कट्टा

कलंदर
गुरुवार, 25 जानेवारी 2018

कट्टा

राजकारणातही गमतीजमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...    –  कलंदर
 

हा रवी उगवला का नाही ??
आधार कार्डाची संगणकीय सुरक्षा ही अभेद्य असल्याचा दावा आधार प्राधिकरण आणि केंद्र सरकारने असंख्य वेळा केलेला आहे. पण चंडीगड येथील ‘ट्रिब्युन’ या वृत्तपत्राच्या रचना खैरा या महिला बातमीदाराने ‘आधार’ची अभेद्यता सांगितली जाते तेवढी ‘अभेद्य’ नाही हे दाखवून दिले. ‘आधार’ कार्डाची सुरक्षा ही अभेद्य नाही हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले.
ही बातमी या वृत्तपत्राने प्रसिद्ध केल्यानंतर सरकार दरबारी खळबळ उडणे स्वाभाविकच होते. ज्या दिवशी बातमी प्रसिद्ध झाली त्यादिवशी सरकारने व आधार प्राधिकरणाने भला मोठा खुलासा जारी केला.
परंतु त्याने कोणाचे समाधान झाले नव्हते. बातमीची चर्चा सुरू झाली होती.  अखेर सरकारने नेहमीचे अस्त्र उपसले.
ज्या पत्रकाराने सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. त्या पत्रकार महिलेविरुध्दच ‘एफआयआर’  - ‘फर्स्ट इन्फर्मेशन रिपोर्ट’ दाखल करण्यात आला.  कमाल आहे. जो सावध करायला गेला त्यालाच बंदिवान करण्याचा हा प्रकार झाला. चोर सोडून संन्याशाला फाशी ????
यामुळे राजधानीसह देशातल्या सर्व प्रमुख पत्रकार संघटनांनी या प्रकाराविरुद्ध आवाज उठविला आहे. यापुढची गंमत ऐकण्यासारखी आहे.
दिल्लीच्या प्रेस क्‍लब ऑफ इंडियाने कायदा व माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांचा ‘मीट द प्रेस’ कार्यक्रम ९ जानेवारीला आयोजित केलेला होता. ‘ट्रिब्युन’च्या घटनेनंतर ही पत्रकार परिषद होणार होती. आणि ‘आधार’ हे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी निगडित आहे तसेच ते देशाचे कायदामंत्रीही आहेत. त्यामुळे पत्रकारांनी त्यांना या कार्यक्रमात प्रश्‍न विचारण्यासाठी कंबर कसणे स्वाभाविकच होते.
पण, पण, पण, पण...........................
आदल्याच दिवशी म्हणजे ८ जानेवारीला रविशंकर प्रसाद यांच्या कार्यालयाने हा कार्यक्रम पुढे ढकलल्याचे प्रेस क्‍लबला कळविले. म्हणजे हा कार्यक्रम ९ तारखेला होणार नाही व नवीन तारीख मागाहून कळविण्यात येईल असे सांगण्यात आले.
आता सर्व पत्रकार वर्तुळात हीच चर्चा आहे की ‘हा रवी उगवला का नाही ?’ कारण उघड आहे. पत्रकारांनी या विषयावरून आपल्याला घेरु नये म्हणून त्यांनी माघारीचा मार्ग स्वीकारला.
आता ते हा एफआयआर रद्द करवतील किंवा या विषयाची चर्चा शांत झाली की मगच प्रेस क्‍लबच्या कार्यक्रमात येतील असा अंदाज व्यक्त होत आहे.

