कट्टा

कलंदर
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

राजकारणातही गमतीजमती घडत असतात. 
अशाच काही गमती सांगणारे सदर...    –  कलंदर

मंत्र्यांची पतंगबाजी!
जानेवारी महिना हा दिल्लीतल्या राजकीय वर्तुळातील भोजनासाठी विशेष प्रिय मानला जातो हे एव्हाना वाचकांना माहिती पडलेलेच आहे.
छान थंडी असते. त्यात शनिवार असेल तर कामही तसे कमीच असते. दुपारचे ऊन अंगावर घेत गरमगरम भोजनाचा आस्वाद मोकळ्या आकाशाखाली घेण्यासारखे दुसरे सुख, आनंद नाही.
नुकत्याच गेलेल्या शनिवारी दुपारी दिल्लीतले भाजप नेते व केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनी दुपारचे भोजन त्यांच्या बंगल्यामागील हिरवळीवर आयोजित केले होते.
खास दिल्लीच्या पदार्थांसाठी त्यांचे भोजन प्रसिद्ध आहे.

चांदणी चौकातील चाट, गोलगप्पे, आलू टिक्की, मुंग दाल का चिल्ला, दही-भल्ला, मुळे-गाजर टोमॅटो यांची कच्ची चाट, तसेच पुरानी दिल्लीतील मूगवडे(मंगोडे), मिक्‍स छोले-पालक-चावल, बेडमी पुरी व बटाटा रस्सा भाजी, मक्के की रोटी सरसों का साग, मिस्सी रोटी मटर पनीर इ. इ. पक्वान्नाखेरीज पंगत पूर्ण होणे शक्‍यच नाही. मग वेगवेगळ्या स्वादाच्या कुल्फी, जिलबी व रबडी मिक्‍स आणि सुप्रसिध्द गाजर हलवा !  याखेरीज पुरानी दिल्लीत केवळ हिवाळ्यातच मिळणारी ‘दौलत की चाट’ हा एक प्रकारही विलक्षण सुखद होता.

आटीव दुधाची साय आणि फेस एका मातीच्या भांड्यात जमा केले जाते. त्यावर बदाम-पिस्त्याची फूड व किंचितशी गुळाची पावडर भुरभुरली जाते. विलक्षण नजाकतीचा हा प्रकार असतो. खायला देखील तितकाच सुखकारक ! चमच्याने तोंडात घास गेल्यावर तो विरघळतच पोटात प्रवेश करतो आणि जिव्हेवर राहते ती आनंदकारक चव !

अर्थात वाचकांच्या तोंडाला पाणी आणण्याचा हा प्रयत्न नाही.
पण, गोयल हे विशेष रसिक आहेत. गेल्या वर्षी त्यांनी स्वतः गाणे गायले होते. पण यावर्षी त्यांनी छोटासा वाद्यवृंद ठेवून मंद संगीताची सोय केलेली होती. कानावर आक्रमण न करणारे व माफक ध्वनीच्या संगीताने परस्परांशी गप्पा मारण्यात अडचण येत नव्हती.

यानिमित्ताने गोयल यांनी पतंग, मांजा, धागा अशा सोयीही करून ठेवल्या होत्या. ज्यांना पतंगबाजी करण्याची लहर येईल त्यांच्यासाठी ही सोय होती. सैलावलेल्या पत्रकारांनी त्याचा फायदा उठवला.

स्वतः गोयलही मैदानात उतरले. त्यांच्याबरोबर साक्षात अर्थमंत्री अरुण जेटलीही उतरले व त्यांनीही काही काळ पतंगाची उडवाउडवी केली. ही पतंगबाजी त्यांनी आगामी अर्थसंकल्पात करू नये म्हणजे मिळवली! पण या निमित्ताने नेहमी कामाच्या तणावाखाली असलेले पत्रकार, राजकारणी, मंत्री यांनी काहीसा तणावमुक्त होण्याचा प्रयत्न केला.

भाजपचे दिल्ली विधानसभेतील गटनेते विजेंद्र गुप्ता यांनीही काही काळ पतंग उडवला. वरिष्ठ नेते रामलाल यांनी वरिष्ठ पत्रकारांबरोबर गप्पांचा फड जमवला.
पण गोयल यांच्या भोजनाच्या आधीच दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनीही भोजन ठेवले होते त्याला गोयल निमंत्रित नव्हते. गोयल यांच्या भोजनाला तिवारी अनुपस्थित होते. गोयल दिल्लीचे असले तरी दिल्लीच्या राजकारणात त्यांना फारसा हस्तक्षेप करू दिला जात नाही व त्यामुळेच तेही दिल्लीच्या स्थानिक नेत्यांना महत्त्व देत नाहीत!
असो, भोजन व एकंदरच कार्यक्रम मस्त झाला. 

