गुपित मन रमण्याचं 

पल्लवी मोहाडीकर
सोमवार, 21 डिसेंबर 2020

मनतरंग
मन... डोळ्यांना न दिसणारं, पण तरीही रोजचं जगणं प्रभावित करणारं... त्याची रूपंही अनेक... अशा या मानवी मनाचा वेगळ्या नजरेतून वेध.
डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 

मनतरंग या मालिकेतून आत्तापर्यंत आपण अनेक गोष्टींवर खूप मनन केलं. जगताना आपल्या वाट्याला आलेले अनुभव, त्यातून घडत जाणाऱ्या आपल्या विविध मनोभूमिका, त्यामागचे शास्त्र, आपली ध्येयं व त्यासाठी होणारे आपले प्रयत्न, आपली धडपड.. मग त्यातून मिळणारे यश तर कधी अपयश, येणारी निराशा, होणारा आनंद, तसेच तत्त्वज्ञानातील काही त्रास देणाऱ्या, नकारात्मक संज्ञा ज्या आपण रोज जगत असतो .. अशा अनेक छोट्या बाबींवर आपण चिंतन करत होतो. असंख्य त्रासदायक विचारांचा जणू होम आपण केला आणि त्यातून सकारात्मकतेचं पायस आपण आपल्याला कसं द्यायचं हेच प्रत्येक लेखाच्या शेवटी पाहत आलो. अशाच रोजच्या जगण्यातल्या दोन गोष्टी पण अत्यंत महत्त्वाच्या या आणि पुढच्या लेखात मांडत आहे आणि ही मालिका इथे संपवत आहे. 

आज मनन करतोय आपण मन रमणे या विषयावर. हा विषय दिसायला साधा पण आजच्या काळात अगदी महत्त्वाचा झाला आहे. या कोरोनाच्या काळात आपण अनेक आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक प्रश्नांचा सामना केला. त्यामध्ये कुठेच बाहेर जाता येत नाही, मनासारखे हिंडता येत नाही म्हणून घरी हळू हळू आता करमत नाही, मन आता रमत नाही ही सुद्धा एक महत्त्वाची तक्रार होती. खास करून लहान मुले आणि वरिष्ठ मंडळी. यांची काळजी घ्यायची म्हणून यांना थोडे घरात अडकून ठेवल्यासारखे झाले. 

