‘माझी भूमिका आवडली, याचा आनंद मोठा’

संतोष भिंगार्डे
मंगळवार, 5 जानेवारी 2021

मुलाखत
 

शेअर दलाल हर्षद मेहताची कहाणी एक संपूर्ण पिढी अजून विसरलेली नाही. हर्षद मेहता प्रकरणानंतर भारतातल्या शेअर बाजार आणि त्यासंबंधीच्या प्रक्रियांमध्ये अनेक बदल झाले. हर्षद मेहताची ही कहाणी प्रेक्षकांसमोर आणणारी ‘स्कॅम १९९२ - द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरीज आयएमडीबी या वेबसाइटने केलेल्या एका पाहणीत सन २०२० मधील भारतातील सगळ्यात लोकप्रिय वेबसीरीज ठरली. सोनी लिव वरील अप्लॉज एंटरटेन्मेंटच्या हन्सल मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या या वेबसीरीजमध्ये गुजराती, हिंदी, इंग्रजी रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप उमटविलेल्या प्रतीक गांधी या अभिनेत्याने ‘बिग बुल़’ हर्षद मेहताची व्यक्तिरेखा साकारली आहे. या भूमिकेसाठी प्रतीकने दिग्दर्शक आणि अन्य सहकलाकारांबरोबर प्रचंड कष्ट घेतल्याचे ही सीरीज पाहताना सतत जाणवत राहते. या बेवसीरीजच्या अनुभवाबद्दल आणि आपल्या एकूणच प्रवासाबद्दल प्रतीकच्याच शब्दांत...

 अभिनयाच्या क्षेत्रात तू कसा काय आलास...आवड पहिल्यापासून होती की अचानक आवड मनात निर्माण झाली?
?:  मला स्टेजवर जायला नेहमीच आवडायचे. लहान असताना मी वक्तृत्व तसेच डान्स वगैरे स्पर्धांत भाग घ्यायचो. सुरतला चौथी इयत्तेत शिकत असल्यापासूनच मला नाटकांची आवड लागली. शाळेत शिकत असताना टीचर मंडळी एखाद्या लेखाचे नाट्यरूपांतर करा असे सांगायचे आणि मी ते लगेच करायचो. शाळा-कॉलेजात असताना गॅदरिंगमध्येही भाग घेतला होता. अभिनयाची आवड तेव्हापासूनच होती. थोडक्यात सांगायचे तर मी थिएटर लहानपणापासूनच करीत आलो आहे.

 व्यावसायिक नाटकांमध्ये पहिला ब्रेक कधी मिळाला...
?:  इंजिनिअरिंगची पदवी घेऊन मी २००४ मध्ये मुंबईत आलो. येथे आल्यानंतर इंजिनिअर म्हणून कामही करू लागलो. एकीकडे काम आणि दुसरीकडे थिएटर, टीव्हीवर कुठे अभिनयाची संधी मिळते का याचा शोध सुरू केला. काही मालिकांसाठी तसेच चित्रपट आणि नाटकांसाठी ऑडिशन्स दिल्या. ऑडिशन्स देत असतानाच मला माझे पहिले व्यावसायिक नाटक मिळाले. ते नाटक गुजराती होते आणि ते साल होते २००५. लहानपणापासूनच रंगभूमीची ओळख असल्याने व्यावसायिक नाटकात काम करणे मला तसे काही अवघड गेले नाही किंवा अडखळल्यासारखे वाटले नाही. मग नाटक आणि माझे काम असा दुहेरी प्रवास सुरू झाला.

