या दोन गोष्टींतही फरक आहे. प्रेमात पडणे आपण मागच्या लेखात पहिले. प्रेम करणे म्हणजे प्रेमावस्थेची तिसरी पातळी.. मानसिक गुंतवणूक, त्या माणसाबद्दलची काळजी, त्याबद्दल माया ममता वाटणे वगैरे ओलांडून एका नात्यात प्रवेश करणे. जिथे जबाबदारीही आहे. मग ते कुमारवय, तरुणपण असो किंवा मध्यमवय. यामुळे हे नाते काही कारणामुळे तुटणे हे दुःखदायक असते. 

एका इंग्रजी चित्रपटातील एक दृश्‍य इथे आठवते. त्यातल्या प्रेमभंग झालेल्या मुलाची बहीण त्याला होणारा त्रास, त्याची चिडचिड पाहून त्याला समजून सांगताना म्हणते, की हे बघ हा सगळा हार्मोन्सचा खेळ आहे. आता ती तुला भेटत नाही, तुम्ही नीट बोलत नाही म्हणून जे ऑक्सिटोसिन तुला हवे आहे प्रेम जाणवण्यासाठी - ते तुला मिळत नाही, म्हणून तू ताणाखाली आहेस. त्याचमुळे तुला वास्तव काय आहे ते समजत नाही आणि वास्तव हे आहे की... कधी आपले कोणाशी जमते, तर कधी जमत नाही.. जमले तर ठीकच, पण जमले नाही तर मूव्ह ऑन!'' 

अगदी मूलभूत, शारीरिक पातळीवर असेच होत असते. सुंदर, शृंगारिक असलेल्या नात्यातील संवाद, भेटीगाठी, जरी प्रत्यक्ष भेट झाली नाही तरी ''कोणीतरी आहे आपले'' अशा जाणिवेतून निर्माण झालेली एक प्रकारची सुरक्षितता हे कोणत्याही वयात माणूस अनुभवतोच. तिथून तर सर्व अपेक्षा निर्मिती, भविष्याचे नियोजन या गोष्टीला सुरुवात होते. माझे माझे म्हणता म्हणता आमचे, आपले हे भाव मनात जागृत होतात. मग काहीही अडचणी आल्या तरी शेवटपर्यंत निभावून नेणे याला वैचारिक बैठक लागते. कारण जे शेवटपर्यंत निभावून नेतात ते फक्त या ऑक्सिटोसिन किंवा डोपामाईनच्या आधारे नव्हे. सुरुवात जरी ती असली तरी ते दोन प्रेमी जीव विचारांनी सावरलेले असतात. त्या नात्यासाठी स्वतःला जबाबदारीपूर्वक बदलले असते. म्हणून मग जेव्हा अचानक उभी केलेली ही सर्व मानसिक यंत्रणा कोसळते तेव्हा तो जोरदार धक्का असतो. 

गंमत म्हणजे कोणी असे प्रेमाचे भेटेपर्यंत आपले भावविश्व अगदी निराळे असते. म्हणजे कोणी आपल्याशी काही वागो, काही बोलो, तात्कालिक राग, आपुलकी या भावनांवर आपण रोजचे जगणे उत्तम, मनस्वीपणे जगत असतो. परंतु आपल्याच मनात या प्रेमभावना निर्माण झाल्या तरी त्या क्षणानंतर आपले भावविश्व बदलून जाते. त्याचा जोर किंवा तीव्रता जास्त असेल तर बाकी अनेक गोष्टी (घर, करिअर, आपली तब्येत) त्यासमोर कमी महत्त्वाच्या वाटू लागतात. 

इथे प्रथमच हे मान्य करायला हवे, की प्रेमात यश येणार की अपयश हे - ते आपल्या मनात किती तीव्रतेच्या भावना निर्माण झाल्या आहेत त्यावरून ठरते. मग त्याला प्रतिसाद कसा मिळतो किंवा मिळत नाही हे जरी तात्कालिक कारण असले तरी आपले गुंतलेले मन हेच जास्त कारणीभूत असते. म्हणूनच जमले तर ठीक, नाहीतरी ठीक.. मूव्ह ऑन; हे म्हणणे सोपे पण याला वैचारिक व मानसिक कष्ट घ्यावे लागतात. 

