जाऊ तिथं खाऊऽऽच 

संजय दाबके 
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

प्रवासातील बुरे-भले
प्रवास आनंददायक असतोच. त्यामुळं जग बघायला मिळतं, माणसं भेटतात, कुठल्याही परिस्थितीत कसं वागायचं याचं भान येतं... प्रवास माणसाला समृद्ध करतो. असे काही खास अनुभव...

मागच्या भागात आपल्या देशातल्या ‘जाऊ तिथे खाऊच’ अशा जागांची आठवण केली. आता या भागात अशाच काही परदेशातील जागांना भेटी देऊया. परदेशात मी एक पथ्य नेमाने पाळतो, ते हे की भारतीय हॉटेल किंवा रेस्टॉरंटकडे मी बघतसुद्धा नाही. याचं कारण साधं आहे. मी जर एखाद्या देशात चार दिवस असेन तर मी तिथं ८ वेळा जेवणार असतो. त्यातलं एकही मला पुन्हा त्याच पंजाबी जेवणात वाया घालवायचं नसतं. म्हणून मग जेवायला जास्तीत जास्त वेळा मी कुठली तरी नवीन, त्या देशातली खास जागा शोधतो. नेहमी जाणाऱ्या देशात जर मी जाणार असेन आणि जर वेळ मिळाला तर नक्की चक्कर टाकणारच अशा जागा ठरलेल्या आहेत. माझ्या यादीत असे काही देश आहेत, की जिथं वारंवार जावं लागतं. 

त्यात सर्वप्रथम येतं इंग्लंड! १९९२ मध्ये पहिल्यांदा शिकायला म्हणून गेलो तेव्हापासून माझं आणि इंग्लंडचं काय नातं आहे ते समजत नाही पण तिथं दरवर्षी कमीत कमी ३-४ वेळा तरी जाणं होतच. त्या सुरवातीच्या काळात आमच्या BBC च्या ट्रेनिंग सेंटर शेजारीच ‘क्लब पार’ नावाचं इंग्लिश ब्रेकफास्ट देणारं छोटंसं हॉटेल होतं. नवरा, बायको आणि त्यांच्या २ अतिशय सुंदर मुली ते हॉटेल चालवायच्या. आजूबाजूला सगळं बिझनेस डिस्ट्रीक्ट असल्यानं आणि स्वागताला त्या २ सुंदर मुली यांच्यामुळं या हॉटेलमध्ये दुपारी जेवायच्या वेळी पाऊल ठेवायला जागा नसायची! BBC मध्ये ट्रेनिंग वर्कशॉप असलं,की सगळ्यांना तिथं BBC च्या खर्चानं जेवण असायचं. माझा मुक्काम बराच असल्यानं मी खूपच वेळा तिथं जायचो. अतिशय हसतमुख अशा त्या टिपिकल ब्रिटिश कुटुंबानं मला इंग्लिश ब्रेकफास्ट आणि इतर जेवणाची गोडी लावली. हा ब्रेकफास्ट फक्त नावाला! तो दिवसभर मिळू शकतो. इंग्लंडमधल्या मोठी शहरं तर सोडाच पण अगदी केम्ब्रिज, ऑक्सफर्ड, स्ट्रॅटफोर्डसारख्या लहान गावांतसुद्धा इंग्लिश ब्रेकफास्ट ही एक संस्था मानली जायची. साधारण परवडेल अशा दरात एग्स अँड बेकन, बीन्स, तळलेले बटाटे, मश्रुम्स, अर्धा भाजलेला टोमॅटो आणि सलामी किंवा सॉसेजेस... असं सगळं असलेली भरगच्च प्लेट आपल्यासमोर येते. बरोबर चहा किंवा कॉफी.. त्यातून अशा प्रत्येक हॉटेलचा आपला आपला बाज.. मी अनेक वेळा अगदी लहान गावातल्या छोट्या घरगुती हॉटेल्समध्ये उतरतो तेव्हासुद्धा त्या घरची गृहिणी सकाळीच कामाला लागलेली असते आणि सहा वाजल्यापासूनच ब्रेकफास्टचा घमघमाट सुटलेला असतो. 

