परिकथेतील अरण्य 

संजय दाबके
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

प्रवासातील बुरे-भले
प्रवास आनंददायक असतोच. त्यामुळं जग बघायला मिळतं, माणसं भेटतात, कुठल्याही परिस्थितीत कसं वागायचं याचं भान येतं... प्रवास माणसाला समृद्ध करतो. असे काही खास अनुभव...

पिटलॉकरीमधला पहिला दिवस अगदी प्रसन्न सकाळ घेऊन आला. कुठेही पर्वतरांगांमध्ये गेले - मग ते महाराष्ट्रात असो, की आल्प्समध्ये असो, की स्कॉटलंडमध्ये.. हवेमध्ये तुम्हाला मजेशीर प्रफुल्लित करणारे असे काहीतरी असते. इंग्लिशमध्ये अशा गारठवणाऱ्या पण प्रसन्न हवेला ‘क्रिस्प एअर’ असा चपखल शब्द आहे. मराठीत मला याला नेमका शब्द सापडलेला नाही. माझ्या हॉटेलमध्ये दोनच खोल्या होत्या. एकात एक जोडपे होते आणि दुसऱ्यात मी. रात्री मालक शांतपणे आमच्याकडे हॉटेलच्या किल्ल्या देऊन स्वतःच्या घरी निघून गेला होता. युरोपमध्ये एखाद्या कुटुंबाच्या मालकीच्या छोट्याशा हॉटेलमध्ये हे सर्रास चालतं! चेक रिपब्लिकमधल्या एका खेड्यात एका हॉटेलात मी एकदा एकटाच होतो. मालक माझ्याकडे सगळ्या इमारतीच्या किल्ल्या देऊन निघून गेला ते सकाळी ब्रेकफास्ट तयार करायलाच आला. तिथेसुद्धा अंडी, ब्रेड आणायला मला गाडीत बरोबर घेऊन गेला आणि परत येऊन ब्रेकफास्ट करून देऊन पुन्हा निघून गेला!  

इंग्लंडमध्ये लहान लहान खेड्यातून अशा फॅमिलीने चालवलेल्या हॉटेलमधला ब्रेकफास्ट हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. पहाटेच घराघरातल्या धुराड्यांमधून स्वयंपाकघरातला धूर आणि त्याच्या बरोबर ‘एग्स अँड बेकन’चा वास सगळीकडे पसरायला लागतो. हा दरवळच तुम्हाला जागे करतो. घरात ३-४ टेबले असतात. सुंदर डिशमध्ये ‘एग्स अँड बेकन’बरोबर बीन्स, हॅश्‍ड पोटॅटोज, सलामी आणि किंचित भाजलेले टोमॅटो आणि मश्रूम असे सगळे समोर येते आणि त्याच्याबरोबर किटलीतून ‘इंग्लिश ब्रेकफास्ट’ चहा! बहुधा समोर नीरव शांतता असते. खिडकीच्या काचेच्या आतसुद्धा बाहेरची थंडी जाणवत असते. या हॉटेल्समधली सर्वोत्कृष्ट वेळ आणि अनुभव कुठला असेल तर तो या ब्रेकफास्टचा! 

ब्रेकफास्ट करून बाहेर पडलो, तर गाव पर्यटकांनी फुललेले! ‘एंचांटेड फॉरेस्ट’ या कार्यक्रमाच्या ४० दिवसांत हे गाव असेच भरलेले असते. गावाला एकच मुख्य रस्ता. न्हाव्यापासून ते किराणा, पुस्तकांची दुकाने सगळी याच रस्त्यावर. बहुतेक सगळी घरे अगदी टुमदार, दगडी बांधणीची, फारतर दुमजली. या रस्त्याला लागूनच खळाळत वाहणारी टमेल नदी.. एकंदरीत निसर्ग एखाद्या गावावर खूश होऊन जे जे देऊ शकतो, ते ते सर्व इथे मुक्त हस्ताने उधळले आहे. मी मुद्दाम जो शो बघायला आलो होतो, तो संध्याकाळी होता. त्यामुळे भारतात जे कधीच करायला मिळत नाही ते म्हणजे मनसोक्त पायी हिंडणे ते दिवसभर करायला मिळणार होते. पर्यटकांच्या टोळ्याही निरनिराळ्या दिशेनी फिरायला निघाल्या होत्या. नदीच्या काठाने जाता जाता डाव्या हाताला पिटलॉकरीच्या नॅशनल थिएटरची इमारत दिसली. थोड्याशा उंचवट्यावर बांधलेली ही इमारत सर्व सुविधांसह अगदी सुसज्ज आहे. वर्षातून एकदा इथे मानाचा नाट्यमहोत्सव होत असतो. पु. ल. इथे तोच बघायला ६० वर्षांपूर्वी आले होते. निरुद्देश भटकंती करत दिवसभर गावात आणि आजूबाजूला भटकत होतो. गर्दी होती पण कुठेही असभ्यपणा नाही, कुठेही गलिच्छपणा नाही. पर्यटन स्थळ कसे सांभाळायचे असते, ते खरोखर या लोकांकडून शिकावे! 

