सुव्हीनूर इटिंग! 

संजय दाबके
सोमवार, 13 जुलै 2020

प्रवासातील बुरे-भले
प्रवास आनंददायक असतोच. त्यामुळं जग बघायला मिळतं, माणसं भेटतात, कुठल्याही परिस्थितीत कसं वागायचं याचं भान येतं... प्रवास माणसाला समृद्ध करतो. असे काही खास अनुभव...

प्रवासाला गेलं की निम्म्यापेक्षा जास्त आनंद तिथल्या खाण्यात असतो. उगाच डाएटवर वगैरे असलेल्या लोकांबरोबर कधीही हिंडायला जाऊ नये. कारण जिथं जाऊ तिथले नामांकित पदार्थ खाल्लेच पाहिजेत असा नियम असतो. यालाच इंग्लिशमध्ये छान नाव आहे, ‘सुव्हीनूर इटिंग’. जसं एखाद्या ठिकाणची आठवण म्हणून आपण येताना तिथून एखादी वस्तू विकत घेऊन येतो, तसंच तिथला पदार्थ खाऊन, त्याची चव तोंडावर रेंगाळीत आठवणीनं दुसऱ्याला सांगण्यात जी मजा आहे, ती फेसबुक आणि व्हॉट्सॲपवरच्या पोस्ट्स बघितल्या तर सहज लक्षात येईल! सरासरी ५० टक्क्यांहून अधिक पोस्ट्स या खाण्यावर असतात.

आपला देश तर त्याबाबतीत अतुलनीय आहे. इथं प्रत्येक पेठेची मिसळ वेगळी असते, इथपासून ते देशाच्या कानाकोपऱ्यात अक्षरशः अब्जावधी प्रकारचे पदार्थ असतात.. लोक त्याचा आनंद घेऊन आपल्याला सांगतात आणि मग आपण ठरवून टाकतो, ‘इथे गेलो की हे नक्की खायचं!’

देशात हिंडताना विमान प्रवास असेल तर हा आनंद फारसा मिळत नाही. पण जर रस्त्यानं प्रवास असेल, तर मात्र ‘सुव्हीनूर इटिंग’ला पर्याय नसतो. कामासाठी मला रस्त्यानंही महाराष्ट्रात आणि देशात कानाकोपऱ्यात वाहनानं हिंडावं लागतं. यातला जास्त प्रवास अर्थातच महाराष्ट्रात होतो. ‘सुव्हीनूर इटिंग’ची माझ्यासाठी सुरुवात होते अर्थात मिसळीपासून! महाराष्ट्रात पुण्यापासून मुंबई, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर या मार्गांवरून निरनिराळ्या ठिकाणी पोचता येतं. बहुतेक वेळा प्रवासाची सुरुवात सकाळी होते. नाश्त्याच्यावेळी मुंबई असेल तर हायवे सोडून मी मनःशक्तीच्या कँटीनमध्ये जातो. कोल्हापूरला किंवा साताऱ्याला जाताना वाईचा सुरूर फाटा सोडला, की १५-२० किलोमीटरवर पाचवड गाव आहे. तिथं पुलाच्या समोर ‘लक्ष्मी’ नावाचं हॉटेल आहे. हे मला दाखवलं गुरुवर्य बाबासाहेब पुरंदरे यांनी; उत्कृष्ट चहा मिळतो म्हणून! मग तिथं नेमानं थांबायला सुरुवात झाली. चहा तर उत्कृष्ट आहेच, इथली मिसळही छान असते. पण इथला सर्वोत्कृष्ट पदार्थ जर कुठला असेल तर पापडी! इथली पापडी तर मी जगात कुठंही विकू शकेन असा मला विश्वास आहे. आता हा जो स्टॉप आहे त्याचा तुमच्या भुकेशी काही संबंध नसतो. पुण्यातून निघतानाच ‘लक्ष्मी’ला थांबायचं ठरलेलं असतं.. हे ‘सुव्हीनूर इटिंग’.

अहमदनगरला असाच स्टॉप सरदवाडीच्या ‘नवनाथ’ला होतो. सोलापूर हायवेवर भिगवणच्या ‘ज्योती’मध्येच थांबलं जातं (हे ‘ज्योती’पण बाबासाहेबांनीच दाखवलंय!).