मन रमत नाही हा प्रश्न फक्त कोरोना मुळेच निर्माण झाला आहे असं नाही. एरवी सुद्धा अनेकांना भेडसावणारा हा प्रश्न आहे. का बरं असं वाटत असावं? आपलं जगणं आपण केलेल्या नियोजनाप्रमाणे किंवा मनात असलेल्या ''जगणे'' या संकल्पनेच्या आडाख्यांप्रमाणे असो किंवा नसो पण, जे आपण रोजचे आयुष्य जगत आहोत, स्वतःला अनेक परिस्थितीतून पुढे नेत आहोत त्यात मन रमते आहे का हा प्रश्न प्रत्येकासाठी नेहमीच महत्त्वाचा आहे. आपण प्रत्येकाने एक साधा प्रश्न स्वतःला विचारूया, रोजचे जगणे जाऊ दे जे काम आपण रोज करत आहोत त्यात मन रमते का? जर रमत असेल तर उत्तमच पण जर रमत नसेल तर मग कशात रमेल असे वाटते? आणि ज्यात मन रमते त्या गोष्टींपासून आपण किती दूर आहोत, का दूर आहोत, काय केले म्हणजे ती गोष्ट आपल्या रोजच्या जगण्यात येईल? याचे उत्तर साधे आहे असे वाटेल की जर काम मनासारखे असेल तर मन रमेल आणि जर जबरदस्तीने, इच्छा नसताना काम  करायला लागत असेल तर नाही रमणार. पण याच्या पलीकडे... माझं मन कशातही रमतं असे म्हणणारी आणि सतत कार्यशील असणारी माणसे असतात. मग  
प्रश्न असा पडतो की त्यांच्या आवडीनिवडी नसतात का? त्यांना सर्वच कामे आवडतात का? आणि जेव्हा कोणी म्हणत असेल की आजकाल माझं मन कशातच रमत नाही... तेव्हा नेमके काय होत असेल. 
प्रथम हे समजून घेऊया की ‘मन रमणे’ हा विषय फक्त आवडीनिवडींशी निगडित नाही. मन रमण्याचा संबंध मनाच्या प्रगतीशीही संबंधित आहे. काही लहान मुले पाहतो आपण की त्यांना स्वतःला कसे रमवायचे हे माहीत असते. त्यांना काहीही पुरते. नुसते झोक्यात बसून स्वतःशी बडबडत राहतात. काही मनात विचार करत राहतात. कधी चित्र काढतील, कागद कापून त्याच्या वस्तू करत बसतील, दुसऱ्यांच्या घरी गेलो तरी नुसते इकडे तिकडे निरीक्षण करतील, काही प्रश्न विचारतील.. याच्या उलट आज अनेक आई वडिलांची तक्रार अशी असते की फार लवकर आमची मुले कंटाळतात. त्यांना बोअर होतं. म्हणून मग मोबाईल खेळत बसतात. हे लहान मुलांच्या बाबतीत कशाला अनेक कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलांमध्येही दिसते. कोणाकडे जायला आवडत नाही, कोणाशी बोलायला आवडत नाही, लवकर कंटाळा येतो, आपल्या आपल्या खोलीत लॅपटॉप किंवा मोबाईल मध्ये गर्क असतात. घरी बोअर होतं म्हणून मग सतत टाइमपास करत हिंडत राहतात. अनेकदा स्वतःच्या हाताने काही करणे, तोडणे-मोडणे-घडवणे याची सवयच त्यांना नसते. यामुळेही मोबाईलचे व्यसन लागते. 
मोबाईलवरचे गेम्स डोळ्यांना सुखावणारे रंग, ॲक्शन सतत दाखवतात त्यामुळे त्यातून निर्माण होणाऱ्या आनंदलहरींवर कोणीही तासनतास तरंगत राहतो.  टीव्ही वरील मालिका बघणाऱ्यांचेही हेच होते. समोरचे भासमय जग हेच खरे वाटू लागते. त्याची सवय जडते आणि त्यातच मन गुंतून जातं. मन रमतं पण हे मनाचे रंजन नाही. यात मनाचा विकास नाही. ही फक्त करमणूक असते. या करमणुकीत वेळ जातो पण वेळेचा उपयोग स्वतःसाठी होतोच असं नाही.  
याचा अर्थ असा की मनाचे रमणे हे एकप्रकारे मनाचे रंजन आहे. त्यात आपल्या मधल्या कौशल्यांची, क्षमतांची जाणीव होऊन ‘स्व’च्या विकासाकडे जाण्याचा मार्ग आहे. लहान असो किंवा मोठे असो वर म्हटल्याप्रमाणे जे मनरंजनामध्ये मग्न असतात ते नेहमी कार्यशील असतात, त्यांचे मन सहज रमते. पण हा वर्कोहोलिझम नाही बरंका. त्यात आवडीनिवडींपेक्षा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने व्यक्त होण्याची इच्छा किंवा तयारी आहे. काही बोलणे म्हणजेच व्यक्त होणे असे नाही तर काही करून दाखवणे म्हणजे ही व्यक्त होणे. या कार्यशीलतेमध्ये सर्जनाचे अंश आणि उद्योगशीलता हे गुणही सापडतात. माझी एक मैत्रीण कलाकुसरीच्या वस्तू सतत बनवत असते. तिला भन्नाट काही सुचतच असते. बॅगा बनवणे, तोरणे, आकाशकंदील, पणत्या, भरतकाम, गोधड्या असे खूप काही ती करत असते. अगदी आनंदाने ती सर्व करत असते. त्याचा छोटा व्यापारही ती करते. यातून फक्त ‘स्व’चा विकास इतकेच नव्हे तर सामाजिक कौशल्यही वाढीस लागतात. नवीन, परक्या माणसांशी बोलणे, त्यांच्याशी व्यवहार करणे हे शिकणे आपोआप होते. मग आपलेच मानसिक व सामाजिक नेटवर्क वाढत राहते. त्यातून आणखी नव्या नव्या गोष्टींचा परिचय होत राहतो. 