म्हणता म्हणता संध्याकाळ झाली आणि गावातल्याच फिशर हॉटेलच्या बाहेर माफक विद्युत रोषणाईने नटलेल्या आवारात ‘एनचांटेड फॉरेस्ट’ हा खास शो बघायला येणाऱ्या पर्यटकांची झुंबड उडाली. इथले नियोजन अतिशय सुंदर आहे. तुम्ही तिकीट काढतानाच त्यावर तुमच्या बसची वेळ लिहिलेली असते. मी २० मिनिटे आधी पोचलो, तर एका स्वयंसेविकेने नम्रपणे मला ‘तुमच्या बसच्या वेळेच्या आधी दोन मिनिटे या’ असे सांगितले. दर १५ मिनिटांनी घड्याळाचा काटा लावल्यासारख्या बसेस सुटत होत्या आणि पर्यटकांना चार, पाचच किलोमीटर अंतरावरच्या त्या परीकथेत शोभेल अशा अरण्यात नेऊन सोडत होत्या. तीच सोय तिथून परत यायला! 

एखादे पर्यटन स्थळ कसे विकसित करावे, याचा ‘एनचांटेड फॉरेस्ट’ हा एक उत्कृष्ट नमुना आहे. दररोज ‘मोजक्याच’ म्हणजे साधारण २० हजार पर्यटकांना तिकिटे दिली जातात. ही सगळी तिकिटे फक्त ऑनलाइन बुकिंगनेच मिळतात. एकेका तिकिटाची किंमत २० पौंड, म्हणजे साधारण २००० रुपये. ४० दिवसांची ही सर्व तिकिटे ४-५ महिने आधीच संपतात, आणि मग जगभरातून इथे पर्यटकांची गर्दी परिकथेतील अरण्य बघायला लोटते. ‘एनचांटेड फॉरेस्ट’ या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन गावातली समितीच करते. अगदी दररोज रात्री थंडीच्या कडाक्याच्या जंगलात स्वयंसेवकांचे कामही गावातली ज्येष्ठ मंडळी करतात. पळापळीच्या कामात तरुण पिढी सहभागी होते. फक्त चाळीस दिवसांत इथे सुमारे १०० कोटी रुपयांची तिकिटे विकली जातात. याशिवाय शोमुळे गावातल्या हॉटेल मालक, उपाहारगृहे आणि इतर सगळ्याच व्यवसायांची चलती होते ती वेगळीच! गेली वीस वर्षे हा एक चमत्कार वाटेल असा ‘इव्हेंट’ अत्यंत यशस्वीपणे सुरू आहे. पण व्यवसाय ही या ‘एनचांटेड फॉरेस्ट’ची फक्त एक बाजू झाली. 

अत्यंत व्यावसायिक पद्धतीचे नियोजन असलेल्या या कार्यक्रमासाठी मी पोचलो तेव्हा रोषणाईने उजळलेले जंगल बघायला पालकांच्या बरोबर आलेल्या लहान मुलांची गर्दी खूप मोठी होती. त्यांना गुंतवून ठेवायचे काम बसच्या ड्रायव्हरपासून सुरू होते. डोक्यावर रंगीबेरंगी टोप्या घातलेले ड्रायव्हर आत येणाऱ्या प्रत्येकाशी काहीनाकाही गमतीदार बोलून स्वागत करत होते. गोबऱ्या गोबऱ्या गालांच्या थंडीचे रंगीबेरंगी कपडे घालून आलेल्या चिमुकल्या थव्यांचे कौतुक तर विचारू नका! सगळीकडे नर्म विनोदांच्या हास्याचे तुषार उधळत होते. या आकर्षणाची सुरुवातच अतिशय प्रसन्न वातावरणात होते.  

बस सुरू झाल्यावर एका ३-४ वर्षांच्या चिमुरडीच्या आवाजात कॉमेंट्री सुरू होते. अगदी लहान मुलांच्या भाषेत जंगलात वागायचे नियम ती अतिशय नेमकेपणाने आपल्याला सांगते. त्यात अगदी ‘अरण्यात कचरा टाकू नका’पासून ‘आपल्या आईवडिलांचा हात सोडून लांब जाऊ नका..’ अशा साध्या सूचना असतात. त्या ऐकतानाच आपण ‘एनचांटेड फॉरेस्ट’च्या प्रवेशापाशी येतो. एव्हाना लांबूनच सुंदर रोषणाईने नटलेली वनसंपदा आपल्याला दिसायला लागलेली असते.

