मोहीम माउंट कांचनजुंगा 

भूषण हर्षे 
सोमवार, 17 जून 2019

कव्हर स्टोरी
‘कांचनजुंगा इको एक्‍स्पिडिशन २०१९’ ही ‘गिरीप्रेमी’ची महत्त्वाकांक्षी मोहीम होती. १५ मे २०१९ च्या पहाटे साडेपाच - सहाच्या दरम्यान ‘गिरीप्रेमी’च्या दहा शिलेदारांनी कांचनजुंगा शिखरावर भारतीय तिरंगा फडकवला. उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली आशिष माने, रूपेश खोपडे, भूषण हर्षे, आनंद माळी, प्रसाद जोशी, कृष्णा ढोकले, डॉ. सुमीत मांदळे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर आणि जितेंद्र गवारे यांनी शिखरावर चढाई केली. या मोहिमेदरम्यान केवळ ‘गिरीप्रेमी’चेच नाही तर ३० लोकांच्या जागतिक मोहिमेचे नेतृत्वही श्री. झिरपे यांनी केले. या चढाईचे सविस्तर वर्णन...

एव्हरेस्टच्या २०१३ च्या मोहिमेनंतर तब्बल सहा वर्षांनी पुन्हा एकदा तितक्‍याच मोठ्या आणि आव्हानात्मक शिखराच्या मोहिमेला जाण्याची संधी मला मिळाली. गिरीप्रेमीच्या ‘माउंट कांचनजुंगा इको एक्‍स्पिडीशन २०१९’च्या संघामध्ये माझी निवड झाली व आणखी एका उंचीवरच्या स्वप्नाकडे वाटचाल सुरू झाली. एव्हरेस्ट, ल्होत्से, मकालू, चो ओयु, धौलागिरी, मनास्लू या सहा यशस्वी अष्टहजारी मोहिमांनंतर पुन्हा एकदा मामा अर्थात उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली आमचा दहा गिर्यारोहकांचा संघ काठमांडूत दाखल झाला... आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोहीम काठमांडूहून निघाली. 

कांचनजुंगा शिखर हे गिर्यारोहणातील एक अवघड आव्हान समजले जाते. आजवरच्या इतिहासात कांचनजुंगा शिखरावर यशस्वी चढाई करण्यात खूपच कमी गिर्यारोहकांना यश मिळाले आहे. कित्येक मोसमात तर दोन-दोन महिने प्रयत्न करूनदेखील एकही गिर्यारोहक माथ्यापर्यंत पोचू शकलेला नाही. बऱ्याचदा गिर्यारोहकांना अतिउंचीवरील आजार आणि काही प्रसंगी मृत्यूलाही सामोरे जावे लागले आहे. भारतातून अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्‍याच मोहिमा आजवर या शिखराकडे वळल्या. महाराष्ट्रातून तर केवळ एकच मोहीम यापूर्वी कांचनजुंगावर आयोजित झाली होती. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे आणि भारतातील सर्वांत उंच असणारे हे शिखर चढाईसाठी अवघड असण्याला अनेक कारणे आहेत. समुद्रसपाटीपासून ८ हजार मीटरच्या वर म्हणजे २६ हजार फुटांच्या वर ज्याठिकाणी प्राणवायूचे प्रमाण अत्यल्प असते, वाऱ्याचा वेग ताशी १०० ते १२० किलोमीटर इतका असतो, तापमान -४० पेक्षा कमी असते, अशा ठिकाणी जेव्हा हातात फेदरचे (पिसांचे) जाडजूड हातमोजे आणि पायात खिळ्यांचे crampon घालून प्रस्तरारोहण करावे लागते, त्यावेळी प्रत्येक पावलागणिक गिर्यारोहकाचा कस आजमावला जातो. तसेच या शिखरावरील आणखी एक अवघड आव्हान म्हणजे, शेवटच्या टप्प्यातील चढाईला लागणारा वेळ. आजवर कित्येक गिर्यारोहकांना शेवटच्या कॅंपवरून माथा गाठून परत कॅंपवर यायला २४ ते २७ तास इतका कालावधी लागला आहे. इतका वेळ प्रतिकूल हवामानात आणि ८ हजार मीटरच्या उंचीवर घालवल्याने प्राणवायूचा पुरवठा संपून किंवा अंगातील त्राण संपून अनेक गिर्यारोहकांनी इथे प्राण गमावले आहेत. 