सलोखा आणि क्षुधाशांति?
सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांच्या विरोधात अभूतपूर्व असा जाहीर असंतोष प्रकट केला. यानंतर हा पेच मिटविण्याच्या हालचाली सुरू होणे स्वाभाविक होते. कारण अजूनही जनता ज्या काही हाताच्या बोटावर मोजता येतील अशा संस्थांवर विश्‍वास ठेवते त्यात न्यायसंस्थेचा समावेश होतो.

सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज रोज सुरू होण्यापूर्वी सरन्यायाधीशांकडे सर्व न्यायमूर्ती चहापानाला जमतात. त्यामध्ये त्या दिवसातील संभाव्य घडामोडींचा आढावा घेऊन मग हे न्यायमूर्ती आपापल्या न्यायालयांकडे रवाना होतात. परंतु त्यात पेच सुटू शकला नाही.
दर बुधवारी सर्व न्यायमूर्तींचे एक अनौपचारिक भोजन असते. याचे वैशिष्ट्य असे की प्रत्येक न्यायमूर्ती त्याच्या प्रदेशातील काही खास व वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ त्यात सादर करतात.

गेल्या बुधवारी न्यायमूर्ती एन.व्ही रामण्णा यांनी सर्वांसाठी खास दाक्षिणात्य इडली सांबार सादर केले. तेव्हाच सरन्यायाधीशांना काहीतरी मनाला खटकले. रामण्णा हे वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत.
हा पेच सोडविण्यासाठी काही न्यायाधीशांनी पुढाकार घेतला होता. सरन्यायाधीशांनीही त्यांना तसे सूचित केले असावे. परंतु त्यात रामण्णा यांचा समावेश नव्हता. इडली सांबार चाखतानाच सरन्यायाधीशांच्या लक्षात ही गोष्ट आली व त्यांनीही या प्रक्रियेत रामण्णा यांना समाविष्ट केले. सरन्यायाधीशांना या प्रक्रियेत मदत करणाऱ्या तीन न्यायाधीशांमध्ये शरद अरविंद बोबडे, उदय ललित व धनंजय चंद्रचूड यांचा समावेश आहे. या तिघांमधील समान धागा म्हणजे तिघेही मराठी आहेत.

थोडक्‍यात, चहापान, भोजनाच्या माध्यमातून हा पेच आगामी काळात कसा सुटतो ते पहावे लागेल. 
पेच कोणत्याही मार्गाने का होईना पण सुटणे आवश्‍यक आहे !
तो पर्यंत पाहू रे किती वाट? 

नवी संपर्क मोहीम?

जाहीर सभा-भाषणांमधून थेट जनतेशी संवाद साधण्यावर भर देणारे व त्यास प्राधान्य देणारे काही नेते असतात. त्यांचा त्यांच्या वक्तृत्वावर नितांत विश्‍वास असतो आणि वाणीच्या जोरावर निवडणुकांचा रोख आपल्याकडे वळविण्याची क्षमता असल्याचा या नेत्यांचा दावा असतो. यामुळे त्यांच्या दृष्टीने माध्यमांना म्हणजेच वृत्तपत्रे किंवा वृत्तवाहिन्या यांची त्यांच्या लेखी फारशी किंमत नसते.

परंतु कधीकधी वातावरण प्रतिकूल होऊ लागते तेव्हा या नेत्यांना माध्यमांची आठवण येते. जाहीर भाषणांपेक्षा मुलाखतींमधून संदेश देण्यात विश्‍वसनीयता अधिक असते. जाहीर भाषणांमध्ये ‘जुमलेबाजी’ असल्याने त्यावर लोक कमी विश्‍वास ठेवतात. मग ही नेते मंडळी त्यांच्या पसंतीच्या माध्यमांना मुलाखती देऊन वातावरणनिर्मिती करू लागतात.

सध्या हा प्रकार सुरू झालेला आढळतो. प्रधान सेवकांनी भारतीय वृत्तवाहिन्यांना मुलाखती देण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्यांना असे मधूनच करायला आवडते.
आता अलीकडेच त्यांनी त्यांच्या खास पसंतीच्या दोन वृत्तवाहिन्यांना लागोपाठ मुलाखती दिल्या. निवडही अचूक होती. हिंदी व इंग्रजी वृत्तवाहिन्यांची निवड करण्यात आली. 

