गदिमांचा ‘बामणाचा पत्रा’

संजय दाबके
सोमवार, 23 मार्च 2020

प्रवासातील बुरे-भले
प्रवास आनंददायक असतोच. त्यामुळं जग बघायला मिळतं, माणसं भेटतात, कुठल्याही परिस्थितीत कसं वागायचं याचं भान येतं... प्रवास माणसाला समृद्ध करतो. असे काही खास अनुभव...

मी  भारताच्या बाहेर जितका फिरलोय तितका दुर्दैवानं भारतात हिंडू शकलेलो नाही. पण काही जागा अशा खास आहेत, की ज्या समज आल्यापासून मनात घर करून होत्या. जिथं खूप लोकांना जायला आवडेल, पण फारशी लोकं तिथं जात नाहीत आणि मला मात्र योगायोगानं तिथं मुक्काम करायला मिळाला. महाकवी ग. दि. माडगूळकर यांच्या काव्याशी माझं जसं नातं जुळलं, तसं फक्त काही प्रमाणात कुसुमाग्रज सोडले तर इतर कवींशी जमलं नाही. दोष माझाच असणार. गदिमांचं साधं, सोपं आणि अत्यंत प्रासादिक काव्य हे माझ्यासारख्या सामान्यांसाठी आहे. अगम्य भाषेत लिहिलेलं गूढ काव्य मला फारसं समजत नाही. गदिमांच्या शब्दांनी मात्र घायाळ करून टाकलं होतं. मग ती चित्रपट गीतं असोत, रामायण असो किंवा इतर कुठलंही काव्य. याला कारणंही तशीच. ज्येष्ठ दिग्दर्शक रामकाका गबाले, बाबा पाठक हे गदिमांच्या बरोबर प्रत्यक्ष काम केलेले नेहमी माझ्या स्टुडिओत येणारे, तर कविवर्य सुधीर मोघे, अजित सोमण हेही सगळे गदिमा आणि बाबूजी प्रेमी आमच्या स्टुडिओत नेहमीचेच. गदिमा मी लहान असतानाच गेले, त्यामुळं त्यांची भेट कधी झाली नाही. पण नंतर त्यांच्या सगळ्याच कुटुंबीयांनी मात्र नेहमीच अगदी घरातल्यासारखं वागवलं. हे सगळं अनुभवताना गदिमांच्या आठवणी म्हणजे अक्षरशः दंतकथा झाल्या होत्या आमच्यासाठी!

त्यातली एक महत्त्वाची दंतकथा होती त्यांच्या गावातली, आटपाडीजवळच्या माडगुळ्यातली त्यांच्या शेतावरची एक पत्र्याची शेड! ‘बामणाचा पत्रा’ हे तिचं गावकऱ्यांनीच ठेवलेलं नाव!

कित्येक विलक्षण पटकथा, गीतं, काव्य ही गदिमांनी या गावाकडच्या ‘पत्र्यात’ बसून लिहिली. पुण्यात काम होत नाही असं दिसलं, की ते आठ पंधरा दिवस सगळा बाडबिस्तरा घेऊन पुण्याहून गावात यायचे आणि सगळा वेळ या पत्र्यातच घालवायचे. गावाकडची माती कदाचित त्यांच्याकडून अस्सल साहित्यिक सोनं निर्माण करून घेत असावी.

बाबा पाठक, रामकाका हे त्यांच्या बरोबर अनेक ‘प्रोजेक्ट्स’साठी गावी जाऊन राहिलेले. त्यांचं बोलणं ऐकता ऐकता या जागेनं मनात एक ओढ निर्माण केली होती. इतकं अलौकिक साहित्य गदिमांकडून निर्माण करून घेणारा हा ‘बामणाचा पत्रा’ आहे तरी कसा? तो एकदा तरी बघून यायलाच पाहिजे ही इच्छा तीव्र व्हायला लागली होती.  

इच्छा असली की मार्ग सापडतो. माडगुळ्याला (गावाचं नावं ‘माडगुळे’ असंच आहे - माडगूळ नाही!) माझं एकदा नाही अनेक वेळा जाणं झालं!