नाशिकच्या रस्त्यावर नारायणगाव सोडलं, की डाव्या हाताला ‘परिवार’ म्हणून छोटेखानी हॉटेल आहे. तिथं थांबायला लागतं. इथं मिसळ खाऊन झाल्यावर अस्सल नारायणगावच्या खव्याचा मोठा सुंदर पेढापण मिळतो!  

पण मिसळ हा एक प्रवासातला भाग झाला. त्या त्या ठिकाणी पोचलं की जेवायची ठिकाणं निश्चित झालेली असतात. कोणी नवनवीन ठिकाणं सुचवत असतं!

सध्या नागपूर, चंद्रपूरला काम सुरू आहे. आता नागपूरला जाऊन एखाद्या सावजीकडं नाही जेवलं, तर मित्रमंडळी वाळीत टाकतील! पण बाहेरगावी जेवायचंही शास्त्र आहे. तिथं जाऊन आलेल्या तोकड्या अनुभवावर सांगणाऱ्यावर फारसा विश्वास ठेवू नये. स्थानिक माणसाचं मत जास्त महत्त्वाचं! अशी दोन-चार मतं घेऊन मग कॉमन नाव येईल तिथं नक्की जावं. फसायचे चान्सेस कमी असतात. मग नागपूरचं सावजी ट्राय करून झालं. एखाद्या ठिकाणी खाऊन मत तयार करायला नको म्हणून पाच-सहा निरनिराळ्या ठिकाणी जेवलो. माझं मत आता नक्की झालंय, की नागपूरच्या सावजीत काही दम नाही! पण वेळ मिळाला तर बडकस चौकातल्या राम भांडारमध्ये जाऊन लस्सी प्यायलाच पाहिजे! इथंच जुन्या पद्धतीची खरीखुरी संत्र्याची बर्फी मिळते. ती पुण्याहून आणायची ऑर्डर असतेच! हे ‘सुव्हीनूर इटिंग’.

दुसरं लहानपणापासून अत्यंत आवडतं शहर म्हणजे कोल्हापूर! हे तर ‘सुव्हीनूर इटिंग’ची काशी किंवा मक्का.. काहीही म्हणा. बाकी मिसळ, कटवडा वगैरे चिल्लर प्रकार आपण सोडून देऊयात.. मुद्द्याचं म्हणजे सुरुवातीला ओपल, पद्मा वगैरेत जाऊन तांबडा/पांढरा ओरपल्याशिवाय कोल्हापूरची ट्रिप पूर्ण व्हायचीच नाही! मग हळूहळू कोल्हापूरच्या मित्रांनी पापाच्या तिकटी जवळची राजहंस, गंधर्व अशी कोल्हापूरकरांची आवडती ठिकाणं दाखवायला सुरुवात केली. शेवटी जेवण झालं, की सोळंकींच्याकडचं दूधकोल्ड्रिंक पाहिजेच, ते प्यायल्याशिवाय गाडी पुण्याकडं निघायला नकारच द्यायची! कोल्हापूरभर सोळंकींची दुकानं पसरलेली आहेत. त्यातलं वाटेवरचं बघायचं अन् थांबायचं.. कोल्हापूरला शूटिंग असलं, की फिल्मची युनिट जाम खूश असायची. तिन्ही त्रिकाळ वाईकरांचं मटण! गदिमांचा एक किस्सा आहे. त्यांच्या युनिटमध्ये एक तांत्रिक काम करणारे कोणी होते. मटण म्हटलं की ते एवढं जेवायचे की गदिमा त्यांना गमतीनं म्हणायचे, ‘अहो बाबूराव, मटण निर्मात्याचं आहे पण पोट तुमचं आहे!’

गोव्याची गंमत निराळीच... गोव्याला जाताना पत्रादेवी सुटलं की महाराष्ट्राची बॉर्डर संपते. तिथपर्यंत दारूची किंमत महाग. एकदा पत्रादेवी ओलांडलं की बरीच वर्षं पहिला धाबा दिसायचा तो ‘मारिया’ धाबा. इथं मद्याची किंमत एकदम निम्म्यावर! पिणाऱ्यांची चंगळच! मला तर महाराष्ट्र ओलांडून जे गाडीवाले, ट्रकवाले येताना दिसायचे ते म्हणजे अक्षरशः हपापलेले वाटायचे.. वेगात येऊन करकचून मारिया धाब्यासमोर ब्रेक लागायचे! कधी एकदा मारियात पोचतो आणि बाटलीचं बूच उडवतो अशी त्यांची अवस्था! (माझा संबंध फक्त निरीक्षणापुरता!)  

