सिंगापोरियन सफर...

संजय दाबके 
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

प्रवासातील बुरे-भले
प्रवास आनंददायक असतोच. त्यामुळं जग बघायला मिळतं, माणसं भेटतात, कुठल्याही परिस्थितीत कसं वागायचं याचं भान येतं... प्रवास माणसाला समृद्ध करतो. असे काही खास अनुभव...
संजय दाबके

सुव्हीनूर इटिंग - ४ 

‘सुव्हीनूर इटिंग’च्या मागच्या काही भागात आपण पश्चिमेतल्या देशांची खाद्यभ्रमंती केली. आता या भागात काही पूर्वेकडच्या देशांमधल्या तिथे गेल्यानंतर जायलाच पाहिजे अशा ठिकाणांची आठवण काढणार आहे. पूर्वेकडच्या देशांमध्ये माझा वारंवार प्रवास हा सिंगापूर, मलेशिया, थायलंड, हॉंगकॉंग आणि चीन या देशांमध्ये झाला आहे. जपान, कोरिया, फिलिपिन्स, इंडोनेशिया आणि कंबोडिया इथे जाऊन आलो आहे, पण तिथल्या संस्कृतीशी जवळून ओळख करून घेण्याइतका वेळ कामाच्या गडबडीत न मिळाल्याने या देशांबद्दल पुन्हा कधीतरी! 

भारतीय प्रवासी जेव्हा आंतरराष्ट्रीय प्रवासाला निघतो, तेव्हा पश्चिमेकडे अगदी मनासारखं खाणं मिळालं नाही - त्यातल्या त्यात शाकाहाऱ्यांना, तर फारसं बिघडत नाही याचं कारण बरीच भारतीय रेस्टॉरंट्स आहेत आणि काही ना काही पर्याय मिळून जातात. पण पूर्वेकडच्या देशात बहुधा ९५ टक्के पदार्थ हे मांसाहारी.. आणि त्यातही ते मांस कसलं असेल ते सांगता येणार नाही अशी स्थिती.. (गमतीत चिनी माणूस तर सरपटणारा किंवा उडणारा एकही प्राणी सोडत नाही असे म्हणतात!) त्यामुळे बरेच भारतीय पर्यटक या देशांमध्ये आपले खूप हाल करून घेतात. त्यातून चिनी भाषा! आपल्याला नेमकं काय हवंय ते त्यांना नीट समजावून सांगेपर्यंत जीव जायची पाळी येते याचा मी अनेकदा साक्षीदार झालेलो आहे! 

मी गेली १७-१८ वर्षे तरी या भागात हिंडतो आहे. सुरवाती सुरवातीला नवीन उत्सुकता म्हणून बरीच वर्षं तिथले मित्र म्हणतील ते ते आवडीने स्वाहा करत गेलो. त्यातले बरेचसे खाद्यपदार्थ आवडलेसुद्धा. पण नंतर नंतर (म्हणजे खूप वर्षांनी!) सगळीकडं कोंदून राहिलेला तो चिनी सॉस आणि मसाल्यांचा वास आपल्या अंगावर यायला लागतो. आपण साधं सोपं असं काही शोधायला लागतो. बऱ्याचशा पर्यटकांची ही अवस्था पहिल्याच प्रवासात होते. त्यांच्यासाठी म्हणून हा लेख. 

सिंगापूर हा त्यातल्या त्यात अगदी साधा सोपा देश! इथं चिनी, मलेशियन आणि भारतीय लोकांची भाऊगर्दी आहे. चिनी अर्थातच ७० टक्के; पण मलेशियन आणि भारतीयही कमी नाहीत! त्यातूनही भारतीयांमध्ये इथं तामीळ लोकसंख्या भरपूर आहे. इतकी की सिंगापूरची तिसरी अधिकृत भाषा ही तामीळ आहे. साहजिकच हे लोक आपल्याबरोबर आपली संस्कृती, दुकानं, हॉटेलं सगळं बरोबर घेऊन आलेले आहेत. ‘लिट्ल इंडिया’ ही सेरंगून रस्त्याच्या दुतर्फा तयार झालेली वस्ती त्याचीच साक्ष देते. भारतात मिळणारी एकही वस्तू इथं नसेल, जी या ‘लिट्ल इंडिया’त मिळत नाही. तरीही भारतीय पर्यटकांची आलेली एकही टूर इथं येऊन याच वस्तूंची सिंगापूर डॉलर्स देऊन खच्चून खरेदी केल्याशिवाय पूर्ण होत नाही. इथलं मुस्तफा सेंटर म्हणजे तर पर्यटकांचा स्वर्ग! या भव्य स्टोअरमधून ट्रॉल्याच्या ट्रॉल्या भरून माल भारतीय पर्यटक खरेदी करत असतात आणि भारतात परत जाताना विमानात वाढीव सामानाचे दाम दुप्पट दरानं मोजून भारतात परतत असतात. हौसेला मोल नसतं हेच खरं! 