 रंगभूमीवर काम करीत असताना चित्रपटांकडे कसा वळलास...
?:  सन २०१२ मध्ये मला पहिला चित्रपट मिळाला. तो गुजराती चित्रपट होता. त्यामध्ये काम केल्यानंतर माझा चित्रपटातील प्रवास सुरू झाला. चित्रपटात काम करायचे म्हणजे कॅमेऱ्याला सामोरे जायचे. खरे तर काही जण पहिल्यांदा काहीसे घाबरतात किंवा नको तेवढे टेन्शन घेतात. पण मला असे काहीही कधीच वाटलेले नाही, कारण त्या पहिल्या चित्रपटाच्या आधीही मी छोट्या छोट्या भूमिकांसाठी कॅमेऱ्याला सामोरा गेलो होतो. कधी एखादी मालिका किंवा जाहिरात करीत असताना कॅमेऱ्याचा सामना केला होता. त्यामुळे चित्रपटात अभिनय करणे मला काही अवघड वाटलेले नाही. पण कॅमेऱ्याची दुनिया वेगळी असते. त्याचे टेक्निक निराळे असते, हे मला चित्रपटात काम केल्यानंतर अधिक जाणवले. कॅमेऱ्याच्या अनेक तांत्रिक बाजू मला तेथे शिकता आल्या. पहिल्याच चित्रपटात या गोष्टी शिकल्यामुळे पुढील कामासाठी मला त्या उपयोगी पडल्या. कारण हे क्षेत्रच असे आहे की येथे नवनवीन गोष्टी सतत येत असतात आणि आपण त्या शिकत असतो. आजही मी अनेक गोष्टी शिकत आहे. कारण मला विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहणे नेहमीच आवडते. आतापर्यंत मी गुजरातीत दहा एक चित्रपट केले आहेत आणि हिंदी तीन चित्रपट केले आहेत. ‘मित्रो’, ‘लवरात्री’ आणि तिसरी फिल्म ‘रावण लीला’. यातील ‘रावण लीला’ ही फिल्म प्रदर्शित झाली नाहीये. ती लवकरच प्रदर्शित होईल, अशी आशा आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण ‘स्कॅम १९९२’ ही माझी वेबसीरीज येण्यापूर्वी पूर्ण झाले आहे.  

 ‘स्कॅम १९९२’ तुला कशी काय मिळाली...
?:  माझे गुजराती दोन चित्रपट हन्सल मेहता यांनी पाहिले होते. त्यातील ‘व्हॉट्स रॉंग राजू’ या गुजराती चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. त्यातील काम पाहून मला ही भूमिका मिळाली. या भूमिकेकरिता मला ऑडिशन द्यावी लागली. दोन वेळा माझी ऑडिशन घेण्यात आली. पण नंतर लूक टेस्ट खूप वेळा झाली. मी वजन वाढविले होते. त्यासाठी मला आठ ते नऊ महिने लागले होते. या कालावधीत आठेक वेळा तरी माझी लूक टेस्ट घेण्यात आली. प्रत्येक वेळी वेगळी हेअर स्टाइल आणि वेगळा कॉस्च्युम घालून लूक टेस्ट व्हायची. ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात केली. हे चित्रीकरण मी खूप एन्जॉय केले.

 हर्षद मेहताची भूमिका ऑफर झाली तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती...आणि या भूमिकेकरिता तू काय तयारी केलीस...
?:  ह्या भूमिकेची ऑफर मिळाली तेव्हा मला खूप आनंद झाला होता. कारण अशा प्रकारच्या जटिल आणि कठीण भूमिका साकारायला मला नेहमीच आवडतात आणि ही भूमिका साकारायला मिळतेय याचा आनंद नक्की होता. तयारीबद्दल सांगायचे तर आधी म्हणालो तसे मला वजन खूप वाढवावे लागले. त्या काळात मी साधारणतः अठरा किलो वजन वाढवावे लागले होते. त्याकरिता खाण्यावर चांगलाच ताव मारावा लागला. मिठाई खूप खाल्ली. कारण ती भूमिकेची गरज होती. तसेच काही व्हिडिओ पाहिले. शेअर बाजारात गेलो. शेअर ब्रोकर्सना जाऊन भेटलो. त्यांच्याकडून खूप माहिती घेतली. एक व्यक्ती म्हणून हर्षद मेहता कसा होता...त्याची विचार करण्याची पद्धत कशी होती. समाजाकडे आणि माणसा-माणसांकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा होता वगैरे बाबी जाणून घेतल्या आणि ही भूमिका साकारली.

 हर्षद मेहताच्या भूमिकेसाठी काही विशिष्ट शैली वापरावी लागली का, विशेषतः संवादांसाठी वगैरे?
?:  हो. हर्षद मेहताविषयी जाणून घेत असताना मी त्याच्या स्वभावाचा अभ्यास केला. त्याचा स्वभाव खूप बिनधास्त आणि धाडसी होता. कोणतेही काम तो रिस्क घेऊनच करात असे. त्याच्या या स्वभावाचा मला खूप बारकाईने अभ्यास करावा लागला. ही सीरीज पाहिल्यानंतर तुम्हाला त्याची प्रचिती आली असेलच. तो कॉन्फिडन्स आणि तशी विचारशैली दाखवण्यासाठी नक्कीच मला थोडा भाषेचा आणि देहबोलीचा अभ्यास करावा लागला.