आपण एरवी चित्रपटांतही बघतो आणि आपल्या मित्रमंडळीतही असे लोक असतात, ज्यांना आपण ''फ्लर्ट'' म्हणतो. त्यांना एकत्र नात्याची जबाबदारी नको असते किंवा खरंच ते कोण्या एकात गुंतूच शकत नाहीत. ते अनेक छोट्या छोट्या दृक श्राव्य उद्दीपकांमुळे पटकन त्या माणसाकडे ओढले जातात आणि कालांतराने ती तीव्रता नाहीशी झाली की त्यातून बाहेर पडतात. त्यांना वाटत नसते की ते असे कोणाला दुखावणारे वागत आहेत. त्यांच्या नकळत तात्कालिक गरजाही तशाच बनल्या असतात. त्यामुळेच हे लोक कशालाही भुलतात. यात जगण्याची मूल्य समजलेली असतात किंवा नसतात, पण एक सुदृढ नाते समजावे इतकी विचारांची खोली त्यांना प्राप्त झाली आहे असे दिसत नाही. 

अर्थात फक्त फ्लर्ट लोकांमुळेच प्रेमभंग होतो असे नाही. प्रेमात ''ब्रेक अप''च्या अनेक परिस्थिती असतात. आधी प्रेम वाटले पण ते दीर्घकाळ टिकणार नाही असे वाटून ''ब्रेकअप'' झाला किंवा ठरवून केला असे असू शकते किंवा घरातून विरोध झाल्याने एखादा/एखादी त्या नात्यासाठी (म्हणजे लग्नासाठी) निर्णय घेऊ शकली नसेल म्हणून प्रेमभंगाची जाणीव झालेली असू शकते. कोणत्याही परिस्थितीत हा ब्रेकअप मनस्ताप देणारा असतो. यावेळी हार्मोनल असमतोलच जणू निर्माण होतो आणि जणू एरवी सृजनशील विचार कारणारा मेंदूच बंद पडला आहे असे वाटावे अशीही अवस्था होते. 

काय बरे करावे अशा परिस्थितीत? त्या व्यक्तीने काय करावे या आधी, या लेखात.. आजूबाजूच्या लोकांनी काय करावे हे पाहू कारण या वेळी खरी गरज असते मानसिक आणि वैचारिक आधाराची न की उपदेश किंवा कानउघाडणी करण्याची! म्हणून प्रथम, कुमारवयीन आणि तरुण मुलांचा विचार करूया. कारण आज शाळेत असल्यापासूनच मुले या भावनांच्या प्रभावाखाली आहेत. याची कारणे बरीच आहेत परंतु त्या कारणांत न अडकता, ज्यांना समजते आहे त्यांनी मुलांसाठी ही जबाबदारी घ्यायला हवी. 

म्हणून, कोणतेही मूल या प्रेमभंगातून जात असेल तर पालक, शिक्षक, भावंडं किंवा कोणी नातेवाईक, मित्र, मार्गदर्शक अशा भूमिकांतून त्यांना खात्री देऊया की आपण त्यांच्या बरोबर आहोत. हे स्वीकारूया की प्रेमात पडणे ही कमी महत्त्वाची, दुर्लक्ष करण्याची गोष्ट नाही. ती त्याक्षणी त्या व्यक्तीसाठी अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे. शहाणपणाच्या गोष्टी इथे सांगून लगेच मुलांमध्ये बदल होणार नाही. त्यावेळी नकारात्मक विचार केला जाणार आहे. त्या मुलांचे लक्ष रोजच्या जगण्यातून थोडे हलणार आहे. एरवी उत्साही, सृजनशील असणारे हे मूल दिङ्‍ग्मूढ दिसेल. बाकी सर्वांतून रस संपून जाईल, चिडचिड होईल. इथे, तुझ्या वागण्याचा आम्हाला धक्का बसला आहे असे न म्हणता होते असे या वयात पण तू माझ्याशी संवाद साधत राहा, मला चालेल तू काहीही बोललेले मला त्याचा त्रास होणार नाही. आपण चर्चा करून यातून बाहेर पडूया असे आश्वासक बोलणे इथे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

