कट्टा : १३ जानेवारी

कलंदर
गुरुवार, 11 जानेवारी 2018

कट्टा

राजकारणातही गमतीजमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...    –  कलंदर
 

विराट-अनुष्का विवाह!

राजधानीतल्या चाणक्‍यपुरी या कूटनीती परिसरात किंवा ‘डिप्लोमॅटिक एन्क्‍लेव्ह’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात असलेल्या ताज पॅलेस या भव्य पंचतारांकित हॉटेलात विराट कोहली व अनुष्का शर्मा यांच्या विवाहाचा स्वागत समारंभ पार पडला.
या हॉटेलातील दरबार हॉलमध्ये समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधानांसोबत राजकारण, उद्योगक्षेत्र, राजनैतिक क्षेत्र, परदेशांचे राजदूत अशा मोजक्‍या परंतु अतिअतिविशिष्ट मंडळींपुरताच हा समारंभ मर्यादित होता.
या समारंभाला एवढी ‘हाय व्होल्टेज’ मंडळी येणार असल्याने सुरक्षा व्यवस्थादेखील तेवढीच कडेकोट असणार हेही अपेक्षितच होते.
या समारंभाची निमंत्रणपत्रिका मिळणे म्हणजे या विविध क्षेत्रांतल्या तारे-तारकांच्या तारांगणात तरंगण्याचा अनुभव मिळण्यासारखेच होते.
राजधानीत अशी निमंत्रणे मिळवून त्या समारंभात प्रवेश करून आपला कार्यभाग सिद्धीस नेणारे असंख्य ‘घुसखोर’ असतात.
अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुभवानुसार त्यांच्या मुलीच्या लग्नात जवळपास चारशे घुसखोरांनी त्यांच्या सौजन्याचा फायदा उठवल्याचे त्यांच्या मागाहून लक्षात आले.
पण विराट आणि अनुष्का पडले आधुनिक जोडपे. त्यांना सल्ला देणारी मंडळीदेखील चाणाक्ष असावीत.
त्यांनी निमंत्रणपत्रिकेबरोबरच एक स्मार्टकार्डपण निमंत्रितांना दिले होते. ते कार्ड खिशात असले तरी त्यातील चिपमुळे प्रवेशद्वारावरील सेन्सरमध्ये संबंधितांची माहिती येऊन ओळख पटवणे व प्रवेश सुलभ करण्यात आला होता.
त्यामुळे नुसती पत्रिका मिळूनही फारसा उपयोग नसल्याने घुसखोरांची पंचाईत झाल्याचे सांगण्यात आले.
या समारंभात सहभागी झालेल्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या कडक निर्बंधांमुळे प्रत्यक्ष हॉलमध्ये गर्दी अत्यंत कमी होती. तसेच वर-वधूकडील कुटुंबे व येणारे जाणारे अतिविशिष्ट अतिथी वगळता चक्क शुकशुकाट होता.
असो, नवदांपत्यासह थोडासा एकांत व निवांतपणा हवाच ना! 