बरेच लोक पाश्चिमात्य खाण्याला ‘सपक’ म्हणतात. पण त्याची वेगळी गोडी आहे. आपल्या सतत मसाल्यांना चटावलेल्या जिभेला हे थोड अळणी वाटावं हे साहजिक आहे. तीच गोष्ट जॅकेट पोटॅटोची! भला मोठ्ठा बटाटा ओव्हनमध्ये खरपूस भाजून घेतलेला असतो आणि मग त्यात ट्यूना, चिकन, चीज आणि काय वाट्टेल ते... अशी सगळी सारणं भरून हा बटाटा आपल्यासमोर येतो. इंग्लंडला गेलं की ब्रेकफास्ट रोजच कुठं तरी होतोच पण एकदातरी जॅकेट पोटॅटोचा वार लागलेला असतो. गेल्या वेळी खूप वर्षांनी ‘क्लब पार’ला गेलो होतो. अजून आहे तिथंच आहे. पण आता त्याची रया गेली आहे. चालवणारा क्रिस लीज आता म्हातारा झालाय.. त्याच्या सुंदर मुलीही लग्न करून सासरी गेल्यात.. आणि आता कोपऱ्या कोपऱ्यावर उघडलेल्या ‘प्रेट अँड मोन्गर’, ‘कोस्टा’सारख्या फास्टफूड कंपन्या झटपट ब्रेकफास्ट द्यायला लागल्यामुळं पारंपरिक हॉटेलचं गिऱ्हाईक खूपच कमी झालं आहे. आता ही संस्था संपते की काय.. अशी भीती त्याला वाटते.. एकेकाळी श्वास घ्यायला फुरसत नसणाऱ्या या हॉटेलात आता म्हातारा क्रिस आणि त्याची बायको बऱ्याचवेळा  गिऱ्हाईकांची वाट बघत बसलेले असतात.. 
००० 
दुसरा बऱ्याच वेळा जायला लागणार देश म्हणजे अर्थातच अमेरिका.. हा खरं तर जगातला सगळ्यात मोठ्ठा कम्युनिस्ट देश आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. इतका एका साच्यात जगणारा दुसरा देश सापडणं कठीण! प्रत्येक गोष्टींची तिथं चेन असते. किराणा मालाची दुकानं, पुस्तकाची दुकानं, गाड्या दुरुस्त करणारी दुकानं.. प्रत्येक गोष्ट एकसारखी त्याच नावानं प्रत्येक शहरात किंवा गावात मिळणारच.. मग खाण्यापिण्याची हॉटेल्स वेगळी काय असणार?.. बघावं तिथं हजारो मॅक्डोनाल्ड्स, बर्गरकिंग्स, वेन्डीज, फ्रायडेज, रीब्ज, आयहॉप्स आणि इतर बरीच... बरं सगळीकडं माल एकसारखाच मिळणार याची खात्री!! पण प्रॉब्लेम हा की आपल्या प्रत्येक चौकात वेगळी चव शोधणाऱ्या आपल्या भारतीय जिभेला हे कसं आवडायचं? अमेरिकेत शिकायला होतो, नवीन गोष्टी शोधायची आवड होती, शिष्यवृत्तीमुळं भरपूर प्रवास विनासायास होत होता... त्याच वेळी या चेनच्या भानगडीतूनसुद्धा आवडेल अशी जागा सापडली! अगदी अमेरिकन शेतकऱ्याच्या घरी जसं भोजन होतं तसंच देणारी ‘क्रॅकर बॅरल’ नावाच्या रेस्टॉरंट्सची चेन आहे. 