मला मात्र गोव्याला गेल्यावर केलीच पाहिजे अशी एक गोष्ट म्हणजे सकाळचा नाश्‍ता. सगळ्या गोव्यात सकाळी सकाळी माणसं भाजी पाव खातात. ‘पावभाजी’ नव्हे! ही भाजी म्हणजे मिक्स भाजी असते. वाटाण्यांची उसळ आणि बटाट्याची भाजी वेगवेगळी येते. बरोबर गरम गरम गोल पाव असतात. हे झालं की मिरची भजी मागवायची. दोनच मोठी भजी येतात. एवढा ब्रेकफास्ट झाला की पुन्हा जेवणाच्या वेळेपर्यंत बघायला नको! बहुधा काम पणजीमध्येच असतं. तिथल्या १८ जून रस्त्यावरच्या पूर्ण पांढरा रंग दिलेल्या ‘आराम’ किंवा तत्सम कॅफेमध्ये जाऊन भाजी पाव खाणं म्हणजे सुखाची परमावधी आहे. या हॉटेल्समध्ये जड खुर्च्या किंवा टेबलं असतात. मोठ्या गजांच्या खिडक्या असतात. हाफ चड्डीतले वेटर आणि त्यांच्यावर कोकणीतून खेकसणारा मालक, दोघंही गिऱ्हाइकाशी गोव्याच्या पद्धतीप्रमाणं अरे, तुरे करून बोलत असतात.. कुठल्याही जागी परत परत येण्यात पदार्थांच्या बरोबरच तिथला असा अँबियन्ससुद्धा कारणीभूत असतो! दुपारी जेवण पुन्हा मध्यावरच्या जुन्या रिट्झच्या टपरीत! इथल्या फिशकरी आणि राइससमोर दुसऱ्या कशाची गरज नसते!

असंच बराच काळ घालवलेलं आणखीन एक बहुरंगी शहर म्हणजे हैदराबाद! १४-१५ वर्षांपूर्वी इथं राहत होतो, त्यामुळं गल्लीन गल्ली पाठ आहे. पॅराडाईजला भेट देऊन बिर्याणी चापणारे आणि गोडवे गाणारे पर्यटक असतातच, कारण ते हैदराबादचं ‘सुव्हीनूर इटिंग’ आहे. पण अनेक जागा आहेत की जिथं उत्कृष्ट दर्जाचं खास तेलगू पद्धतीचं जेवण मिळतं. दिलसुखनगरच्या एका बोळात दुसऱ्या मजल्यावर एक चारच टेबलांची ‘अन्नपूर्णा’ नावाची खानावळ आहे. आजही वेळ मिळाला तर तिथं थांबतो. हैदराबादला गेल्यावर कराची बेकरीची बिस्किटं आणणं हे अनिवार्य असतं, पण जे नेहमी जाणारे आहेत ते हिमायत नगरच्या हिंदुस्थान बेकरीची बिस्किटं अव्वल आहेत हे खात्रीनं सांगतील! हल्ली गावात जायला वेळ होत नाही. बहुतेक वेळा एअरपोर्टवरून कामाचं ठिकाण म्हणजे रामोजी फिल्म सिटी आणि काम संपलं की परत.. पण त्यातही मी एक ठिकाण शोधलंच आहे. एअरपोर्टच्या वाटेवर तुक्कूगुडा नावाच्या गावात एक चहाची टपरी आहे. तिचं नाव आहे ‘टी पॅलेस’! जेमतेम चार लोक उभे राहू शकतील इतकी जागा, पण नाव टी पॅलेस! इथला ग्लासातून मिळणारा सुंदर चहा हा जगातला सर्वोत्तम आहे, असं माझं मत आहे. इथं चहा आणि बारीक बारीक पट्टी सामोसे तोंडात टाकायचे अन् एअरपोर्टच्या दिशेला लागायचं. इथं तुमच्या भूक असण्या-नसण्याचा संबंध नाही!  