गदिमांच्या २५ व्या स्मृतीनिमित्त २००२ मध्ये गदिमा प्रतिष्ठानानं त्यांच्यावर एक माहितीपट निर्माण करायची जबाबदारी माझ्यावर सोपवली. माडगुळ्याला स्वतः बाबा पाठक (प्रपंच, संथ वाहते कृष्णामाई आणि अनेक चित्रपटांचे दिग्दर्शक) आमच्या बरोबर येणार होते. इतर शूटिंग संपवून आमची गाडी आटपाडीच्या दिशेनं चालू लागली. हा परिसर सगळा ओसाड! पावसाचा अजूनही नेम नाही. कधी थोडाफार पडला तर पडला! या अशा कोरड्या परिसरात कविराजांची प्रतिभा कशी फुलायची? देव जाणे!

आटपाडीहून माडगुळे साधारण दहा किलोमीटरवर पोचलो. गदिमांचं घर बघितलं. त्यांचे सगळ्यात धाकटे बंधू श्यामकाका त्यावेळी होते. मुक्तेश्वर हा गदिमांचा पुतण्या.. गावाकडचं हल्ली तोच बघतो. घराच्या समोरच छोटासा शेताचा तुकडा. तो पाव एकराचा म्हणून घरचे त्याला ‘पाव’च म्हणतात. कुठं गेलाय? तर ‘पावा’त गेलाय.. आणि याच पावाच्या मध्यभागी ती पवित्र जागा. बामणाचा पत्रा!

एक साधीसुधी पत्र्याची शेड पण तिचं स्थान माहात्म्य असं, की तिथं मला एक मंदिर दिसायला लागलं. आमचा मुक्काम पत्र्यावरच टाकला होता. ती जागा जणू भारलेली होती. गदिमांचं अस्तित्वच त्या जागेत आहे असं मला तरी सतत वाटत होतं. कदाचित हा माझ्या गदिमांवरच्या श्रद्धेचा भाग असेल! बाबा पाठक गदिमांच्या वेळेपासून त्यांच्या बरोबर येत असल्यानं सगळ्या गावकऱ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध! गदिमांना पाहिलेल्या खूप लोकांना भेटलो.. त्यांच्यासाठी आपल्या या छोट्याशा कुग्रामी जन्म घेऊन एवढी कीर्ती मिळालेला तो गावचा पुत्र देवा समानच होता.. ‘पत्रा’ बघायचं स्वप्न पूर्ण झालं होतं. भरलेल्या मनानं पुण्याला परत आलो.

पुढच्या दोनच वर्षांत ETV मराठीच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली आणि २००४ मध्ये असं मनात आलं, की गदिमांच्या वरचा एक भव्य कार्यक्रम त्यांच्या गावात करूयात. जसे शेक्सपिअरच्या नाटकांचे महोत्सव जगभर होतात, पण स्ट्रॅटफर्डला होणाऱ्या नाट्य सप्ताहाची महती वेगळीच असते, कारण तो सप्ताह त्याच्या जन्मगावी भारलेल्या वातावरणात होत असतो. गदिमांच्या गाण्यांचे कार्यक्रम सगळीकडं होत असतात, पण असा कार्यक्रम त्यांच्या गावात व्हायला पाहिजे.

असं ठरवलं की कार्यक्रमाची जबाबदारी कविवर्य सुधीर मोघे यांच्यावर सोपवावी. काही प्रमाणात तरी गदिमांच्या काव्य परंपरा पुढे चालवणारे ते कवी. सोबतीला अजित सोमण यांच्यासारखा मर्मज्ञ होताच. मोघ्यांनी लगेच होकार दिला आणि पहिलीच टूम काढली, की कार्यक्रम करायच्या आधी एकदा माडगुळ्याला जाऊन यायचं! मी उडीच मारली. एका पायावर तयार! ठरलेल्या दिवशी सुधीर मोघे, प्रख्यात छाया लेखक देबू देवधर, अजित सोमण आणि मी असे माडगूळ्याच्या दिशेनं निघालो. त्या दिवशीच्या प्रवासाचा आनंद काय वर्णावा! रस्ताभर फक्त गदिमांचं काव्य सुरू होतं. सुधीर मोघ्यांच्या मुखातून रसग्रहणाची जणू सरस्वती वाहत होती. गीत रामायण, गीत गोपाळ, अनेक चित्रपट गीतं, पुरिया आणि चैत्रबनसारखे काव्य संग्रह.. किती तरी गोष्टी त्या प्रवासात उलगडून समजल्या. मोघ्यांच्या बरोबर सोमण सर तेवढेच तयार. मी आणि देबूदा श्रोत्यांच्या भूमिकेत होतो.