नववर्षारंभ आणि भोजने
राजधानी दिल्लीत वर्षअखेरीच्या मेजवान्या असतातच.
पण, नववर्षाच्या स्वागतासाठीदेखील जानेवारी महिन्यात विविध नेते, पक्षोपपक्ष हे भोजनाचे आयोजन करत असतात.
यावर्षी संसदेचे लांबलेले हिवाळी अधिवेशन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालले. त्यामुळे यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नववर्षाचे भोजन त्यांनी पहिल्या आठवड्यातच उरकले.
जेटली यांच्या भोजनाची खासियत असते. ते संसदेतल्या त्यांच्या कार्यालयातच पत्रकारांना, मंत्र्यांना भोजनासाठी पाचारण करतात.
शुद्ध शाकाहारी भोजन असते. त्यांना आवडणारे अमृतसरी नान व कुलचे, छोले, फिरनी असा खास पंजाबी बेत असतो.
यावेळी बहुधा निमंत्रणे देण्यात काहीतरी गडबड झाली असावी.
संसदेतल्या मध्य कक्षात जेटली व पत्रकारांचा एक अड्डा असतो. त्यातले बरेच पत्रकार गायब असल्याचे पाहून त्यांनी एका निकटच्या पत्रकाराला चक्क मध्यकक्षात फोन करायला लावून ‘अरे सगळे गेले कुठे’ अशी चौकशी करायला लावली. हे त्यांचे भोजन सर्वपक्षीय असते.
त्यामुळेच ५ जानेवारीला त्यांच्या या भोजनाच्या दिवशीच राज्यसभेतले काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांचा वाढदिवसही होता.
काय ? जेटली यांनी त्यांच्यासाठी वाढदिवसाचा केकही मागविला होता आणि शर्मा यांनीही तो कापून वाढदिवस साजरा केला.
तर जानेवारीत अशी भोजनाची रेलचेल असते. 
वेंकय्या नायडू आता उपराष्ट्रपती झाले आहेत त्यामुळे यावर्षी ते काय करतात कुणास ठाऊक ? पण यापूर्वी त्यांच्याकडेही भोजन असे.
काँग्रेसचे दिल्लीचे नेते सज्जनकुमार यांचे दुपारचे भोजन हे देखील दिल्लीच्या राजकीय वर्तुळातील एक खास प्रकरण असते.
पूर्वी जयपाल रेड्डी हे देखील खास आंध्र पद्धतीचे भोजन आयोजित करीत असत. आता ते संसदेत नाहीत. त्यामुळे बहुधा ते होण्याची शक्‍यता नाही. राजधानीतील ही भोजने म्हणजे केवळ खाऊगिरी नसते ! भोजन हे एक निमित्त ‘बहाणा’ असतो. त्यानिमित्ताने आणि विशेषतः मनपसंत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना नेते मंडळींची ‘जिव्हा’ आणि ‘वाणी’ही सैल होते आणि पत्रकारांना भरपूर माहिती मिळते. अशी भोजने हा देखील एक संपर्काचा आणि माहिती मिळवण्याचा एक मोठा स्रोत असतो ! परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज याही दरवर्षी नववर्षाचे भोजन आयोजित करीत असतात. परराष्ट्र मंत्रालयाच्या नव्या कार्यालयाच्या हिरवळीवर हा समारंभ असतो. सुषमा स्वराज परराष्ट्रमंत्री असल्याने त्यांच्या भोजनाला परदेशी पत्रकारही हजर असतात. त्यामुळे या निमित्ताने त्यांना खास भारतीय खाद्यपदार्थांशी ओळख करून देण्याचा हा प्रसंग असतो. हो, कारण ‘डिप्लोमसी’ किंवा ‘कूटनीती’ म्हणजेच ‘मुत्सद्देगिरी’च्या क्षेत्रात भोजनालाही एक वेगळे महत्त्व दिले जाते. यावर्षीही स्वराज यांनी उत्तर व दक्षिण भारतीय पदार्थांचा समावेश करून राष्ट्रीय भोजन एकात्मता साधलेली होती. अनेक पत्रकारांच्या टेबलावर जाऊन त्यांनी गप्पा मारल्या. थोडक्‍यात ही भोजने हा देखील पत्रकारांच्या बातमीदारीचा भाग झालेली आहेत.
चला, पाहू आता कुणाचे निमंत्रण आहे ते?

‘आप’चे राज्यसभेत पदार्पण
दिल्लीतून राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होत आहे.
यापूर्वी या तिन्ही जागा काँग्रेसकडे होत्या. डॉ.करणसिंग, जनार्दन द्विवेदी आणि परवेझ हाशीम हे काँग्रेसचे तीन सदस्य निवृत्त होत असून त्यासाठी दिल्लीत निवडणूक होणार आहे.
दिल्ली विधानसभेत ‘आम आदमी पार्टी’ ऊर्फ ‘आप’चे महाकाय बहुमत असल्याने या तिन्ही जागांवर त्यांचेच उमेदवार निवडून येणार हेही उघड आहे.
पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचे प्रवक्ते संजयसिंग, दिल्लीतील एक उद्योगपती व शिक्षणसंस्थाचालक सुशील गुप्ता आणि प्रख्यात करसल्लागार, चार्टर्ड अकाउंटंट नारायणदास गुप्ता यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
संजयसिंग हे पक्के ‘आप’चे आहेत पण उरलेल्या दोघांची पार्श्‍वभूमी मनोरंजक आहे.
सुशील गुप्ता हे काँग्रेसी आहेत. त्यांनी काही महिन्यापूर्वीच ‘आप’मध्ये प्रवेश केला. यापूर्वी ते केजरीवाल विरोधी मोहिमेत सक्रिय होते.
नारायणदास गुप्ता हे ‘आप’ला करविषयक तसे त्यांना प्राप्तिकर विभागाच्या आलेल्या नोटिसा वगैरे आर्थिक मामल्यांमध्ये सल्ला व मदत करीत असतात. ते अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निकटचे मानले जातात. सध्या जेटलींनी केजरीवाल यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा लावलेला आहे हे येथे विशेषत्वाने नमूद करावे लागेल.
थोडक्‍यात केजरीवाल यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा उद्योग केला आहे.
बंडखोर कुमार विश्‍वास यांनाही त्यांनी त्यांची जागा दाखवून दिली.
आता हे तिघे राज्यसभेत कुणाला साथ देतात त्याकडे सर्वांचे लक्ष राहील !  