एकतर जे या अनुभवातून जात असतात ते सर्वच मोकळेपणाने बोलतीलच असे सांगता येत नाही. जे वाटत असते ते शब्दांतून व्यक्त करता येतेच असे नाही. शिवाय ते वास्तवाला धरून असतेच असे नाही, बहुतेक सर्व काल्पनिक असते. त्यामुळे ते व्यक्त केलेच तर ते समजून घेतले जाईल अशी खात्री वाटत नाही. वरकरणी सर्व मॅनेज केले असे मुले दाखवतात मनातून मात्र अनेक मुले दुःखीच राहतात. आपल्या घरांमधून आजही अजूनही आपल्या मुलांचे अपयशी प्रेम याबद्दल फार आस्था आहे असे दिसत नाही. यामुळे एकटेपणाची भावना दृढ होत जाते. अनेक वेळा ‘काय थेरं लावलीत’ असे म्हणून मुलांना रागावले जाते. त्यांचा अपमान केला जातो. पण थोडा विचार करूया की या तरुण वयात ठरवून, नियोजन करून प्रेमभावना निर्माण होत नाहीत. कोणी मुद्दाम आयुष्य उद्‍ध्वस्त करायचेच आहे असे ठरवून प्रेमात पडत नाही. म्हणूनच त्यांची ही अवस्था समजूतदारपणेच सांभाळावी लागते. काही वेळा घरातून दुर्लक्ष झाले, आवश्यक प्रेम मिळाले नाही तर जे मित्रमंडळी आपल्याशी आपलेपणाने बोलतात त्यांच्याकडे मुलं ओढली जातात. त्यातून पुन्हा त्यांना समजून घेतले गेले नाही तर ‘हा प्रियकर किंवा प्रेयसीच आपली आणि आता कोणी नाही आपले’ अशी समजूत व्हायला वेळ लागत नाही. या अशावेळी पालकांनीच सामंजस्य दाखवायला हवे. त्यांच्याशी संवाद साधून धीराने, शांतपणे त्यांच्या मनातल्या या संकल्पना स्वीकारून त्यावर त्यांना योग्य ती उत्तरे शोधण्यास मदत करायला हवी. वर उदाहरण दिलेल्या चित्रपटात जसे बहीण त्याला जो धक्का बसला आहे त्याचे जणू शास्त्रीय कारण समजून सांगत आहे तसे बोलणे आश्वासक वाटू शकते. हे प्रेम म्हणजेच सर्व आयुष्य नाही, तसेच हे दुःख आयुष्यभर वाटून घ्यायलाच हवे असेही नाही. जे घडले आहे ते नाही विसरता येणार हे स्वाभाविक आहे, पण यातून निर्माण होणाऱ्या निराशेला वाट काढून देणे शक्य आहे असे सांगावे. अशावेळी एखादी कला जोपासणे, छंद जोपासणे, खेळणे हे खूप महत्त्वाची साथ करते. नकारात्मक विचारातून जी ऊर्जा निर्माण झाली असते ती कलेच्या अभिव्यक्तीमधून, एखादा खेळ खेळून बाहेर पडते. काही काळ का होईना माणूस हातून काही घडवण्याकडे लक्ष केंद्रित करतो. मग त्यामध्ये जसजसे काही यश मिळेल तसा आत्मविश्वास भरून येतो. मुलांना साथ द्यायची, समजून घ्यायचे म्हणजे त्यांना मनमानी करू द्यायचे असे नाही. त्यांचा हात घट्ट पकडून त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढायचे. न कंटाळता त्यांना सांगत राहायचे. या प्रेमभावनांचा पगडा खूप मोठा असतो. त्यातून बाहेर पडायला वेळ लागतो. 

वर म्हटल्याप्रमाणे फार लवकर वयात आज मुले या प्रेमभावनेच्या जाळ्यात अडकली जात आहेत. अभ्यासाकडे दुर्लक्ष, मोबाईलवर बोलणे तासनतास असे दिसते. प्रेमभंगाइतकेच लवकर वयातील मुलांचे प्रेमप्रकरण हा चिंतेचा विषय आहे. याविषयी पुढील लेखात मनन करूया. आणि त्यानंतर सज्ञान व्यक्तींनी विचारपूर्वक हे व्यवस्थापन कसे साधायचे हा विचार करू.

संबंधित बातम्या