या मुलाखतींमधून प्रधान सेवकांनी एक दोन सूचक गोष्टी मांडल्या. आपल्या कामाचे मूल्यमापन केवळ नोटबंदी व जीएसटीची अंमलबजावणी या दोन मुद्यांच्या आधारे करू नका असे त्यांनी सांगितले. म्हणजेच या दोन्ही निर्णयाचे अपेक्षित चांगले परिणाम झालेले नाहीत याची जाणीव त्यांना आहे पण ते जाहीर कबूल करण्याची तयारी नाही किंवा हिंमत नाही. इतर कामांच्या आधारे मूल्यमापन करा असे त्यांचे म्हणणे आहे.

असो, ज्यांना मूल्यमापन करायचे ते करतील पण प्रधान सेवक अचानक बोलू लागले हे विशेष! पत्रकार, माध्यमांना दूर अंतरावर ठेवणाऱ्या प्रधान सेवकांना अचानक ही उपरती होण्याचे कारण काय?

खुलासा तेच करू शकतील. त्यांचे अतिविश्‍वासू सहकारी, साथीदार पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यातही काही बदल आढळू लागले आहेत.

अमित शहा राज्यसभेत आले आहेत. त्यामुळे अधिवेशनकाळात ते संसदेत नियमितपणे येत असतात. कारण खासदारांवर देखरेख ठेवण्यासाठी त्यांना हे करणे भाग झाले आहे.

संसदेत अधिवेशनकाळात पत्रकार व नेतेमंडळींचे अनौपचारिक गप्पांचे अनेक फड कुठे ना कुठे जमत असतात. कधी एखाद्या मंत्र्याच्या किंवा नेत्याच्या खोलीत किंवा इतरत्रही!

अलीकडेच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात अमित शहा यांनी लागोपाठ पत्रकारांमध्ये मिसळून ब्लॅक कॉफीबरोबर भरपूर गप्पा मारल्या. मनमोकळेपणाने अगदी अवघड प्रश्‍नांनाही उत्तरे दिली. तसेच काहीही न छापण्याच्या अटीवरही गप्पा मारल्या. त्यांच्यातला हा बदल स्वागतार्ह असल्याचे मत वरिष्ठ पत्रकारांनी व्यक्त केले.

पण लोकसभेच्या आणि इतरही महत्त्वाच्या निवडणुका जवळ येत चाललेल्या आहेत. माध्यमांशी चांगले संबंध राखणे हाही निवडणूक रणनीतीचा भाग असावा. त्यामुळेच या दोन नेत्यांनी वेगळी पावले टाकायला सुरवात केलेली दिसते! 

पद्मावतीचा फटका
कलास्वातंत्र्य वगैरे न मानणाऱ्या महाभागांचे सध्या सुगीचे दिवस आहेत.
जेवढे टोकाचे जुनाट, सनातनी विचार तेवढे अधिक महत्त्व मिळण्याचे सध्याचे दिवस आहेत.
पूर्वीचे लोक संयमी व विचारी होते त्यामुळे मुघले आझमसारख्या अमर कलाकृती निर्माण होऊ शकल्या अन्यथा त्यांनाही पुराणमतवाद व फुटकळ अस्मितांच्या फूटपट्ट्या लावून ते सिनेमे बंद पाडले गेले असते.

पद्मावती सिनेमा दिल्लीतल्या नोईडा येथील मल्टिप्लेक्‍समध्ये सुरू होण्याची माहिती मिळताच या चित्रपट विरोधकांच्या अस्मिता उफाळून येणे अपेक्षितच होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयालाही धुडकावणारे हे नव-दहशतवादी आहेत. त्यांना राजस्थानसारखी भाजपशासित राज्ये पाठिंबा देत आहेत. त्यामुळे ते बेगुमान धुडगूस घालत आहेत.
तर या मोकाट चित्रपट विरोधकांनी दिल्ली व नोईडा यांना जोडणारा जो प्रमुख रस्ता आहे तोच अडवला, तेथील टोलनाके पेटवले. नोएडात चित्रपटगृहांचीही नासधूस केलीच.
यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली.
यात कोण अडकावे?

साक्षात लालकृष्ण अडवानी! देशाचे माजी उपपंतप्रधान व गृहमंत्री! त्यांना झेड प्लस सुरक्षा आहे.
हा प्रकार कळताच दिल्ली पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी गेली.
पोलिस येत आहेत हे कळताच हे शूरवीरतेचा वारसा सांगणारे चक्क पळून गेले की हो!
पण पोलिस गेले आणि त्यांनी रस्ता साफ करून अडवानी यांची सुटका केली.
जय हो! 

संबंधित बातम्या