अमेरिकेत ६५० क्रॅकर बॅरल आहेत. म्हणजे जवळ जवळ प्रत्येक गावात.. अमेरिकेतल्या इतर रेस्टॉरंट्सपेक्षा इथली सजावटही वेगळी असते. गजांच्या खिडक्या. बाहेर मोठ्ठा व्हरांडा. त्यात ठेवलेल्या रॉकिंग चेअर्स म्हणजे डुलणाऱ्या खुर्च्या, काळसर लाकडातील इमारत. एकंदर सतत घाईगडबडीत असलेल्या अमेरिकेपेक्षा या जागेला थोडा निवांतपणा आहे हा भास निर्माण करणारी सजावट. बहुधा आत शिरताना आपण त्यांच्या स्टोअरमधूनच आत शिरतो. इथं ग्रामीण अमेरिकेत शोभतील अशा सगळ्या वस्तूंचे भांडार असते. अगदी नॉन ब्रँडेड साबणापासून ते लहान मुलांच्या झबली, अंगड्यापर्यंत सगळ्या वस्तू इथं हारीनं जुन्या पद्धतीनं मांडून ठेवलेल्या असतात. आत मध्ये थोडे जुनाट वाटणारे रेस्टॉरंट. भले मोठ्ठे.. शंभर तरी टेबलांचे. ‘क्रॅकर बॅरल’मध्ये जेवायला यायचं असेल तर एक नियम आहे, तो म्हणजे भरपूर भूक असेल तरच इथं या! एकतर अमेरिकन लोकांचं खाण्याचं प्रमाण प्रचंड असतं. ‘क्रॅकर बॅरल’मध्ये त्याला दोनानं गुणायचं. वाया जाण्याचं प्रमाणही प्रचंड.. पण त्याचं कोणालाच काही वाटत नसतं.  आपल्यावर ‘पानात काही टाकायचं नाही’ असे जे संस्कार लहानपणापासून झालेले असतात त्यामुळं सवय होईपर्यंत हे फार भयंकर वाटतं. समोर ज्या डिशेश येतात त्यात अक्षरशः अन्नाचे ढिगारे लागलेले असतात. आपल्या पोटाला तर तिथला खास लहान मुलांचा मेनूपण जास्त होईल; पण लाजेकाजेस्तव तो मागवता येत नाही! अमेरिकेतल्या दक्षिणेकडच्या लोकांच्या स्वयंपाकाचा बराच प्रभाव ‘क्रॅकर बॅरल’च्या मेन्यूमध्ये आहे. बराचसा भाग हा मांसाहारी! होम स्टाईल कंट्री कुकिंग मध्ये तब्बल अर्धा पौंड वजनाचा हॅम्बर्गर किंवा प्लेट गच्च भरलेले कंट्री चिकन समोर बघूनच माणूस आडवा होतो. त्यातून कोणी पट्टीचा खाणारा बरोबर असेल, तर अप्रतिम असे पॅनकेक्स किंवा आंबोळ्याही हव्यातच! इथलं जेवण अंगावर येतं पण इथलं वातावरण मला इतर जागांपेक्षा फार आवडतं म्हणूनच ‘समोर कितीही येवो’ आपण जपून जेवायचा निश्चय करून प्रत्येक अमेरिकावारीत एकदातरी मी ‘क्रॅकर बॅरल’चा योग जमवतोच! 
००० 
तिसरा आवडीचा देश तसा फारसे भारतीय न जाणारा देश आहे. ‘पोलंड.’ मी एका पाक्षिकात दुसऱ्या महायुद्धावर लेखमाला लिहीत होतो. त्यातल्या काही जागा तरी प्रत्यक्ष बघाव्यात म्हणून मी पोलिश टुरिझम खात्याला अशा प्रवासाला मदत मिळेल का? असं एक पत्र पाठवलं. उत्तर यायची आशा शून्य! पण आश्चर्य! एका आठवड्यात त्यांचं उत्तर आलं आणि वॉर्सा आणि क्रॅकोव या दोन ऐतिहासिक शहरांमधील माझा सगळा कार्यक्रम त्यांनी प्रायोजित केला! पहिल्यांदा गेलो आणि मी या देशाच्या प्रेमातच पडलो. फक्त रंग गोरा बाकी संपूर्णपणे आपल्यासारखेच लोक! शिष्टाचारांच्या फारसे भानगडीत न पडणारे, कधी फटकळ तर कधी प्रेमळ! नंतर बरेच वेळा वॉर्सा आणि क्रॅकोवला जाणं झालं. त्यामध्ये खाण्याच्या (चहा सोडून दुसरं काही पित नसल्यामुळं ‘खाण्या-पिण्या’च्या म्हणता येत नाही!) जागा सापडत गेल्या. त्यातली एक जागा म्हणजे मिल्क बार्स किंवा पोलिश भाषेत ‘बार म्लेझनी.’ 