वेंकय्या नव्या अवतारात!
आपले उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू.
ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापतीही आहेत.
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने त्यांच्या या नव्या अवतारात ते राज्यसभेपुढे अवतीर्ण झाले आहेत.
गेल्या अधिवेशनापर्यंत ते मंत्रिमंडळात होते व सक्रिय 
सदस्य होते. शाब्दिक कोट्या करण्यात पटाईत असलेल्या 
नायडूंनी सभापती झाल्यानंतरही आपल्या सवयीत बदल केलेला नाही.
‘इफ यू कोऑपरेट देन ओन्ली वुई कॅन ऑपरेट स्मूथली’! म्हणजे तुम्ही सहकार्य केले तर कामकाज सुरळीतपणे चालेल हा त्यांचा मूलमंत्र आहे. 
गेल्या आठवड्यातच एक सदस्य शून्य काळात आक्रमक झाले होते. नायडू यांनी तत्काळ त्यांना फटकारले. ‘ये आप झिरो आवर में हिरो बनने की कोशिश मत करिये !’
नायडू हे अत्यंत उत्साही आहेत. ते जवळपास सर्व वेळ सभागृहाच्या कामकाजाचे संचालन करताना आढळतात.
यापूर्वी सर्वसाधारणपणे सभापती हे प्रश्‍नोत्तराचा तास, एखादी अतिमहत्त्वाच्या विषयावरील चर्चा किंवा पंतप्रधानांचे भाषण असेल तरच उपस्थित राहात असत. पण नायडू यांनी मात्र उपसभापती पी. जे. कुरियन यांना फारसा वाव ठेवलेला नाही अशीच कुजबूज ऐकू येते.
नायडू हे त्यांचे अस्तित्व सतत जाणवून देत असतात. 
सदस्याने प्रश्‍न विचारल्यानंतर सामान्यतः मंत्री आपण होऊनच उठून उत्तरे देतात. पण नायडू मात्र सदस्याच्या प्रश्‍नानंतर ‘मंत्री जी’ म्हणून संबंधित मंत्र्यांचे लक्ष वेधतात, जणू काही ते आदेशच देत आहेत.
गेल्या आठवड्यात राज्यसभेत गोंधळामुळे फारसे कामकाज झाले नाही. शुक्रवारी सव्वा अकरा वाजताच नायडू यांनी, ‘आज कुणी सदस्य काम करण्याच्या मनःस्थितीत दिसत नाहीत. तशीही पुढे चार दिवस सुटी आहे. बहुधा सगळ्यांना घरी लवकर जाण्याची घाई असावी’ असे म्हणून चक्क दिवसभरासाठी कामकाज तहकूब करून टाकले.
एके दिवशी नायडू हे कामकाज तहकूब करण्याची घोषणा करेपर्यंत सभागृहनेते अरुण जेटली फायली घेऊन बाहेर जाण्याच्या तयारीत उभे राहिले. तेव्हा नायडू यांनी आपले वाक्‍य अर्धे तोडून, ‘जरा थांबा’ म्हणून त्यांना थांबवले आणि मगच तहकुबीची घोषणा केली.
ही नायडूंची खास शैली !

सिनेमा पाहण्याचीही चोरी?
गुजरातच्या निकालानंतर राहुल गांधी हे सिनेमा पाहायला गेले. त्यांनी स्टार वॉर सिनेमा पाहिला.
राहुल गांधी यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून त्यांची बदनामी, चेष्टा, टिंगल-टवाळी करणाऱ्या प्रचारकांच्या टोळ्यांना तो विषयही पुरला.
एका महान वृत्तवाहिनीने तर ‘राष्ट्राला माहिती हवीय’ म्हणून चक्क त्यावर कार्यक्रमच केला.
दुसरीकडे प्रचारकी टोळक्‍यांनी सोशल मीडियावर मोहीम सुरू केली. पण तोपर्यंत त्याला प्रत्युत्तर मिळू लागले.
१९६८ मध्ये दिल्ली महानगर परिषदेतल्या जनसंघाच्या पराभवानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवानी हे दोघे नेते चक्क राजकपूर-माला सिन्हा यांच्या ‘फिर सुबह होगी’ सिनेमाला गेल्याची माहिती फिरू लागली.
त्यानंतरच वाजपेयींना ‘आओ फिरसे दिया जलाएं’ ही कविता लिहिण्याची स्फूर्ती मिळाली ही माहितीही उजेडात आली.
पण हे चक्र येथेच थांबले नाही.
साक्षात प्रधानसेवकांनीदेखील गुजरातच्या एका निवडणुकीनंतर पूर्ण मंत्रिमंडळासह एक सिनेमा पाहिल्याची माहितीही जेव्हा सोशल मीडियावर झळकू लागली तेव्हा प्रचारकी टोळक्‍यांचा आवाज बंद झाला.
राहुल गांधी यांच्या टिंगलीचा प्रकार बंद झाला.
जय हो! 