माझ्यासाठी मात्र हा ‘सेरंगून रोड’ म्हणजे कामाच्या नंतर मोकळा वेळ फिरण्यात घालवण्याची आणि सगळीकडं मिळणाऱ्या चिनी जेवणाला पर्याय म्हणून इथल्या काही दाक्षिणात्य हॉटेलात भोजन करण्याची जागा आहे. त्यातही अगदी मुस्तफा सेंटरच्या समोरच्या कोपऱ्यावर असलेलं उस्मान चाचाचं हॉटेल माझं सगळ्यात आवडतं! इथं केरळी पद्धतीचं उत्कृष्ट सामिष/नामिष भोजन अतिशय माफक दारात मिळतं. खास शाकाहारी लोकांसाठी अगदी जुनं असं ‘सर्वान्ना’ भुवनही इथून जवळच आहे. थोडक्यात सिंगापूरला जाऊन भारतीय भोजन जर पाहिजे असेल तर ‘सेरंगून रोड’ला पर्याय नाही! 

सिंगापूर हे शहर खरंतर चालत जायचं शहर आहे इतकी सगळी अंतरं जवळ जवळ आहेत. सेरंगून रोडपासून जवळच, म्हणजे सुमारे एक - दोन किलोमीटर अंतरावर मलेशियन लोकांची वस्ती आहे... ‘कॅमपॉंग ग्लॅम’... म्हणजे छोटंसं खेडं! इथं सगळी मलेशियन पद्धतीची दुमजली घरं आहेत. खाली दुकान, वर मकान पद्धतीची. शे-दोनशे वर्षांपूर्वी मलेशियन प्रवासी जे इथं आले त्यांनी सिंगापूरच्या या कोपऱ्यात वस्ती केली. सिंगापूरच्या पर्यटन खात्यानं अतिशय हुशारीनं अशा सगळ्या जागांचे टुरिस्ट स्पॉट्स बनवले आहेत. मलेशिया हा मुस्लीम बहुसंख्याक देश. अर्थातच या ‘कॅमपॉंग ग्लॅम’च्या मध्यभागी एक सुंदर मशीद आहे. आजूबाजूला अर्थातच अनेक मलेशियन खाद्यपदार्थ देणारी हॉटेलं.. हॉटेलं कसली? छोट्या छोट्या टपऱ्याच! मलेशियन जेवणात भात आणि मासे यांचा जोर. या जेवणाला ‘नासी कंदर’ असं नाव आहे. प्रत्येक हॉटेलात समोर काचेच्या कपाटात स्वच्छ ट्रेजमध्ये अनेकानेक शाकाहारी - मांसाहारी खाद्यपदार्थ आकर्षकपणे मांडून ठेवलेले असतात. आपण एक मोकळी डिश घेऊन त्यातले पाहिजे ते घ्यायचे. बरोबर भात असतोच. जितकं घेतलं असेल त्याचे पैसे द्यायचे. मसाले साधारण दाक्षिणात्यांच्या जवळ जाणारे; पण तिरफळाचा जरा जास्त वापर असलेले. समोर प्लॅस्टिकच्या टेबल खुर्च्या टाकलेल्या असतात. इथं रस्त्यावरची गर्दी बघत जेवायला मला अतिशय आवडतं. 

सिंगापूरला हिंडताना कुठल्याही गल्लीबोळात अगदी स्वस्तात उत्तम चहा मिळतो. एका डॉलरपेक्षा कमी किमतीत, एखाद्या काचेच्या मगमध्ये चहाचा अर्क, गरम पाणी आणि कंडेन्स्ड दूध भरपूर ओतलेला हा सिंगापुरी चहा मला आवडतो. सिंगापूरला गेल्यावर चुकवायची नाही अशी आणखी एक जागा म्हणजे ‘चायना टाऊन’! सिंगापूरच्या पूर्व भागात वसलेला हा चिनी अड्डा! मंदिर गल्ली, मस्जिद गल्ली आणि स्मिथ गल्ली अशा  
तीन गल्ल्यांमध्ये थाटलेली लाखो वस्तूंची दुकानं! यात टी शर्टस, घड्याळे मुख्य; पण इतरही प्रचंड विविधता असलेला माल भरलेली दुकानं. पर्यटकांची गर्दी तर इथं सकाळपासूनच सुरू होते. सिंगापूरची हवा बारा महिने दमट. सतत घाम.. पण पर्यटकांचा या गल्ल्यांमध्ये हिंडतानाचा उत्साह विचारू नका. यातच मधे मधे असलेली चिनी हॉटेलं किंवा अगदी उघड्यावर मांडलेल्या टपऱ्या. टायगर बिअरच्या बाटल्यांच्या बाटल्या रिचवत प्लॅस्टिकच्या स्टुलांवर इथं उघडेबंब प्रवासी टेबलं अडवून बसलेले असतात. त्यांना झटपट, म्हणजे अगदी वाऱ्याच्या वेगानं हातातल्या खाद्यपेयांनी खच्चून भरलेल्या ‘ट्रे’जना लीलया नाचवत सर्व्ह करणाऱ्या चिनी मुली! एक तर चिनी भाषा ही अशी आहे, की प्रेमानी जरी कोणी बोलत असेल तरी कडाकडा भांडल्याचा भास होतो! इथं तर या हॉटेलातल्या सगळ्यांचाच चिनी भाषेतला आरडा ओरडा.. आजूबाजूच्या चिनी किराणा माल विकणाऱ्या दुकानांमधून बाहेर मांडून ठेवलेल्या वस्तू.. त्यांचे उग्र वास.. दुपारचे रणरणते ऊन.. या सगळ्यामधून एक विलक्षण वातावरणनिर्मिती होते.. ती अनुभवायला ‘चायना टाऊन’मध्ये जायलाच हवं. मी कधी इच्छा झाली आणि एखादं टेबल चुकून मिळालंच तर इथं कुठंतरी माफक भोजन करतो. पण ‘चायना टाऊन’मध्ये जायचं माझं कारण म्हणजे तिथं एक वेगळंच ठिकाण आहे!