माडगुळ्याला पोचायला संध्याकाळ झाली. मुक्कामाची सोय खास सांगून ‘पत्र्या’वरच केली होती. बरोबरचे तिघंही तिथं पहिल्यांदाच येत होते. सगळ्यांसाठी ते जणू तीर्थक्षेत्रच! गाडीत भरभरून बोलणारे सगळे गप्प झाले होते. न बोलता त्या सरत्या संध्याकाळी आम्ही ‘पावा’त प्रवेश केला. पायवाटेनं चालत पत्र्यासमोर आलो. संध्याकाळची वेळच अशी असते, की आपल्या इतर वेळी दडून बसलेल्या जाणिवा जाग्या होतात. पत्र्यात एक पिवळा मिणमिणता लाइट लावलेला होता. तिथं लेखनाची बैठक घालून बसलेल्या गदिमांचा एक फोटोच उपलब्ध आहे. पांढरी स्वच्छ बैठक, समोर लिहायचं बैठं डेस्क, बाजूला मंद जळणारी उदबत्ती, डेस्कवर गदिमांना लागणारे बिन रेघांचे कागद आणि शाईचं पेन आणि तंद्री लागलेले कविराज! गदिमा गावात आलेत म्हटल्यावर त्यांना भेटायला लोकांची रीघ लागायची, पण सकाळी त्यांच्या लिहायच्यावेळी उमा रामोशी बाहेरच सगळ्यांना आडवायचा.. ‘अन्ना लिवत्यात’ एवढंच सांगायचा आणि लोकांना आडवायचा.. आता तिथं काहीही नाही तरी त्या मंतरलेल्या वातावरणात स्वतः गदिमाच तिथं लिखाणाची बैठक मांडून बसलेत असा भास होत होता. त्यांचं अस्तित्व त्या जागेत आहेच.. त्या शांततेत लांब कुणीतरी खाकरलं, तेसुद्धा नको वाटलं! बराच वेळ शांततेत गेल्यानंतर पुन्हा कविवर्य मोघे यांना कंठ फुटला. आता तर आम्ही त्या जागेत होतो, जी जागा स्वतः महाकवींचं प्रेरणा स्थान होतं.

थंडीचे दिवस होते. शहरातलं प्रदूषण नसल्यानं ताऱ्यांनी भरलेलं आकाश समोर होतं. पत्र्यासमोरच्या अंगणात बाहेरच घोंगड्या टाकून बसायची सोय झाली. गदिमांचे कुटुंबीयसुद्धा या मैफिलीत सामील झाले. उमाचा मुलगा भिवा आता पुण्याहून पावणे आलेत म्हटल्यावर आमच्या सेवेत होता. त्यानं झकास जेवायचा बेत केला. रात्री तर काय सांगावं! किती गाणी, किती कविता, किती आठवणी! बहुतेक सगळे गदिमांच्या जिवाभावाचे लोक आणि मी श्रोता. अशा मैफिली वारंवार व्हाव्यात आणि आपण फक्त त्याचा योग जुळवून आणावा.. पहाट कधी झाली ते कोणालाच समजलं नाही.