या सगळ्या आव्हानांची झलक आम्हाला बेस कॅंपला पोचेपर्यंतच मिळाली. बेस कॅंपला पोचण्यासाठी आम्हाला तब्बल १० दिवसांचा आणि ९० किलोमीटरचा ट्रेक करावा लागला. तसे आमच्या सर्वांसाठी ट्रेक करणे म्हणजे सवयीचे, परंतु शेवटच्या दिवशीचा पल्ला हा आमच्यासाठी चांगलाच अवघड गेला. पायामध्ये साधे ट्रेकिंग शूज घालून अचानक झालेल्या सुमारे एक दीड फूट बर्फातून चालताना पाय इतके थंड पडले होते, की ‘इथेच मोहीम संपते का काय’ असे मला अनेकदा वाटून गेले. सकाळी ६ वाजता आम्ही चालायला सुरुवात केली होती आणि दुपारचे ३ वाजले तरी बेस कॅंप दिसत नव्हता. त्यात संपूर्ण खोरे ढगांनी व्यापले होते आणि काही वेळात जोरदार वाऱ्यासह बर्फवृष्टीही चालू झाली. आम्ही एका ठिकाणी दम खायला दोन मिनिटे दगडावर टेकलो, अचानक ढग हटले आणि समोरच्या डोंगरावर बऱ्यापैकी उंचावर काही टेंट आणि मानवी आकृती दिसू लागल्या. कॅंपचे ठिकाण बघून आम्हा सर्वांना वाटले, की हा कदाचित कांचनजुंगाचा कॅंप असावा. पण जेव्हा शेर्पांकडून कळले, की हा तर बेस कॅंप आहे, तेव्हा माझ्या तर पायातले त्राणच गेल्यासारखे झाले. बेस कॅंपला पोचण्यासाठी आम्हाला आता हा साधारण सिंहगडाच्या उंचीचा डोंगर चढावा लागणार होता... आणि हे नुसते चालणे किंवा चढणे नव्हते; वाटेत rock fall area आणि सुमारे २०० फुटांचा ७० ते ८० अंश कोनातील प्रस्तरारोहणाचा टप्पा पार करायचा होता. समुद्रसपाटीपासून १८ हजार फुटांवर वसलेल्या बेसकॅंपला पोचता पोचता आम्हाला संध्याकाळचे साडे चार वाजले; म्हणजे सुमारे १० तास आम्ही सलग चालत होतो. ‘बेस कॅंपचीच जर ही कथा; तर पुढची आव्हाने कशी असतील!’ या विचाराने दोन दिवस नीट झोपही लागली नाही. 

बेस कॅंपला पोचून तीन दिवस झाले होते. हळूहळू आम्ही बेस कॅंपला सरावलो. दुपारी जेवण झाल्यावर सर्वजण गप्पा मारत बसलेलो असताना कसला तरी स्फोट झाल्याचा मोठा आवाज झाला. आम्ही सगळे त्या आवाजाने दचकलो आणि पळतच टेंटच्या बाहेर आलो. बघितले तर एका टेंटच्या भोवती बऱ्याच शेर्पांचा घोळका जमलेला; जवळ जाऊन बघितले तर त्या टेंटच्या कापडाच्या चिंध्या चिंध्या झालेल्या फक्त पोल्स उभे दिसत होते आणि आत ठेवलेल्या sleeping bag ची पिसे हवेमध्ये उडत होती. नक्की काय झाले असेल या विचाराने माझ्या काळजात धस्स झाले. माझ्या गिर्यारोहणाच्या इतक्‍या वर्षांत प्रथमच असले दृश्‍य मी पाहत होतो. नीट पाहिल्यावर समजले, की कृत्रिम प्राणवायूचे २ सिलिंडर एका शेर्पाने टेंटमध्ये ठेवले होते आणि ऊन वाढल्याने टेंटच्या आतले तापमान वाढून त्यापैकी एक सिलिंडर फुटला होता. त्या सिलिंडरच्या स्फोटात दुसरा सिलिंडरदेखील उडून गेला आणि गडगडत दरीत पडला. नशीब म्हणजे टेंटमध्ये किंवा जवळपास कोणी गिर्यारोहक किंवा शेर्पा नव्हता. त्यामुळे कोणाला काही इजा झाली नाही. परंतु त्या आवाजाने आणि धक्‍क्‍याने थोडा वेळ सारा बेसकॅंप स्तब्ध झाला होता. 