मन रमते याचा अजून एक अर्थ आहे. रमणे म्हणजे जे आपण करत आहोत, जो समोरचा क्षण आहे, जे जगणं आहे त्याकाळातलं, ते अर्थपूर्ण वाटणे.  एक नेहमी दिसणारे उदाहरण घेऊ. परदेशातील मुलांकडे अनेक वेळा त्यांचे आई वडील ‘रमत’ नाहीत. सुंदर घरं असतात. स्वच्छ रस्ते, हिंडायला, पाहायला खूप काही .. पण त्यांना अर्थपूर्ण वाटेल असे काम तिथे नसते. मुलीचे, सुनेचे बाळंतपण करायला गेलेली आई, किंवा सासू, मदतीची गरज संपली की परत येते. आणि इथे ती रोज डबा करण्याचा छोटा उद्योग का करत असेना पण त्यात रमते. कारण त्यात तिचे कौशल्य पूर्णपणे वापरले जात असते, लोक आपल्या हातचे जेवून जातात, गरजूना मी मदत करते असं जे मनात फिलिंग असतं ते सुखसोयीयुक्त घरात राहण्यापेक्षा जास्त त्या माउलीला अर्थपूर्ण वाटतं. 
या अर्थपूर्णतेचं अजून एक उदाहरण. एका सोसायटी मधील एक आजोबा निवृत्त झाल्यानंतर सर्व सोसायटी मधील लोकांची छोटी छोटी कामे करून देतात. म्हणजे प्लम्बरला फोन करण्यापासून ते घरात नसलेल्यांचं कुरिअर घेणे व नंतर नेऊन देणे इथपर्यंत. हे सर्व ते हौसेने करतात. एक अशाच एकट्या राहणाऱ्या आजी घरातली कामे दिवसभर पुरवतात. पटापट सर्व उरकून टाकत नाहीत. मध्येच कोणाला फोन करतील, बाहेर जाऊन येतील, शब्दकोडी सोडवतील, वाचन करतील आणि घरातली कामे करतील. विविध अशा कामांनी त्यांचा दिवस भरलेला असतो पण त्यामुळे त्या नेहमीच फ्रेश दिसतात.
जे नवरा बायको मुलांबरोबर राहत नाहीत आणि कोणी एकाचे निधन झाले अशी परिस्थिती असेल तरी जे कोणी मागे उरलं आहे ते केवळ आपली काळजी चिंता मुलांना वाटून नये म्हणून काही दिवस मुलांबरोबर राहतात. पण काही दिवसांनी काही बिघडत नाही, आपल्या घरी जावं असं वाटतं. कारण अनेक वर्ष जिथे राहिलो तिथे त्यांच्या दृष्टीने त्याचं ‘काम’ असतं. तिथे जास्त सुचतं असंही हे लोक म्हणतात. त्यातही जर एकटं राहू देत नसतील तर काहीतरी ‘काम’ शोधतात आणि मग मन रमवून घेतात. 
एक पुस्तक मध्ये वाचनात आले. त्याचे नाव ‘डाय एम्प्टी.’ त्याचे सार असे की मनातले सर्व करून पहा. जे काही चांगले आहे, करण्यासारखे आहे ते करा. मरताना मोकळ्या मनाने मृत्यूला सामोरे जा, मन रिकामे करून जा. काही करायचे राहून गेले असे व्हायला नको. याचा दुसरा अर्थ असाही की आपल्या मनात अनेक विचार आणि कल्पना घोळत असतात. पण आपण सगळ्यांवर विचार करतोच असे नाही, किंवा सगळ्या गोष्टी करून पाहतोच असे नाही. पण जर प्रत्येकाने  तसे ठरवले तर जगातील क्रियाशीलता किती वाढेल. त्यामुळे आयुष्य किती मिळाले आहे ते माहीत नाही पण जर आज पासून मनात येणाऱ्या प्रत्येक कल्पना आणि विचार यावर काही कृती करायची ठरवली तर कितीतरी उद्योग वाढतील आणि कितीतरी व्यापार वाढेल. 
म्हणजेच मंडळी मन रमण्याचे गुपित आपल्याच मनात आहे. मनाने त्याचे पंख पसरून नवी क्षितिजे, नवे परीघ शोधायचे आहेत. यासाठी लहानपणापासून सवय लागायला हवी. आता या वयात काय होईल, असे काही नाही. जेव्हा जाणवेल त्या वयापासून सुरुवात करावी. आवडीचे काम कधी मिळेल असा विचार करत बसण्यापेक्षा जे काम समोर आहे त्यातही आपली प्रगती शोधणे, त्यातही सर्जनशील राहणे यात मनाचे रंजन तर आहेच पण तीच आनंदाची एक गुरुकिल्ली आहे. याविषयी पुढच्या शेवटच्या लेखात विचार करू

संबंधित बातम्या