आणखीन एक महिन्यानं कार्यक्रमासाठी आल्यावर मी इथल्या शेतात एक आठवडा मुक्काम ठोकून बसलो होतो. गावकऱ्यांचं प्रेम तर काय सांगावं! गावच्या शाळेच्या मैदानात कार्यक्रम होणार म्हटल्यावर मुख्याध्यापकांनी आमच्या तयारीसाठी अख्खी शाळाच शेतात हलवली. कार्यक्रमाला लाखाच्या वर लोक आले होते. गदिमांच्या बरोबर काम केलेले रेखा, चित्रा, ग. रा. कामत, रामभाऊ गबाले, बाबा पाठक, श्रीधर फडके अशी दिग्गज मंडळी या निमित्तानं पहिल्यांदाच माडगुळ्याला आली आणि पत्र्याचं दर्शन घेऊन धन्य झाली. प्रक्षेपणातही सगळी रेकॉर्ड्स या कार्यक्रमानं मोडली. या महाकवीवर महाराष्ट्रातल्या जनतेचं अजूनही किती प्रेम आहे त्याचाच तो प्रत्यय होता. माझ्या दृष्टीनं मात्र त्या परम पवित्र जागेत झालेला मुक्काम याच्यापेक्षा दुसरं कुठलंही समाधान मोठं नव्हतं! या गावात आल्यामुळं गदिमांच्या साहित्याचा अस्सल मराठी पिंड थोडा तरी आणखीन समजला.

पुन्हा तुलना करायची झाली, तर स्ट्रॅटफर्डला जेव्हा आपण शेक्सपिअरच्या गावात जातो, तेव्हा तो परिसर बघून, ते वातावरण अनुभवून शेक्सपिअरच्या काळाची, त्याच्या साहित्याची नाळ आपल्याला थोडीफार तरी समजते, त्याला आपण जोडले जातो. जगभरातून लाखो प्रवासी तिथं भक्तिभावानं येतात. गदिमांचा हा ‘बामणाचा पत्रा’सुद्धा तेवढाच भारलेला आहे. या माणसानं मराठी भाषेला केवढं दिलं आहे! इथं मात्र कुणी आमच्यासारखा एकटा दुकटा फिरकतो. कित्येक सरकारं आली आणि गेली. प्रत्येक वेळी गादिमांचं स्मारक त्यांच्या गावात उभारणार अशी घोषणा होते आणि हवेत विरून जाते. दरवर्षी किती तरी नवीन पुढाऱ्यांची स्मारके उगवत असतात, पण ज्या कवीनं मराठी भाषेतलं ‘गीत रामायणा’सारखं कैलास लेणं साकारलं त्याच्याकडं लक्ष देण्यात कोणाला फारसं गम्य नाही. मला विचाराल तर एखादा पुतळा आणि त्याच्याभोवती बाग उभारून त्यांचं स्मारक होऊच शकत नाही. त्यांच्या साहित्याचं रहस्य या बामणाच्या पत्र्यात आहे. त्याच्या इतकं त्यांचं योग्य स्मारक होऊ शकणार नाही. फक्त ते आहे तसं जपायला पाहिजे. लोक येतील, शांतपणे तिथं बसतील, त्या महाकवीची कवनं आठवतील आणि तृप्त होऊन त्यांच्या गावचा श्वास घेऊन परत जातील!  

मी सध्या कृष्णाच्या एका थीम पार्क प्रोजेक्टवर काम करतोय. बरोबर सतत गदिमांचं ‘गीत गोपाल’ आहे. ‘गीत रामायणा’सारखं नशीब जरी ‘गीत गोपाल’ला लाभलं नसलं, तरी त्यातलंही प्रत्येक गीत म्हणजे लखलखता दागिना आहे. काम करत असताना मधेच कधी तरी नुकत्याच जन्मलेल्या बाळ कृष्णाला घेऊन यमुना ओलांडत वासुदेव गोकुळात पोचलेत या प्रसंगाचं वर्णन करणाऱ्या -
‘पिता पुत्र काजळ रात्री गोकुळात आले, 
शांत शांत अवघे खेडे, जसे चित्र ओले’

अशा विलक्षण ओळी लिहून गदिमा आजही ‘आहे हिंमत हे चित्रबद्ध करायची?’ असं जणू आव्हान समोर ठेवतात.

अशा वेळी वाटून जातं, की पत्र्यावर जाऊन खूप दिवस झाले. पुन्हा एकदा जाऊन यावंच आता. बघू कधी योग येतोय ते! 

संबंधित बातम्या