बेस कॅंपवरची पूजा पार पडली आणि आम्ही कॅंप १ आणि २ साठीची पहिली फेरी सुरू केली. या मार्गात दोन अवघड टप्प्यांतून जीव मुठीत धरून जावे लागले. पहिला टप्पा म्हणजे ९० अंश कोनापेक्षा जास्त असे अंगावर आलेले Hanging Glacier. एक तर सहा हजार मीटर इतक्‍या उंचीवर असल्याने तिथे चालण्याचा वेग खूपच मंदावलेला असतो. त्यात वर बघितले, की समोर दिसणारे अजस्र Glacier बघून प्रचंड भीती वाटत होती. यातला बर्फाचा छोटासा तुकडा जरी तुटून पडला, तरी तो आमच्या संपूर्ण संघाला खाली वाहून न्यायला पुरेसा होता. त्यामुळे ‘हे Glacier तुटणार नाही’ असा ठाम विश्‍वास ठेवत आणि तो विश्‍वास सार्थ ठरो, असा देवाकडे धावा करत हा टप्पा पार केला. पण इतक्‍यात परीक्षा संपणार नव्हती.. इथून पुढे आणखी अवघड आव्हान आमचे स्वागत करायला सज्ज होते. ते म्हणजे, Rock fall! बापरे, माझा आणि Rock fall चा तर चांगलाच ऋणानुबंध आहे. २०१० च्या देवतिब्बा मोहिमेत खूप मोठा Rock fall डोळ्यांनी बघितला होता, २०१२ च्या एव्हरेस्ट मोहिमेत तर डोक्‍यात दगड पडून मला मोहीम सोडावी लागली होती. २०१३ मध्येदेखील एक मोठा दगड माझ्या आणि आनंदच्या मधून गडगडत गेला होता. इथे तर हा टप्पाच Rock fall चा होता. देवाचे नाव घेत पाऊल पुढे टाकले. एकाने वर दगड पडतोय का याकडे लक्ष ठेवायचे आणि दुसऱ्याने पळत ते अंतर पार करायचे असे करावे लागणार होते. मी अर्धा टप्पा पार केला आणि आनंदचा आवाज ऐकू आला, ‘भूषण, Watch the Rock’.. आणि दुसऱ्या क्षणी भले मोठे दगड कोसळल्याचा आवाज आला. मी अक्षरशः जीव मुठीत धरून जोरात पळालो आणि समोर सुमारे १०-१५ फुटांवर दिसणाऱ्या बर्फाच्या उतारावर उडी मारली. लहानपणी शाळेत Long Jump बरेचदा केली, पण ही उडी बहुधा माझ्या आजवरच्या आयुष्यातली सगळ्यात लांब उडी असेल. दगड चुकविण्यासाठी मी त्या बर्फात झोपलो आणि सुदैवाने त्या दिव्यातून पार झालो. जेव्हा त्या धक्‍क्‍यातून सावरून आनंदपाशी पोचलो, तेव्हा मी आणि तो दोघेही काहीच बोलू शकलो नाही. केवळ नजरेतूनच ‘वाचलो!!’ या विचाराची देवाणघेवाण झाली आणि आम्ही पुन्हा चालू लागलो. पुढे कॅंप २ आणि ३ पर्यंत चढाई करून आम्ही बेसकॅंपवर परतलो. 