‘टॉंग हेंग डेलिकसीज’ नावाचं एक चिनी ठिकाण जिथं फक्त गोड पदार्थ मिळतात. ‘चायना टाऊन’मध्ये जेवण करा किंवा ना करा, या ‘टॉंग हेंग डेलिकसीज’ला भेट देणं मस्ट आहे. त्यातही तिथं मिळणारा ‘शेंडॉल’ नावाचा मूळचा मलेशियन असलेला आइस्क्रीमसदृश पदार्थ म्हणजे केवळ अद्वितीय आहे! हा मी मलेशियामध्ये गाडीवर  खाल्ला आहे. आपल्याकडे जसे बर्फाचे गोळे मशीनवर बर्फ तासून बारीक करून देतात, तसाच हा प्रकार फक्त आइस्क्रीमच्या जवळ जाणारा.. पामच्या म्हणजे माडाच्या अगदी फिक्क्या साखरेत बनवलेला हा आइस्क्रीमचा डोंगर या ‘टॉंग हेंग डेलिकसीज’मध्ये जसा तुमच्यासमोर येतो तसा कुठंही अगदी मलेशियातसुद्धा मला सापडलेला नाही. 

हे झाले सगळे रोडसाईड प्रकार! रस्त्यावरचे ‘स्वस्त आणि मस्त’ या कॅटॅगरीतले! एक गोष्ट मात्र नक्की सांगायला पाहिजे ती म्हणजे सिंगापूरमध्ये तुम्ही कठंही खा.. स्वच्छता असणारच!.. त्यामुळं त्याबाबतीत घाबरायचं कारणच नाही. पण तरीही ज्यांना उत्तम दर्जाच्या रेस्टॉरंटमध्येच भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी सिंगापूरच्या पर्यटन खात्यानं उत्कृष्ट दर्जाच्या रेस्टॉरंट्सची एक टेकडीच वसवली आहे. सिंगापूरचं एक प्रचंड कौतुक आहे, की पर्यटन हा आपल्या चिमुकल्या देशाचा कणा आहे हे उमजून त्यांनी या छोटेखानी शहराच्या कानाकोपऱ्यात अशा सुंदर जागा निर्माण केल्या आहेत. तिथं जगभरातले पर्यटक येऊन वर्षभर पैसे उधळत असतात! 

सिंगापूर शहराच्या उत्तरेला ‘डेम्प्से हिल’ या नावानं प्रसिद्ध असलेली ही पर्वतीपेक्षा बुटकी टेकडी आज जगभरातल्या खवय्यांचा अड्डा झाली आहे. जगातला एक देश नसेल, की त्या देशाचे खाद्यपदार्थ देणारं रेस्टॉरंट या टेकडीवर नाही. तुम्ही मनात आणा ते खाद्य या टेकडीवर हजर आहे. बरं नुसतं ते नाही, तर त्या त्या देशाचं किराणा माल विकणारं दुकानसुद्धा शेजारी आहे. समजा तुम्हाला एखाद्या देशाचा एखादा पदार्थ आवडला, तर तात्काळ त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी खरेदी करा, पाककृती हॉटेलमधून समजून घ्या आणि घरी प्रयत्न करा. ऑस्ट्रेलियापासून स्कँडिनेव्हियन देशांपर्यंत जगातल्या कुठल्याही गोष्टी, त्यासुद्धा अगदी नामांकित कंपन्यांच्या.. इथं सहज मिळतात. तुमच्याकडं फक्त चांगलं भक्कम क्रेडिट कार्ड पाहिजे! 

पुढच्या भागात क्वालालंपूर (मलेशिया), हॉंगकॉंग आणि चीनमध्ये फेरफटका मारून येऊ..

संबंधित बातम्या