राहुलच्या पराभवासाठी कसली कंबर!
लोकसभा २०१४च्या निवडणुकीत अमेठी मतदारसंघात राहुल गांधी यांच्या विरोधात ‘तुलसी’ ऊर्फ स्मृती इराणी यांनी निवडणूक लढवली होती. त्या हरल्या. थोडक्‍या मतांनीच राहुल विजयी झाले.
स्मृती इराणी या राज्यसभेत सदस्या होत्या. या त्यांच्या पराक्रमाबद्दल त्यांना केंद्रात मंत्री करणे स्वाभाविकच होते.
प्रथम त्यांना मनुष्यबळ विकास मंत्रालय देण्यात आले होते. पण तेथे त्या वादग्रस्त ठरल्यानंतर त्यांना तेथून बदलून वस्त्रोद्योग आणि आता माहिती व प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली.
अमेठीची लोकसभा निवडणूक हरून देखील त्यांनी त्या मतदारसंघाशी आपला संबंध तोडलेला नाही.
उलट तो अधिकाधिक घनिष्ठ केलेला आहे.
त्यांनी म्हणजे शपथ घेतली आहे की राहुल गांधी यांना अमेठीतच २०१९ मध्ये पराभूत करायचे !
यासाठी त्यांनी थेट ‘वर’पासून मदत केली जात आहे. सर्वशक्तिमान नेत्याचा त्यांना आशीर्वाद व वरदहस्त असल्यानंतर त्यांना घाबरण्याचेच काही कारण नाही. उलट त्यांनाच सगळे घाबरून असतात म्हणे !
तर त्यांनी त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी अमेठीतील लोकांसाठी नियमित संपर्क केंद्र स्थापन केले आहे. महिन्यातून दोन दिवस त्यांनी अमेठीतल्या लोकांसाठी राखून ठेवलेले असतात. तसेच तेथील मतदारांच्या मुलांना शाळा-कॉलेज प्रवेशासाठी, रुग्णालय प्रवेश, वैद्यकीय या सर्व मदतीसाठी त्यांनी त्यांच्या एका खास सहाय्यकाची नेमणूक केली आहे. नुकतेच अमेठीमधील स्थानिक कार्यकर्ते दिल्लीत येऊन त्यांना भेटले. त्यांची सर्व कामे झाल्यानंतर त्या प्रत्येकाला एक बॅग देण्यात आली. पुरुषासाठी कपडे, महिलेसाठी साडी, मिठाई आणि इतरही काही छानछान वस्तूंनी ती बॅग परिपूर्ण होती. या मंडळींशी भेटताना त्यांनी त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. त्यातील काही अडचणींसाठी त्यांनी थेट अर्थमंत्र्यांशी संपर्क साधला. एवढेच नव्हे तर या मंडळींना अर्थमंत्र्यांबरोबर भेटही घालून दिली. अर्थमंत्री म्हणे स्मृती इराणी यांच्या निवासस्थानी गेले होते. आणखीही एका मंत्र्यांना पाचारण करण्यात आले होते असे समजले.
अमेठी मधल्या लोकांवर सध्या मदतीचा वर्षाव सुरू आहे. अनेकांना नोकऱ्यांचे आश्‍वासन देण्यात आले आहे आणि काहींना तर नोकऱ्या दिल्या गेल्याही आहेत. थोडक्‍यात अमेठीवासीयांची चंगळ सुरू आहे !  राहुल गांधी यांच्या दृष्टीने ही धोक्‍याची घंटा आहे. ते कुणाला भेटत नाहीत ही बाब त्यांच्या विरोधात जाणारी आहे.
असे गृहीत धरू की राहुल गांधी २०१९ मध्ये अमेठीतून हरले ! पुढे काय ? स्मृती इराणी कायम अमेठीतूनच निवडणूक लढतील काय ? आणि त्या एकदा निवडून आल्यानंतर अमेठीवासीयांचे हे लाड पुढे सुरू राहतील काय ? 
याची उत्तरे ज्याची त्याने शोधावीत !
तोपर्यंत अमेठीच्या लोकांनी जे मिळतेय ते पदरात पाडून मोकळं व्हावं हे चांगलं !!!!

संबंधित बातम्या