बेस कॅंपवरचा आमचा तो पंचविसावा दिवस होता आणि घरातून निघून जवळपास दीड महिना लोटला होता. आता आम्हाला प्रतीक्षा होती ती चांगल्या हवामानाची. १३-१४ मे हे दोन दिवस चांगले असल्याचे सगळ्या वेदर रिपोर्टमधून समोर आले. अखेर ११ मे रोजी आम्ही अंतिम चढाईसाठी बेस कॅंप सोडला. पुन्हा एकदा देवाचे नाव घेत Rock fall चा टप्पा पार केला. कॅंप २ ला एक मुक्काम करून आम्ही दुसऱ्या दिवशी कॅंप ३ ला जाणार होतो. परंतु, रात्री वातावरण चांगलेच खराब झाले. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आणि जोरदार वादळ सुरू झाले. टेंट जोरजोरात फडफडू लागले. बाहेर सगळीकडे बर्फ उडू लागला. बाहेर पडणे अशक्‍य होऊन गेले आणि थोड्या वेळात तर सह्याद्रीमध्ये वळवाचा पाऊस पडताना जशा विजा कडाडतात तसा विजांचा आणि बर्फाचा खेळ सुरू झाला. आता सर्वांनाच पुढच्या चढाईची चिंता वाटू लागली. परंतु मामांनी बेस कॅंपवरून १५ तारखेला म्हणजेच आणखी एक दिवस वातावरण चांगले राहणार असल्याचा ताजा रिपोर्ट कळविला आणि आम्हाला कॅंप २ ला सुखाने झोप लागली. दुसरा दिवसही कॅंप २ ला मुक्काम करून आम्ही ठरल्याप्रमाणे १३ तारखेला कॅंप ३ आणि १४ तारखेला कॅंप ४ गाठला. कॅंप ४ च्या पुढे मात्र आमचा खरा कस लागणार होता. 

चौदा मे संध्याकाळी ५ वाजता कॅंप ४ चे विश्‍व खूपच वेगळे भासत होते. ‘गिरीप्रेमी’चे आम्ही १० गिर्यारोहक, इतर संघांचे-देश-विदेशातील सुमारे १५ गिर्यारोहक आणि सर्व शेर्पा, सर्वांमध्ये एक वेगळेच चैतन्य संचारले होते. कोणी बूट घालत होते, कोणी Crampon, तर कोणी हार्नेस तपासून बघत होते. कोणी आपल्या बॅगमध्ये पुरेसे पाणी असल्याची खात्री करत होते, तर कोणी आपापल्या शेर्पाकडून प्राणवायूचा सिलिंडर आणि मास्क तपासून घेत होते. एखाद्या मंगलप्रसंगी मुहूर्त जवळ आल्यावर जशी लगबग सुरू होते तसाच काहीसा कॅंप ४ भासत होता. मीदेखील माझा सहकारी पासांग शेर्पा याच्यासोबतीने निघण्यासाठी सज्ज झालो. टेंटच्या बाहेर आलो तर समजले, की आमच्या ‘गिरीप्रेमी’च्या सर्व सदस्यांनी नुकतीच चालायला सुरुवात केली होती. तरी एकदा कोणी ‘गिरीप्रेमी’चा सदस्य टेंटमध्ये नसल्याची खात्री केली आणि कांचनजुंगा पर्वतमातेला अभिवादन करून मी आणि पासांग शेर्पा आमच्या अंतिम ध्येयाकडे मार्गस्थ झालो... 