सगळीकडे गुजरातच गुजरात!
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला झटका बसला. शेपटीवर निभावले म्हणतात तसा निसटता विजय मिळवून पक्षाला सहाव्यांदा सत्ता मिळाली आणि त्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला !
परंतु राजधानीत गुजरातचा दबदबा कायम आहे. 
गुजरातचे ‘साहेब’ देशाचे पंतप्रधान नाही प्रधान सेवक असताना सगळीकडे गुजरातचा झेंडा फडकावला गेलाच पाहिजे.
‘साहेबां’ना खूष करण्याची एकही संधी गमावली जात नसल्याचे आढळून येते.
संसदेचे हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबरला सुरू झाले.
१८ डिसेंबरला संसदेच्या कॅंटीनमध्ये अचानक नवा 
‘मेनू’ सादर केला गेला. ‘स्पेशल ऑफ द वीक’, ‘गुजरात क्विसिन’ असे इंग्रजीत लिहिले होते. हिंदीत ‘सप्ताह का 
विशेष’, ‘गुजरात भोजन’ असे लिहिले होते. रंगीबेरंगी अशा या कार्डावर गुजराती खाद्यपदार्थांची यादी दिली होती. खमण, वाटाणा समोसा, बटाटा वडा, फाफडा-फ्राइड मिर्च के साथ, दुधी ना मुठिया, मेथी गोटा, थेपला, पाव भाजी, दाल वडा, पोहा !
व्वा व्वा !
अचानक हे कसे काय घडले बुवा ?
संसदेतल्या अन्न-समितीचे (फूड कमिटी) अध्यक्ष जितेंद्र रेड्डी आहेत.
त्यांना हे माहीतच नव्हते.
त्यांनी थेट लोकसभा अध्यक्षांना जाब विचारला !
असे कळले, की रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी लोकसभा अध्यक्षांशी बोलूनच हे गुजराती पदार्थ कॅंटिनमध्ये सादर करण्याचा घाट घातला होता. आता पियुष गोयल यांचा संबंध काय? तर संसदेतले कॅंटीन रेल्वे खात्यातर्फे चालवले जाते. गोयल सध्या रेल्वेमंत्री आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अनेक खासदारांनी त्यांच्या राज्यातल्या खाद्यपदार्थांना संसदेत संधी मिळत नसल्याची तक्रार केली होती. मग त्यांनी ‘आयडिया’ काढली की संसदेचे अधिवेशन असताना दर आठवड्याला एकेका राज्यातल्या खाद्यपदार्थांचा खाद्य उत्सव साजरा करायचा!
सुरवात कुणापासून? अर्थातच गुजरातपासून!
आता सध्याचे अधिवेशनच तीन आठवड्याचे असल्याने केवळ तीन राज्यांनाच संधी मिळणार आहे. गुजरातनंतर आता काश्‍मीर आणि शेवटच्या आठवड्यात ओडिशाचा नंबर लावण्यात आला आहे.
तर विश्‍वासात न घेतलेल्या जितेंद्र रेड्डी यांना लोकसभा अध्यक्षांनी शांत केले. यातही काही गमतीजमती घडल्याच !
गुजरात भवनातील कॅंटिनला गुजराती थाळी संसदेला पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली होती पण त्यांनी असमर्थता व्यक्त केली व केवळ खाद्यपदार्थ पाठविण्याचे त्यांनी मान्य केले. गुजरात भवनातील कॅंटीन चालविणारी व्यक्ती दाक्षिणात्य असल्याची माहितीही मिळतेच. पण जोपर्यंत ‘साहेब’ आहेत तोपर्यंत गुजराती पदार्थांना दिल्लीत भरपूर वाव मिळेल, असा अंदाज करायला हरकत 
नाही!

संबंधित बातम्या