सर्वसामान्य माणसांना दुधाचे पदार्थ माफक दारात मिळावेत म्हणून १८९४ मध्ये पोलंडमध्ये ‘मिल्क बार्स’ सुरू झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर पोलंड रशियाच्या कम्युनिस्ट राजवटीखाली गेला आणि बरीचशी चांगली रेस्टॉरंट्स बंद पडून हे ‘मिल्क बार्स’ फोफावले. सर्वसामान्य माणसाला सहज परवडेल अशा किमतीत अस्सल पोलिश खाद्यपदार्थ इथं मिळू लागले. १९९० नंतर रशियन राजवट गेली तरी बऱ्याचशा पोलिश शहरांमध्ये आजही असे ‘मिल्क बार्स’ सुरू आहेत. क्रॅकोवमध्ये हिंडताना शहराच्या अगदी मध्यभागी मला एक ‘बार म्लेझनी’ सापडला. अतिशय साधी सजावट असलेलं हे छोटेखानी हॉटेल आहे तरी कसं ते बघावं या कुतुहलापोटी मी आत शिरलो. आतमध्ये अगदी सामान्य वर्गातील स्थानिक लोक बसलेले होते. इथे पर्यटक फारसे येत नाहीत, त्यामुळं मेनू पोलिश भाषेत. समोर एक काउंटर. तिथं एक ललना बसलेली. शेजारी एक लहानशी खिडकी. ही ओरडून ऑर्डर देणार की लगेच त्या खिडकीतून आपली प्लेट बाहेर! वेळ थोडी गर्दीचीच होती. मी काय घ्यावं या विचारात होतो.. ती पोलिश भाषेत काहीतरी खेकसली.. भाषा कळत नसली तरी अविर्भावावरून ‘काय घ्यायचं ते लौकर घ्या आणि टळा’ असं काहीसं असावं! मी पण मग बोटांनी समोरच्या काचेच्या कपाटातला एक एक पदार्थ दाखवत बाजूला झालो. इथं सेल्फ सर्व्हिस असते. टेबल दाखवणं वगैरे प्रकार नाहीत. जी जागा मोकळी दिसेल तिथं जाऊन बसायचं. पण प्रत्येक पदार्थाची चव मात्र अस्सल पोलिश! बिटचं गुलाबी दाट किंवा डाळीचं ‘झुरेक’ नावाचं सुरेख सूप (कोटी भिकार असली तरी सूप खरोखर सुरेख असतं!), निरनिराळ्या प्रकारच्या उकडलेल्या करंज्या - पिरोजी.. (यात बटाट्यापासून सर्व प्रकारच्या मांसाहारापर्यंत सगळं भरून मिळतं!), इतर मांसाहारी प्रकार, पुडिंग्स हे प्रकार फक्त पोलंडमध्येच मिळतात.  शेजारी ठेवलेल्या ट्रे मधून एक ताकाचा ग्लास घ्यायचा आणि आपल्या जागेवर बसून जेवायला सुरुवात करायची. शेजारी कोणी बोलका मनुष्य असेल तर वेळ चांगला जातो आणि बरीचशी नवीन माहिती मिळते. पण एकंदरीत पोलिश माणसाला हसण्याचं वावडंच! आणि हे सगळं जेवण फक्त १० zloty मध्ये झालं! त्यावेळी एक zloty साधारण १२ रुपये होता. अजूनही मी जेव्हा जेव्हा पोलंडला जातो तेव्हा जास्तीत जास्त वेळा एखादा ‘मिल्क बार’ शोधून काढतो आणि तिथंच जेवायला जातो. नुसतं स्वस्त आहे म्हणून नाही, तर सामान्य पोलिश माणूस तिथं सहजपणे भेटतो म्हणून! 

तीच गोष्ट इथल्या ‘कुकिर्निया’ असं नाव धारण करणाऱ्या दुकानांची. इथं गोड पदार्थांची रेलचेल. पण त्यातही पोलंडच्या अनेक भागात ‘क्रेमाकी’ म्हणजे क्रीम केक मिळतो तो अजोड आहे. मऊ केक आणि मध्यभागी भरपूर क्रीम भरलेले हे केक जेवणानंतर हवेतच! याला जगात प्रसिद्धी मिळाली ती नव्वदीच्या दशकातले पोप जॉन पॉल यांच्यामुळं. क्रॅकोवजवळच्या वाडोविट्झा या खेड्यात त्यांच्या लहानपणी एका छोट्याशा दुकानात हे केक मिळायचे. पोप झाल्यावर त्यांनी एका मोठ्या भाषणात या केकचा उल्लेख केला आणि तेव्हापासून ‘क्रेमाकी’ म्हणजे पोलंडची ओळख झाले आहेत. 
००० 
एकंदरीत काय, तर खाद्यजीवन हा प्रवासाचा एक फार महत्त्वाचा घटक आहे. भारताबाहेर लाखो रुपये खर्च करून विदेश बघायला म्हणून जाणारे आणि तिथं रोज सकाळ संध्याकाळ वरण, भात, तूप, लिंबाची आठवण काढत झुरणारे बघितले, की मजा वाटते.  

पुढच्या भागात आणखी काही देशातल्या मला आवडणाऱ्या जागांबद्दल!

संबंधित बातम्या