पहिले दोन तास गुडघ्याइतक्‍या बर्फातून चालता चालता पुढची चढाई किती अवघड असेल याची प्रचिती आली आणि आजवर गिर्यारोहकांना माथा गाठून परत यायला २४ तास का आणि कसे लागले असतील याचीसुद्धा कल्पना आली. थोड्या वेळाने अंधार पडला, माझ्या पुढे आणि मागे हेड टॉर्चची रांग दिसू लागली. नजर आणि समोर दिसणाऱ्या मार्गाची कक्षा आता केवळ हेड टॉर्चच्या प्रकाशापुरती सीमित झाली. त्यामुळे खाली मान घालून, पावले मोजत चालत राहणे हा एकच पर्याय उरला होता. मधून मधून घड्याळ बघून समजत होते, की आपण सलग अनेक तास चालतो आहोत. वाटेत एक एक टप्पा पार होत होता आणि चढाईतील खडतरपणा वाढतच होता. सुमारे ७८०० मीटरवर समोर उभी ठाकलेली Rock chimney पार करताना एव्हरेस्टच्या हिलरी स्टेपची आठवण झाली. Crampon पायात असताना कातळावरून चालताना अतिशय काळजीपूर्वक चालावे लागत होते. Chimney पार झाल्यावर वाटेत एकदा पाणी पिण्यासाठी थांबलो. तीन थर्मास आणि पाण्याच्या २ बाटल्या अशा पाच लिटरपैकी दोन थर्मास आणि दोन बाटल्यांची झाकणे उणे तापमानामुळे गोठून गेली होती. सुदैवाने एका थर्मासचे झाकण उघडू शकले आणि काही पाण्याचे घोट नशिबी आले. रात्री सुमारे १ वाजता पासांग शेर्पाने पुन्हा मला थांबण्याची खूण केली. आम्ही थांबलो आणि आमचा दोघांचा ऑक्‍सिजन सिलिंडर बदलला. आता हा सिलिंडर अजून ७ तास चालेल असे आमचे गणित होते. कॅंप ४ हून निघाल्यापासून देवाकडे एकच प्रार्थना करत होतो, की २०१३ च्या एव्हरेस्टच्या अंतिम चढाईसारखे वारे आणि थंडी नसावी. कारण एव्हरेस्टची अंतिम चढाई १४ तासांची होती. परंतु, ही चढाई कमीत कमी २० ते २१ तास चालणार होती. त्यामुळे तेव्हासारखे वारे जर इथे लागले असते, तर मात्र आमचे काही खरे नव्हते. कारण तशा वाऱ्यात तापमान झपाट्याने खाली जाते आणि Frost bite अर्थात हिमदंशासारखे आजार हमखास होतात. यावेळी देवाने आणि कांचनजुंगेने माझी प्रार्थना ऐकली होती. चढाई सुरू करताना आलेले ढगही आता नाहीसे झाले होते आणि वारेदेखील पडले होते. पण जसजशी रात्र पहाटेकडे सरकू लागली, तसतशी थंडी जाणवू लागली. हातापायांची बोटे गार पडायला सुरुवात झाली. आता चालायचा वेग थोडा वाढवणे भाग होते. पण मनातून कितीही ठरवले तरी समोरच्या एका गिर्यारोहकाला Overtake करून पुढे जायचे म्हणजे उसने बळ आणावे लागत होते... आणि एक Overtake केला, की दुप्पट विश्रांती घ्यावी लागत होती. अखेर पहाटे ३ च्या सुमाराला आम्ही ‘ओम मोराल’ या ठिकाणी पोचलो. जसे एडमंड हिलरी यांच्या नावावरून ‘हिलरी स्टेप’ हे नाव पडले. तसा ‘ओम मोराल’ नावामागेदेखील एका गिर्यारोहकाचा याठिकाणी मुक्काम करून जिवंत परत आल्याचा इतिहास आहे. आम्ही बेस कॅंपपासून ऐकत होतो, की एकदा इथे पोचलो, की Summit नक्की होणार! आणि अखेर आम्ही इथवर मजल मारली होती. आता काही तासांचाच अवकाश आणि गेली दोन वर्षे बघितलेले स्वप्न सत्यात उतरणार होते. मनात आनंदाची एक लाट उसळली, पण दुसऱ्याच क्षणी ब्रेक लागल्यासारखे झाले. Torch च्या प्रकाशात पुढचा जो काही मार्ग नजरेच्या टप्प्यात आला, तो चढाईसाठी अशक्‍यप्राय वाटत होता. तिरक्‍या, उभ्या, ओबडधोबड कातळावरून ज्यावर मधेच कुठेतरी टणक आणि मऊ बर्फ असे मिश्रण होते, त्यावरून चढावे आणि उतरावे लागत होते. हे सगळे करताना उजव्या हाताला सतत आठ-दहा हजार फुटांची खोल दरी होती, जी आम्हाला रात्रीच्या अंधारात दिसत नव्हती. थोड्या वेळात उजाडू लागले आणि काही अंतरावर दिसणारा कांचनजुंगा शिखराचा माथा आता डोळ्यांना सुखावू लागला. पण जी दरी इतका वेळ दिसत नव्हती, तीही आता दिसू लागली आणि या २७ हजार फुटांवरच्या प्रस्तारारोहणातील भेदकता अधिक प्रकर्षाने जाणवू लागली. माथा गाठण्याच्या आनंदापेक्षा ‘चढतो तर आहे पण इथून खाली कसे उतरायचे?’ या विचारांनी जास्त दडपण आले. 