दिल्ली, पंजाब आणि एकंदरच उत्तर दिशेला कित्येक दशकं जातोय. ‘सुव्हीनूर इटिंग’ सगळ्यात जास्त करायला लावणारा हा प्रदेश. बऱ्याच वर्षांपूर्वी दिल्लीत जेवायला पहाडगंजला मुद्दाम यायचो. तिथं एक टपरी होती. त्याचं विशेष म्हणजे त्याच्याकडं सगळ्या एअरलाईन्सची कटलरी असायची. म्हणजे ब्रिटिश एअरवेजची प्लेट असेल तर काटे चमचे लुफ्तांसाचे असणार! ग्लास आणखीन कुठल्यातरी एअरलाईनचे! मग काही वर्षांनी सुधीर गाडगिळांनी ‘काके द ढाबा’ दाखवला. हे एक प्रकरण आहे. प्रचंड गर्दी असते. तेवढ्या चिमुकल्या जागेत मिळेल तशी जागा पटकावत लोक बसून ताव मारत असतात. इथं अँबियन्सला किंमत शून्य! सगळे येतात ते काकाच्या चवीकरता. अस्सल तुपात तयार केलेले पदार्थ असतात. दुसऱ्या दिवशी हाताला तुपाचा हलकासा तरी वास येतोच येतो. त्याच्याच शेजारी ‘भापे दा धाबा’ आहे. पूर्वी गंधर्व कंपनीची तिकिटं नाटक हाऊसफुल्ल होऊन मिळाली नाहीत, की लोक घरी जायच्या ऐवजी दुसऱ्या नाटकाला जायचे. ती कंपनी गंधर्वांच्या थोडं नंतर नाटक सुरू करायची, पण या ओव्हर फ्लोमुळं दणक्यात चालायची.. भापेची गत तशीच आहे! बाकी दिल्लीबद्दल मी बोलायला नको. करोल बाग, चांदणी चौकातली परांठेंवाली गली, जामा मशिदीच्या शेजारचा ‘करीम’ हे सगळे अनुभवण्याचे प्रकार आहेत. पंजाबच्या रस्त्यावरचा अमरिंदरचा धाबा असाच! पराठे मागितले तर आग्रहानं लोण्याचे गोळे वाढणारे धाबे या रस्त्यावर सगळीकडंच आहेत! त्यांना परवडतं कसं हा आपल्या मध्यमवर्गीय जिवाला नेहमी पडणारा प्रश्न! तसाच पंजाबातील चहा! फुल्ल मोठा ग्लास भरून समोर येणारा आणि पूर्णपणे तृप्त करणारा चहा इथंच मिळतो. आपल्याकडं त्या कागदाच्या एवढ्याशा कपात दोन घोटांचा जो चहा देतात, तो प्यावासाही वाटत नाही!

प्रत्येक प्रांत, प्रत्येक जागा खाण्यापिण्याच्या जगात वेगळेच अनुभव देऊन जाते. त्यातून माझा स्वभाव थोडा रोडसाईडवाला जास्त असल्यानं छोट्या छोट्या जागा मला आवडतात. तिथं स्थानिक माणसं भेटतात. त्यांची भाषा, त्यांचा लहेजा, कधी त्यांचे विनोद हे सगळं बघायला मिळतं.

कित्येक वर्षं हिंडल्यानंतर आता माझं हे ‘सुव्हीनूर इटिंग’ जरा कमी झालंय. कुठलीही गोष्ट अति झाली की त्याचा कंटाळा कधी तरी येतोच. पण अजूनही कुठंही निघालो की त्या ठिकाणच्या जागा निश्चितपणे आठवतात. बरोबर जर कोणी तरुण सेना असेल, तर त्यांना मुद्दाम तिथं घेऊन जातो. ‘सुव्हीनूर इटिंग’ तुमचं आयुष्य समृद्ध करतं हे जातीच्या खवैय्यांनाच पटेल.. डाएटवाल्यांनी दुर्लक्ष करावं!  

प्रवास करणारा कोणीही असो. प्रवासाची संधी मिळूनही जर त्या जागी मिळणाऱ्या खास पदार्थांचा आनंद आपण घेतला नाही तर चूक काही नाही, पण आयुष्यात आपलं काही तरी मोठं हुकलंय हे निश्चित! पुढच्या भागात थोडं इंटरनॅशनल ‘सुव्हीनूर इटिंग’! 

संबंधित बातम्या