आतमधले वातावरण तर विचारू नका. मोठे त्यात अवाक होऊन गुंगून जातात, तर लहानग्यांची धमाल काय सांगावी! थंड प्रदेशातल्या उंचच उंच वृक्षाचे हे तसे घनदाट जंगल. त्यातून साधारण ४ किलोमीटर लांबीची पायवाट काढली आहे. या वाटेवरूनच आपल्याला फक्त ही चालत सफर करता येते. रात्री १२ वाजता शेवटची बस परत जायला सुटते तोपर्यंत तुम्ही कितीही वेळ तिथे घालवा. जागोजागी थांबे आहेत. कुठे नैसर्गिक तलावात कारंजी उसळत आहेत. अतिशय मंद आवाजात त्याला कुठे संगीताची साथ आहे. या सगळ्या वाटेवर खूप गमती जमती निर्माण केलेल्या आहेत. कुठे अवाढव्य झाडांचे पोशाख केलेले कलाकार लहानग्यांबरोबर थट्टामस्करी, गमतीजमती करत असतात. कुठे कोणी छोट्याशा संगीतिका सादर करणारी तरुण मंडळी झाडे, निसर्ग, जंगल यांची सहज गुणगुणावीत अशी गाणी गात असतात. लहान थोर सगळे नकळत त्यात सामील होऊन ठेका धरतात. कसलीही घाई नसते. वाटेत जागोजागी कॉफीचे आणि बारीक सारीक जिभेचे चोचले पुरवण्याचे थांबे आहेत. थंडी असल्याने तिथेही उच्चांकी विक्री होत असते. कुठे एखादा तंबू असतो. त्यात एखादा हरहुन्नरी कलाकार लहान लहान मुले जमवून त्यांना जंगलातल्या प्राण्यांचे आवाज काढून दाखवत असतो. जंगलातल्या अद्‍भुत कथा अभिनयासह सांगत असतो. समोरची चिमुरडी विस्फारलेल्या डोळ्यांनी ते बघत असतात, टाळ्या वाजवत असतात, नाचत असतात, गात असतात.. दहा पंधरा मिनिटे झाली, की पुढचा ग्रुप. तिकीट फक्त एक पौंड! या सगळ्यात एक जाणवेल असा अतिशय सुंदर सौम्यपणा आहे. इतकी गर्दी, करमणूक असूनही त्यात त्या जंगलाचे जंगलपण टिकवून ठेवले आहे. करमणूक कधीही त्यावर वरचढ होत नाही. सादरीकरणात हा तोल सांभाळणे हे अत्यंत अवघड काम आहे. 

अशा जागी गेले आणि लहान मुलांना इतक्या सहजपणे गुंतवून ठेवणारे काही पाहिले, की माझ्या डोळ्यात आनंदाने पाणी येते. सतत वाटत राहते, की माझ्या देशातल्या मुलांना हे असे इतके सुंदर कधी बघायला मिळेल? 

प्रकाशयोजनेमुळे सगळीकडे अरण्य खुलून दिसत असते. बरे ही प्रकाशयोजनासुद्धा अंगावर येईल अशी बटबटीत नाही, तर जंगलाचे सौंदर्य आणखी खुलवणारी असते. चालत चालत तुम्ही जेव्हा निम्म्यापर्यंत पोचता, तेव्हा अक्षरशः सगळ्या बाजूंनी उजळलेले हे जंगल तुम्हाला स्तब्ध करून टाकते. रात्रीच्या अंधारात झाडांच्या आणि वन्यप्राण्यांच्या कृष्णरेघा बघत मी हिंडलो आहे. जंगलाचे तेही एक रौद्र सौंदर्य आहे आणि इथे एखाद्या सोनाराच्या कलाकुसरीसारखी सादर केलेली प्रकाशाने उजळलेल्या निसर्गाची भव्यता बघणे हेही अद्‍भुतच! आपल्याला आणखीन १०-१२ डोळे असते तर काय मजा आली असती असे वाटायला लावणारा हा ‘एनचांटेड फॉरेस्ट’चा अनुभव आहे. 

करमणुकीचे आणि जत्रेचे वातावरण असले तरी सगळीकडे विषय, पर्यावरण आणि निसर्ग यांचे आपल्या आयुष्यातले महत्त्व अधोरेखित होईल असेच असतात. तेही सांगायचे ते काही तरी जड, अवघड न करता लहान मुलांच्या भाषेत! जागोजागी गावातल्या ज्येष्ठ मंडळींचे सगळीकडे लक्ष असते. रात्रीच्या जंगलात रोज वीस हजार लोकांना सोडणे हे तसे अत्यंत जोखमीचे काम! कोणी कुठे हरवले तर? सगळे आत गेलेले परत बाहेर येईपर्यंत प्रचंड जबाबदारी या लोकांवर असते. पण अत्यंत काटेकोर नियोजनामुळे ही अवघड कामगिरी पार पाडताना यातल्या कोणाच्याही चेहऱ्यावर तसूभरही तणाव दिसत नाही. त्याच उत्साही चेहऱ्याने सगळ्यांचे स्वागत करतात आणि त्याच आर्जवाने परत जाताना ‘गुड बाय अँड कम अगेन’ म्हणतात.

संबंधित बातम्या