 दिग्दर्शक हन्सल मेहता यांच्याबद्दल काय सांगशील...  
?:  खरं तर मला त्यांच्याबरोबर काम करायचेच होते. त्यांचे चित्रपट मी पाहिलेले होते. त्यामुळे त्यांनी मला जेव्हा या भूमिकेबद्दल विचारले तेव्हा मी नकार देणे शक्यच नव्हते. हन्सल मेहता हे एक कम्प्लिट दिग्दर्शक आहेत आणि मला असे वाटते की त्यांनी हा विषय सुरेख मांडलेला आहे.

 आयएमडीबी या वेबसाइटने भारतातील या वर्षातील टॉप टेन लोकप्रिय वेबसीरीज नुकत्याच जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये ‘स्कॅम १९९२ - द हर्षद मेहता स्टोरी’ पहिल्या क्रमांकाची लोकप्रिय सीरीज ठरली, त्याबद्दल तू काय सांगशील.
?:  ही माझ्यासाठी नक्कीच आनंदाची बाब आहे. ‘स्कॅम’ हा भारतातला पहिलाच फायनान्शियल थ्रिलर होता. हा जॉनरच प्रथमच हाताळला जात होता. त्यामुळे ही सीरीज खूप लोकांनी पाहिली आणि माझे काम तसेच ही सीरीज त्यांच्या पसंतीस उतरली याचा आनंद होतो आहे. खरे तर शूटिंग करताना आम्हाला असे काही वाटलेले नव्हते. आम्ही सगळे जण काम करीत होतो आणि चांगले काम कसे होईल याकडेच सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. आता आम्ही केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. आता ही वेबसीरीज भारतातील लोकप्रिय वेबसीरीज ठरल्यामुळे मला चित्रपटांच्या आणि वेबसीरीजच्या खूप ऑफर्स येत आहेत. परंतु आता खूप विचारपूर्वक पाऊल टाकावे लागणार आहे. कारण लोकांच्या अपेक्षा आता वाढलेल्या आहेत आणि त्या नक्कीच विविध भूमिका साकारून पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल.

 ओटीटी या नव्या प्लॅटफॉर्मबद्दल काय सांगशील...
?:  हा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे आणि भविष्यात याचा विस्तार होणार आहे. कलाकारांसाठी हे एक नवे व्यासपीठ आहे आणि रंगभूमीवरील नवोदित कलाकारांसाठी ही संधी आहे. येथे विविध विषय हाताळले जातात आणि तेदेखील अधिक विस्ताराने मांडले जातात. एखादी गोष्ट मोठ्या पडद्यावर तीन तासांमध्ये सांगता आली नाही तर ती येथे अधिक विस्तृतपणे मांडता येते. पण चित्रपट आणि ओटीटी ही दोन्ही माध्यमे वेगवेगळी आहेत. त्यांच्यामध्ये आता स्पर्धा लागणार ही बाब जरी खरी असली तरी मोठे चित्रपट मोठ्या पडद्यावरच प्रदर्शित होतील हेही तितकेच खरे आहे.

 तुझ्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल काय सांगशील ?
?:  पुढील वर्षी मी ‘रावण लीला’ या चित्रपटातून एका वेगळ्या भूमिकेत तुम्हा सगळ्यांसमोर येणार आहे. ‘रावण लीला’ हा सोशिओ-पॉलिटिकल ड्रामा आहे. यात माझ्यासोबत अन्द्रिता राय, फ्लोरा सायनी, राजेश शर्मा आदी कलाकार आहेत. हार्दिक गज्जर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग वगैरे सगळं पूर्ण झालं असून २०२१ साली हा चित्रपट रिलीज होईल. शिवाय ‘हवाई’ हा चित्रपट करीत आहे. आणखीही काही प्रोजेक्ट्स आहेत, पण त्याबाबत आताच बोलणे उचित ठरणार नाही.

व्हॉट्स रॉंग राजू या गुजराती चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. त्यातील काम पाहून मला हर्षद मेहताची भूमिका मिळाली. या भूमिकेकरिता मला आॅडिशन्स द्यावी लागली. दोन वेळा माझी आॅडिशन्स घेण्यात आली. पण नंतर लूक टेस्ट खूप वेळा झाली.

संबंधित बातम्या