अखेर १५ मे २०१९, सकाळी साडेपाच! माझा माझ्या स्वतःवर विश्‍वास बसत नव्हता. सूर्याची पहिली किरणे चेहऱ्यावर पडली. नेपाळचा झेंडा आणि प्रार्थनावस्त्र (Prayer Flags) धारण केलेला कांचनजुंगा शिखराचा माथा अक्षरशः दहा पावलांवर होता. एका वेगळ्याच ऊर्जेने, वेगळ्याच उत्साहाने आणि अवर्णनीय आनंदाने स्तब्ध व्हायला झाले. डोळे आपोआप भरून आले. आजवरचा थकवा आणि शीण आनंदाश्रूंच्या रूपाने वाहून गेला. मीही बरोबर नेलेली प्रार्थनावस्त्र माथ्यावर वाहून एव्हरेस्टनंतर इतक्‍या वर्षांनी मला इथवर येण्याची शारीरिक आणि मानसिक ताकद दिल्याबद्दल कांचनजुंगाचे मनापासून आभार मानले. भारताचा तिरंगा फडकावून एक फोटो काढला. आजूबाजूचे सगळे वातावरण स्वच्छ होते. यालुंग खांग, कांग्बाचेन, कुंभकर्ण, काब्रू ही शिखरे सकाळच्या सोनेरी सूर्यप्रकाशात न्हाली होती. लांब क्षितिजावर दिसणारे एव्हरेस्ट, ल्होत्से, मकालू इतक्‍या लांबूनदेखील नजरेत भरत होते. जगातील तिसऱ्या आणि भारतातील सर्वांत उंच शिखरावरून भवतालच्या जगाकडे बघण्याचा आनंद काही औरच होता...! हे क्षण कधी संपूच नयेत असे वाटत होते. पण अधिक वेळ ८५८६ मीटरवर थांबणेही शक्‍य नव्हते. त्यामुळे शेवटी शिखरमाथ्याला अभिवादन करून आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. 

‘गिरीप्रेमी’च्या दहाच्या दहा गिर्यारोहकांनी माथा गाठला. भारताचा तिरंगा तब्बल दहा वेळा जगातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या शिखराच्या माथ्यावर फडकला. एका दिवशी एकाच संघाच्या दहा गिर्यारोहकांनी कांचनजुंगा शिखरमाथा गाठल्याचा विश्‍वविक्रमही प्रस्थापित झाला. या महत्त्वाकांक्षी आणि ऐतिहासिक मोहिमेचा, मला भाग होता आले याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. एव्हरेस्ट नंतरच्या सहा वर्षांच्या मोठ्या विश्रांतीनंतरही माझ्यावर विश्‍वास दाखवून या मोहिमेत कामगिरी करण्याची संधी दिल्याबद्दल मोहिमेचे नेते उमेश झिरपे अर्थात मामांचे आणि ‘गिरीप्रेमी’ संस्थेचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. तसेच या मोहिमेच्या यशामागे भक्कमपणे उभ्या असलेल्या महाराष्ट्रातील सर्व साहसप्रेमी हितचिंतकांचा मी सदैव ऋणी राहीन.

संबंधित बातम्या